महात्मा गांधी आणि हिंदू जीवन दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |




महात्मा गांधी हे स्वतःला
‘सनातनी हिंदू’ म्हणवून घेत असत. भगवान श्रीकृष्णाने अजुर्र्नाला कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचे महात्मा गांधींच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान होते. सोबतच वेद, उपनिषदे आदींवरही त्यांची आस्था होती. महात्मा गांधींचे हिंदू जीवन दर्शन आध्यात्मिक अंगाने जाणारे होते. सदर लेखात गांधीजींच्या याच पैलूचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे.



मोहनदास करमचंद गांधी हे
महात्मा गांधी’ या नावाने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात ओळखले जाणारे महामानव होते. २ ऑक्टोबर, २०१९ पासून त्यांचे सार्ध जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असून त्या निमित्ताने त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा, कर्तृत्वाचा आणि तत्त्वज्ञानाचा पुन्हा एकदा एकविसाव्या शतकाच्या संदर्भात अभ्यास होणे स्वाभाविक आहे. लेखन, भाषणे, मुलाखती, पत्रे या स्वरूपातील त्यांचे समग्र चिंतन सुमारे १०० खंडातील हजारो पृष्ठात सामावलेले व प्रसिद्ध झालेले आहे. त्यातून व्यक्त होणार्‍या विचारविश्वाला वा तत्त्वज्ञानाला ‘गांधीवाद’ म्हणून जगभर ओळखले जाते. त्याचे समग्र आकलन हे जगातील विचारवंतांसमोर असलेले एक आव्हान आहे. गांधीजी आज जरी आपल्यात नसले तरी आपल्या विचारांच्या रूपाने ते पुढील अनेक पिढ्या आणि अनेक शतके मार्गदर्शन करीत राहणार आहेत. काळ जसजसा पुढे जातो आहे, तसा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव अधिकाधिक वाढतो आहे. ‘‘Mahatma Gandhi dead is becoming stronger and stronger than the Mahatma alive.’’ असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. एवढे पाथेय ते आपल्यासाठी मागे ठेवून गेले आहेत. या लेखात आपण गांधीजींची धर्मप्रवणता, त्यांचे भगवद्गीतेविषयीचे आकलन आणि धर्माविषयीचे चिंतन यांची चर्चा करणार आहोत.



गांधींजींची धर्मप्रवणता

धर्मप्रवणतेचे बीज गांधीजींच्या जीवनात त्यांच्या बालपणीच रुजलेले दिसते. याचे मुख्य कारण, त्यांच्या घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांचे आईवडील वैष्णव होते आणि धर्मनिष्ठ होते. बालपणापासून त्यांना रामायण-महाभारताची गोडी लागली होती. श्रावणबाळाची मातृपितृभक्ती आणि राजा हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा या व अशा असंख्य संस्कारक्षम गोष्टींचा प्रभाव त्यांच्या बालमनावर पडलेला दिसतो. रामकथेने तर त्यांच्या मनात कायमचे घर केले होते. कारण तुलसी रामायणाचे त्यांच्या घरात नित्य वाचन होत असे. बालपणी ते आईवडिलांबरोबर देवदर्शनासाठी देवळात नियमितपणे जात असत. मात्र, देवळातील कर्मकांड वा बडेजाव त्यांना कधीच आवडला नाही. एका अर्थाने चांगले-वाईट, योग्यायोग्य याचा विवेक लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजत होता. या सार्‍यांचा एकत्रित परिणाम म्हणजे त्यांची मनोवृत्ती मुख्यतः सात्विक, सन्मार्गी व धार्मिक घडत गेली. ते पोरबंदर येथे ज्या भागात राहत होते, तेथे जैन समाजाची मोठी वस्ती होती. जैन तत्त्वज्ञानाचा ठसा त्यांच्या भावी जीवनात उमटलेला दिसतो. त्याची रुजवात या काळात झाली. ब्रह्मचर्य, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह या जैन तत्त्वज्ञानातील मूल्यांचा खोलवर ठसा त्यांच्या पुढील जीवनावर का व कसा उमटला, याचे स्पष्टीकरण येथे मिळते. त्यांच्या वडिलांचे अनेक मित्र पारशी व मुस्लीम समाजातील होते. त्यांच्यात अनेकदा धर्मविषयक चर्चा होत. कळत असो वा नसो, बालवयातील गांधीजी त्या चर्चा मन लावून ऐकत व त्यात रंगून जात. अशा सुसंस्कारी वातावरणात गांधीजींचे बालपण गेले. सर्वधर्म विचारांचा कमीअधिक प्रभाव त्यांच्या बालमनावर पडत गेला व तो प्रभाव पुढे जीवनभर टिकला. बालवयातील या अनुभवांमुळे त्यांचा पिंड धर्मप्रवणतेचा बनला, असे म्हणता येईल.




अनेकानेक धर्ममतांचा प्रभाव त्यांच्या स्वागतशील मनावर पडला
. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते ‘हिंदू’ होते. हिंदू हा ‘धर्म’ आहे, ‘रिलीजन’ नव्हे. या धर्माचा कोणी एक धर्मसंस्थापक व एक विशिष्ट धर्मग्रंथ, प्रमाण धर्मग्रंथ नाही. जीवनाला दिशा देणारा तो मार्ग आहे. It is a way of life.. व्यक्ती आणि समाज यांच्या सम्यक विकासासाठी व जीवनधारणेसाठी विकसित झालेले तत्त्वज्ञान व जीवनमूल्ये म्हणजे ‘हिंदू’ धर्म. तो पूजापाठ व कर्मकांडे यांच्या पलीकडे आहे. ‘धारयति सः धर्मः’ या धर्माच्या व्याख्येत ज्या धारणेचा उल्लेख आला आहे, ती व्यक्ती वा समाजाची धारणा अनेक मार्गाने होऊ शकते, असे मानणारा हा खुला (Open-ended) व सर्वसमावेशक (Inclusive) धर्म आहे. म्हणूनच ‘एको सत् विप्र बहुधा वदन्ति’ या संकल्पनेेवर या धर्माचा विश्वास आहे. सत्य एकच व त्रिकालाबाधित असले तरी विद्वान व शहाणी माणसे त्याचे आकलन, त्याची अभिव्यक्ती विविध पद्धतीने, विविध मार्गाने करतात, अशी हिंदू धर्माची धारणा आहे.

आकाशात् पतितं तोयम् यथा गच्छति सागरम् ।

सर्व देव नमस्कारः केशवंप्रति गच्छति ॥

अनेक धारांनी आकाशातून पडणारे पाणी शेवटी एकाच सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणे अनेकानेक देवदेवतांना केलेला नमस्कार शेवटी एका ‘केशवा’ला जाऊन पोहोचतो. या धारणेत ‘हिंदू’ धर्माचे मर्म साठवले आहे. विविध मार्गांनी व पद्धतींनी अभिव्यक्त होणार्‍या जगातील अनेक धर्मांचे (Religon) ‘हिंदू’ व्यक्ती स्वभावतःच स्वागत करते. गांधीजींची सर्वधर्मसमभाव मानणारी मानसिकता बालपणापासून कशी व किती विकसित होत गेली, त्याचे रहस्य ‘हिंदू’ जीवनदृष्टीत दडले आहे. गांधीजी जीवनभर धर्मनिष्ठ व धर्मप्रवण होते, याची असंख्य उदाहरणे त्यांच्या जीवनात सापडतात. या अर्थाने ‘धर्म’ गांधीजींच्या जीवनाचा मूलाधार होता आणि त्यांच्या बर्‍यावाईट अनुभव विश्वात त्यांना दिशादर्शन करीत होता, असे म्हणता येईल.




