मंदावलेली प्लास्टिकबंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |



प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला जूनमध्ये वर्ष पूर्ण झाले. मात्र, अपुर्‍या उपाययोजनांमुळे ही योजना शंभर टक्के यशस्वी झाली नाही. सुरुवातीला नागरिकांवर, दुकानदारांवर वचक निर्माण झाला, पण नंतर प्रशासनाकडूनच कारवाई मंदावत गेली.


प्लास्टिकबंदी सर्वांच्या हिताची आहे
, हे सर्वांना कळत आहे. तरीही प्लास्टिक वापराचा मोह अनेकांना होतो. प्रशासनाचे निर्बंध येण्यापेक्षा आपणच तसा निर्धार केला तर प्लास्टिकबंदी नक्कीच यशस्वी होईल, हे अनेकांना कळते, पण वळत नाही. म्हणून कारवाईची वेळ येते. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला जूनमध्ये वर्ष पूर्ण झाले. मात्र, अपुर्‍या उपाययोजनांमुळे ही योजना शंभर टक्के यशस्वी झाली नाही. सुरुवातीला नागरिकांवर, दुकानदारांवर वचक निर्माण झाला, पण नंतर प्रशासनाकडूनच कारवाई मंदावत गेली. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर एक वर्षाच्या काळात दुकाने, मॉल्समध्ये धाडी टाकून सुमारे ६३ हजार किलोचा प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आणि ३ कोटी २० लाख रुपये दंडही वसूल करण्यात आला. ही मोहीम ठोसपणे राबविण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे परवाना विभाग, बाजार आणि दुकाने व आस्थापना विभाग यातील २५० अधिकार्‍यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. कारवाईसाठी २३ पथके कार्यरत केली. मात्र, सध्या कारवाईचा वचक राहिला नसल्याने प्लास्टिकचा पुन्हा वापर झाल्याचे दिसत आहे. निवडणुका हे यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल-मे २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत अधिकारी गुंतल्याने कारवाईसाठी यंत्रणा अपुरी पडू लागली. त्यामुळे असलेल्या अधिकार्‍यांनीही कारवाईकडे दुर्लक्ष केले. आता गांधी जयंतीपासून कारवाई कडक होण्याचे संकेत मिळत होते. फेरीवाल्यांनीही त्यांच्याकडे गुपचूप वापरण्यात येणारा साठा सप्टेंबरमध्येच संपवून टाकण्याचे ठरविले. पण, त्या दरम्यान विधानसभा निवडणुकीला अधिकारी आणि कर्मचारी जुंपले गेले. त्यामुळे पालिका प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी फेरीवाल्यांचा धीर चेपला गेला. त्यांनी पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू केल्याचे दिसत आहे. आता तर दिवाळी आहे. त्यानिमित्त रांगोळी, पणत्या यासारख्या वस्तू वापरण्यासाठी प्लास्टिकचा वापर होणार हे नक्की. कारवाईसाठी मोठा ताफा लागतो हे मान्य, पण वचक बसविण्यासाठी एखाद्या कर्मचार्‍याने फेरी मारली तरी पुरेसे होते. त्याचाही धसका फेरीवाले किंवा व्यापारी घेतात, हे प्रशासनात बसलेल्या अधिकार्‍यांनी जाणायला हवे.



धोकादायक फटाक्यांना द्या फाटा


दिवाळी सण मोठा
, नाही आनंदा तोटा’ अशी महती असलेला दिवाळी हा महत्त्वाचा सण. ‘तिमिरातून तेजाकडे’ हा या सणाचा अर्थ आहे. मानवाच्या जीवनातील अंधःकार नाहिसा होऊन त्याच्या जीवनात प्रकाश उजळो, हा या सणाचा संदेश असतो. पण सध्याच्या काळात प्रकाश उजळण्याचा नव्हे, तर त्याचा कवडसा येण्याबाबतही शंका निर्माण होते. दिवाळी सण आता केवळ प्रकाशाचा न राहता, तो आतषबाजीचाही झाला आहे. या सणात विद्युत दिव्यांची रोषणाई आणि मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. विद्युत दिव्यांची रोषणाई करताना काळजी घेण्यात येत नसल्याने शॉर्टसर्किटचे प्रकार घडतात. त्याने एखादी आग लागते, वातावरणात धुराचे लोट फैलावतात आणि आनंदाच्या या सणात दुःखाचे डोंगर उभे राहतात. आता फटाक्यांचेही विविध प्रकार बाजारात आले आहेत. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे लोक बहिरे होतात. लहान मुलांच्या कानाचे पडदे फाटण्याबरोबर त्यांचे हृदय धडधडते आणि कायमचे बंद होण्याची भीती असते, एवढी त्या आवाजाची तीव्रता असते. दिवाळीतील पाचही दिवस सरासरी ९३.३ डेसिबल आवाजाची नोंद करणारे फटाके फुटतात, तेव्हा मुले आणि वयोवृद्धांचा काय अवस्था होत असेल, याचा विचार करणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयालाही यात हस्तक्षेप करावा लागला. सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणार्‍या ‘हरित’ फटाक्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, बाजारात फटाकेविक्रेत्यांना हरित फटाके म्हणजे काय, हेच नेमके अजून माहीत नाही. हे फटाके इतर फटाक्यांपासून वेगळे कसे ओळखायचे, याचीही निश्चिती झालेली नाही. त्यामुळे आनंदाऐवजी धोकादायक ठरणार्‍या या सणाचे दिवस जवळ येत चालले की, लोकांची धडधड वाढते, भीतीने त्यांचे चेहरे काळवंडतात आणि सणाचे दिवस सरले की त्यांचे चेहरे उजळतात. यात सणांचा दोष नाही. तर तो साजरा करणार्‍यांमध्ये दोष आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होते, पण कमी पोलीस बळापुढे कारवाईचे प्रमाण कमी राहते. सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपणच आपल्यात सुधारणा घडवून आणली पाहिजे.

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@