
विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' नावाचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला. या पोस्टरवरील आक्षेपार्ह्य मजकुरावर गायक आणि दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी नाराजी आणि निषेध व्यक्त करत फेसबुकवर पोस्ट लिहिली. याची दखल घेत आज 'गर्ल्स' चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोस्टरवरील मजकूर काढून नवीन पोस्टर प्रदर्शित केले.
कालच्या पोस्टरमुळे काही गैरसमजुती निर्माण होऊन, काही ठिकाणी चुकीचे मेसेज फिरवले जात आहेत. आमचा 'गर्ल्स' हा सिनेमा यूथफुल असला तरी कुटुंबासोबत बघावा असा आहे. पोस्टर कोणालाही दुखावण्याच्या हेतूने बनवलेले नाही. आपण सगळे कुटुंबासारखेच आहोत या भावनेने आम्ही नवीन पोस्टर सादर करत आहोत. pic.twitter.com/c2LyTWDlB9
— Everest Entertainment (@EverestMarathi) October 11, 2019
दरम्यान काल प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवर 'आयुष्यावर बोलू काही' या प्रसिद्ध कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आला होता शिवाय त्याखाली 'फॅमिली सक्स' असा हॅशटॅग देखील वापरण्यात आला होता. या पोस्टरमध्ये असलेली नायिका आक्षेपार्ह्य कृती देखील करताना दिसत आहे. या सगळ्याच गोष्टींमुळे गेले १६ वर्ष मेहेनत घेऊन अतिशय चांगल्या उद्देशाने श्रोत्यांचे मनोरंजन करणाऱ्या 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमातील कलाकार सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि आदित्य आठल्ये यांनी या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे.
प्रत्येकाला आपली कला प्रस्तुत करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यामुळे कोणते समज-गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी प्रत्येकानी घेणे हे गरजेचे आहे. चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब आहे असे म्हटले जाते या गोष्टीला तडा जाणार नाही याची जबाबदारी शेवटी चित्रपटकर्त्यांवरच असेल.