असे असले तरी गांधीजींचा जीवनप्रवास एकरेषीय वा सरळमार्गी होता असे नव्हे
, त्यात अनेक चढउतार, खाचखळगे त्यांनी अनुभवले होते. त्यांच्याही मनोवृत्तीत सत्व, रज, तम हे घटक होतेच. सात्विकतेचा प्रभाव जरी त्यांच्या जीवनावर असला तरी रज, तमोगुणांपासून ते पूर्णपणे मुक्त नव्हते. पशुत्व, मनुष्यत्व, देवत्व त्यांच्याठायीदेखील होते. तो प्रवास देवत्वाच्या दिशेने झाला असला तरी पशुवृत्तीपासून ते मुक्त होते, असे नाही. ते विचारी असले तरी विकारापासून ते अलिप्त नव्हते. षड्रिपूंनी त्यांनाही छळले होते. राग, लोभ, मोह यांनी त्यांच्या जीवनाला काही काळ ग्रहण लावले होते, स्खलनशीलतेचा अनुभव त्यांनीही घेतला होता. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, ग्राह्य-अग्राह्य यांच्या द्वंद्वातही ते अडकले होते. या सर्व वृत्तीप्रवृत्तीतून येणार्‍या अनुभवांना न नाकारता ते त्यांना सामोरे गेले होते. त्यांचे दमन करून ते शमविण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. मात्र, या अनुभवांत ते वाहून गेले नाहीत. त्यांचे जीवन प्रवाहपतित नव्हते. त्यांच्या धर्मप्रवणतेमुळे अशा अनुभवांना सद्सद्विवेक बुद्धीचा बांध केव्हा घालायचा, याचे उपजत ज्ञान त्यांना होते. याचे श्रेय त्यांच्यावर बालपणापासून झालेल्या संस्कारांना व धार्मिकतेला द्यावे लागेल. त्यांच्या मनोभूमीत सात्विकतेचे बीज लहानपणीच पेरून ठेवले होते. त्यामुळेच प्रथम शालेय जीवनात व पुढे तरुणपणी इंग्लंडच्या वास्तव्यात आलेल्या विपरित अनुभवांना व स्खलनशीलतेला विवेकाचा बांध घालून ते आपले जीवन योग्य मार्गावर आणू शकले. त्यांचा हा प्रवास सामान्यत्वापासून असामान्यत्वाकडे झालेला दिसतो कारण, या प्रवासात सद्सद्विवेकबुद्धी व धर्मप्रवणता त्यांना दीपस्तंभप्रमाणे दिशादर्शन करीत होती.




वरील विवेचन गांधीजींच्या जीवनातील दोन अनुभवांवरून स्पष्ट करता येईल
. पहिला अनुभव हा त्यांच्या पौगंडावस्थेतील म्हणजेच शालेय जीवनातील आहे. शाळेत शिकत असताना ते शेख मेहताब या विद्यार्थ्याच्या संपर्कात आले. ती एका खुशालचेंडू मुलाची वाईट संगत होती. त्यांच्या संगतीत गांधीजी बहकले, वाहवत गेले, त्यांना विड्या ओढण्याचे व्यसन लागले. घरात फक्त शाकाहारी असलेले बाल मोहनदास चोरून मांसाहार करू लागले. त्या मुलाच्या संगतीत नको त्या वयात त्यांनी कुंटणखान्यात जाऊन वेश्यागमनही केले. या सर्वांसाठी अर्थातच पैशाची गरज होती. ती भागविण्यासाठी ते घरातील सोन्याची व पैशाची चोरी करू लागले. एकदा माणूस घसरणीला लागला की, तो प्रवास फार वेगाने होतो. या अनुभवांचा काळ हा साधारण वर्षभराचा होता. पुढे केव्हातरी बालपणात झालेले संस्कार जागे झाले. सद्सद्विवेकबुद्धी जागी झाली. आपल्या चुका लक्षात येऊ लागल्या. पश्चात्तापाची भावना मनाला अस्वस्थ करू लागली. ते सरळ वडिलांकडे गेले आणि आजवर केलेल्या दुष्कृत्यांची त्यांनी कबुली दिली. एवढेच नव्हे तर त्यासाठी कडक शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी वडिलांकडे केली. येथून पुढे अशी दुष्कृत्ये न करण्याचे आश्वासन, अभिवचन दिले.



आपण दुष्कृत्य केले
, सन्मार्गापासून ढळलो याची पश्चात्तापदग्ध जाणीव होणे, हे त्यांचे मोठेपण. सद्सद्विवेकबुद्धीच्या जागृतीचे हे अनुभव म्हणजे गांधीजींच्या मूळ स्वभावाने मनोवृत्तीने परिस्थितीवर दुष्कृत्य करण्याच्या प्रवृत्तीवर केलेली मात आहे, असे म्हणावे लागेल. दुसरा अनुभव त्यांच्या ऐन तारुण्यातील व इंग्लंडमधल्या वास्तव्यातील आहे. इंग्लंडमधील वास्तव्यात ‘आपणही साहेब बनावे’, असे त्यांच्या मनाने घेतले. उंची सूटबूट, टाय यांची आवड त्यांनी जोपासली. पाश्चात्त्य संगीत, भाषा, नृत्य यांचे धडे घेण्यास त्यांनी सुरुवात केली. केसाच्या भांगाची रचना बदलली. हॉटेलातील खाणे व पिणे यात त्यांना रस वाटू लागला, एवढेच नव्हे तर आपले लग्न झाले आहे, आपण एका मुलाचे बाप आहोत, हेही तेथील लोकांपासून लपविण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यांना काही काळ आपल्या संस्कृतीचा, संस्कारांचा विसर पडला, आपण आपले स्वत्व गमावत आहोत, याचेही भान त्यांना राहिले नाही. अशी घसरण सुरू असताना एका प्रसंगाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यांचा परिचय झालेल्या एका ब्रिटिश महिलेने गांधीजींनी आपल्या धाकट्या बहिणीशी लग्न करावे, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. तेव्हा सद्सद्विवेकबुद्धीने, नैतिकतेने त्यांचे डोळे खाडकन उघडले. आपण सत्याशी, वस्तुस्थितीशी प्रतारणा करणे योग्य नाही, हे त्यांच्या लक्षात आले.



विकारावर विचाराने जेव्हा मात केली
, तेव्हा आपण हे महागडे शौक कुटुंबाच्या जीवावर करून उधळपट्टी करीत आहोत, याची जाणीव त्यांना झाली. नैतिक विचारांनी त्यांच्या अधोगतीला लगाम घालायला सुरुवात केली. अधिक विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, नृत्य आपल्याला जमत नाही, पाश्चात्त्य संगीत आपल्या रक्तात नाही, साहेबी व्यवहार काटकसरीच्या विरुद्ध होते. सत्याशी प्रतारणा आपण किती काळ करणार?, याची टोचणी त्यांच्या मनाला लागली. जी महिला त्यांचे लग्न जमविण्याचा प्रयत्न करीत होती, तिला त्यांनी सत्य स्थिती सांगून टाकली. पश्चात्ताप होऊन वर्तनात सुधारणा होणे, हे एक प्रकारचे विरेचन (catharsis) नव्हे का? या विचारप्रक्रियेमुळे त्यांना विकारावर मात करता आली. नैतिक विचार, सद्सद्विवेकबुद्धी आणि धर्मप्रवणता यामुळे गांधीजींची मूलभूत मनोवृत्ती इंग्लंडमधील परिस्थिती यात सुसंवाद घडून त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. माणसातील मनोवृत्ती आणि बाहेरील परिस्थिती यांच्यात सुसंवाद घडू लागतो, तेव्हा जीवनाचा योग्य मार्ग सापडतो व जीवनाचा प्रवास सुरळीत होऊ लागतो, याची ही दोन ठळक उदाहरणे. या सर्व प्रक्रियेत धर्मप्रवणतेची भूमिक अतिशय महत्त्वाची असते, हेच येथे अधोरेखित होते आणि ती तर त्यांच्या मनोभूमीत निसर्गानेच खोलवर रुजवली होती. गांधीजींनी मानवी स्खलनशीलतेच्या त्यांना आलेल्या अनुभवांची सविस्तर माहिती व कबुलीजबाब (confession) यांची सविस्तर चर्चा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात केली आहे. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.




