पुणे करार : अस्पृश्यता निर्मूलनाच्या मार्गातला महत्त्वाचा टप्पा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |



महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दलित समाजाविषयीचे विचार काय होते, त्यांच्यात मतभिन्नता होती की साम्यता होती, आताचे काही अभ्यासक ‘गांधी विरुद्ध आंबेडकर’ असा संघर्ष मांडण्याचाही उद्योग करतात. पण, तो खरेच तसा होता का आणि पुणे कराराच्या माध्यमातून भारताचे, इथल्या समाजाचे एकता-अखंडत्व अबाधित राखण्यात गांधीजींनी नेमकी कोणती भूमिका निभावली, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात. जाणून घेऊया याविषयी सविस्तर...

 

यंदाच्या वर्षी आपण महात्मा गांधीजींची दीडशेवी जयंती साजरी करीत आहोत. या निमित्ताने या महापुरुषाच्या मौलिक जीवनकार्याविषयी कृतज्ञता बुद्धीने चिंतन-मंथन करणे नि:संशय इष्ट आहे. भारतात वर्षानुवर्षे रुजलेली अमानुष अस्पृश्यतेची प्रथा कायमची संपुष्टात यावी, या हेतूने महात्माजींनी केलेले योगदान निश्चितच प्रभावी ठरले आहे व या अस्पृश्यता निर्मूलन मार्गात पुणे करारामुळे एक मोठा टप्पा आपण पार केला, हे वादातीत आहे. गांधीजींनी स्वत:चे प्राण पणाला लावले व त्यातून पुणे करार अक्षरबद्ध झाला, हेही सर्वांना ठाऊक आहे. अर्थात पुणे करार साकारला, याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही स्वत:चा मूळचा हट्ट बाजूला ठेवला. भारतवर्षाच्या, हिंदू समाजाच्या हिताचा विचार केला म्हणूनच पुणे करारावर सगळ्यांचे शिक्कामोर्तब झाले, हे लक्षात येते. तात्पर्य, पुणे कराराविषयी आपण चिंतन करतो तेव्हा महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या अस्पृश्यता निर्मूलनाविषयीच्या भूमिका अभ्यासल्या जातात, हाही एक महत्त्वाचा लाभ या विवेचनातून पदरी पडतो.

 

गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या जीवनात पुणे करारापूर्वी अस्पृश्यता निर्मूलनाविषयी काही निश्चित दिशादर्शन झाले होते व म्हणून पुणे करारापूर्वी या दोघांच्या कोणत्या प्रतिमा जनमनात रुजल्या होत्या, हे प्रथम अभ्यासात घेतले पाहिजे. खुद्द पुणे कराराची नजीकची पृष्ठभूमी हा करार व या कराराची फलश्रुती हे विवेचन लेखाच्या दुसर्‍या भागात केले पाहिजे आणि लेखाच्या अखेरीस पुणे करारानंतर गांधीजी व बाबासाहेब या दोघांनी अनुसरलेले मार्ग या विषयाचेही विवेचन केले पाहिजे.

 

गांधीजी व बाबासाहेब यांच्या प्रतिमा

सन १९३२ मध्ये पुणे करार कागदावर उतरला. तत्पूर्वीच महात्मा गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी आपल्या आचरणातून व अभिव्यक्तीतून भारताच्या पुनर्निर्माणाविषयीचे अभिप्राय सर्वांसमोर मांडले होते. आपण या अभिप्रायांची दखल घेतली तर या दोघांच्या प्रतिमांचे काही चित्रण शब्दांकित करता येईल.

 

सन १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले, पण दक्षिण आफ्रिकेतच त्यांनी सामान्य माणसाला न्याय व सन्मानाचा व्यवहार मिळावा म्हणून सत्ताधीशांशी यशस्वी अहिंसक संघर्ष केला होता. माणसा माणसातला वर्णभेद, माणसा माणसातील उच्चनीचता आणि परिणामत: जनसामान्यांत उत्पन्न होणारे वैफल्य संपुष्टात यावे म्हणून प्रभावी प्रयास केले होते. या प्रयासातून गांधींजीचे संघटन कौशल्य त्यांची समूहनेतृत्व करण्याची क्षमता हेही गुण प्रकटले होते.किंबहुना अभिजनांनी स्वसुखावर निखारे ठेवून समाजसेवा करावी, तर बहुजनांनी न्यूनगंडावर मात करून आत्मविश्वासाने मार्गक्रमणा करावी, हा गांधीजींचा दृष्टिकोनही दक्षिण आफ्रिकेतल्या त्यांच्या संघर्षातून जगाला कळला होता.

 

भारतात आल्यावर त्यांनी प्रथम चंपारण्यात नंतर अहमदाबादेत व याच क्रमाने खेडा जिल्ह्यात स्वत:ला जुंपून घेतले तेव्हा तर गांधीमार्गाच्या यशस्वितांची चांगली प्रमाणेच जगाला उपलब्ध झाली. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतला दुष्ट दरडोर्ई कर तुलनेने सुसह्य झाला, चंपारण्यातल्या शेतकर्‍यांच्या शिरावर लादले गेलेले नीळ लागवडीचे ओझे समाप्त झाले. अहमदाबादेतल्या श्रमिकांना वेतनवाढीचा लाभ पदरी पडला, तर खेडा जिल्ह्यातला जाचक जमीन महसूल अथवा सारा संपुष्टात आला. म्हणता म्हणता, गांधीजींनी गुजरातेतून अखिल भारतीय स्तरावर चांगली झेप घेतली.

