'या' माशासाठी मच्छीमार ठरले देवदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019   
Total Views |



तीन 'व्हेल शार्क' माशांना मच्छीमारांकडून जीवदान


मुंबई (अक्षय मांडवकर) - समुद्रातील सगळ्यात मोठा मासा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'व्हेल शार्क’च्या संवर्धनासाठी मच्छीमार धावून आले आहेत. गेल्या आठवड्यात मच्छीमारांनी मासेमारीच्या जाळ्यात सापडलेल्या तीन 'व्हेल शार्क'ना पुन्हा समुद्रात सोडले. मच्छीमारांना या अजस्त्र माशाबरोबर जाळ्यात सापडलेले इतर मासेही सोडावे लागल्याने त्यांना आर्थिक फटका बसला. मात्र, असे असूनही मच्छीमार समाजात 'व्हेल शार्क माशाप्रती धार्मिक आस्था असल्याने प्रसंगी नुकसान सहन करूनही या माशाला जीवदान देण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे.

 
 
 

शार्क कुळातील 'व्हेल शार्क’ हा मासा सागरी परिसंस्थेतील आकाराने सर्वात मोठा मासा मानला जातो. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीक्षेत्रात त्याचा अधिवास आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील मालवणच्या सागरी पट्ट्यात हे मासे प्रजननासाठी येतात. अनावधानाने होणारी मासेमारी, परांची तस्करी आणि प्रदूषण हे 'शार्क' कुळातील जीवांसाठी घातक आहे. 'व्हेल शार्क'ला 'वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीत संरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या माशाला वाघ-बिबट्यांसारखेच संरक्ष आहे. याचाच अर्थ या माशांची मासेमारी करण्यावर कायदेशीररित्या मनाई आहे. परंतु, पर्ससीनसारख्या मोठ्या जाळ्यांचा वापर करून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळात हे मासे अडकले जातात. अशाच पद्धतीने गेल्या आठवड्यात तीन मच्छीमारांच्या जाळ्यात हा मासा सापडला होता. परंतु, मच्छीमारांनी या माशांची सुटका करून त्यांना जीवदान दिले.

 

श्रीवर्धन येथील सागरी परिक्षेत्रात मच्छीमार भूषण भाटे आणि रोहन नाखवा यांच्या बोटीच्या जाळ्यात ३ व ४ ऑक्टोबर रोजी 'व्हेल शार्क’ मासा सापडला होता. तर, मुरुडच्या समुद्रात गणेश नाखवा यांच्या बोटीतील पर्ससीन जाळ्यात हा मासा अडकला. या तिन्ही बोटींच्या जाळ्यात सापडलेले 'व्हेल शार्क' पंधरा ते वीस फुटांचे होते. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता बोटींवरील कर्मचाऱ्यांनी या माशांना पुन्हा समुद्रात सोडले. या घटनांची नोंद ’वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ (डब्लूटीआय़) या संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या किनापट्टीवर ’व्हेल शार्क’च्या संवर्धनासाठी काम करणारे सागरी संशोधक स्वप्नील तांडेल यांनी केली. अनावधानाने होणारी मासेमारी आणि त्यांच्या परांची तस्करी या माशांसाठी घातक असल्याची माहिती तांडेल यांनी दिली. तसेच हा मासा जवळपास ३० वर्षांनी प्रजननक्षम होत असल्याने त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तीन व्हेल शार्कंना जीवदान देणाऱ्या मच्छीमारांना डब्लूटीआय कडून प्रमाणपत्र देऊन गौरवित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

 

धार्मिक आस्था

सागरी कासवे, देवमासा आणि व्हेल शार्क या सागरी जीवांप्रती कोळी समाजात धार्मिक आस्था आहे. त्यामुळे हे मासे जाळ्यात सापडले तरी, मच्छीमार बांधव प्रसंगी जाळे कापून त्यांची पुन्हा समुद्रात सुटका करतात. 'व्हेल' शार्क म्हणजेच बहिरी माशाप्रती आमच्या समाजात धार्मिक आस्था आहे. हा मासा जाळ्यात सापडल्यानंतर बर्याचवेळा त्याच्यासोबत जाळ्यात आलेल्या इतर माशांनाही समुद्रात सोडावे लागते. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होते. मात्र, असे असूनही केवळ धार्मिक आस्थेप्रती आम्ही त्यांची सुटका करत असल्याने एकप्रकारे या माशांच्या संवर्धनाला हातभार लागत असल्याची माहिती मच्छीमार गणेश नाखवा यांनी दिली.

 
 
@@AUTHORINFO_V1@@