या दोन्ही अनुभवांनी गांधीजींना अंतर्मुख केले
. धर्मप्रवणता माणसाला अंतर्मुख करते. तो अंतरात्म्याचे आदेश पाळतो. सदासर्वकाळ व सर्वत्र विद्यमान असणार्‍या ईश्वरावर त्याची परमश्रद्धा असते. परमेश्वराचा न्याय कदाचित अतर्क्य असेल पण तो न्याय अंतिमत: चांगल्या-वाईटाचा, पाप-पुण्याचा निवाडा करण्याची माणसाला शक्ती देतो, अशी त्याची धारणा असते, गांधीजींचीही तशी धारणा होती म्हणून ते वाममार्गाचा मोह पचवून सन्मार्गाला लागले. त्यांची पारलौकिकावर, आध्यात्मावर, आत्मिक शक्तीवर परमेश्वराइतकीच श्रद्धा होती. जीवनातील ऐहिकांकडे असा माणूस प्राप्त कर्तव्य म्हणून लक्ष देतो. मात्र, ऐहिकापेक्षा पारलौकिक, भौतिकतेपेक्षा आध्यात्मिक आणि शारीरिकापेक्षा आत्मिक नेहमीच श्रेष्ठ असते, याची त्याला हळूहळू जाणीव होऊ लागते, त्यामुळे सद्सद्विवेकबुद्धी, नैतिकता आणि नैतिक दृष्टी हे त्याचे निकष वा स्पर्शमणी असतात. धर्मप्रवण मानसिकतेचे हे निकष लक्षात ठेवून गांधीजींच्या जीवनाचा अभ्यास केला नाही तर, त्याचा योग्य अन्वयार्थ लागू शकत नाही. त्यांच्यात झालेल्या परिवर्तनाची मीमांसा करता येत नाही. या अर्थाने गांधीजी हे धर्मप्रवण पुरुषाचे एक उत्तम उदाहरण होते, हे लक्षात येईल. धर्मकल्पनेने त्यांच्या सर्व मनोव्यापारावर, मनाच्या सर्व मूूलद्रव्यावर आपला मंत्रवत् प्रभाव टाकला होता. त्यांच्या सर्व प्रेेरणांना, मन:शक्तींना संस्कारित केले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अन्यायापुढे, असत्यापुढे ते कधीही वाकलेले दिसत नाहीत, त्यांच्या पुढील सर्व जीवन व्यवहारावरून हेच अधोरखित होते.




. आफ्रिकेत वास्तव्यास असताना नाताळ व मर्क्युरी या प्रांतातील हिंदी लोकांचा मताधिकार तेथील सरकारने काढून घेतला आहे, हे त्यांच्या कानावर आले. हे वृत्त ऐकून ते कमालीचे अस्वस्थ झाले. द. आफ्रिकेतील त्यांचे नियोजित कार्य पूर्ण झाले असूनही त्यांनी भारतात परत न जाण्याचा निर्णय घेतला(1893). द. आफ्रिकेतील भारतीयांवर लादली जाणारी वांशिक विषमता अन्यायकारक आहे आणि ती दूर करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत, असा निश्चय त्यांनी केला. या वर्ण-विषमता निर्मूलनाच्या कार्यात त्यांना आपल्या जीवनाची दिशा सापडली. त्यातून ते अशा अन्यायग्रस्त लोकांच्या सेवेकडे वळले. कृतिशीलता, स्वत:च्या व लोकांच्या सुधारणेची इच्छा या प्रेरणेतून ईश्वराला शोधत शोधत, ईश्वराचेच रूप धारण करणार्‍या जनसमुदायाच्या मनात ते शिरले आणि लोकसेवेच्या मार्गाला लागले. ईश्वर प्राप्तीसाठी लोकसेवा हेच त्यांच्या जीवनाचे ब्रीद झाले. पुढे 1936 साली ते एके ठिकाणी म्हणतात, “देवाला शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याने केलेल्या निर्मितीत - म्हणजेच माणसात - त्याला पाहणे व त्याच्याशी एकरूप होणे. माणसांची सेवा करूनच हे शक्य होईल. मी त्या ईश्वररूपी संपूर्णाचाच एक अंश आहे. उर्वरित मानवजातीपासून वेगळे असे मी त्याला पाहूच शकत नाही.” द. आफ्रिकेत त्यांनी हिंदी लोकांवरील अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाच्या माध्यमातून जो दीर्घकालीन लढा दिला, त्याची प्रेरणा या त्यांच्या तात्त्विक भूमिकेत आणि धर्मप्रवणतेत सापडते. द. आफ्रिकेत गांधीजी जसजसे आपल्यातील धर्मभावनेला प्रतिसाद देऊ लागले, तसतसे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगाने फुलू लागले व खरे गांधीजी प्रकट झाले.




. आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर गांधीजींनी आपले गुरू नामदार गोखले यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी गांधीजींना किमान एक वर्षभर संपूर्ण भारतात उघड्या डोळ्याने व खुल्या मनाने प्रवास करण्याचा सल्ला दिला. त्यातून समाजस्थितीचे व जनमानसाचे आकलन होईल व त्यांचे सुखदुःख व वेदना समजतील, असे त्यांनी सांगितले, ‘त्यातून तुला तुझ्या जीवनाचा मार्ग सापडेल,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. गांधीजींनी गुरूची इच्छा शिरोधार्य मानली व भारतभ्रमण केले. पारतंत्र्यात पिचलेल्या, दारिद्य्रात होरपळलेल्या, निमूटपणे अन्याय सहन करणार्‍या जनजीवनाचे चित्र त्यांना दिसले. त्यातून सत्याग्रह व अहिंसेच्या मार्गाने जनमानस जागवून स्वातंत्र्याचा लढा उभारावा, असा निर्णय त्यांनी केला. ते सार्वजनिक कार्याकडे, सेवेकडे वळले, त्यांना जीवनाची दिशा पुन्हा एकवार सापडली व त्या दिशेने ते पुढे जन्मभर चालत राहिले. स्वातंत्र्यलढ्यातील गांधीजींचे योगदान याचा सर्व जगाला परिचय असल्यामुळे त्याचा वेगळा उल्लेख करायला नको. त्यांच्यातील उपजत धर्मप्रवणतेमुळे त्यांच्यातील स्थायी मनोवृत्ती व बाहेरील सामाजिक परिस्थिती यांच्यात सुसंवाद साधला गेला आणि त्या आधारे स्वातंत्र्यप्राप्तीचा लढा यशस्वी झाला. या धर्मप्रवणतेचे प्रतिबिंब त्यांच्या दैनंदिन जीवनात झालेल्या परिवर्तनात व त्यांनी विकसित केलेल्या तत्त्वज्ञानात उमटलेले दिसते. साधी राहणी, स्वावलंबन, अतिथी व रुग्णसेवा, गीतापाठ, ब्रह्मचर्य पालन हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग झाले. ते स्वत:चे कपडे स्वत: धूत असत. स्वत: आपले कपडे शिवत असत. स्वत:चे केस स्वत: कापत असत. मल-मूत्र विसर्जनाची त्यांना लाज वाटत नसे. एवढेच काय, शेवटच्या दोन अपत्यांच्या वेळी पत्नीचे बाळंतपणही त्यांनी स्वत: केले. स्वावलंबनाचा एवढा टोकाचा आग्रह धरणारा माणूस विरळा. त्यांनी गृहस्थ जीवनाचा जवळजवळ त्याग करून आश्रमीय धर्मात प्रवेश केला होता. हे परिवर्तन धर्मनिष्ठेतून झालेले दिसते.



याच भावनेचा प्रभाव त्यांच्या सार्वजनिक जीवनावरही झाला
. वकिली व्यवसाय करताना कमीत कमी शुल्क (fee) आकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. “आर्थिक नुकसान झाले तरी चालेल, पण नैतिक अध:पतन टाळले पाहिजे,” अशी त्यांची भूमिका होती. “गुन्हेगाराला सोडविणे हे वकिलाचे काम नसून सत्यशोधनाच्या कामी न्यायव्यवस्थेला सहकार्य करणे हे काम आहे,” अशी तात्त्विक भूमिका त्यांची होती. समजुतीने तंटे मिटावे, न्यायालयाबाहेर समेट व्हावा, असे त्यांना वाटे. त्यामुळे पैसा, शक्ती आणि वेळही वाचेल, असे त्यांचे मत होते. सार्वजनिक काम धर्मभावनेने केले पाहिजे, असे त्यांना वाटत असल्यामुळे त्यांना मिळालेल्या देणग्या त्यांनी परत केल्या किंवा त्याचा विश्वस्त निधी करून त्या माध्यमातून लोकोपयोगी कामे केली. अपरिग्रह वृत्तीतून हे त्यांना साध्य झाले. ‘सर्व संचित धन समाजकार्यासाठी’, ‘आपण आपल्या संपत्तीचे मालक नसून विश्वस्त आहोत,’ या सूत्राच्या आधारे त्यांनी आपला जीवनव्यवहार केला. विवेकानंदांचा ‘राजयोग’ पतंजली यांची ‘योगसूत्रे’ व रस्किन यांचे र्’ीपीें ींहळी श्ररीीं’ या ग्रंथांचा त्यांंच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. या ग्रंथातून समष्टीच्या भल्यात व्यष्टीचे भले सामावले आहे, सर्वांच्या कामाचे सारखेच मोल आहे. शरीरश्रम करणारे जीवन हेच खरे जीवन, या सूत्राचा शोध त्यांना लागला व त्याप्रमाणे त्यांनी व्यवहारही केला. हे सर्व आविष्कार म्हणजे त्यांच्या धर्मप्रवणतेचीच अभिव्यक्ती होती, असे म्हणावे लागेल.