 

रौलेट अ‍ॅक्टच्या विरोधात तसेच जालियनवाला बागेत जो भीषण गोळीबार झाला, त्याच्याही विरोधात गांधीजींच्या पुढाकारामुळे सर्वदूर जन आक्रोश अभिव्यक्त झाला. लोकमान्य टिळकांच्या दुर्दैवी निधनानंतर गांधीजीच भारताचे अनभिषिक्त सम्राट म्हणून पुढे आले. म्हणजे सत्ता कुणा ब्रिटिश गौरवर्णीय माणसाची असेल, अधिकार गांधीजींचाच. हे समीकरणही पुणे करारापूर्वी जनमनात टंकित झाले. सत्ता खुर्चीवर निर्भर असते, अधिकार त्यागावर अधिष्ठित असतो. या अर्थाने सत्ता परप्रकाशित तर अधिकार मात्र स्वयंप्रकाशी असतो. खुर्ची गेली की सत्ता संपली व म्हणून सत्ता अल्पजीवी तर त्यागाधिष्ठित अधिकार मात्र चिरंजीवी! गांधीजींचा अधिकार या प्रकारे भारतव्यापी झाला होता. बाबू राजेंद्रप्रसाद, नेहरू पितापुत्र, सरदार वल्लभभाई पटेल, विनोबा भावे अशी अनेक लोकोत्तर अभिजन मंडळी गांधीजींच्या आज्ञा प्रमाण मानून शासनविरोधी लढे चालवित होती.

 

पुणे करारापूर्वीच थेट केरळात जाऊन गांधीजींनी नारायण गुरुंना साथसंगत दिली होती. वैकामच्या रस्त्यावर सामाजिक समरसता सिद्ध करण्यात गांधीजींना यश लाभले होते. उत्तर प्रदेशात महामना पंडित मदनमोहन मालवीय यांच्या खांद्याला खांदा लावून गांधीजींनी अस्पृश्य बंधुभगिनींना सार्वजनिक पाणवठ्यांवर प्रवेश मिळावा, मंदिरातून ये-जा करण्याची अनुमती मिळावी म्हणून चांगली खटपट केली होती. तात्पर्य, भारताचे पारतंत्र्य संपवायचे असेल तर राजकीय लढ्यांना सामाजिक संघर्षाची सोबत मिळाली पाहिजे, ही गांधीजींची भूमिका पुणे करारापूर्वीच भारतवर्षाला कळली होती. कालबाह्य रुढी कायम राहिल्या, तर खाकी जाऊन खादी आली, पण गोरगरीब व विशेषत: अडाणी अस्पृश्यांची अवस्था अधिक बिकट झाली, असे म्हणण्याची वेळ येईल, हे लोकांना पटविण्यात गांधीजींनी सक्रिय भूमिका बजावली होती.

 

गांधीजींचेहिंद स्वराज्य’ हे पुस्तक तसेच ‘नवजीवन’ नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख, त्यांच्या व्यवहारामागे कणखर विचार आहेत, याचे प्रमाण देत होते. युरोपीय सभ्यतेऐवजी भारतीय सभ्यता आपण शिरोधायर्र् मानावी आणि जाती पोटजातीतली उच्चनीचता, अस्वच्छता आणि अज्ञान यांच्यावर यशस्वी मात करणारी ग्रामसंस्था सामूहिक प्रयासातून भारतात उभी करावी, हे गांधीजींचे स्वप्नही पुणे करारापूर्वीच लोकांना कळले होते.

 

डॉ. आंबेडकरांची प्रतिमा

पुणे कराराचे महात्मा गांधी हे जसे एक शिल्पकार होते, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्मरण शिल्पकार म्हणूनच केले पाहिजे. तेव्हा हा करार कागदावर उतरला, तत्पूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांचीही जी प्रतिमा जनमानसात निश्चित झाली होती, तिचे रेखाटनही प्रस्तुत लेखात स्वाभाविक आहे. गांधीजींपेक्षा बाबासाहेब २२ वर्षांनी लहान होते. सन १९३२ मध्ये जेव्हा गांधीजींनी आयुष्याची साठी पूर्ण केली होती, तेव्हा डॉ. आंबेडकरांनी चाळीशी ओलांडली होती. पण या वयातच त्यांनी ‘दलितोद्धारक’ ही प्रतिमा स्वकर्तृत्वाने स्वत:च्या कनवटीस बांधली होती.

 

मुळात, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी बोलताना सन १९१३ मध्येच त्यांनी, "मला माझ्या शिक्षणाच्या आधारे माझ्या दलित बंधू-भगिनींचा उद्धार करायचा आहे," हे जीवनोद्दिष्ट सुस्पष्ट केले होते. या उद्दिष्टपूर्तीच्या मार्गात येणार्‍या अन्य सर्व पर्यायांचा निर्धारपूर्वक इन्कार केला होता. स्वत:च्या चिंतनातून, लेखनातून व संशोधनातून ‘अस्पृश्यता निर्मूलन’ या विषयाचे अधिकाधिक आकलन व्हावे म्हणून प्रयासांची माळ रचली होती. काय योगायोग आहे पाहा, सन १९१६ मध्ये लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य मिळविणे, हा माझा हक्क आहे व हे स्वराज्य मी मिळविणारच,’ अशी सिंहगर्जना केली, त्याच वर्षी बाबासाहेबांनी 'Castes in India : Their Genesis Mechanism and Development' या शीर्षकाचा संशोधनपर निबंध हातावेगळा केला.

 

आपण म्हणू शकतो की, भारताला स्वराज्य मिळाल्यानंतर ते सार्थकी लावायचे असेल तर हिंदू समाजातली जातिव्यवस्था व तद्भव उच्चनीचता व स्पृश्यास्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. हा उचित आग्रहच आंबेडकरांनी अभिव्यक्त केला होता. सन १९२४ मध्ये विदेशातून भारतात परतल्यावर तर अस्पृश्यता नष्ट व्हावी, या हेतूपूर्तीकरिता बाबासाहेबांनी विविध उपक्रमांची जाळी विणली होती. ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’, 'People Education Society' या संस्थांची स्थापना केली होती, ‘बहिष्कृत भारत’ नामक साप्ताहिक सुरू केले होते, मंदिर प्रवेशासाठी मोर्चे, सत्याग्रह वगैरे लढेही सुरू केले होते. म्हणजे खाजगी व्यवसायाबरोबरच सार्वजनिक उद्योगही उपरोल्लेखित जीवनोद्दिष्ट-पूर्तीसाठी साहसाने सुरू केले होते.

