टिळकांचा राजीनामा : भ्रम आणि वास्तव (भाग-५)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019
Total Views |




आजीव सभासदांचा पगार पाच रुपयांनी वाढवावा
, या वादाला दोन वर्षं उलटल्यानंतर वासुदेवराव केळकर यांनी लिहिलेल्या पत्रात उल्लेख आढळतो, आजीव सभासदांचा पगार पाच रुपयांनी वाढवावा, असा प्रस्ताव आगरकरांनी मांडला तेव्हापासून गेल्या तीन वर्षांतील आपल्या कडवट भांडणांना सुरुवात झाली, असे म्हणता येईल. त्यामुळे दोन-तीन गोष्टी एकाच वेळी जाणवल्या पहिली गोष्ट म्हणजे त्याग या तत्त्वासंबंधी सभासदांमध्ये गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काही सभासदांमधील व्यक्तिगत संबंध अतिशय कडवट बनले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे भांडणार्‍या सभासदांना योग्य वर्तन करावयास लावण्यासाठी आवश्यक ते धैर्य ज्यांना त्रयस्थ म्हणता येईल, अशा इतर सभासदांजवळ नाही. पगारवाढीचा विचार नंतर सोडून द्यावा लागला, पण त्यामुळे सुरू झालेली भांडणे मिटली नाहीत. (१९ मे, १८८९) यात भांडणारे सभासद म्हणताना केळकरांचा रोख नेमक्या कोणत्या सभासदांकडे आहे, याची कल्पना सुज्ञ वाचकांना येईलच.



टिळक
-आगरकर यांच्यामधील मतभेदाचे चित्रण करताना त्यांनी एकत्रितपणे ११ वर्षे ज्या शैक्षणिक संस्थेत काम केले त्या संस्थेच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घ्याव्या लागतात. त्यापैकी आगरकरांनी ‘केसरी’ सोडून ‘सुधारक’ वृत्तपत्र काढणे आणि ‘केसरी’ व ‘मराठा’ संपूर्णपणे टिळकांच्या ताब्यात येणे ही एक महत्त्वाची घटना ठरते. सामाजिक बाबतीतील तीव्र मतभेदाचा हा परिणाम दिसतो. सामाजिक प्रश्नांचा वेध घेणे जितके महत्त्वाचे ठरते, तितकेच सोसायटीमधील अंतर्गत मतभेद समजावून घेणेही महत्त्वाचे ठरते. या दोन्हीचा साकल्याने विचार केला, तरच टिळकांचा राजीनामा हे प्रकरण पूर्णपणे समजून घेता येईल. भीषण स्वरूपाच्या भांडणाला सुरुवात होण्यासाठी आगरकरांनी मांडलेला आणि टिळकांनी विरोध केलेला पगारवाढीचा मुद्दा कारणीभूत झाला. संस्थेच्या आजीव सभासदांपैकी बर्‍याच जणांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती, असे दिसते. काही दिवसांपूर्वी नामजोशी यांच्या सांगण्यावरून शंकर मोरो रानडे यांना संस्थेने कर्ज दिले होते. ते फेडण्यापूर्वीच नामजोशी यांना स्वतःला आर्थिक अडचण जाणवू लागली, मुलीच्या लग्नात झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी संस्थेकडे मदत मागितली पण त्यांचा हा अर्ज पाच आजीव सदस्यांनी फेटाळून लावला. संस्थेत नव्याने दाखल झालेले गोपाळ कृष्ण गोखले यांची पत्नी अंथरुणाला खिळून राहिली असल्याने त्यांना कौटुंबिक चिंता होत्या, आर्थिक सौख्य नव्हते, पैशाची गरज होती. पाटणकरांची आर्थिक परिस्थिती बघून संस्थेने त्यांना २०० रुपयांचे कर्ज देऊ केले, पण त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन होऊन तत्कालीन जनरीतीप्रमाणे ते पुन्हा बोहल्यावर उभे राहिले आणि आधीचे पैसे परत करण्याऐवजी त्यांनी संस्थेला आणखी १०० रुपये ग्रॅच्युईटी म्हणून मागितले. १८८७च्या सुरुवातीला दाखल झालेल्या भानू यांनीही २०० रुपये कर्ज मागितले, असे आढळते.