धर्मविषयक ग्रंथांचे वाचन
, मनन, त्यावरील चिंतन आणि निसर्गाने केलेली जडणघडण यांच्या संकलित परिणामातून त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान विकसित झालेले दिसते. यामुळे त्यांच्यात धर्म विचार बळावलेला दिसतो. ही धर्मभावना त्यांच्या सार्वजनिक कार्याच्या मुळाशी आहे. त्यांनी सत्याग्रहाचा जो मार्ग विकसित केला, ते याचे दृष्यरूप आहे. यात असत्य आणि अन्याय यांचा प्राणपणाने प्रतिकार, हिंसा पूर्णपणे वर्ज्य, अराजक व स्वैरवर्तनाला नकार, आत्मपीडन व आत्मोन्नती, प्रतिपक्षाच्या करुणेची व सहानुभूतीची प्रतीक्षा, माणसाच्या सज्जनपणावर व हृदयपरिवर्तनाच्या शक्यतेवर श्रद्धा आणि क्षमाशीलता या मूल्यांचा समावेश होतो. सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी जी आंदोलने केली, त्यांना या मूल्यांचे तात्त्विक अधिष्ठान होते.



धर्मप्रवण असूनही गांधीजी धर्मसुधारक होते
. त्यांनी सर्व धर्म सारखे मानले, सर्व धर्माचे सार एकच आहे. “सर्व धर्म हे ईश्वरनिर्मित आहेत. सत्याचा जो शोध घेतो, त्याच्या लक्षात येते की, सर्व धर्म वितळतात आणि ईश्वराशी एकरूप होऊन जातात. तो ईश्वर एकच असून सर्व प्राणिमात्रांसाठी तो सारखाच असतो.” असे गांधीजी म्हणतात. परमेश्वरप्राप्ती हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असले तरी ते सृष्टीच्या म्हणजेच सामान्य जनतेच्या, प्राणिमात्राच्या सेवेतून गाठता येते, यावर त्यांचा गाढ विश्वास होता. राजकारण आणि समाजकारण करताना त्यांनी सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्य यांना महत्त्वाचे स्थान दिले. राजकारण त्यांच्या दृष्टीने धर्माचाच भाग होता. ‘धर्माशिवाय राजकारण ही निव्वळ घाण असनू त्यापासून आपण नेहमी दूर राहिले पाहिजे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या धार्मिकतेच्या संकल्पनेत नीतीचाही अंतर्भाव होतो. त्यांची अहिंसा नीतीची द्योतक होती. सत्यासत्याचा, चांगल्या-वाईटाचा, ग्राह्याग्राह्यतेचा निर्णय ते अहिंसा ओलांडून नीतीच्या साहाय्याने करीत, एवढे ते नीतीला महत्त्व देत. त्यामुळे अहिंसा विचारापेक्षा नीतीविचार हा त्यांच्या लेखी प्रबळ ठरे. दोन माणसे प्रेमाच्या बंधनाने बांधणे म्हणजे धर्म, असे ते म्हणत. त्यामुळे अस्पृश्यतेला स्पष्ट विरोध करून त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला अग्रक्रम दिला. “दोन समाज बंधुभावाने बांधणे म्हणजे धर्म,” अशी त्यांची भूमिका असल्यामुळे हिंदु-मुस्लीम ऐक्यावर त्यांनी सातत्याने भर दिला.



हिंदू
-मुस्लीम ऐक्य ही गांधीजींची उत्कट इच्छा (passion) होती; तो त्यांच्या श्रद्धेचा विषय होता (article of faith). म्हणूनच त्यांनी खिलाफत चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. देशाच्या धर्माधारित फाळणीला विरोध करून,“देशाचे तुकडे करण्यापूर्वी माझ्या देहाचे तुकडे करा,” ही टोकाची भूमिका घेतली. ठरल्याप्रमाणे भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे म्हणून उपोषण केले. गांधीजींच्या या सर्व कृती त्यांच्या या मानसिकतेचे द्योतक आहेत, अभिव्यक्त रुप आहे. अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही, यावर ते एवढे ठाम होते की, “ते हिंदू धर्मावर वाढलेले एक बांडगुळ आहे,” असे ते म्हणत. एवढेच नव्हे तर “अस्पृश्यता जिवंत राहिली तर हिंदू धर्म मरतो आणि हिंदू धर्म जगावा असे वाटत असेल तर, अस्पश्यतेचा मृत्यू अटळ आहे,” अशी खणखणीत मांडणी त्यांनी केली. सारांश, गांधीजींचे सर्व कार्य व कर्तृत्व धर्मप्रवणतेने उजळलेले स्वातंत्र्यप्रेरणेने स्फुरलेले, अत्यंत विशुद्ध आणि उच्च हेतूने प्रेरित झालेले होते. गांधीजींच्या जीवनात धर्मप्रेरणेला मध्यवर्ती स्थान होते. त्यांच्या जीवनाला मन:पिडेला, मनाच्या मूलद्रव्याला धर्मभावनेनेचे रंगरूप दिले. ही धर्मभावना एकसुरी वा एकरंगी नव्हती. गीता, रॉडवेलकृत कुराणाचे भाषांतर, ख्रिस्ताचेसर्मन ऑन द माऊंटन’, ‘लाईट ऑफ एशियाहे बुद्धचरित्र या सार्यांचा त्यांच्या धर्मकल्पनेवर प्रभाव होता. ते धर्मनिरपेक्ष वृत्तीचे नव्हते तर सर्वधर्मसमभाव मानणे हा त्यांचा पिंड होता. ते म्हणत, “माझ्या सर्व कृती म्हणजे परमेश्वराच्या मांडीवर शिणलेला माथा टेकविण्यासाठी केलेली प्रदीर्घ वाटचाल आहे.” धर्मप्रवणतेशिवाय हे कसे शक्य आहे?

आकलन भगवद्गीतेचे

बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जाण्यापूर्वी भारतात शिक्षण घेत असेपर्यंत गांधीजींची भगवद्गीतेशी तोंडओळखही झाली नव्हती, या गोष्टीचे आश्चर्य वाटते. कायद्याच्या पदवीचा अभ्यास करीत असताना त्यांचा गीतेशी प्रथम परिचय झाला. विशेष म्हणजे त्यांनी प्रथम वाचलेली गीता संस्कृत वा गुजरातीत भाषांतरित झालेली नव्हती, तर ती सर एडवर्ड अर्नोल्ड यांनी इंग्रजीत भाषांतरित केलेली. ‘Bhagvatgeeta : The Song Celestial' ही होती. पुढे एके ठिकाणी, ‘वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत आपण गीता वाचलेली नव्हती, हे मान्य करताना आपल्याला शरम वाटते,’ अशी प्रामाणिक कबुली गांधीजींनी दिलेली आहे. इस्लाममध्ये ‘कुराणा’ला ज्युडाईझममध्ये ‘ओल्ड टेस्टामेंट’ला ख्रिस्ती धर्मात ‘न्यू टेस्टामेंट’ला जे स्थान आहे, ते गीतेला हिंदू धर्मात असूनही गांधीजींच्या वाचनात ती इतक्या उशिरा का आली आणि तीही इंग्रजी भाषांतर स्वरूपात का आली, याचे उत्तर मिळत नाही.