 

लेखांमधून व भाषणांमधून हिंदू समाजाच्या पुनर्रचनेकरिता प्रबोधनाचा यज्ञच आरंभिला होता. "मला कळपर्वी झीेींशीींरपीं म्हणा व हिंदू समाजाच्या सर्वांगीण सुधारणा साकार करा," हाच तर तेव्हा बाबासाहेबांचा धोशा होता. "रामानुजाचार्य, संत एकनाथ या श्रेष्ठ समाजसुधारकांचे अनुकरण करून अस्पृश्यता गाडून टाका," या आशयाचे आवाहनच सवर्णांना उद्देशून बाबासाहेबांनी केले होते. अस्पृश्य बंधुभगिनींना उद्देशून त्यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि अन्यायाच्या विरोधात लढा,’ हे आवाहन केले होते.

 

भारतवर्षाने उपनिषदकारांपासून भागवतधर्मीय संतांपर्यंत आणि एकोणिसाव्या शतकातल्या राजा राममोहन रॉय आदी समाजसुधारकांपर्यंत कैक उदारहृदयी विचारवंतांना व कृतिशूर व्यक्तींना पाहिले होते, पण डॉ. आंबेडकरांच्या रूपात भारतवर्षाने अस्पृश्यवर्गात जन्मलेल्या प्रखर बुद्धिमत्तेचे, प्रतिबद्धतेचे आणि अतुलनीय निर्भयतेचे वरदान लाभलेल्या प्रतिभावंताचे पहिल्यांदाच दर्शन घेतले. आश्चर्य म्हणजे, हा प्रतिभावंत सुधारक स्वत:ला ‘हिंदू प्रोटेस्टंट’ म्हणवून घेत होता. भारतातल्या प्राचीन काळापासून वंदनीय असलेल्या ग्रंथसंपदेतली अवतरणे आणि उदाहरणे प्रस्तुत करून आपल्या युक्तिवादाचे समर्थन करीत होता, हिंदू समाजाने कालसुसंगत व्यवहार करावा, न्यायाची व माणुसकीची कदर करावी, हे म्हणणे तर्कशुद्ध रितीने मांडत होता. म्हणजे ज्ञानाच्या व आंदोलनाच्याही आधारावर चर्चाविमर्श करीत होता. वेगवेगळ्या जाती पोटजातींतल्या कर्तृत्वसंपन्नांना बरोबर घेऊन संस्थांची उभारणी करीत होता. ‘सवर्णांना’ कळकळीची आवाहने करीत होता. जाणकारांनी हेही टिपले की, आंबेडकरांचे हे प्रयास म्हणजे पालथ्या घड्यावरच्या पाण्याप्रमाणे वाहून जात होते. सवर्णांचा आडमुठेपणा, रुढींवरच्या विकृत प्रेमापोटी प्रकटणारा अमानुष व्यवहार व यातून वाढत गेलेल्या समाजातल्या भिंती, यामुळे संवेदनशील व्यक्तींना चटके जाणवत होते. सन १९२४ पासून नारायण गुरू, महामना पं. मालवीय, महात्मा गांधी, वीर सावरकर वगैरे कैक अभिजन हिंदू समाजाच्या परिवर्तनासाठी नाना प्रयास करीत होते, पण सवर्ण मानसिकतेत बदल होत नव्हते. ब्रिटिश सरकारच्याही लक्षात आले होते की, बाबासाहेब आंबेडकर नामक उगवत्या तार्‍याने सर्व नभोमंडळ प्रभावित केले होते, पण समाजाची यथास्थिती वादावरची प्रीती हटत नव्हती की, आटत नव्हती. ब्रिटिश शासकांना हे आकलन झाले, म्हणूनच त्यांनी लंडनमध्ये योजिलेल्या गोलमेज परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एक सन्माननीय प्रतिनिधी म्हणून पाचारण केले होते. तात्पर्य, महात्मा गांधींची कारुण्यरूप, संवेदनशील सवर्णसुधारक ही प्रतिमा पुणे करारापर्यंत तर निश्चित झाली होतीच, पण डॉ. आंबेडकरांचीदेखील निर्भय, बुद्धिमान आणि कृतिशूर दलित नेता अशी प्रतिमा या कालखंडात साकारली होती. संवेदनशील सवर्ण व स्वाभिमानी आणि विवेकी अस्पृश्य नेता यांच्यातल्या वैचारिक देवाणघेवाणीसाठी पारस्परिक चर्चा-विमर्शासाठी एक अनुकूल पृष्ठभूमी सन १९३२ पूर्वीच सिद्ध झाली होती.

 

पुणे-करार व त्याची फलश्रुती

 

दि. २४ सप्टेंबर, १९३२ या दिवशी ‘पुणे करार’ कागदावर अक्षरबद्ध झाला. तत्पूर्वी ब्रिटिश सरकारने योजिलेल्या लंडनस्थित गोलमेज परिषदेच्या दोन फेर्‍या पार पडल्या होत्या आणि तिसरी फेरी होणार, हे ठाऊक झाले होते. गोलमेज परिषदेच्या पहिल्या फेरीत महात्मा गांधी अनुपस्थित होते. डॉ. आंबेडकर मात्र उपस्थित होते व त्यांनी जातिप्रथेमुळे दलितांवर होणारा अन्याय तसेच दलितांची दुर्दैवी विपन्नावस्था ही कहाणी सगळ्यांसमोर मांडली होती. दुसर्‍या फेरीत ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा जाहीर केला, तेव्हा दलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळतील, हे जगाला कळले. महात्मा गांधीजींना दलितांसाठी वेगळी चूल मांडली जाणे मुळातच मान्य नव्हते. हिंदू समाजाची शकले पडणे, सवर्ण आणि दलित यांच्यात सदैव पक्की भिंत उभी राहणे, महात्मा गांधीजींना कदापि मान्य नव्हते. गांधीजींचा आणखी एक दावा होता, काँग्रेस पक्ष अवघ्या भारतवर्षाचे प्रतिनिधित्व करतो, तेव्हा डॉ. आंबेडकरांचा कुठला पक्ष जर दलितांची तरफदारी करण्यासाठी पुढे येत असेल तर ही घटनाही गांधीजींना न रुचणारी होती. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर म्हणजे सन १९१५ पासून दीड दशकांपेक्षा अधिक वर्षांमध्ये गांधीजींचे नेतृत्व चढत्या, वाढत्या वेगाने चौकार व षट्कार मारत होते.

