मुकद्दर का सिकंदर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019
Total Views |




कालच्या संध्याकाळची गोष्ट
. एका कामानिमित्त वरळीला जायचं होतं. बराच वेळ बसची वाट पाहत उभा होतो. अखेरीस एक रिकामी टॅक्सी आली. चालवणारे काका वयस्कर होते. अर्धं टक्कल, तशाच राकट चेहर्‍यावर पडलेल्या सुरकुत्या, आयुष्यभर कष्ट उपसलेल्या, घाम गाळलेल्या माणसाची खूण सांगत होता.


मी
“वरळी?” असं विचारलं असता ’बसा’ असा प्रतिसाद आला. मी उच्चारलेल्या ’ळ’ कदाचित मी मराठी असल्याचा पुरावा झाला असेल अन्यथा बर्‍याचदा लोक ’वरली’ असा थोडासा ’हायफाय’ उच्चार करीत असतात. मी टॅक्सीत बसलो. काकांचं वय तसं ७० पलीकडचं वाटत होतं. चालवण्याच्या पद्धतीवरून गाडीवर अनेक वर्षांपासून हात बसल्याचे जाणवत होते. चालवताना एक अलिप्त भाव होता. उगाच हॉर्न वाजवणं नाही, उगाच कट मारून समोरच्याला बाचकवणं नाही आणि इतक्यात एका दुचाकीवाल्याने गाडी आडवी घातली आणि कट मारुन पुढे गेला. “यांच्या आईच्ची**** बापाचे रस्ते असल्यागत चालवतात बघा. एकदा हातात सापडले तर यांना सगळ्यांना असा घोडा लावेन म्हणून सांगतो तुम्हाला!” मी एकदम मोठ्या दाबाचा विजेचा झटका बसल्यासारखा त्यांच्याकडे बघता झालो. माझ्या तोंडात वाखोळ्या कमी आहेत अशातला भाग नाही, पण हे काका असे पेटून उठावे हे मला जरा अनपेक्षित होतं. तेथून मग काका बोलते झाले. “तुम्हाला सांगतो साहेब इतकी वर्ष गाडी चालवतोय. या बाईकवाल्यांचा त्रास लई वाढलाय बघा. वाट्टेल तशी गाडी मारतात. मीबी गाडी चालवतो बघा. हां. दोन-दोन गाड्या आहेत आपल्या, पण कस्सं एकदम कंट्रोल मंदी. हा आता गेली वर्ष-दोन वर्षं जरा बंद हाय चालवणं.” मी ‘का’ विचारले असता, “अहो ब्लाक बसले ना व्हो,” मी म्हटलं, “कुठेशी?”



‘‘अहो हार्टला हो... एकदम एके दिवशी ते काय ते बीपी का काय झालं शूट. हा मंग घरीच होतो तवा. रात्री फुटला दररून घाम. बायकोला म्हटलं गॅस पकडला वाटतोय बघ. जरा डाक्टरकडे जाऊन गोळी घेऊन येतोया.” बायको घाबरली म्हणली, “मीबी येते. तिला म्हणालो, “अगे बये असली घाबरतेस काय? काय न्हायी व्हत मला तू झोप निवांत.” गेलो मंग डाक्टरकडे. त्यानं काय ती छातीची पट्टी काय ती काढली. म्हणाला, “ताबडतोब भरती व्हा जेजेला. मी म्हणालो, डाक्टर पैसे दिलं न्हावं मी तुमासनी. आता जाऊ द्या की मला. मरणाला काय भियायचं. पोरगं नेवीत हाय. जाऊन पडतो नेवीच्या हास्पिटलात.” ते ओ पुन्याचं. कसंबसं त्या डाक्टरच्या तावडीतनं सुटलो. चुलत्याला म्हटलं, काढ तुझी बुलेट पुन्याला जायचं हाय आपल्याला. मग काय बसलो बुलेटवर अन् झालो भरती त्या नेवीच्या हास्पिटलात. अहो पोरगं पुण्यात. कुठं ओढातान करायची त्याची इथं मुंबईत भरती होऊन.