मात्र
, या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून ते उत्तम संस्कृत शिकले व मूळ गीतेचा त्यांनी सखोल अभ्यास केला. गीतेची अनेक भाषांतरेही त्यांनी वाचली. पुढे गीतेचे त्यांनी स्वतः गुजरातीत उत्तम भाषांतर केले. एवढेच नव्हे तर त्यावर सविस्तर भाष्यही केले. हा त्यांचा ग्रंथ त्यांचे गीतेवरील प्रेम व श्रद्धा अधोरेखित करतो. त्यांच्या एकूण वाङ्मयात त्याला मैलाचा दगड मानले जाते. या संपूर्ण ग्रंथाचे महादेवभाई देसाई यांनी इंग्रजीत भाषांतर करून तेही प्रसिद्ध केले. भगवद्गीतेतील शिकवणीचा त्यांच्या जीवन व कार्यावर खोल ठसा उमटलेला दिसतो. गीतापठण हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होऊन गेला. गीता आणि गांधीजी यांचे नाते इतके उत्कट व विलोभनीय होते. गीतेतील अमानित्व अंगी बाणविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गीतेचा आशय प्रत्यक्ष आचरणात आणण्याची पराकाष्ठा त्यांनी केली. गीता हा जीवनातील दैनंदिन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ज्ञानकोश आहे, असे त्यांचे स्वानुभवाने झालेले निरीक्षण होते. ६ ऑगस्ट, १९२५ च्या ‘यंग इंडिया’ या नियतकालिकात ते कबुली देतात, ‘’जेव्हा जेव्हा शंकांची भुते माझे मन झपाटून टाकतात, तेव्हा मी गीतेकडे वळतो आणि त्यातले श्लोक माझ्या मनाला दिलासा देतात आणि दुःखाने हतबल झालेला मी सुखावतो. माझे जीवन बहिस्थ शोकांतिकांनी भरलेले आहे, पण त्याचा दृश्य किंवा अदृश्य चट्टा माझ्या जीवनावर उमटलेला दिसत नाही. याचे सर्व श्रेय गीतेने मला दिलेल्या शिकवणीकडे जाते.”



खरे तर गीता हा महाभारत या महाकाव्यातील केवळ ७०० श्लोकांचा १८ अध्यायात विस्तारलेला छोटासा भाग आहे
. पण त्याने संपूर्ण मानवी जीवन व्यापून टाकणारे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडलेले आहे. कौरव-पांडवांमधील महायुद्धात संभ्रमित झालेल्या अर्जुनाशी श्रीकृष्णाने केलेला हा संवाद आहे. युद्धभूमीवर आपल्याच रक्ताच्या नातेवाईकांशी लढून मला काय मिळणार आहे?, या शंकेने अर्जुनाला ग्रासले आहे. तेव्हा अर्जुनाला श्रीकृष्ण क्षत्रिय धर्माची आठवण करून देतो. कर्मयोग, सांख्ययोग, ज्ञानयोग, भक्तियोग अशा तत्त्वज्ञानांचे विवरण त्याच्यासमोर करतो. मर्त्य आहे ते शरीर, अमत्यर्र् आहे तो आत्मा.शहाणी माणसे जिवंत किंवा मृतांसाठी शोक करत नाहीत. आत्म्याचे स्वरूप, ‘नैनं छिन्दन्ती शस्त्राणि नैनं दहति पावकः।’ असे असल्यामुळे, “जो जन्माला येतो, त्याचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे जे अटळ आहे, त्याचा शोक तू का करतोस?”, अशी त्याची समजूत काढून, “माझे म्हणणे ऐक आणि युद्धाला सज्ज हो, युद्धात जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. युद्धात धारातीर्थी पडल्यास स्वर्गारोहण करशील,” असे आश्वासन त्याला देतो. हा सर्व प्रसंग युद्धाचा लक्षावधी सैनिकांच्या हौतात्म्याचा, हिंसेचा, रक्तपाताचा व अंतिमतः विनाशाचा आहे. सनातनी हिंदूंच्या मते गीता हा ऐतिहासिक महायुद्धाचा वृत्तांत आहे. येथे एक महायोद्धा अर्जुन रक्तपात थांबविण्यासाठी धडपडतो आहे आणि त्याला प्रत्यक्ष परमेश्वर श्रीकृष्ण आपल्या क्षात्रधर्माची आठवण करून देत हिंसा करायला प्रवृत्त करतो आहे.



प्रश्न येथे असा आहे की, ‘अहिंसेचा प्रवक्ता’ असणार्‍या गांधीजींना हिंसेचा उघडउघड पुरस्कार करणारी गीता इतकी का भावली? गीता हा असा ग्रंथ आहे की, अनेकानेक विद्वानांनी, तत्त्ववेत्त्यांनी गीतेचे वेगवेगळे अर्थ लावले आहेत आणि त्यावर वेगवेगळी भाष्येही केली आहेत. या पार्श्वभूमीवर गांधीजींच्या गीतेचा जो वेगळा अर्थ लावला आहे, तो समजावून घेणे महत्त्वाचे ठरते. गांधीजींच्या मते ‘महाभारत’ किंवा ‘गीता’ हा ऐतिहासिक दस्तऐवज नाही. गीता ही दृष्टांत कथा किंवा रूपक आहे. तिचा ध्वन्यार्थ व लक्षणार्थ समजावून घेतला पाहिजे. “येथील युद्धभूमी म्हणजे मानवी आत्मा आहे. त्यात अर्जुन उच्च दर्जाच्या उर्मीचे, आवेगाचे प्रतिनिधीत्व करतो आणि दुष्टपणाच्या विरोधात संघर्ष करतो. श्रीकृष्ण हा अंतर्निवासी आहे. तो शुद्ध अंतःकरणाचे नित्य गान इतक्या हलक्या आवाजात करीत असतो.” ते पुढे म्हणतात, “शारीरिक युद्धाच्या बाह्यवेषात मानवी मनामनांत सदोदित जे द्वंद्व चालू असते, त्याचे वर्णन म्हणजे गीता. हे मानवी मनातील अंतर्द्वंद्व अधिक मोहक शब्दांत मांडण्यासाठी शारीरिक युद्धाची प्रतिमा गीतेत मांडलेली दिसते. गीतेवरील या त्यांच्या भाष्यातून व आकलनातून त्यांचे वेगळेपण अधोरेखित होते. गांधीजींसाठी गीता म्हणजे आध्यात्मिक संदर्भ ग्रंथ, दैनंदिन जीवनाचा मार्गदर्शक, जीवन व्यवहाराचा शब्दकोश होता. त्यात प्रत्येक संकटाला व कसोटीला उत्तर होते. म्हणूनच त्यांनी दररोज दोन श्लोक पाठ करण्याचा निश्चय केला व वर्षभरात गीता मुखोद्गत करून टाकली. गीतेतील अपरिग्रह व समभाव या संकल्पनांनी त्यांना झपाटून टाकले.



गांधीजींनी अकर्मण्यतेची कायमच निर्भर्त्सना केली
. कर्माबरोबर येणारी हिंसा कशी टाळावी? क्रौर्य, दुष्टपणा कसा टाळावा, हे गीता शिकवते आणि गांधीजींच्या मते तीच गीतेची मध्यवर्ती शिकवण आहे. गीतेचा आशय हा हिंसाविरोधी आहे, असे विश्लेषण करण्यासाठी, गांधीजींनी गीतेच्या ऐतिहासिक व पारंपरिक विश्लेषणाला फार महत्त्व देण्याचे नाकारले. ते म्हणतात, “जरी दुसर्‍या अध्यायात हिंसेचे काही प्रमाणात समर्थन असले तरी समारोपाच्या श्लोक समूहात अशा प्रकारे विश्लेषण करायला प्रतिबंध केलेला दिसतो.” ते पुढे म्हणतात, “गीतेचे शब्दशः केलेले विश्लेषण हे अनेक परस्परविरोधी समजुतींना पाठबळ देते. ‘शब्द’ कदाचित हिंसक वाटत असतील पण त्यातील चैतन्य, आशय वा आत्मा जीवन आणि शांती देतो.” पुढे १९२९ साली गांधीजी लिहितात, ‘’चाळीस वर्षे पूर्ण निष्ठेने गीतेच्या शिकवणीचे जाणीवपूर्वक पालन केल्यानंतर मला नम्रपणे असे वाटते की अहिंसेच्या प्रत्येक आकारात व प्रकारात आपण तिचे श्रद्धापूर्वक पालन केल्याशिवाय परिपूर्ण त्याग केवळ अशक्य आहे.” आपल्या या निरीक्षणाच्या समर्थनार्थ गांधीजींनी काही तर्क मांडला आहे. “गीता असे म्हणते की, शरीर मर्त्य आहे. मात्र, आत्मा अमर आहे. तर मग अर्जुना, तुझ्या क्षात्रधर्मानुसार शत्रूला ठार मारणे, हे तुझे कर्तव्य आहे. असे असेल तर त्या कर्तव्याचे पालन तू का करत नाहीस?” गीतेतील या युक्तीवादाचे खंडन करताना गांधीजी म्हणतात, “जर आपण परिपूर्ण अशा त्या परमेश्वराचे अंश आहोत, तर आपण कोणाला व कसे ठार मारू शकतो?” या अर्थाने गांधीजींच्या मते गीता ही अहिंसेचे समर्थन करते.



