रोजगार मिळवून देणारी माय...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |



स्त्री-पुरुष समानतेचे धडे अनेकदा दिले जातात. आज स्त्री ही अनेक क्षेत्रांत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे. स्त्रियांनी केलेल्या उत्तम कामगिरीनंतर त्या आज पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असून स्त्री कर्तृत्वाचे दाखले नेहमी दिले जातात. नारी ही स्वतःचा विकास साधतेच किंबहुना आपल्यासोबत इतरांचाही विकास घडवते. भांडुपमध्ये अशाच प्रकारे स्वतःसोबत अनेक महिलांना स्व-रोजगार मिळवून देणार्‍या ज्योती राजभोज यांच्याविषयी...




ज्योती राजभोज या मूळच्या भांडुपच्याच रहिवासी
. भांडुपमध्येच त्यांचे बालपण गेले. येथील तेम्बिपदा परिसरात त्या आपल्या आई-वडील आणि तीन भावंडांसोबत राहायच्या. घरची परिस्थिती सर्वसाधारणच. त्यांचे वडील एका कंपनीत वाहनचालक म्हणून नोकरी करायचे. घरातील एकटी व्यक्ती कमावती असल्याने कुटुंबाच्या उदरभरणाचा गाडा हाकताना नाकीनऊ येत असत. त्यामुळे खूप शिकून आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपले शालेय शिक्षणही पूर्ण झाले नव्हते; मात्र कुटुंबाला मदत होण्यासाठी त्यांनी लहानग्यांच्या शिकवण्या घेण्यास सुरुवात केली.



यातून मिळालेले पैसे त्या कुटुंबाला मदत म्हणून देत
. मात्र, असे असतानाही उच्च शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. परिस्थिती हलाखीची असल्याने दहावीनंतर शिक्षण थांबविण्याचा निर्णय त्यांच्या पालकांनी घेतला. परंतु, ज्योती यांनी हार मानली नाही. त्यांनी संघर्ष करत महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बारावी उत्तीर्ण केली. परिस्थिती साथ देत नसल्याने त्यांना पुढे शिकता आले नाही. त्यामुळे त्यांनी एका ब्युटीपार्लरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ज्योती यांची ओळख भांडुपमधील सामाजिक कार्यकर्ते अनिल राजभोज यांच्याशी झाली. पुढे त्यांच्यासोबतच विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राजभोज यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय हा ज्योती यांच्या आयुष्याला वेगळी दिशा देणारा ठरला. त्यांनी ज्योतीला सर्व बाबतीत खूप प्रोत्साहन दिले. तिची अर्धवट राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यास साथ दिली. ज्योतीने लग्नानंतर पतीबरोबर समाजकार्यात उतरण्याचे ठरविले.



आपल्यासारख्या गरीब आणि परिस्थितीमुळे काहीच न करू शकणार्‍या महिलांसाठी काम करण्यास त्यांनी सुरुवात केली
. सर्वप्रथम त्यांनी महिला प्रतिष्ठान संस्था सुरू केली. यात महिलांना रोजगार मिळवून देण्याचे काम ज्योती यांनी सुरू केले. ज्या महिला कमी शिकलेल्या आहेत, त्यांना अनेक अडचणी येतात. शिवाय घरही सांभाळायचे असते. अशा गृहिणींसाठी रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण ज्योती आणि अनिल यांनी अजून एका संस्थेच्या मदतीने सुरू केले. महिला एकत्र करून त्यांना प्रशिक्षण देऊन कमी व्याजात रिक्षा खरेदी करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. भांडुपमधील ५० पेक्षा जास्त महिलांनी याचा फायदा घेतला असून आज भांडुपमध्ये अनेक महिला रिक्षाचालक मानाने आपली भाकरी मिळवत आहेत.




ज्योती यांनी स्वतः रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे
. याविषयी ज्योती म्हणते, “आज प्रवाशांकडून या महिला रिक्षाचालकांचे फार कौतुक केले जात आहे.” याशिवाय ज्योतीने स्वतःचे पार्लर सुरू केले असून यात ६ महिला काम करतात. या सर्वांना एक पैसाही न घेता ती प्रशिक्षण आणि रोजगारही देते. त्यामुळे आज अनेक महिला आपले संसार चालवत आहेत. ज्योतीच्या या समाजकार्यात तिला अनिल राजभोज यांची खूप साथ लाभली असून त्यांची दोन्ही मुलेही आई-वडिलांसारखीच इतरांना मदत करणारी आहेत. यापुढेही तिचे सामाजिक काम वंचित असणार्‍या महिलांपर्यंत पोहोचावे, हीच शुभेच्छा!

-कविता भोसले

@@AUTHORINFO_V1@@