इतक्यात मी उगाच मध्ये
, “काका मी पण डॉक्टर आहे,” असा एक मुद्दा टाकला. मला वाटलं काका म्हणतील, अरे वा लयच भारी वगैरे... त्यांनी त्या उलट, ’‘अस्सं का. बरं बरं,” असं म्हणून त्यांच्या दांडपट्ट्याने माझा डॉक्टरकीचा थोडाबहुत असलेला रुबाब उभा चिरला. पुढे मग एकदम त्यांचा बाज बदलला. “तुम्हाला सांगू का आपण मरणाला अजाबात भीत न्हाई. आतापर्यंत आयुष्यात खूप मजा केली बघा. आख्खा भारत फिरलो बघा. विडी, तंबाखू, बाटली सर्व नाद केला. हां पन बाईचा नाद नाय केला हा. ते लय वाईट. हे ब्लाक बसल्यापासून विडी आनी बाटली बंद. हां... एकदम टोटल बंद...हा आता कदीमधी एक दोन पुड्या होतात बघा. पन ते नावाला. बाकी एकदम बंद.”



शरीरशास्त्राचा अभ्यास करताना शरीराचे विच्छेदन करून एक एक भाग उलगडावा
, तसे काकांचे व्यक्तिमत्त्व उलगडत होतं. त्यात कुठला आडपडदा नव्हता. आपल्या लंगोटीयाराशी बोलावं तसं मनमोकळेपणाने ते आपला जीवनपट माझ्यासमोर एकेक करून मांडत होते. टॅक्सी हाजी अलीपर्यंत आली होती. वाटत होतं असंच या खणखणीत नाण्याचं श्रवणीय खणखणनं ऐकत बसावं. काकांनी एकदम गहिवरून म्हटलं, “पोरा, पण एक गोष्ट लक्षात ठेव बघ...” त्यांच्या या ’पोरा’मध्ये मला दूर कुठेतरी खोलवर रुतून बसलेला घाव दिसला. ते उद्गारले, “आजकाल ही दुनिया पैस्यावर चालते. पन हा पैसा काई कामाचा र्‍हात नाय बघ. आमच्या बायकोचंच घे ना. येत व्हतो दोघे गुजरात फिरून. सगळं सगळं बघितलं बघ. येताना बसवाल्यानं बोरिवलीला गाडी थांबवली. म्हणला इथंच उतरा समद्यांनी. गाडी इथवरच सोडील. मी आमच्या हिला म्हणलो, टॅक्सी बघतो.



मुंबई सेंट्रलला टॅक्सीनं जाऊ
. जीवाची लई काहिली झालीया. पण आमच्या हिचं म्हणनं पडलं ट्रेननं जाऊ. उगा खर्च कशाला अन् सगळं आयुष्यच फिरलं ना रे लेकरा. पलाटफार्मला उभी असताना पाय सरकला तिचा. धडाचे दोन भाग झाले रे पोरा. न्हाई मी म्हणतो मरण काय कोणाला चुकलंय व्हय. पण बाई अशी घराबाहेर जायला नको होती. चालायचंच.” काकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. मी सारं ऐकून सुन्न पडलो होतो. काय म्हणावं तरी काय या माणसाला. मृत्यूला घाबरणारे लाख मिळतात, पण मृत्यूसमोर असं कर्दनकाळ बनून उभे राहणारे नक्की कुठल्या हाडामासाचे बनलेले असतात? आयुष्याची एवढी परखड जाणीव कदाचित साध्वी तपस्व्यांनासुद्धा नसेल. येईल त्या दिवसाला असं निधड्या छातीनं भिडण्याचा दम भल्या भल्यांकडे नसतो. मी मनोमन या अवलियाचं रुप साठवलं. उरलेले पैसे परत घेण्याचं भानही राहिलं नव्हतं मला. ‘’पोरा हे घे. बरं वाटलं बोलून. आपलं माणूस भेटल्यावानी वाटलं.” असं म्हणून काकांनी ब्रेकवरचा पाय काढला अन् त्यांची गाडी पुढच्या रस्त्याला लागली.



-डॉ. अमेय देसाई
@@AUTHORINFO_V1@@