विरोधी पक्षनेता व्हायचंय मला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019
Total Views |



उंटाच्या ढुंगणाचा मुका घेण्याचा मुद्दा राज ठाकरेंनी मांडला आहे. आता ते तो घेणार नाही, असे ते सांगत असले तरी लोकसभेच्या वेळी त्यांनी तो घेतला होता.


राज ठाकरेंची बहुचर्चित सभा झाली
. माध्यमांच्या दृष्टीने सर्वात रंजक आणि तरतरीत मजकूर देणारा नेता म्हणून माध्यमांनीच त्यांच्या सभेविषयी उत्कंठा वाढविली होती. मतदार, त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते यांना या सभेत किती रस होता, हा संशोधनाचा विषय ठरावा. माध्यमांतून निर्माण झालेले नेते माध्यमेच कशी संपवितात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे. माध्यमांना लागणारा चवदार मजकूर द्यायची एकदा चटक लावली की, तीच माध्यमे मग वारंवार मजकूर मागत राहतात आणि त्यांच्या अपेक्षेला तुम्ही उतरला नाहीत की, मग तेच तुमची हवा हळूहळू काढायला लागतात. मोदींनी जे यश संपादन केले, त्यात त्यांनी माध्यमांना दिलेले गौण महत्त्व या घटकालाही आहे. माध्यमे काय म्हणतील आणि त्यांच्या लेखी आपल्याला कुठे जागा मिळेल याचा विचार केला तर मग लोक, राजकारण, राजकीय पक्ष यांचा विचार न होता माध्यमे त्यांचे प्रश्न, कॅमेरे आणि मथळेच डोळ्यासमोर फिरत राहतात. राज ठाकरेंचेही नेमके तेच झाले. महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटची जोरदार घोषणा त्यांनी केली होती. दहा वर्षांपूर्वी या विषयातली अपूर्वाई इतकी होती की लोकही त्यांच्या नादाला लागले. आता राज ठाकरे जिथे कुठे पत्रकार परिषदा करतात, तिथे पत्रकार एक प्रश्न हमखास विचारतात, तो म्हणजे ‘ब्ल्यू प्रिंटचे काय झाले?’ अर्थात हा प्रश्न डिवचण्यासाठीच विचारलेला असतो. एकही आमदार नसलेला हा नेता आता ‘व्हिजन’ मांडूनही काय मांडणार आणि ते कितीही वेळा मांडले तरी ते प्रत्यक्ष उतरवणार कसे? या प्रश्नांची उत्तरे आता माध्यमांनाही माहीत आहेत, पण चोवीस तासच चालवायला लागणारे चर्‍हाट जे काही राज ठाकरे निःशुल्क देऊ शकतात, त्यातच आता माध्यमांना रस आहे.



राज ठाकरेंनी चक्क सांगितले की
, आता त्यांना विरोधी पक्ष म्हणून यायचे आहे. आपल्याला उंटांच्या ढुंगणाचा मुका घ्यायचा नाही. आजच्या प्राप्त परिस्थितीत आपली स्थिती काय आहे, याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. असे त्यांनी मोकळेपणाने सांगून टाकले. परंतु, लोकसभेच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उंटांचा मुका त्यांनी घेतला होता आणि लाथ त्या उंटांकडून न पडता भलतीकडूनच पडली, हे त्यांना कळायला हवे होते. राज ठाकरेंना ईडीच्या मंडळींनी चौकशीसाठी बोलाविले होते. त्यानंतर आपण आपले थोबाड बंद ठेवणार नाही, असे त्यांनी मोठ्या थाटात सांगितले होते. मात्र, वस्तुत: ते बिळातच जाऊन बसले इतके की, आपला पक्ष निवडणुका लढविणार की नाही, हेदेखील त्यांना जाहीर करावे लागले. अन्य कुठल्याही पक्षाला असे करण्याची गरज भासली नव्हती. अगदी आज गलितगात्र झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीलाही असा प्रश्न विचारायला लागला नव्हता. आता मूळ मुद्दा येतो तो, या ‘राजाला साथ द्या’ ते ‘विरोधी पक्षनेता तरी बनवा’ या काकुळतीला येण्याचा प्रवास का झाला? याच राज ठाकरेंनी यापूर्वी संपूर्ण राज्याचा पूर्ण ताबा मतदारांकडे मागितला होता. नाशिक, कल्याण, ठाणे वगैरे भागात लोकांनी साथही दिली होती. तिथेही लोकांना शानदार स्वप्ने आणि नंतर भ्रमनिरास असाच हा सारा प्रवास राहिला. आता लोकांना त्यातून जे काही शिकायचे होते, ते ते आता शिकले आहेत.