स्वतः आगरकरांचीही परिस्थिती हलाखीची होती
. त्यांना औषध-गोळ्यांसाठी महिन्यातून बरेच रुपये खर्च करावे लागत. आईवडिलांसाठी, बायका-मुलांसाठी काही विशेष तरतुदी करून ठेवण्याचे त्यांच्या मनात होते. तरीही आगरकर आणि आपटे यांनी टिळक सोसायटीत असेपर्यंत कर्ज किंवा इतर आर्थिक सवलती मागितल्या नाहीत. नंतरच्या काळात सोसायटीकडून आगरकरांना चतु:श्रुंगीच्या मैदानावरील जागेत झोपडीवजा घर बांधण्यासाठी जागा देण्यात आली. त्यासाठी सोसायटी अगदीच नाममात्र भाडे घेत असे. आपटे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारालादेखील घरी पुरेसे पैसे उपलब्ध नव्हते. यावरून आपटे यांची स्थिती काय होती, याची कल्पना येईलच. त्यांच्या मृत्यूनंतर सोसायटीतर्फे त्यांना २०० रुपये मिळावे, असा अर्ज गोखले यांनी केला अशी नोंद सोसायटीच्या दफ्तरात आढळते. टिळक आणि वासुदेवराव केळकर यांनी मात्र कधीही कर्ज किंवा आगाऊ पगार मागितला, याचे एकही उदाहरण डेक्कन सोसायटीच्या दफ्तरात आढळत नाही. टिळकांसाठी त्यांच्या वडिलांनी भरपूर रक्कम ठेवली, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, टिळकांनाही कौटुंबिक जबाबदार्‍या चुकल्या नव्हत्या, टिळकांच्या बाबतीत आर्थिक स्थिती बरी असल्याने आर्थिक अडचणींचे स्वरूप जरा सौम्य होते इतकेच. त्यांच्या मुलाचे निधन झाल्याने कौटुंबिक दु:ख त्यांच्याही वाट्याला होतेच. बायका-मुले यांच्या जबाबदारीसोबत धोंडूची जबाबदारी त्यांच्यावरही होतीच.



सगळ्याच आजीव सदस्यांची होणारी ओढाताण पाहून सर्वांसाठी दरमहा पाच रुपयांची पगारवाढ करावी
, अशी सूचना आगरकरांनी सभेत केली. इतर सभासदांनी या सूचनेचे स्वागत केले पण टिळकांनी मात्र विरोध केला. यावरून आपल्या सहकार्‍याच्या संकटांची टिळकांनी पर्वा केली नाही, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. टिळकांना नेमके काय वाटत होते? पोटापुरता पगार घेऊन आपण संस्था चालवाव्यात, गरज पडली तर ग्रॅच्युईटी घ्यावी, अशी कल्पना टिळकांच्या मनात होती. जेसुइट धर्मोपदेशकांप्रमाणेआपण नि:स्वार्थीपणे संस्थेच्या वाढीसाठी कार्य करावे अशी भूमिका टिळकांनी या वादात घेतली, असे दिसून येते. आगरकरांचा आणि टिळकांचा यावरून कडाक्याचा वाद झाला. सगळ्यांचा पगार वाढवावा याऐवजी आगरकरांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणी मांडाव्यात आणि ग्रॅच्युईटी (उपदान) मागावी, असे टिळकांनी सुचवून पाहिले पण आगरकरांना ते पटेना. आपला स्वाभिमान दुखावला जातोय, असे त्यांना वाटले असावे. टिळकांच्याच शब्दात सांगायचे झाले, तर ५ फेब्रुवारी, १८८७चा सभेचा दिवस सर्वार्थाने संस्मरणीय ठरला. या सभेत आगरकरांच्या तोंडून कमीजास्त बोलले गेले असावे, असे दिसते. ही सभा वादाची ठरली हे इतर पुराव्यांवरून किंवा पत्रांवरून दिसून येते. या दिवशी झालेल्या सभेचे प्रतिवृत्त डेक्कन सोसायटीच्या इतिहासात कुठेच सापडत नाही.