या नेतृत्वाला कुणीही आव्हान देऊ शकत नव्हते
, पण डॉ. आंबेडकरांनी मात्र अतुलनीय साहस दर्शविले. "मी दलित म्हणून माझ्या जन्मापासून सर्व त्या भेदभावांची शिकार झालो आहे व म्हणूनच अस्पृश्य जातींच्या दुखण्या-गार्‍हाण्यांना मीच वाचा फोडू शकतो, दलितांचा सच्चा प्रवक्ता या नात्याने या मंडळींची कैफियत मांडण्याचा, त्यांना न्याय मिळवून देण्याचा माझा हेतू आहे व हा हेतू सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे." या आशयाचा बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद सर्वार्थाने समर्थनीय होता. नुकतीच चाळीशी ओलांडलेला एक बुद्धिवान दलित युवक, साठी उलटलेल्या सुप्रतिष्ठित वृद्ध नेत्याला आव्हान देत होता, हे दृश्य अनोखे होते. साहजिकच भारतात आंबेडकरांच्या विरोधात रान पेटले. महात्मा गांधीजीही हट्टाने उपोषण करण्यास सिद्ध झाले. ब्रिटिश शासनाचा दलितांसाठी वेगळी चूल मांडण्याचा पवित्रा गांधीजींना पूर्णत: अमान्य होता व म्हणूनच ब्रिटिश शासकांनी दलितांसाठी वेगळे, स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याचे धोरण रद्द करावे, या उद्दिष्टपूर्तीसाठी गांधीजी उपोषणाला बसले. आता सर्व मदार बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून होती. "मुसलमान, ख्रिश्चन यांच्यासाठी स्वतंत्र राहुट्या उभ्या करण्यास गांधीजींचा पाठिंबा आहे, मग दलितांना मात्र स्वतंत्र मतदारसंघ का नाकारता?" हा होता आंबेडकरांचा सवाल! सन १९३२ मध्ये १९ सप्टेंबरला महामना पंडित मालवीयांनी मुंबईला एक हिंदू संमेलन योजिले. तिथे सर्व वक्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की, स्वतंत्र मतदार संघ दलितांनाही अमान्य आहेत, या भूमिकेवर बाबासाहेबांनी शिक्कामोर्तब करावे. वेगळ्या शब्दांत, आंबेडकरांनी दलितांना प्राप्त होणार्‍या स्वतंत्र मतदारसंघावर पाणी सोडावे तरच गांधीजी स्वत:चे प्राणांतिक उपोषण मागे घेतील. मालवीयजींनी योजिलेल्या या हिंदू संमेलनात बाबासाहेबांनी प्रतिकूल प्रतिक्रिया सुस्पष्ट शब्दांत मांडली, "माझ्यासमोर उभयापत्ती आहे. गांधीजींचे प्राण वाचविण्यासाठी मी जर दलितांना मिळणार्‍या स्वतंत्र मतदारसंघांवर तुळशीपत्र ठेवले तर महात्माजींचे प्राण वाचविण्याचे पुण्य मला नक्की मिळेल, पण शतकानुशतके ज्यांचे शोषण झाले आहे, त्या माझ्या दलित बंधु भगिनींना दाखविला गेलेला आशेचा किरण मीच संपुष्टात आणला, या आरोपास मी पात्र ठरेन. उलट स्वतंत्र मतदारसंघाचा दलितांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, हा माझा धोशा मी सोडला नाही, तर गांधीजीही उपोषण चालू ठेवतील. या उपोषणाची परिणती जर भयानक झाली तर अवघा भारतवर्ष माझ्यावर हल्ला चढविल! अर्थात, शेकडो वर्षे अन्यायग्रस्त राहिलेल्या माझ्या दलित बंधुभगिनींना न्याय मिळेल. माझे मन मला सांगत आहे की, मी दलितांना न्याय मिळवून द्यावा. महात्माजींनीच स्वत:चे उपोषण सोडून द्यावे."

महात्मा गांधीजीही आपल्या भूमिकेशी चिकटून राहिले, तेव्हा मालवीय, जयकर, सप्रू वगैरे नेत्यांनी विधिमंडळातून दलितांसाठी १४८ जागा आरक्षित ठेवाव्यात, ७१ जागांपेक्षा ७७ अधिक जागा दलितांना याप्रकारे दिल्या जाव्यात, असा प्रस्ताव मांडला. स्वतंत्र मतदारसंघातून प्रतिनिधी व मतदार-दोन्ही दलित असतात, तर आरक्षित मतदारसंघातून मतदारांमध्येे सवर्ण व दलित अशा दोन्ही वर्गांचा समावेश असतो. प्रतिनिधी मात्र केवळ दलित राहतात. डॉ. आंबेडकरांसमोर हा पर्याय ठेवण्यात आला. बाबासाहेबांना परिस्थितीतले ताणतणाव कळून चुकले. महात्मा गांधींचे प्राण वाचविण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघांचा हट्ट सोडून द्यावा आणि आरक्षित मतदारसंघांचा पर्याय मान्य करावा, या दिशेकडे निर्णयाचा काटा झुकला. त्यांनी हाच निर्णय गांधीजींना कळविण्यास संमती दिली आणि हिंदू समाजात फूट पडणार नाही, सवर्णांकडून दलितांसाठी ७१ ऐवजी १४८ आरक्षित जागा सोडण्यात येतील, हा निवाडा सर्वमान्य ठरला. गांधीजींनी उपोषण सोडले. पुणे कराराद्वारे या निवाड्यावर मान्यतेची मोहोर उठली.