ईडीची चौकशी ज्या कारणासाठी राज ठाकरेंच्या मागे लागली, तोच खरा राज ठाकरेंच्या राजकीय अस्ताचा प्रारंभबिंदू होता. कोहिनूर मिलची जागा. त्यावेळी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ खुद्द बाळासाहेबांनी मराठी माणूस, उद्योजक वगैरे अशा आशयाचे विधान केले होते. या सौद्यातून राज ठाकरेंनी चांगले पैसे कमावले. मात्र, जी काही अपकीर्ती त्यांना इथे मिळाली, ती त्यांना टाळता आली नाही. मराठी माणसाला खणखणीत राजकीय नेतृत्व हवे होते. शंतनुराव किर्लोस्करांपासून चौगुलेंपर्यंत मोठे उद्योजक महाराष्ट्राने पाहिले होते. हा उद्योजक मात्र महाराष्ट्राला पचला नाही. राज ठाकरे का फसले, हा त्यांच्यासह त्यांच्या अनेक चाहत्यांना आणि माध्यमातल्या मित्रांना पडलेला प्रश्न. इतका प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा जहाल नेता, उत्तम आयोजक फर्डा वक्ता असे असूनही राज ठाकरेंचे असे का व्हावे? यावर माध्यमात व मुक्त माध्यमांत भरपूर चर्चा झाली आहे. अनेक जण मग पवारांच्या घड्याळाचा आणि गजराचा किस्सा सांगायला सुरुवात करतात. अनेक जण त्यांनी कार्यकर्त्यांना कसे दुखावले, हे सांगतात. मात्र, त्यांच्या या सगळ्या कथित अवगुणांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मात केली असती. खरा मुद्दा होता, तो त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारसरणीचा.

शिवसेनेने नव्वदीच्या दशकात अलगदपणे सोडलेला मराठी माणसाचा मुद्दाच राज ठाकरेंनी पुन्हा उचलला होता. या भांडवलावर जे काही मिळायला हवे होते, ते त्यांना मिळाले. नंतर त्यावर काही चांगलेही त्यांनी करून दाखविले. मात्र, नंतर ‘आपले नेमके काय’ या प्रश्नाचे उत्तर त्यांना शोधता आले नाही. शिवसेनेप्रमाणेच त्यांनीही नंतर हिंदुत्वाचा मुद्दा आणला आणि जिल्ह्यात गोशाळा वगैरेंसारख्या घोषणाही दिल्या. हिंदुत्वाचा मुद्दा मानणार्‍या कल्याण-डोंबिवलीसारख्या ठिकाणच्या मतदारांनी त्यांना मतदानही केले. मात्र, आपल्या पक्षाची विचारसरणी कोणती, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला होता. आता अस्तित्वात असलेल्या सर्वच पक्षांना काही ना काही, कधी ना कधी कधी तरी वैचारिक पार्श्वभूमी होती. नरेंद्र मोदींच्या मागे रा. स्व. संघाचे पाठबळही होते आणि कर्तृत्वही होते. मनसेचा पायाच मुळी काही भाडोत्री विचारवंतांकडून घालण्यात आला होता. त्यांनी काय वाचावे आणि काय वाचू नये, हेदेखील हे विचारवंत सांगायचे. आता अशा ठिसूळ पायावर उभा असलेला पक्ष कोसळणार नाही तर काय होणार? राज ठाकरेंचेही नेमके तेच झाले. आता मुद्दा असा की, विरोधी पक्षाची जागा तरी मनसेला लोक देतील का? तर या प्रश्नाचे उत्तर खुद्द राज ठाकरेही देऊ शकणार नाहीत.

@@AUTHORINFO_V1@@