अश्वत्थाम्याची हळहळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |



अश्वत्थाम्याला झालेली जखम घेऊन तो आजही हिंडतो
-फिरतो, असे म्हणतात. आता गलितगात्र झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रस्थानी आणण्याच्या मिषाने वणवण भटकणारे पवारही तसेच भासतात. पण केवळ वल्गना करून काहीही साध्य होणारे नसते, हे शरद पवारांनी लक्षात घ्यायला हवे.



भाजपला घालवल्याशिवाय म्हातारा होणार नाही
,” असा निर्धार नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरला लागू असलेले ‘कलम ३७०’ निष्प्रभ करत राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केले. भारताच्या या पावलाने चवताळलेल्या पाकिस्तानने तेव्हापासूनच गरळओकीला सुरुवात केली. त्या देशाच्या रेल्वेमंत्री, परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान आणि लष्करानेही ‘भारताला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’च्या शपथा घेतल्या. इतकेच नव्हे तर पाकिस्तानची मजल अण्वस्त्रयुद्धाच्या धमक्या देण्यापर्यंतही गेली. पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रासह आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्नही केला. परंतु, भारताच्या जगभरातील पत-प्रतिष्ठेमुळे तर पाकिस्तानच्या विध्वंसक-दहशतवादी प्रतिमेमुळे त्या देशाच्या बाजूने कोणीही उभे राहिले नाही.



तद्नंतर पाकिस्तानला आपली पात्रता समजली व त्या देशाने आदळआपट करण्यातून भारतविरोधी द्वेषाला वाट मोकळी करून दिली
. आपल्याला भारताविरोधात कोणतीही कारवाई करणे शक्य नसल्याचे पटल्याने पाकिस्तानचे शब्द वाफेचे बुडबुडे ठरले. नंतरची त्या देशातल्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये हतबलतेतून येत असल्याचेही स्पष्ट झाले. समोर कोण उभे आहे, त्याची आणि आपली बरोबरी होऊ शकते का, याची कोणतीही माहिती न घेता बरळत सुटले की असेच होणार म्हणा. हा मुद्दा इथे देण्याचे कारण म्हणजे शरद पवारांचाही पाकिस्तान झालाय की काय? कारण, पाकिस्ताननेही सुरुवातीला ‘यंव करू न् त्यंव करू’ ची भाषा वापरली पण नंतर मात्र शेपूट घातली. शरद पवारही आता भाजपविरोधात पाकिस्तानसारखीच सत्तेतून बेदखल करण्याची विधाने करत आहेत. पण, भाजपला सत्तेबाहेर करण्याची ताकद शरद पवार वा त्यांच्या उरल्यासुरल्या राष्ट्रवादी काँग्रेस वा मित्रपक्ष काँग्रेसकडे आहे का? तसे नाही, म्हणूनच पवारांच्या बोलण्याला काहीही करू न शकण्याच्या हताशेतून व्यक्त होणारा केविलवाणेपणाच म्हटले पाहिजे.



महाभारतात एक कथा आहे
. कौरव-पांडव युद्धावेळी द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या पाच पुत्रांना रात्रीच्या अंधारात मारून टाकले. तत्कालीन संकेतानुसार अश्वत्थाम्याचे हे कृत्य धर्मविरोधी होते. पुढे अर्जुनाने श्रीकृष्णाच्या साहाय्याने अश्वत्थाम्याला पकडून द्रौपदीपुढे हजर केले. त्यावेळी द्रौपदीने अश्वत्थाम्याला न मारता जीवदान दिले. पण श्रीकृष्णाने मात्र, “गुन्हेगाराला दंड न करता तसेच सोडून देणे योग्य नाही,” म्हणत शिक्षा द्यायलाच हवी, असे मत मांडले. ते ऐकून अर्जुनाने अश्वत्थाम्याच्या माथ्यावरील जन्मजात मणी काढून टाकला व त्याचे मुंडन केले. नंतर झालेली जखम घेऊन अश्वत्थामा तिथून पसार झाला. मात्र, कपाळावरची ती भळभळती जखम त्याची आयुष्यभराची सोबती झाली. कथा, पात्रे, प्रसंग जसाच्या तसा घेतला नाही, तरी शरद पवारांची आजची अवस्था त्या अश्वत्थाम्यासारखीच झालेली दिसते. एकेकाळी दिल्ली दरबारात झेप घेतलेल्या, पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिलेल्या बारामतीच्या तेल लावलेल्या पहिलवानाला कितीही कागाळ्या, लावालाव्या वा फोडाफोडी करूनही ते सर्वोच्चपद कधी मिळालेच नाही.