गांधीजींनी ‘डॉ. आंबेडकर हे दलितांचे प्रामाणिक प्रवक्ते आहेत व त्यांच्या भूमिकेची कदर केली पाहिजे,’ या बाजूने कौल दिला. ‘मीच काय तो अवघ्या भारतवर्षाचा प्रतिनिधी’ हा धोशा गांधीजींनी सोडून दिला. पुणे कराराची ही निष्पत्ती बाबासाहेब आंबेडकरांना समाधानकारक वाटली. या करारानंतर तत्काळ बाबासाहेब म्हणाले, "गांधीजींच्या विचारांत मोठी क्रांती झाली आहे. सहविवाह व सहभोजन या उपक्रमांना त्यांचा आता पाठिंबा आहे." शेषराव मोरे वाचकांना सांगतात, "गांधीजींचा एवढा गौरव बाबासाहेबांनी इतरत्र कधीही व कुठेही केलेला दिसत नाही." (पाहा : डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास (पुणे१९९८) पान ९२)

 

दुर्दैव असे की, पुणे करारानंतर केवळ तीन महिने उलटल्यानंतर बाबासाहेब पुनश्च गांधीजींवर प्रहार करू लागले, कारण चातुर्वर्ण्याबाबत गांधीजी पूर्वीचीच मते बाळगून होते. ‘जाती जाव्यात, पण चातुर्वर्ण्य व्यवस्था राहावी,’ हा गांधीजींचा दृष्टिकोन आंबेडकरांना मान्य नव्हता. दुसरे म्हणजे भारतात खेडोपाडी व शहरातूनही सर्वसामान्य सवर्ण दलितांच्या विरोधात भेदभाव करीतच होता. वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, शुद्धीबंदी आणि सिंधूबंदी या सप्तशृंखलांपैकी एकही शृंखला काढून टाकण्यास सामान्य सवर्णाची सिद्धता नव्हती.

 

सन १९२४ ते सन १९३५ अशी ११ वर्षे आंबेडकरांनी सवर्णांची मनधरणी केली, चळवळी केल्या, ‘हिंदू सारा एक’ हा नारा दिला पण, सवर्ण मानसिकता ‘अधर्मम् धर्ममिति या मन्यते तमसा वृता’या गीतापंक्तीप्रमाणे अधर्मालाच धर्म समजून विपरीत, दुष्ट व्यवहार करण्यात भूषण मानत होती. म्हणूनच सन १९३५ मध्ये येवला-मुक्कामी बाबासाहेबांनी ‘मी हिंदू म्हणून मरणार नाही,’ अशी घोषणा केली. आर्य चाणक्यांचा एक श्लोक या संदर्भात कुणालाही आठवतो.

 

यस्मिन देशे न सन्मानो,

न वृत्तिर्नच बान्धवाः।

नच विद्यागमः कश्चित्,

तं देशं परिवर्जयेत्॥

 

(जिथे सन्मान नाही, व्यवसाय नाही, बंधुप्रेम नाही, विद्याप्राप्तीची शक्यता नाही, त्या देशाला शहाण्या माणसाने रामराम ठोकावा.)

 

बाबासाहेबांची येवल्याच्या भाषणातली घोषणा आपण समजून घेतली पाहिजे. प्रस्तुत घोषणेची कार्यवाही आंबेडकरांनी सन १९५६ मध्ये म्हणजे येवल्याच्या घोषणेनंतर २१ वर्षे उलटल्यावर केली. तसेच भारतात जन्मलेल्या बौद्धधर्माचा त्यांनी स्वीकार केला. "इस्लाम वा ख्रिश्चॅनिटीचा दलितांनी स्वीकार केला, तर ते अराष्ट्रीय होतील," हे आंबेडकरांचे ठाम मत होते. डॉ. आंबेडकर ई. व्ही. रामस्वामी उर्फ पेरियार यांच्या "Self Respect' चळवळीपासूनही अंतर ठेवून होते. भारतवर्षाची एकात्मता त्यांना मनापासून प्रिय होती, हेही लक्षात ठेवले पाहिजे. बाबासाहेबांनी 'Annihilation of Castes' हे पुस्तक लिहिले. प्रसंगी कडवट व जहाल शब्दांत त्यांनी हिंदू धर्मावर टीकेचे प्रहार केले. गांधी व नेहरू या नेत्यांवर हल्लेही चढविले, पण या सर्व उद्योगांच्या मागे भारतीय संस्कृतीची मूळची विशालता, अंगभूत व्यापकता पुनश्च अनुभवास यावी, हिंदूमात्राच्या वर्तनात व्यापक, विशाल चिंतन प्रतिबिंबित व्हावे, भारतीय माणसाच्या भाषणात व आचरणात एकवाक्यता असावी, असाच सद्हेतू होता. खुद्द पाकिस्तानच्या मागणीचे समर्थन करतानाही आंबेडकरांचा युक्तिवाद आगळावेगळा होता. जहाज बुडू नये म्हणून या जहाजाचा कप्तान धोका रेषेवरचे सामान चक्क समुद्राच्या प्रवाहात फेकून देतो, ही उपमा वापरून आंबेडकर म्हणतात, ‘’भारताच्या वायव्येचे मुस्लीमबहुल प्रांत भारताशी एकरूप होणार नाहीत, सदैव कुरापती व हिंसक कारवाया करीत राहतील. तेव्हा अशा प्रांताचे ओझे भारतवर्षाने स्वतःच्या शिरावर कशाला सांभाळावे?" या आशयाचा आंबेडकरी युक्तिवाद बाबासाहेबांच्या भारतभक्तीचाच पुरावा होता. सारांश, दलितांनी भारतात जन्मलेल्या धर्मातच प्रवेश करावा, भारताविषयी भक्ती बाळगावी, इथल्या भावविश्वावर प्रेम करावे, हाच आंबेडकरांचा स्थायीभाव होता. १३ ऑक्टोबर, १९५६ या दिवशी बाबासाहेबांनी श्रोत्यांना मौलिक माहिती दिली, ती अशी, ‘’मी एकदा अस्पृश्यांच्या प्रश्नासंबंधी गांधीजींशी चर्चा करताना त्यांना म्हणालो होतो की, अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी तुमच्याशी माझे मतभेद असले तरी वेळ येईल, तेव्हा मी या देशाला कमीत कमी धोका लागेल, असाच मार्ग स्वीकारीन. म्हणून तर बौद्धधर्म स्वीकारून मी या देशाचे जास्तीत जास्त हित साधत आहे. कारण, बौद्धधर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. या देशाची संस्कृती, या देशाचा इतिहास यांच्या परंपरेला धक्का लागणार नाही, याची मी खबरदारी घेतली आहे."

