मनी नको हे वैफल्याचे शल्य...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |



जेव्हा तुम्ही तुमच्या परिस्थितीबद्दल नाराज आहात, पण तरीही तुम्हाला तुमचे इप्सित साध्य करायचे आहे, तेव्हाच तुम्ही तुमची पूर्ण ताकद पणाला लावता आणि नक्की काय हरवले आहे वा नक्की काय शोधले पाहिजे, याचा विचार करता. त्यातूनच समस्येची उकल होण्यास सुरुवात होते.


'विफलता' आणि 'नैराश्य' या दोन भावना, हे दोन टप्पे बरेचदा आपल्या आयुष्यात अधूनमधून येतच असतात. आपल्या स्वप्नांपासून वा आपल्या ध्येयापासून आपण दूर राहिलो वा आपल्याला ती प्राप्त झाली नाही, तर विफलता आपल्या आयुष्यात डोकावते. आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग उद्भवतात की, जे आपल्या आवाक्यात नसतात. अनेक व्यक्तींवर, त्यांच्या स्वभावांवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. अनेक गोष्टींची उत्तरेही आपल्याला सापडत नाहीत. अशा वेळी विफलतेमुळे आपला विकास थांबतो. मनात निराशेचे सूर उमटतात आणि आपला स्वाभिमान दुखावला जातो. असे हे वैफल्य खरेतर आपली गती कमी करते. आपली सारासार विचारक्षमता कमी करते. दीर्घकालीन वैफल्यग्रस्त मन दडपणाखाली वावरत, तणावग्रस्त राहतं. बऱ्याचवेळा आपल्या लक्षात येतं की, आपलं मन खूप उतावीळ झालं आहे. त्यामुळे मनातला आक्रमकपणा वाढतो, संताप वाढतो. यासाठीच विफलता कशी हाताळावी, याला महत्त्व आहे.

 

प्रथम आपण विफल झालो आहोत, आपल्याला वैफल्याने ग्रासले आहे, हेच मुळी लोकांना कळत नाही. त्याचे कारण म्हणजे, मनातला राग व उतावीळपणा. पण, जितक्या लवकर आपण वैफल्याचा प्रतिकार करू, तितक्या लवकर आपण आपल्या नकारात्मक भावनांमधून बाहेर पडू शकतो. यासाठी वैफल्यग्रस्त मन जे संकेत आपल्याला देते, ते ओळखता आले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा संकेत म्हणजेच, आपण प्रत्येक गोष्टीचा किंबहुना आपल्याला न रुचणाऱ्या वा न पटणाऱ्या गोष्टींचा प्रतिकार करायला लागतो. आपलं सगळं छान चाललेलं असतं. पण, अचानक आपणच काहीतरी अडचणी निर्माण करतो, व्यवस्थित लक्ष घालत नाही. सगळं आलबेल असताना आपलीच गाडी एकाएकी घसरायला लागते. आपल्याला हे सगळं घरंगळताना जाणवत असतं, आपल्याला हेही लक्षात आलेलं असतं की, आपण या विघ्नांतून बाहेर पडू शकतो. पण, काहीना काही कारणांमुळे आपल्याला परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही. क्षमता असूनही आपल्या अपेक्षापूर्तीच्या दिशेने आपल्याला पावलं टाकता येत नाही. ही वैफल्याच्या सुरुवातीची खूण आहे. गोष्टी इच्छेनुसार वा अपेक्षेनुसार घडत नाही म्हणून वैफल्य आणि वैफल्य आले आहे म्हणून घडी विस्कटली जाते, असा एक चक्रव्यूह बनतो. त्यामुळे अंतर्मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होऊ लागतो, दुर्बलता जाणवू लागते, मर्यादा जाणवायला लागतात. आपण अकार्यक्षम झालो आहोत, असे वाटू लागते. पूर्वीची कार्यक्षमता संपून गेली आहे आणि आपण आता अकार्यक्षम झालो आहोत, या जाणिवेने माणूस हतबल होऊ लागतो. खरेतर हीच ती वेळ असते, जेव्हा आपण स्वत:ला सावरून या दुर्बलतेवर मात मिळवावी लागते, आपले सामर्थ्य वाढवावे लागते, आपला उत्साह वाढवायला लागतो.

 

वैफल्य ही इतर भावनांसारखीच एक दु:खद भावना आहे. वरवर पाहता ती असुखावह आणि त्रासदायकच आहे. पण, ती आपली स्थिती नाही, केवळ भावना आहे. वरकरणी दु:खदायक असली तरी या भावनेला आपण योग्य दिशेने हाताळले, तर ती आपल्याला फायद्याचीच ठरेल. मानसशास्त्रात वैफल्याचे काही फायदे वर्णिले आहेत. वैफल्य तसे पाहिले, तर काही व्यक्तींच्या बाबतीत प्रेरणादायी भावना आहे. आपण सक्षम आहोत, पण आपल्या अपेक्षेप्रमाणे एखादी कृती घडत नाही किंवा आपण ही गोष्ट आरामात चुटकीसरशी सोडवू शकतो, पण सध्या तरी क्लिष्ट झाली आहे. अशा वेळी विफल झाल्याने काही माणसे ती गोष्ट प्राप्त करतात. अशा वेळी काही नवीन कल्पना सुचतात. काही वेगळं करता येईल का, याचा विचार होतो. विधायक मार्ग शोधला जातो. आज विश्वातील अनेक प्रयोग संशोधन आणि शास्त्राला पुढे घेऊन गेले आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या परिस्थितीबद्दल नाराज आहात, पण तरीही तुम्हाला तुमचे इप्सित साध्य करायचे आहे, तेव्हाच तुम्ही तुमची पूर्ण ताकद पणाला लावता आणि नक्की काय हरवले आहे वा नक्की काय शोधले पाहिजे, याचा विचार करता. त्यातूनच समस्येची उकल होण्यास सुरुवात होते. म्हणजे वैफल्य जितके भासते तितके नकारात्मक नाही. वैफल्यातही काही विधायक घडू शकते. फक्त गरज आहे, ती सर्जनशीलतेची आणि निर्णायकतेची...

 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@