गीतेतील कर्मयोगावर गांधीजींनी सविस्तर भाष्य केले आहे
. गीतेत ‘सुखदुःख समेकृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ ही भूमिका असली तरी कोणतेही कर्म पाप ओढवून घेत नाही, असे म्हटले आहे. “मनाने अलिप्त राहून कोणतेही कर्म कर, योगावर अढळ राहा, जय-पराजयाकडे समतोल वृत्तीने पाहा, ही समत्वबुद्धी म्हणजेच योग,” अशीच गीतेची शिकवण आहे. असे असेल तर योगी माणसाला कोणते फळ मिळते, या प्रश्नाला उत्तर देताना गांधीजी म्हणतात, “खरे तर जो (फलाचा) त्याग करतो, त्याला त्याचीच सहस्त्रपटीत प्राप्ती होत असते. गीतेत सांगितलेला त्याग, हीच खरी श्रद्धेची सत्त्वपरीक्षा असते. जो नित्य फळाची वा परिणामाची चिंता करतो, तो अनेकदा कर्म करताना आपला धीर गमावतो, तो अस्वस्थ होतो व रागाला मोकळी वाट करून देतो आणि नको त्या गोष्टी करायला सुरुवात करता. एका कर्मातून दुसर्या कर्मात उड्या मारतो आणि कोणत्याही कर्माशी एकनिष्ठ राहत नाही, उलट त्याग माणसाला मनःशांती आणि आध्यात्मिक समतोल देतो. त्यातून आपोआप इष्ट अशी फलनिष्पत्ती होते. म्हणूनच फलाशा न धरता कर्म करणार्‍या माणसाचे वर्णन हा गीतेचा गाभा आहे. पण त्यासाठी मनावर ताबा हवा. श्रद्धेतून मिळणारी ईश्वराची कृपा नसेल तर माणसाचे प्रयत्न व्यर्थ आहेत. मात्र, त्यासाठी कोणत्याही प्रकारची दडपशाही, दमन मनावर करणे योग्य नाही. हे दमन स्वेदरहित असले पाहिजे. दमनवृत्तीने उदात्ततेला शरण गेले पाहिजे. असे असले तरच माणूस आदर्श किंवा परिपूर्ण कर्मयोगी होऊ शकतो.” अशा कर्मयोग्याची लक्षणे सांगताना गांधीजी म्हणतात, “तो सभ्य असतो व कोणाविषयीही द्वेष बाळगत नाही. तो दयेचा सागर असतो व त्याला आत्मश्लाघा नसते. तो निःस्वार्थी असतो. शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख तो एकाच मापाने मोजतो. तो क्षमाशील व नित्य समाधानी असतो. निश्चयाचा तो पक्का असतो. त्याने आपले मन आणि बुद्धी ईश्वराप्रती समर्पित केलेली असते. तो कोणालाही भीती दाखवत नाही आणि स्वतःही भयमुक्त असतो. तो पवित्र असतो. फळाचा... चांगले किंवा वाईट तो त्याग करतो. शत्रू व मित्रांना सारखेच वागवतो. तो स्तुतीने फुगून जात नाही. आदर किंवा अनादर त्याला स्पर्श करत नाहीत. लोक जेव्हा त्याच्याबद्दल अप्रिय, वाईट बोलतात, तेव्हा तो खचून जात नाही. त्याला शांतता आणि एकांत प्रिय असतो. त्याला कशाचीही ओढ नसते. त्यामुळे तो कशातही गुंतून पडत नाही. त्याच्या विचारांना तर्काची शिस्त असते. या सर्व गुणांचे जो आचरण करतो, तो ईश्वराशी एकरूप होतो. परिपूर्ण कर्मयोगी होतो.” यालाच गांधीजी अभिलाषाविरहितता असे म्हणतात.


गांधीजींनी गीतेवर जे जे भाष्य केले
, गीतेचा जो अन्वयार्थ लावला त्याला अनुरूप असा जीवनव्यवहार त्यांनी जन्मभर केला. या अर्थाने ते ’योगी’ व ’संत’ पदाला पोहोचले, असे म्हणता येईल. ते परिपूर्ण कर्मयोगी होते. कारण त्यांचे जीवन निष्काम कर्मप्रधान होते. गीतेचा गांधीजींवरील प्रभाव समजून घेतल्याशिवाय त्यांच्या जीवनातील अनेक घटनांचा, कृतींचा व निर्णयांचा योग्य अर्थ समजू शकणार नाही. आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना ते एके ठिकाणी म्हणतात, ”योगी आणि मतारोपण करणारा साम्यवादी नेता हे दोघेही आपले जीवन सर्वांना वाहून घेत असतील. परंतु, त्यांच्या कर्माचा हेतू आणि गुणवत्ता तसेच त्यांच्या जीवनाचा हेतू यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. गीता ही जीवनाच्या हेतूवर, उद्देशावर लक्ष केंद्रित करते. पाश्चात्त्य देशातील व्यक्ती परिपक्वता आणि भौतिक यश मिळाल्यानंतर जीवनाच्या हेतूविषयी चर्चेचा चिंतन करतो. मात्र, गीतेने प्रेरित झालेला हिंदू जीवनाच्या उंबरठ्यावर असतानाच जीवनलक्ष्याचा विचार करतो.” गांधीजींचे संपूर्ण जीवन गीता तत्त्वाच्या चैतन्याने प्रेरित झाले होते. त्यांच्या जीवनाचे यथायोग्य आकलन होण्यासाठी गीतेचा त्यांनी लावलेला अन्वयार्थ व त्यांचा प्रत्यक्ष जीवनव्यवहार यांच्यातील संगती लक्षात घेतली पाहिजे. हा सर्व प्रवास म्हणजे अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे केलेली वाटचाल आहे.


हिंदू धर्म चिंतन


गांधीजींचे हिंदू धर्माविषयीचे चिंतन त्यांच्या
समग्र वाङ्मयात विखुरलेले दिसते. त्यांनी या विषयाची सूत्रबद्ध व सलग मांडणी केलेली दिसत नाही. ‘हरिजन’ व ‘यंग इंडिया’ या नियतकालिकातून वेळोवेळी त्यांनी या संदर्भातील आपले विचार मांडले आहेत. त्यांनी केलेले ग्रंथलेखन, त्यांचे आत्मचरित्र ‘सत्याचे प्रयोग’ म्हणजेच ‘The Story Of My Experiment With Truth' यातही त्यांच्या या विचारांचे प्रतिबिंब घडलेले दिसते. त्यांनी केलेल्या अनेक भाषणांतून व लिहिलेल्या पत्रांतूनही त्यांची हिंदू धर्माविषयी मते व्यक्त झालेली आढळतात. डॉ. आंबेडकर यांनी ‘जातींचे निर्मूलन’ या एका न केलेल्या पण प्रसिद्ध झालेल्या भाषणावर गांधीजींनी ‘हरिजन’मध्ये तीन लेख लिहून आपली प्रतिक्रिया दिली. त्यातही हिंदू धर्मविषयक चिंतन आले आहे. या सर्व चिंतनाचे सार काढणे, हा स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे. आपण येथे त्याचा केवळ सूत्ररूपाने आढावा घेणार आहोत. १९२१ साली केलेल्या एका भाषणात गांधीजी म्हणतात, “मी स्वत: आपण सनातनी हिंदू आहोत, असे समजतो. धर्मशास्त्रांबद्दल मी अगदीच अज्ञानी आहे असे नाही. पण मी संस्कृत भाषेत पारंगत नाही. वेद आणि उपनिषदांचे, गीतेचे वाचन व अध्ययन मी केले, ते भाषांतरांच्या- इंग्रजी भाषेच्या माध्यमातून, त्यामुळे माझा या विषयाचा अभ्यास व्यासंगी वा विद्वत्तापूर्ण नाही. पण एक हिंदू म्हणून त्यांचा जेवढा अभ्यास करणे शक्य आहे, तेवढा मी केला असून त्यातील सत्वांश, मथितार्थ मला कळला आहे, असा दावा मी करू शकतो. वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत जागतिक अन्य धर्म मतांचाही मी अभ्यास केला होता.“ मी स्वत:ला सनातनी हिंदू समजतो, याची कारणे देताना गांधीजी म्हणतात. १) हिंदूंचे धर्मशास्त्र म्हणून जे समजले जाते, त्यावर माझा विश्वास आहे. अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पना मी मानतो. २) माझा वर्णाश्रम धर्मावर व त्यात अनुस्यूत असलेल्या कर्तव्यावर विश्वास आहे. हा विश्वास कटाक्षाने त्याच्या वैदिक स्वरूपावर आहे. आज त्याचा जो लोकप्रिय, विकृत व बटबटीत अर्थ सांगितला जातो त्या अर्थाने नव्हे. ३) सध्या लोकप्रिय असलेल्या रुढ जनमतापेक्षा वेगळ्या अर्थाने माझा गोरक्षणावर विश्वास आहे. ४) माझा मूर्तिपूजेवर अविश्वास नाही. अर्थात हे सर्व हिंदू धर्माचे वरवरचे व बाह्य स्वरूप आहे.