 

बाबासाहेबांच्या वरील उद्गारातून त्यांचे गांधीजींविषयीचे प्रेम, गांधीजींविषयीची बांधिलकी सुस्पष्टपणे दिसून येते. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या आंबेडकर चरित्रात पान क्र. ४७७ वर वाचकांना एक किस्सा वाचण्यास मिळतो. तो असा, आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना देवादिकांच्या मूर्तींची पूजाअर्चा करू नका, असा उपदेश केला होता. या उपदेशाच्या प्रकाशात एक भाबडा अनुयायी बाबासाहेबांना सांगू लागला, "वर्षानुवर्ष मी गणपतीची मूर्ती घरी आणतो व गणेश चतुर्थीस ती मखरात बसवून तिची पूजा-आरती करतो. यापुढे या प्रथेला सोडचिठ्ठी द्यायची का?" बाबासाहेबांनी त्याला सांगितले. "माझीही देवावर श्रद्धा आहे, तू अवश्य मूर्ती आण व कर त्या मूर्तीची पूजा आरती."

 

पुणे करार झाला, बाबासाहेबांनी गांधीजींचे प्राण वाचावेत म्हणून या कराराला संमती दिली व गांधीजींच्याच म्हणजे गांधीजींना दिलेल्या वचनाला जागूनच भारतात जन्मलेला बौद्ध धर्म स्वत: स्वीकारला व आपल्या अनुयायांना दिला. सामान्य भारतीय नागरिकांच्या भावभावनांचा अधिक्षेप करणे, त्यांना मान्य नव्हते. उलटपक्षी या नाजूक भावनांची कदर करावी, ही त्यांची मनोवृत्ती होती. भारताच्या एकात्मतेवर तर त्यांचे मनापासून प्रेम होते. म्हणूनच अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीतून या भूमीचे, भूमीत राहणार्‍या भारतीयांच्या भावविश्वाचे व या भूमीच्या एकात्मतेचे नुकसान होऊ नये, अशीच दक्षता त्यांनी कसोशीने घेतली.

पुणे करारानंतर गांधी-आंबेडकरांनी अनुसरलेले मार्ग

पुणे कराराच्या निमित्ताने गांधीजींना डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वाची चांगली ओळख झाली. या तरुण नेत्याचे म्हणणे आपण विचारात घेतले पाहिजे, ही जाण बाळगून गांधीजींनी आंबेडकरांशी चर्चाविमर्श केला. इतर सवर्ण नेत्यांनीही आंबेडकरांचे मन:परिवर्तन करण्याचा आटोकाट प्रयास केला. या सर्व प्रयासांना आंबेडकरांनी अनुकूल प्रतिसाद दिला. स्वतंत्र मतदारसंघांच्याऐवजी आरक्षित मतदारसंघांना आंबेडकरांनी स्वीकृती दर्शविली, हे लक्षात घेऊन गांधीजीही हरिजन विकासासाठी कटिबद्ध झाले. मुळात दलित बंधूभगिनीच खर्‍या अर्थाने परमेश्वराशी जिवलग नाती बाळगतात, तेव्हा अशा सज्जनांना विकसित करण्यासाठी आपण तीन सूत्री कार्यक्रम राबवावा, हे धोरण गांधीजींनी पुणे करारानंतरच्या वर्षांमध्ये अमलात आणले. एक म्हणजे सवर्णांचे प्रबोधन, दुसरे म्हणजे हरिजनांमध्ये स्वाभिमानाचे, आत्मविश्वासाचे सृजन व तिसरे म्हणजे सवर्णांनी व दलितांनी एकत्र येऊन विविध उपक्रमांचे संचालन, अशी तीन सूत्रे गांधीजींनी व्यवहारात उतरविली.

 

सवर्णांचे प्रबोधन हे तर अत्यंत मूलगामी सूत्र होते कारण, सवर्ण हिंदू स्वत:ला परमपवित्र, तर दलितांना एकदम अपवित्र मानत होते व त्यांची ही मनोभूमिकाच अस्पृश्यता निर्मूलनाच्या मार्गातली मुख्य धोंड होती. तेव्हा गांधीजींनी सर्व सवर्णांना सांगितले, "तुम्ही मंडळीच खरे अपवित्र आहात कारण, तुम्ही अधर्माला धर्म मानता, ज्या माणसात ईश्वर शोधून त्याची निरपेक्ष पूजा करायची, त्यालाच अस्पृश्य-अछूत मानून त्याच्यावर घोर अन्याय करता, तेव्हा प्रथम आपण सर्वांनी सक्रिय पुढाकार घेऊन या जनताजनार्दनाला सर्व सन्मान दिला पाहिजे. समता हीच उत्कृष्ट समाजाची खूण असते, तेव्हा आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक व्यवहारातून विषमता, उच्चनीचता घालवून दिली पाहिजे आणि समतेचे नंदनवन फुलविले पाहिजे." ‘आधी केले, मग सांगितले’, हा गांधीजींचा बाणा होता, म्हणून स्वतः त्यांनी दलित मुलीस दत्तक घेतले, भंगीकाम करण्यास हात घातला व स्वतःच्या आश्रमातून सर्वांनी एकमेकांशी बंधुभावनेने निर्मळ व्यवहार करावेत, हा दंडक रुढ केला. "मला जर निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळाले तर पुढच्या जन्मी भंगी कुटुंबात उत्पन्न होणे श्रेयस्कर मानीन." ही होती गांधीजींची इच्छा. "आपण कैक शतके आपल्याच बंधुभगिनींवर अस्पृश्यता लादून गहन पाप केले आहे, तेव्हा प्रायश्चित म्हणून आपण भंगीकाम आनंदाने केले पाहिजे. सहभोजन, सहपूजन, सहजीवन या मार्गावर द्रुतगतीने वाटचाल केली पाहिजे," ही गांधीजींची शिकवण होती.

