डोंबिवली शहराचे ‘कल्याण’ कधी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |




डोंबिवली हे नोकरदारांचे शहर म्हणून ओळखले जाते. चाकरमान्यांचे शहर असलेल्या डोंबिवली शहरात विकासकामानिमित्त अनेक बदल घडले. मात्र, येथील राजकीय परिस्थिती काही बदलली नाही. डोंबिवली मतदारसंघात कायम भाजप-शिवसेना युतीचाच दबदबा राहिलेला आहे. अगदी लोकसभेपासून विधानसभा आणि महानगरपालिकेपासून ग्रामीण भागांतील नगर परिषदांतही भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्याच गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली आहे. २००९ साली कल्याण विधानसभेचे विभाजन झाले व डोंबिवली मतदार संघ उदयास आला. या मतदार संघातून भाजपचे रवींद्र चव्हाण हे विजयी झाले. त्यानंतर २०१४ साली झालेल्या निवडणुकीतदेखील रवींद्र चव्हाणच पुन्हा निवडून आले. यंदाही महायुतीतर्फे त्यांनाच उमेदवारी देण्यात आली असून ते हॅट्ट्रिकसाठी सज्ज झाले आहेत.



डोंबिवली शहरातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतल्यास शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाचा
यात समावेश होतो. डोंबिवलीत भाजपचे १५ नगरसेवक आहेत. यातील पूर्वेला ९ तर पश्चिमेला ६ नगरसेवक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे ४ लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आले होते. या निवडणुकीत महायुती उमेदवाराविरोधात उभे ठाकलेले महाआघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांची डाळ काही शिजली नाही. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसच्या राधिका गुप्ते यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. त्या सामजिक कार्यकर्त्या आहेत. मनसेकडून नगरसेवक मंदार हळबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, डोंबिवली शहरात काँग्रेसचे अस्तित्व हे दमदार नसल्याने ही निवडणूक भाजपविरोधी मनसे अशी होणार आहे. हळबे हे संघाचे कार्यकर्ते असल्याने संघाच्या लोकांशी त्यांची एक वेगळी जवळीक आहे. याचा फायदा हळबे यांना होईल, असे बोलले जात असले तरी राज्यमंत्री चव्हाण यांचे शहरातील प्रत्येक नागरिकाशी आपलेपणाचे सबंध आहेत. पण त्याचबरोबर संघाच्या जुन्या व जाणत्या लोकांचा चव्हाण यांना पाठिंबा असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.



डोंबिवली शहरात वाढती वाहतूककोंडी तसेच अरुंद रस्ते
, रेल्वेची समस्या, अनधिकृत बांधकामे, धोकादायक इमारती आदी मुद्दे अग्रगण्य असून त्यावर विद्यमान आमदारांनी आत्तापर्यंत केले तरी काय? तसेच विविध समस्यांनी ग्रासलेल्या या शहराचे ‘कल्याण’ नेमके होणार तरी कधी? असे सवाल मतदार राजाकडून विचारले जात आहेत. मात्र असे असले तरी राज्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीचा या शहराला कायमच फायदा झाला आहे. डोंबिवलीकर हे कला, क्रीडा, व सांस्कृतिक क्षेत्रात रमणारे आहेत, याची जाण राज्यमंत्र्यांना आहे. गेली १० वर्षे राज्यमंत्री चव्हाण ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ च्या माध्यमातून डोंबिवलीकरांची ही रुची जोपासत आहेत. डोंबिवली शहरात जनसंघापासून भाजपला डोंबिवलीकरांचा पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांचे कौशल्य व दांडगा जनसंपर्क व संघपरिवाराचा असलेला पाठिंबा याविरोधात विरोधकांचे आव्हान तुटपुंजे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- रोशनी खोत
 
 
@@AUTHORINFO_V1@@