तात्त्विक अंगाने हिंदू धर्माबद्दल बोलायचे झाल्यास गांधीजींच्या मते ईश्वराचा साक्षात्कार
, त्याच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे धर्म. देव आणि धर्म हे अभिन्न व अनिवार्य आहेत. या संदर्भात थोर तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी गांधीजींना तीन प्रश्न विचारले होते. १) तुमचा धर्म कोणता २) तुम्ही त्या धर्माकडे कसे वळलात आणि ३) त्याचा समाजजीवनावर काय परिणाम होतो? या प्रश्न मालिकेला उत्तर देताना गांधीजी लिहितात) माझा धर्म हा हिंदू धर्म आहे. तो संपूर्ण मानवतेचा धर्म आहे. सर्व धर्मातील सर्वोत्तम मूल्यांचा त्यात अंतर्भाव आहे. २) सत्य आणि अहिंसा या माध्यमातून मी या धर्माकडे ओढला गेलो. त्यालाच मी व्यापक अर्थाने प्रेम समजतो. मी माझ्या धर्माचे वर्णन सत्यधर्म असे करतो. ३) कोणीही व्यक्ती जीवनाच्या अमर्याद महासागरात मिसळून गेल्याशिवाय किंवा त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय त्या व्यक्तीला सत्याचा साक्षात्कार होणे अशक्य आहे. ते पुढे एके ठिकाणी म्हणतात, “ ‘मोक्ष’ हे हिंदू धर्माचे मध्यवर्ती तत्त्व आहे. तो मिळविण्यासाठीच मी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे. माझ्या सर्व कार्याचा व उपक्रमांचा अंतिम उद्देश मोक्षप्राप्ती हाच आहे. माझ्या शरीराच्या अस्तित्वावर व नश्वरतेवर जेवढा माझा विश्वास आहे, तेवढाच माझा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर व त्याच्या अमरत्वावर, अविनाशीत्वावर आहे.” हिंदू समाजातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता या विषयावरही गांधीजींनी भाष्य केले आहे. ते म्हणतात, “हिंदू धर्मात चारपेक्षा जास्त वर्ण नाहीत, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. मात्र, या समाजात असंख्य असलेल्या जातींची संख्या कमी होणे अत्यावश्यक आहे. हिंदू धर्माला कोणतीही इजा न पोहोचता जातींचे प्रातिनिधिक गट करून त्यांची संख्या कमी करणे शक्य आहे,” असे त्यांचे निरीक्षण आहे. ते असेही म्हणतात की, “जाती वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीला जातीबाह्य म्हणजे बहिष्कृत करता येते पण धर्मातून बहिष्कृत करता येत नाही. धर्मांतर हे केवळ व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते.”



अस्पृश्यतेसंदर्भात ते म्हणतात
, “अस्पृश्यता नावाच्या रोगाचे मूळ नेमके कशात आहे, याचा शोध अद्याप लागलेला नाही. अस्पृश्य आपल्या शेजारी राहू शकत नाहीत. जमिनीचे मालक होऊ शकत नाही. त्याला पाहिल्यावर मला स्पर्श करू नकोस, माझ्यापासून दूर राहा, असे ओरडलेच पाहिजे हा हिंदू धर्म नव्हे. ते राक्षसी कृत्य आहे व ती दडपशाही वृत्ती आहे,” या शब्दांत त्यांनी अस्पृश्यतेच्या रुढीची निर्भर्त्सना केली आहे. स्वामी विवेकानंदांनी ‘Don't Touchism' म्हणजे ‘शिवू नको वादा’वर आपल्या लेखनात घणाघाती हल्ला केला आहे. त्याचे प्रतिबिंब गांधीजींच्या या मतावर पडलेले दिसते. पुढे १९२५ साली गांधीजी एका भाषणात म्हणाले, “जर हिंदू धर्मातून आपण अस्पृश्यता नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नाश पावेल. मी स्वत:ला हिंदू धर्माशी एकरूप करून घेतले आहे. मी त्याच्यासाठी जगतो आहे आणि त्याच्यासाठीच प्राणार्पण करू इच्छितो. अस्पृश्यता नाहीशी करणे हा माझा धर्म आहे.” याच संदर्भात पुढे एके ठिकाणी ते म्हणतात, “मी अनेकदा असे प्रकटपणे म्हणालो आहे की, “अस्पृश्यता समूळ नाहीशी करणे हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माझ्या अन्य कार्यापासून तो मी वेगळा करू शकत नाही. अस्पृश्यतेच्या वलयातून हिंदू धर्माची मुक्तता करणे हा माझ्या अस्तित्वाचा मथितार्थ आहे. त्या दिशेने मी जगलो नाही वा प्रयत्न केले नाहीत तर मी खर्‍या अर्थाने हिंदू असूच शकणार नाही.” याचा अर्थ अस्पृश्यता निवारण हा गांधीजींचा ध्यास होता, हे निश्चित. राजकीय क्षेत्रात राखीव जागांच्याद्वारे दलित/अस्पृश्य समाजाला प्रतिनिधित्व कसे द्यावयाचे, या संदर्भात गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्या दृष्टिकोनात व भूमिकेत महदंतर होते. येरवडा कारागृहात असताना गांधीजींनी या संदर्भात आमरण उपोषण सुरू केले होते. याच प्रश्नावर पुढे गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात जो करार झाला तो ‘पुणे करार’ म्हणून ओळखला जातो. त्या संदर्भात डॉ. आंबेडकरांना आश्वस्त करताना गांधीजी म्हणाले, “मी कारागृहात असो व कारागृहाबाहेर, हरिजनांची सेवा करणे ही माझी हृदयस्थ प्रेरणा आहे, तो माझा श्वास आहे. ती मला अन्नापेक्षा अधिक मौल्यवान वाटते. काही दिवस मी अन्न-पाण्याशिवाय राहू शकेन पण हरिजन सेवेशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. माझे जीवन अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी समर्पित आहे,” गांधीजींकडून हे आश्वासन मिळाल्यानंतर त्या उभयतांनी ‘पुणे करारावर’ सह्या केल्या. ‘Gandhiji means what he says’ यावरील विश्वासातूनच हे घडू शकले आणि गांधीजींनी आपले उपोषण मागे घेतले.