 

गांधीप्रणित हरिजनोद्धाराचे अथवा हरिजन विकासाचे दुसरे सूत्र दलितांच्या वर्तनाशी निगडित होते. दलित समाजघटकांनी कुजलेले, सडलेले, उष्टे अन्न खाऊ नये, अंतर्बाह्य स्वच्छतेची कास धरावी व आत्मविश्वासाने जीवन जगावे, हे होते गांधीजींचे मार्गदर्शन. "तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, कुठलाही न्यूनगंड बाळगू नका," या शब्दांत गांधीजी अस्पृश्य जनांशी सुुखसंवाद करीत असत. एका बाजूने दरिद्रीनारायणाशी निखळ ममतेचे व्यवहार, तर दुसर्‍या बाजूने सनातनी रुढीमार्तंडांशी, ‘स्पष्ट बोलतो, माफ करा,’ या आशयाचा परखड व्यवहार. गांधीजींनी विचार केला की, अस्पृश्यता कायम राहिली व स्वराज्य प्राप्त झाले तर त्या स्वराज्याचा दलित नागरिकांना शून्य लाभ मिळेल. अर्थात असे अर्थपूर्ण स्वराज्य मिळवायचे असेल तर सवर्ण समाजघटकांनी कठोर आत्मपरीक्षण करून स्वतःचे वर्तन निर्दोष केले पाहिजे आणि दलित समाजघटकांनीही स्वप्रयासातून स्वच्छता, शिक्षण व समृद्धी या क्षेत्रातून नवी शिखरे गाठली पाहिजेत. "उद्धरेदात्मानम’ म्हणजे, ‘मी माझ्या जीवनाचा शिल्पकार बनले पाहिजे,’ हा मंत्र लाखमोलाचा आहे.

 

गांधीजींनी पुरस्कारिलेल्या हरिजनोद्धार-उपक्रमाचा तिसरा पैलूही महत्त्वाचा मानला पाहिजे. सवर्ण व दलित अशा दोन्ही गटांतल्या घटकांनी एकत्र येऊन विविध रचनात्मक कार्यक्रम पार पाडले, तर ‘संगच्छध्वं, संवदध्वं, संवोमनांसि जानताम्’ हे प्राचीन सूत्र व्यवहारात उतरविता येईल, अशी गांधीजींची श्रद्धा होती. ग्रामसफाई, सूतकताई, सहभोजन, सहकारी चळवळ इत्यादी उपक्रमांतून अवघा समाजपुरुष यशस्वी मार्गक्रमणा करू लागला तर कालबाह्य रुढी संपुष्टात येतील, दैववादाला मूठमाती देता येईल आणि प्रयत्नवाद समाजात रुजविता येईल.

 

महात्मा गांधीजींच्या विचाराला वर्तमानात विश्वमान्यता मिळाली आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. "जो बदल तुम्ही समाजात घडवू पाहता, तो प्रथम स्वतःमध्ये साकार करा," हा गांधीमंत्र तसेच शरीरश्रमाला, अपरिग्रह म्हणजे असंग्रह या तत्त्वाला सदैव लक्षात ठेवा, हे गांधीजींचे मार्गदर्शन तसेच सर्वधर्मसमानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना... इत्यादी एकादश व्रते सध्या शिरोधार्य मानली आहेत. गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय अद्वैताचे तत्त्वज्ञान सर्वांना मार्गदर्शक वाटत आहे. गांधीजींप्रमाणेच बाबासाहेबही आता जगन्मान्य ठरले आहेत.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातले शेवटचे दशक त्यांच्या राष्ट्रभक्तीपूर्ण व्यवहारांमुळेे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अभ्यासविषय ठरले आहे. सन २०१६ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या आयुष्याचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव थेट संयुक्त राष्ट्रसंघामध्ये (युनायटेड नेशन्स) थाटात साजरा झाला. तत्पूर्वी सन २०१० मध्येे तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतात येऊन आपल्या संसद सदस्यांसमोर भाषण देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय गौरवपूर्ण व समयोचित उल्लेख केला होता, तर त्यानंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत जाऊन, "तुमच्या देशातच बाबासाहेबांनी उत्तम संस्कारांचे ठसे आत्मसात केले होते," या शब्दांत समर्पक आशय अमेरिकन श्रोत्यांसमोर मांडला होता. तात्पर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या पीडित, शोषित लोकांसाठी आदर्श उभा केला आहे, यावर आता मतैक्य उत्पन्न झाले आहेडॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर एक व्यापक जीवनोद्दिष्ट साकार करण्याचा अथक प्रयास केला. स्वत:च्या सुखावर निखारे ठेवून तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, या उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी जे उद्योग केले, ते तुम्हा आम्हाला अक्षरश: थक्क करणारे आहेत. या उद्योगातून फार मौलिक वस्तुपाठ आपणास प्राप्त होतात.

