उत्तर मुंबई मतदारसंघात अनेक वर्षे भाजपचाच वरचष्मा आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अभिनेता गोविंदाला लोकसभेत पाठविण्याची चूक केली, असे मतदारांना वाटायला लागल्यानंतर २०१४ आणि २०१९च्या निवडणुकांनंतर त्यांनी पुन्हा भाजपलाच पसंती दिली आहे. या लोकसभा मतदारसंघातील दहिसर, गोरेगाव, बोरिवली विधानसभा मतदारसंघ भाजपचेच आहेत. त्यातून बोरिवली हा भाजपचा सुरक्षित गड आहे. १९८० पासून येथे माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, भाजपचे वरिष्ठ नेते हेमेंद्र मेहता आणि खा. गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना येथून ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. २००९ मध्येही शेट्टी यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला. मात्र, २०१४ मध्ये मात्र गोपाळ शेट्टी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तेथे उमेदवार कोण याची चाचपणी झाली. हा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ असल्याने पार्ल्यात वास्तव्य असणारे विनोद तावडे यांना तेथून उमेदवारी देण्यात आली आणि बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विनोद तावडे यांनी १ लाख, ०८ हजार, २७८ एवढी मते घेत विजय मिळवला.
दुसर्या ठिकाणी उभे राहून मोठा विजय मिळविणार्या तावडे यांचा मानही मोठा राहिला. पहिल्याच विजयाचे रूपांतर मंत्रिपदात झाले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे ते विश्वासू सहकारी झाले. मात्र, भाजप हा पारदर्शी व्यवहारांचा आणि लोकमताचा आदर करणारा शिस्तबद्ध पक्ष असल्याने विनोद तावडे यांच्याऐवजी पक्षाने त्यांना तूर्त बाजूला ठेवत पक्षासाठी झटणार्या दुसर्या युवा कार्यकर्त्याला संधी देण्याचे ठरविले आणि सुनील दत्तात्रेय राणे यांचे नाव पुढे आले. सुनील राणे हे माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री दत्तात्रेय राणे यांचे चिरंजीव आहेत. सुनील राणे यांचाही सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात दबदबा आहे. मुंबई उपनगरात अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारी ‘अथर्व शैक्षणिक संस्था’ स्थापन करून युवा पिढीला रोजगारक्षम बनविण्याचा त्यांनी संकल्प केला.
वरळी हा शिवसेनेचा गड असतानाही येथे भाजपचे उमेदवार सुनील राणे यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. मात्र, या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती झाल्याने वरळी मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यामुळे पक्षाने त्यांना बोरिवलीतून संधी दिली आहे. या मतदारसंघात मराठी भाषिकांबरोबरच गुजराती आणि हिंदी भाषिकही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, येथे उमेदवार निवडताना भाषेचा प्रश्न आड येत नाही. राणे यांच्या विरोधात येथे कुमार खिलारे (काँग्रेस), राजेश मल्लाह (समाजवादी), धीरूभाई गोहील (अपक्ष) असे तीन उमेदवार आहेत. मात्र, राणे यांच्या कामापुढे इतर तिघांचे काम वाखाणण्यासारखे दिसत नाही. त्यामुळे भाजप आपली परंपरा कायम राखण्याची जास्त शक्यता आहे.
चारकोप-गोराई यासारख्या मोठ्या म्हाडा वसाहती या मतदारसंघात आहेत. त्यांचा पुनर्विकास आणि पाण्याचा भेडसावणारा प्रश्न आहे. बोरिवली स्थानकानजीकचा परिसर मोकळा कसा राहील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाहतूककोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी रस्ते मोकळे राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.