गांधीजी केवळ अशा आश्वासनांच्या घोषणा करून थांबले नाहीत
, तर त्यांनी तसा प्रत्यक्ष जीवन व्यवहार केला. आपल्या सहकार्‍यांनी व अनुयायांनी तसा व्यवहार केला पाहिजे, असा आग्रहही धरला. दिल्ली मुक्कामात असताना गांधीजी अस्पृश्य समजल्या जाणार्‍या भंगी समाजाच्या वसाहतीत राहत असत. वैष्णवांच्या घरापेक्षा या समाजातील लोकांची घरे अधिक स्वच्छ असतात, असा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव होता. त्यांचे सत्याविषयीचे प्रेम, साधेपणा, दयार्द्रता आणि अन्य गुण कथित स्पृश्यांपेक्षा कणभरही कमी नाहीत, याचा अनुभव घेऊन ते आश्चर्यचकित झाले. अस्पृश्यता या क्रूर व माणुसकीहीन प्रथेच्या प्रवेशाने हिंदू धर्म शक्तीहीन व कलंकित झाला आहे, ती प्रथा दूर झाल्याशिवाय, तिला हद्दपार केल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मागण्याचा हक्कच नाही, असे त्यांचे ठाम प्रतिपादन होते. “अस्पृश्यतेला नकार, देवदासीची प्रथा व पशुबळी यापासून मुक्ती, या बाबी झाल्याशिवाय हिंदू धर्म खर्‍या अर्थाने शुद्ध व सुरक्षित होऊ शकणार नाही, कारण यापैकी कोणतीही बाब नैतिकतेला धरून नाही.” इतक्या नि:संदिग्ध व परखड शब्दांत व प्रत्यक्ष जीवन व्यवहारातून अस्पृश्यतेसारख्या दुष्ट रुढीला असलेला आपला विरोध व्यक्त केला आहेप्राचीन भारतीय धर्मग्रंथांबरोबरच गांधीजींच्या हिंदू धर्माविषयक चिंतनावर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, महर्षि अरविंद, रवींद्रनाथ टागोर, डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारांचाही प्रभाव होता. पाश्चात्त्य विचारवंत व तत्त्वज्ञ थोरो, इमर्सन, रस्किन, अर्नोल्ड, टॉलस्टॉय, मादाम ब्लावात्सकी यांच्याही विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. थिऑसॉफी, ख्रिस्ती, इस्लाम, पारशी, बौद्ध, जैन, शीख या धर्मांच्या धर्मग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यातून या सर्व धर्माच्या ग्रंथातील मूलभूत तत्त्वांचा परिचय त्यांना अगदी जवळून झाला होता. त्यांच्यातील मुख्य शिकवणीत जो समान धागा आहे, त्यामुळे ते प्रभावित झाले होते. परिणामत: त्यांनी एक सर्वस्पर्शी व सर्वसमावेशक असा धर्मविषयक दृष्टिकोन आपल्या जीवनव्यवहारात विकसित केला होता. त्यामुळे धर्माच्या संदर्भात एकारलेपणा, एकसुरीपणा त्यांना मान्य नव्हता. त्यांनी जीवनभर सर्वधर्म समादर या मूल्याचे मन:पूर्वक पालन केलेले दिसते. हे सर्व तपशील समजावून घेतल्याशिवाय गांधीजींच्या जीवनातील अनके घटना निर्णय व कृती यांचा योग्य तो अन्वयार्थ लावता येणार नाही. त्यातून उत्पन्न होणार्‍या त्यांच्याविषयीच्या गैरसमजांचे निराकरणही होऊ शकणार नाही. 


गांधीजी हिंदू धर्म व हिंदू जीवनदृष्टी यांच्याशी प्रामाणिक राहून जीवन जगणारे निष्ठावंत हिंदू होते. म्हणूनच अन्य धर्मांबाबत ते सहिष्णू व उदारमनस्क होते. प्रत्येक धर्मातील सत्वांशाचा त्यांनी खुल्या मनाने स्वीकार केला होता. ‘सत्य हे एकच असते पण, अनेक विद्वान ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात’ या हिंदू धर्मातील विश्वासापोटीच ते सर्व धर्मांकडे इतक्या ममत्व बुद्धीने पाहू शकले, पण हे सर्व लक्षात घेऊनही या संदर्भात काही प्रश्न मनात उभे राहतात. इस्लाम धर्म व धर्मानुयायी यांचा हिंदू धर्म व हिंदू समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका उदार व समावेशक असतो का? ख्रिस्ती धर्म व धर्मप्रसारक यांचा हिंदू धर्म व हिंदू समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका व्यापक असतो का? या दोन्ही धर्मात कु्रुसेड्स वा जिहाद होताना इतिहासात का दिसतात? हे सर्व प्रश्न त्यांच्या चिंतनात अनुत्तरित का राहतात? या संदर्भात बारकाईने विचार केल्यास असे जाणवते की, या प्रश्नमालिकेतच त्याचे उत्तर आहे आणि ते गांधीजींच्या मूलत: ‘हिंदू’ असण्यात आहे. अन्य धर्मीय व त्यांचे धर्माधिकारी हिंदू धर्माविषयी व हिंदू समाजाविषयी काय म्हणतात वा कोणती भूमिका घेऊन व्यवहार करतात, यावर आपण त्यांच्याशी कसे वागायचे, हे ठरवणे गांधीजींच्या हिंदू मनाला पटत नाही. ‘जशास तसे’ हे हिंदू जीवन दर्शनांचे सूत्र नव्हे. मूलभूत चांगुलपणा, व्यापक दृष्टिकोन व उदारमनस्कता ही या जीवन दर्शनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे सच्चा हिंदू नकारात्मक व विध्वंसक विचार करीत नाही. याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत, हे गांधीजींना समजत नसावे, असे कसे म्हणता येईल? आपण नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे राहून जीवनाचा समग्रपणे व साकल्याने विचार केला पाहिजे, उदारमनस्क असले पाहिजे, हे गांधीजींच्या धर्मनिष्ठ जीवनाचे मुख्य सूत्र असल्यामुळे त्यांना असले लौकिक प्रन्न पडले नसावेत. यातच या महात्म्याचे द्रष्टेपण व मोठेपण सामावले आहे, असे मला वाटते.

 

श्रीमद्भगवद्गीता आणि गांधीजी

गांधीजींच्या मते ‘महाभारत’ किंवा ‘गीता’ हा ऐतिहासिक दस्तऐवज नाही. गीता ही दृष्टांत कथा किंवा रूपक आहे. तिचा ध्वन्यार्थ व लक्षणार्थ समजावून घेतला पाहिजे. “येथील युद्धभूमी म्हणजे मानवी आत्मा आहे. त्यात अर्जुन उच्च दर्जाच्या उर्मीचे, आवेगाचे प्रतिनिधीत्व करतो आणि दुष्टपणाच्या विरोधात संघर्ष करतो. श्रीकृष्ण हा अंतर्निवासी आहे. तो शुद्ध अंतःकरणाचे नित्य गान हलक्या आवाजात करीत असतो.”


अस्पृश्यतेला कडाडून विरोध

अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही, यावर गांधीजी एवढे ठाम होते की, “ते हिंदू धर्मावर वाढलेले एक बांडगुळ आहे,” असे ते म्हणत. एवढेच नव्हे तर “अस्पृश्यता जिवंत राहिली तर हिंदू धर्म मरतो आणि हिंदू धर्म जगावा असे वाटत असेल तर, अस्पश्यतेचा मृत्यू अटळ आहे,” अशी खणखणीत मांडणी त्यांनी केली.



गांधीजी एक सनातनी हिंदू

मी स्वत:ला सनातनी हिंदू समजतो, याची कारणे देताना गांधीजी म्हणतात. १)हिंदूंचे धर्मशास्त्र म्हणून जे समजले जाते, त्यावर माझा विश्वास आहे. अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पना मी मानतो. २)माझा वर्णाश्रम धर्मावर व त्यात अनुस्यूत असलेल्या कर्तव्यावर विश्वास आहे. हा विश्वास कटाक्षाने त्याच्या वैदिक स्वरूपावर आहे. आज त्याचा जो लोकप्रिय, विकृत व बटबटीत अर्थ सांगितला जातो, त्या अर्थाने नव्हे. ३)सध्या लोकप्रिय असलेल्या रुढ जनमतापेक्षा वेगळ्या अर्थाने माझा गोरक्षणावर विश्वास आहे. ४)माझा मूर्तिपूजेवर अविश्वास नाही.

‘त्यां’ची सेवा करणे ही माझी हृदयस्थ प्रेरणा

“मी कारागृहात असो व कारागृहाबाहेर, हरिजनांची सेवा करणे ही माझी हृदयस्थ प्रेरणा आहे, तो माझा श्वास आहे. ती मला अन्नापेक्षा अधिक मौल्यवान वाटते. काही दिवस मी अन्न-पाण्याशिवाय राहू शकेन पण हरिजन सेवेशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. माझे जीवन अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी समर्पित आहे,” गांधीजींकडून हे आश्वासन मिळाल्यानंतर त्या उभयतांनी ‘पुणे करारावर’ सह्या केल्या. ॠरपवहळक्षळ ाशरपी थहरीं हश डरूी यावरील विश्वासातूनच हे घडू शकले आणि गांधीजींनी आपले उपोषण मागे घेतले.



-प्रा. श्याम अत्रे
(९३२४३६५९१०)
संदर्भग्रंथ

 

. सत्याचे प्रयोग : महात्मा गांधी

. द लाईफ ऑफ महात्मा गांधी : लुई फिशर

. गांधीजी - मानव नि महामानव : द. न. गोखले

. हिंद स्वराज्य : महात्मा गांधी

. गांधी - ए मेमॉयर : विल्यम एल. शरर

. एम. के. गांधी - सिलेक्टेड स्पीचेस : संपादक बी. के अहलुवालिया

. गांधी : प्रा. नलिनी पंडित

 
@@AUTHORINFO_V1@@