 

. समाजात कालोचित परिवर्तन करायचे असेल तर समाजाच्या विकासात विघ्ने उत्पन्न करणार्‍या विकृत रुढी संपुष्टात आणल्याच पाहिजेत. पण समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन हे उद्दिष्ट गाठले पाहिजे. अर्थात ते रुढीमार्तंड यथास्थितीवादी आणि अन्यायी प्रथांचे समर्थक आहेत, त्यांच्याशी झुंज दिलीच पाहिजे. सुदैवाने भारताची प्रकृती समन्वयाची आहे, इथे समजूतदार समाजघटक बहुसंख्येने आहेत व म्हणूनच वेगवेगळ्या मंडळींचे साहाय्य घेऊन अपेक्षित समाजपरिवर्तन साधले पाहिजे

 

. भारतात धर्मसंकल्पनेला मान दिला जातो. माणसामाणसात चैतन्यतत्त्व आहे व म्हणूनच समाजघटकांमध्ये कुठलीही उच्च-नीचता नाही तसेच उच्चवर्णीय मंडळींनी अधिक विशाल, अधिक उदार होऊन जातिप्रथेमुळे अन्यायग्रस्त झालेल्या जनसामान्यांना न्याय दिला पाहिजे, अशी भूमिका बाळगणार्‍या महात्मा गांधीजींसारख्या नेत्यांशी व विचारवंतांशी सख्य केले पाहिजे, बाबासाहेबांनी याच धारणेतून गांधीजींच्या आरक्षित मतदारसंघांना स्वीकृती दिली.

 

. बौद्ध धर्म प्रज्ञा, शील व करुणा या तत्त्वांची बूज राखतो, जन्मजात व धनाधिष्ठित उच्चनीचतेला विरोध करतो, व्यक्तीचे समाजाशी अंगभूत नाते आहे, यावर बौद्ध धर्माचा विश्वास आहे. भारतातल्या बहुसंख्याकांना म्हणजे हिंदूमात्रांना भगवान गौतम बौद्ध व त्याचा धर्म आपलेच वाटतात. भारतभूमी, भारताची संस्कृती आणि भारताची उदात्त परंपरा हे धागे या देशातल्या बहुजनांशी बौद्धांना संलग्न करतात.

 

. मार्च १९४७ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेसमोर एक निवेदन सादर केेले. त्या निवेदनाद्वारे त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतात विशिष्ट शर्तीचे कसोशीने पालन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्तविली. या शर्ती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. १)कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कुणाही भारतीय नागरिकावर जात, पंथ, धर्म, रंग व लिंग अशा निकषांवर प्रतिबंध लादला जाऊ नये. २)कुणाही नागरिकावर उपरोल्लेखित निकषावर भेदभाव केला जाऊ नये, ३)कुणाही नागरिकावर कोणतीही नोकरी करण्याची वा व्यवसाय करण्याची बळजबरी होऊ नये.

 

. बाबासाहेबांनी २५ नोव्हेंबर, १९४९ या दिवशी संविधान सभेत भाषण करताना ‘आपल्यापैकी कुणाच्याही घरात भारतद्रोही जन्मणार नाही,’ अशी दक्षता आपण सर्वांनी घेण्याची गरज आहे, असे आवाहन सर्व सदस्यांना केले.

 

. भारताच्या सरहद्दींचे अतिशय निर्धाराने व सतत रक्षण केले पाहिजे, ही डॉ. आंबेडकरांची भूमिका होती व म्हणूनच पं. नेहरूंकडून झालेल्या तिबेटच्या भूदानाला त्यांनी विरोध केला. याच भूमिकेतून काश्मीरला मुलखावेगळी स्वायत्तता बहाल करणार्‍या ३७० व्या संवैधानिक कलमासदेखील आंबेडकरांनी विरोध केलाभारताच्या इतिहासात उपनिषदकारांपासूनच समाजसुधारकांच्या परंपरेला प्रारंभ होतो. दुर्दैवाने, अशा परंपरेला छेद देणारी कर्मकांडे व यथास्थितीवादी वृत्तीप्रवृत्ती अधूनमधून विघ्ने उत्पन्न करतात, पण भगवान गौतम बुद्धांचा करुणाधर्म जागविणारे सत्शील समाजसुधारक पुढे येतात व त्यांच्या प्रभावामुळे विघ्ने दूरही होतात. तात्पर्य, सर्व सत्प्रवृत्त मंडळींनी सदैव जागे राहून सुधारणांचा रथ पुढे नेला पाहिजे, हा आंबेडकरांचा दृष्टिकोन अविस्मरणीय आहे.

 

गांधीजी व डॉ. आंबेडकर या दोघांनी पुणे कराराच्या माध्यमातून दलित समाज घटकांसाठी आरक्षित जागांची तरतूद केली व संविधान सभेत याच तरतुदीच्या प्रकाशात वनवासी समाज घटकांनाही आरक्षणाचे लाभ मिळाले. कालांतराने विवक्षित जाती-पोटजातींच्या घटकांवर ‘गुन्हेगार’ असा शिक्का मारणारा सन १८७२चा दुष्ट कायदाही रद्द झाला. भूतकाळातल्या विकृत व जुलमी प्रथा स्वातंत्र्योत्तर काळात संपुष्टात आणण्यात स्वतंत्र भारताने पुढाकार घेतला.

 

पुणे करारामुळेच संविधान सभेत क्षतिपूर्ती भेदभाव करणारी संविधानिक कलमे संमत झाली. लोकशाही मार्गाने म्हणजेच प्रत्येक विषयाचा सर्वांगीण ऊहापोह व चर्चाविमर्श करून एकेक विधेयक मंजूर करण्याचा प्रघात पडला. यथास्थितीवाद संपुष्टात आणला पाहिजे पण, कायदा-सुव्यवस्था आणि स्थैर्य व शांतता यांना सुरूंग लागू नये, अशी काळजीही घेतली पाहिजे. हे पथ्य स्वतंत्र भारतात स्थिरपद झाले. पुणे करार अस्पृश्यता निर्मूलनाच्या मार्गात महत्त्वाचा टप्पा ठरला आहे, हे कुणीही मान्य करील.

- प्रा. अशोक मोडक 

@@AUTHORINFO_V1@@