अशातच सामाजिक बाबतीत आगरकरांचे मत इतरांशी जुळत नसल्याने
‘केसरी’ आणि ‘मराठा’ची व्यवस्था टिळक आणि केळकर यांच्याकडे लावली होती. आगरकरांचे सोसायटीमधील इतरांसोबत सामाजिक प्रश्नावर दुमत असल्याने ‘केसरी’ व ‘मराठा’ आपल्या हातातून सुटतो की काय, अशी शक्यता निर्माण होईल, असे आगरकरांना वाटू लागले. ‘केसरी’ व ‘मराठा’ नाही तर किमान सोसायटीमधील अंतर्गत हलचाली आपल्या नियंत्रणात असाव्या आणि यासाठी काही पावले टाकावीत, असे आगरकरांना वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाच रुपयांच्या पगारवाढीला टिळक विरोध करत होते. टिळकांचा विरोध बघून आगरकरांनी लगेचच संस्थेच्या कामकाजासंबंधी काही नवे नियम सुचवले. १२ फेब्रुवारी, १८८७ रोजी ही नवी बारा कलमी योजना सुचवण्यात आली. डेक्कन सोसायटीच्या दफ्तरात ती आजही सापडते. अभ्यासकांनी ती अवश्य वाचावी. आगरकर, गोखले आणि पाटणकर यांनी नव्या योजनेनुसार होणार्‍या कामकाजाचे स्वरूप सांगितले. या नव्या योजनेनुसार एखाद्या सदस्याने कर्ज किंवा ग्रॅच्युईटी मागितली, तर त्याबद्दलचा निर्णय एकमताने घ्यावा लागणार होता. कारण, तो एखाद्या विषयीचा वैयक्तिक निर्णय होता. पण सगळ्यांसाठी निर्णय घ्यायचा असेल तर केवळ बहुमत सिद्ध झाले तरी चालणार होते. त्यासाठी एकमताची गरज नाही, अशी तरतूद यात केली होती. म्हणजेच पाच रुपये पगारवाढ यांसारख्या सगळ्या सदस्यांसाठी घेण्यात येणार्‍या निर्णयावर मात्र बहुमत सिद्ध झाले की, अंमलबजावणी करता येणार होती.



या बाराव्या पोटनियमाच्या माध्यमातून आगरकर पाच रुपये पगारवाढ करण्याची आपली इच्छा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत
, असे टिळकांना वाटले तर त्यात चूक काहीच नव्हते. किंबहुना आगरकरांचा तसेच काही करण्याचा प्रयत्न होता. आगरकरांच्या या आडमार्गाने पगार वाढीसाठी केलेल्या प्रयत्नाचा टिळकांना राग आला. पगारवाढीसाठी म्हणजेच स्वतःच्यास्वार्थासाठी संस्थेच्या मूळ तत्त्वांना आपण धक्का लावत आहोत, अशी टिळकांची धारणा झाली आणि आगरकर हे मूळ कल्पनांपासून, तत्त्वांपासून दूर जात आहेत याबद्दल टिळक नाराजी व्यक्त करू लागले. टिळकांना सुपारी खाण्याची प्रचंड हौस! पण सभा चालू असताना कुणी पानसुपारी खाऊ नये वगैरेसारख्या आगरकरांनी केलेल्या सूचना केवळ आपली कोंडी व्हावी म्हणून बनवल्या आहेत, असे टिळकांना वाटणे साहजिक होते. या योजनेतील सर्वच मुद्दे टिळकांना अमान्य होते, असे नाही. काही निवडक मुद्द्यांवर नामजोशी आणि केळकर यांनी नाराजी व्यक्त केली. मंडळाच्या सभांना शिस्त येण्यासाठी नियम करावेत यापलीकडे त्यांचे स्वरूप जाचक नसावे, असे टिळकांना वाटत होते.



