कृषीचा नवा अर्थसुगंध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019   
Total Views |



बहुतांश दुष्काळी भागात शेतकर्‍यांनी कमी पाण्यावर झेंडूची लागवड यशस्वी करत आर्थिक उत्पादनाचा नवा मार्ग विकसित केला आहे. कांदा उत्पादन केल्यावर त्यात दरांची असणारी स्थिती लक्षात घेता शेतकर्‍यांनी या संघर्षात न पडता झेंडू पिकाला दिलेली पसंती हे कृषी साक्षरतेचे लक्षण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका हा
पर्जन्यछायेचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो. असे असले तरी कांदा पीक हे येथील कृषी अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे पीक असून याच पिकाने या तालुक्याला ओळख निर्माण करून दिली. मात्र, आज झेंडू पिकाच्या रूपाने येथील कृषी अर्थव्यवस्थेला नवा सुगंध प्राप्त होत आहे. तालुक्यातील शेतकरी खरिपाच्या हंगामात आधुनिक पद्धतीने झेंडूची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे. चार महिन्यांत लाखांचे उत्पादन देणारे झेंडू पीक हे शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरले आहे. तालुक्यातील बहुतांश दुष्काळी भागात शेतकर्‍यांनी कमी पाण्यावर झेंडूची लागवड यशस्वी करत आर्थिक उत्पादनाचा नवा मार्ग विकसित केला आहे. कांदा उत्पादन केल्यावर त्यात दरांची असणारी स्थिती लक्षात घेता शेतकर्‍यांनी या संघर्षात न पडता झेंडू पिकाला दिलेली पसंती हे कृषी साक्षरतेचे लक्षण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चांदवड तालुक्यातील विविध गावांत यंदा सिझेंडा, इन्व्हा, इंडस या कंपन्यांच्या गोल्डस्पॉट टू, अष्टगंधा, रोगोल्ड, मेरीगोल्ड आदी जातीच्या झेंडूंची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकर्‍यांनी काही हेक्टरी क्षेत्रात झेंडूची लागवड केल्याने आणि त्यातच पाच गुंठे ते अगदी दोन एकरपर्यंत लागवड करण्यात आल्याने आगामी काळात बाजारपेठेत झेंडूचा गंध दरवळणार, अशी स्थिती आहे. काही शेतकर्‍यांनी तर दुहेरी पीक म्हणून झेंडूला पसंती दिली आहे. तसेच, डाळिंब उत्पादनासाठी बहुपयोगी पीक म्हणून देखील झेंडूचे आगळे महत्त्व आहे. फूल तोडणीनंतर सेंद्रिय खत म्हणून झेंडूपिकाचा वापर कृषी क्षेत्रात केला जातो. यामुळे डाळिंबावर मर रोगाचा प्रादुर्भाव होण्यास अटकाव होतो. या गुणधर्मामुळे डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांसाठी हे पीक नगदी अंतरपीक म्हणून उदयास येत आहे. शिवाय इतर पिकाच्या तुलनेत या पिकाला खर्च कमी असल्याने बहुतांश शेतकरी हे पीक घेण्यास पसंती देत आहेत. झेंडूच्या फुलांनी तालुक्यातील बाजार समित्यांसह दादर, सुरत, धुळे, अहमदाबाद, जळगाव, औरंगाबाद, कल्याण येथील बाजारपेठेतदेखील आपला डौलदारपणा दाखवत सुगंध पसरविण्यास सुरुवात केली आहे.


आव्हान नाशिक ते पुणे विमानसेवेचे


भारतातील सर्वच महत्त्वाची शहरे ही एकमेकांशी हवाई मार्गाने जोडली जावीत यासाठी केंद्र शासनाच्या वतीने
‘उडान’ योजना कार्यान्वित करण्यात आली. भारतीय नागरिकांना हवाई सफर स्वस्तात उपलब्ध व्हावी, या हेतूबरोबरच नागरिकांच्या प्रवासातील वेळेची बचत व्हावी, हादेखील यामागील उद्देश होताच. ‘उडान’ योजनेअंतर्गत नाशिक येथून अहमदाबाद, हैदराबाद, दिल्ली अशा महत्त्वाच्या शहरांसाठी हवाई सेवा यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यातच आता लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ‘नाशिक ते पुणे’ ही हवाई सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचे बुकिंगदेखील सुरू झाले असून त्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त वाचनात येत आहे. असाच प्रतिसाद दिल्ली आणि अहमदाबाद हवाईसेवेलादेखील यापूर्वी नाशिक नगरीतून प्राप्त झाला होता. मात्र, त्यानंतर प्रवाशांची कमतरता, विमानतळावर विमान उतरविण्यासाठी स्लॉट न मिळणे अशा बाबींमुळे या सेवा कायमच खंडित होत राहिल्या. तशीच गत आता नाशिक ते पुणे या हवाईसेवेची होऊ नये, हीच अपेक्षा नाशिककर नागरिक बाळगत आहेत. मात्र, नाशिक ते पुणे हवाई सेवा अखंडित राहाणे, हे एक मोठे आव्हान असणार आहे, हे नक्की. याचे प्रमुख कारण म्हणजे, नाशिक ते पुणे हे अंतर रस्तामार्गे केवळ २१० किमी आहे. तसेच, हा रस्ता चौपदरीदेखील झाला आहे. त्यामुळे वाहनांना वेग प्राप्त होण्याबरोबरच खूप कमी वाहतूक खोळंब्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे नाशिकहून निघालेला प्रवासी सव्वाचार ते पाच तासांत पुण्यात इच्छित स्थळी पोहोचतो (यात पुणे येथील नाशिक फाटा ते पुणे शहरातील वाहतूक स्थितीदेखील समाविष्ट) दुसरे म्हणजे या हवाईसेवेला एक हजारांपेक्षा जास्त रकमेचे तिकीट आकारले जात आहे, तर वाहन इंधनाचा खर्च त्यापेक्षा कमी येतो आणि किमान चार प्रवासी एकाच इंधन खर्चात प्रवास करू शकतात. तसेच, नाशिक येथून दर अर्ध्या तासाला बस पुण्यासाठी उपलब्ध आहेच. या सर्व बाबी लक्षात घेता, या हवाईसेवेचे अखंडत्व अबाधित राखणे, हे एक आव्हान असणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@