पुढे त्यांच्या समर्थकांनी हे दुःख
भारताला न लाभलेला उत्कृष्ट पंतप्रधानअशा शब्दांत सोनेरी मुलामा लावून व्यक्त केले, तर शरद पवारांनी आपल्या मनाला झालेली जखम कोणाला घरी बसवण्याच्या तर कोणाला राजकारणातून उठवण्याच्या हळहळीतून बाहेर काढली. अकोल्यातील सभेतून शरद पवारांनी केलेले भाजपला घालवून देण्याचे विधान त्यांच्या विवशतेचीच साक्ष देणारे आहे. अश्वत्थाम्याला झालेली जखम घेऊन तो आजही हिंडतो-फिरतो, असे म्हणतात. आता गलितगात्र झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रस्थानी आणण्याच्या मिषाने वणवण भटकणारे पवारही तसेच भासतात. पण केवळ वल्गना करून काहीही साध्य होणारे नसते, हे शरद पवारांनी लक्षात घ्यायला हवे. त्यातून फारतर पवारांना ‘साहेब’, ‘राजा’, ‘सह्याद्री’ वगैरे विशेषणे लावणार्‍यांना चेव चढेल. मात्र, जनतेच्या मनामनात घर केलेल्या भाजपला सत्तेतून बाजूला फेकता येणार नाही, तेवढी शक्ती पवारांकडे कालही नव्हती आणि आजही नाही.



दुसरीकडे
‘तोपर्यंत म्हातारा होणार नाही,’ असेही शरद पवार म्हणाले. पण, पवारांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे एक बरे आहे. ज्यावेळी शरद पवारांचे नाव शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आले, त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी वार्धक्यात साहेबांच्या मागे ‘ईडीपिडा’ लावून त्रास दिला जातो, असे म्हणत रडारड सुरू केली. शरद पवार आता म्हातारे झालेत, त्यांना छळू नका, असे त्यांनी म्हटले. आता मात्र, शरद पवारांनी स्वतःच आपण म्हातारे झालो नसल्याचे सांगत कोलांटउडी मारली. छगन भुजबळ जसे तुरुंगात जातेवेळी छातीत कळ येऊन आजारी पडतात, रुग्णालयातील बिछाना सोडत नाहीत आणि जामिनावर बाहेर आले की, टुणटुणीत दिसतात, प्रचाराला लागतात, तसलाच हा प्रकार. अर्थात, शरद पवार स्वतःला तरुण समजत असतील तर उत्तमच; पण त्यांनी,‘महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् केल्याशिवाय म्हातारा होणार नाही,’ अशी प्रतिज्ञा केली असती तर ते अधिकच उत्तम ठरले असते.



तसेच इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे धडाडीचा तरुण कधी कोणाला बसवण्याची भाषा करत नाही
, तर तो उमदेपणाने समोरासमोर लढण्याची भाषा करत असतो. शरद पवार मात्र तसे काही करण्याऐवजी निराळीच चिंता वाहताना दिसतात. खरे म्हणजे त्यांनी आपल्या तोळामासा झालेल्या पक्षाला नव्याने उभारी देण्याची, नव्या दमाचे-हिमतीचे नेतृत्व तयार करण्याची धमक दाखवायला हवी होती. पण ते न करता स्वपक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला असताना, खांद्याला खांदा लावून सत्ताधार्‍यांशी दोन हात करायला कोणी उरलेले नसताना शरद पवारांनी भाजपलाच सत्ताच्युत करण्याचा उद्देश व्यक्त केला. अर्थात ते पवारांच्या आणि त्यांच्या पुतण्याच्या आतापर्यंतच्या राजकारणालाही साजेसेच म्हणा. कारण, राष्ट्रवादीवाल्यांनी नेहमीच याला पाडतो-त्याला पाडतो, याची जिरवतो-त्याची जिरवतो, असेच केले. मात्र, असल्या उद्योगातूनच आपल्यावर पराभूताचे जिणे जगण्याची वेळ आली, हे त्यांना कधी समजलेच नाही. आता पवारही तसेच म्हणत असतील तर त्यातून भाजपला नुकसान होण्यासारखे काहीही नाही. कारण, अश्वत्थाम्याने कितीही हळहळ व्यक्त केली तरी सत्य व सकारात्मकता गाठीशी नसल्याने त्याला जनता स्वीकारत नसते-त्याच्या नशिबात जखम कुरवाळत निरर्थक पायपीट करणेच असते.

@@AUTHORINFO_V1@@