या प्रस्तावावरील सविस्तर चर्चेसाठी १२ फेब्रुवारी
, १८८७ रोजी सभा झाली. या नव्या योजनेला विरोध दाखवताना नामजोशी यांनी बैठकीच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत शंका घेतली. त्यामुळे ती सभा तहकूब करून २२ फेब्रुवारी, १८८७ रोजी पुन्हा सभा भरवण्यात आली. सभा सुरू होण्याच्या वेळी टिळकांनी आधी झालेल्या सभेच्या कामकाजाचे प्रतिवृत्त वाचावयास मागितले व त्यावरून झालेल्या चर्चेदरम्यानटिळकांच्या बोलण्याने त्यांच्यावर आरेरावी, बेशिस्त वर्तनाचा आरोप लावला गेला. त्यांच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. आपण झाल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, असे सुचवण्यात आले. पण टिळकांनी नकार दिला आणि टिळक, धारप, नामजोशी यांनी या निर्णयावर सभात्याग केला, तर वासुदेवराव केळकरांनीसुद्धा याला विरोध दर्शवला. इतरांनी मात्र यांच्या अनुपस्थितीत टिळकांच्या निषेधाचा ठराव मंजूर केलानंतरच्या काळात टिळकांनी सभेत शिस्तीला सोडून वर्तन केले हे सांगितले जाते. पण त्याचबरोबरीने असाच शिस्तीला सोडून वागल्याचा ठराव आगरकरांच्या विरुद्ध केळकरांनी मांडला होता आणि नामजोशी यांनी त्याला दुजोरा दिला होता, हे सांगितले जात नाही. विषयांतर करू नका, असे वारंवार सुचवूनही आगरकरांनी ऐकले नाही. त्यामुळे हा ठराव केला असावा. मात्र, टिळक प्रक्षुब्ध होऊन सभा सोडून निघून गेले आणि नंतरच्या दिवशी शाळा आणि कॉलेजात फिरकलेसुद्धा नाही, हा गंभीर स्वरूपाचा अपराध आहे असेच सगळ्यांना वाटले. आपटे यांनी सविस्तर पत्र लिहून टिळकांना बजावलेसुद्धा!



झाला प्रकार इतका गंभीर होता की
, दुसर्‍या दिवशी टिळक महाविद्यालयाला गेले नाहीत. त्यांनी संस्थेच्या सचिवांना एक पत्र लिहिले. त्यावरून संताप येण्यापेक्षा ही भांडणे टिळकाच्या जिव्हारी अधिक लागली असावी, असे दिसते. टिळक त्या गोपनीय पत्रात लिहितात, ज्या तत्त्वांसाठी आपण त्याग केला आणि जी आजवर आपल्याला मार्गदर्शन करीत आली त्यांच्याविषयीच शंका घेण्यात आल्यानंतर हा सबंध प्रश्न निकालात निघेपर्यंत व आजीव सदस्यांचे व्यवस्थापक मंडळ भावी धोरण निश्चित करेपर्यंत निदान मी तरी मला देण्यात आलेले काम करण्यास असमर्थ आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीच्या अनौपचारिक सभेला टिळक आणि आगरकर दोघेही उपस्थित राहिले नाहीत.२४ तारखेला आगरकरांनी आपण उपस्थित का राहणार नाही, याची सविस्तर कारणे देणारे एक पत्र संस्थेच्या सचिवांना लिहिले त्यात टिळकांचा उल्लेख आपल्यापैकी सर्वात जास्त बेताल माणूस असा केला. आगरकर इतके लिहून थांबले नाहीत, टिळक आणि त्यांचे काही सहकारी यांच्या मतांचा विरोध न करता त्यांच्या मताने पुढे जाणे म्हणजे संस्थेची नाच्चकी करून घेणे आहे, असेही त्यांना वाटले. त्यांनी पुढे लिहिले, आपण सर्वांनी जे कार्य अंगिकारले आहे. त्याबद्दल माझे प्रेम कमी झाले नसून ते वाढते आहे, पण अविचारी आडमुठेपणा, विजय मिळवण्याची संकुचित लालसा, आपणच एकटे शहाणे आहोत, असे मानण्याची वृत्ती इतर माणसांच्या भावनांविषयीची बेपर्वाई या सार्‍या गोष्टी सहन करणे मला दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे. म्हणूनच माझ्या मित्रांची अनुमती घेऊन व्यवस्थापक मंडळाच्या सभांना गैरहजर राहण्याची माझी इच्छा आहे. आपण सुचवलेले १२ पोटनियम टिळकांमुळे व्यवस्थापक मंडळाच्या सभेत स्वीकारले गेले नाहीत असे वाटल्यामुळे आगरकरांच्या मनात टिळकांविषयीचा कडवटपणा आणखी वाढला आणि तत्त्वांना तडा जातो म्हणून टिळकही संतापले. भांडणे टोकाला भिडली.


-पार्थ बावस्कर
@@AUTHORINFO_V1@@