भारताची अर्थनीती-गांधींच्या दृष्टिकोनातून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |



गांधीजींचे विचार बऱ्याचदा तात्कालिक असल्याचे म्हटले जाते किंवा तसा आरोपही त्यांच्या विचारांवर होतो. ‘हिंद स्वराज्य’ या गांधींजींच्या पुस्तकात मात्र त्यांनी आपले उद्योग, अर्थव्यवस्था, गाव-खेडी, गोरक्षण, यांत्रिकीकरण, शेती वगैरे विविध विषयांवर मत व्यक्त केले आहे. त्यातील कितीतरी विचार आजही शाश्वतच वाटतात. सदर लेखातून गांधीजींच्या या विचारधनाचा आढावा घेतला आहे.



मोहनदास करमचंद गांधी तथा
बॅरिस्टर गांधी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी’, असा हा गांधीजींचा प्रवास हा अनेक तात्त्विक, व्यावहारिक व सामाजिक अंशांनी विस्तारलेला प्रवास आहे. स्वातंत्र्य चळवळीतला १९२० ते १९४७ हा कालखंड. गांधीजींच्या क्लृप्त्यांनी, चळवळींनी, विचारांनी, हट्टाग्रहांनी आणि शांतपणे प्रसवलेल्या तत्त्वांनी भारावलेला काळ, हा आपल्या पिढीने अभ्यासण्यासारखा आहे. एका संशोधकाच्या नजरेतून अभ्यासले तर लक्षात येते की, समाजसदृश्य क्रिएटिव्ह माईंड (नवनिर्माणकर्ते मन-बुद्धी) काय असते, याची प्रचिती येते. भारतात आणि जगभरात गांधीजींची ख्याती आहे, ती म्हणजे सत्याग्रहदर्शनाचे प्रणेते, स्वातंत्र्यलढ्याचे सेनानी, विधायक दृष्टीचे समाजसुधारक आणि धर्म व नीती यांच्या ऐक्यभावाचा पाठपुरावा करणारे आधुनिक संत अशा अर्थाने. त्यातूनच उदारमतवाद किंवा समाजवाद यांच्याप्रमाणे गांधीवाद हाही एक मूलगामी आणि सर्वंकष अशी तत्त्वप्रणाली म्हणून अभ्यासला जातो. त्यामध्ये स्वीकारार्हता आणि अस्वीकारार्हता या बाबी आल्याच!


माझ्या दृष्टीने गांधीजींचा विचार हा केवळ निरीक्षणातून प्रसवलेला विचार नसून तो प्रयोगशीलतेतून आलेला तत्त्व विचार आहे. असा विचार त्याच व्यक्तीकडून प्रसवला जातो, जो इथल्या मातीशी संपूर्ण समरस झालेला आहे आणि ज्याला इथल्या समाजाच्या प्रत्येक घटकाच्या भविष्याबद्दल चिंता आहे. जगरहाटीत चाललेल्या आधुनिकीकरणातील धोके त्यास जाणवत आहेत. इथल्या समाजमन आणि समाजजीवनातील शाश्वत मूल्यांना वरकरणीपणामुळे धोका निर्माण होईल, अशी खात्री गांधीजींच्या हट्टाग्रही तत्त्वप्रणालीत दिसून येते. हे एक दूरद्रष्ट्या समाजसुधारकाचे लक्षण गांधीजींच्या विविधांगी तत्त्वप्रणालीत दिसून येते. २७ मे, १९३९ ला ‘हरिजन’मध्ये ते म्हणतात, “माझ्यापाशी आधारासाठी कोणतीही तयार अशी सैद्धांतिक तत्त्वप्रणाली नाही. सत्याग्रह शास्त्राची सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशी मांडणी मी केलेली नाही. मी करीत असलेल्या (त्याच्या) या शोधाने तुमचे मन वेधून घेतले आणि तुम्हाला त्याची ओढ वाटली तर या शोधात तुम्ही सहभागी होऊ शकता.” गांधीजींच्या तत्त्व प्रतिपादनात आणि जीवनसरणीत धर्माला सर्वोच्च स्थान होते. त्यांच्या आत्मकथेच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, “माझ्या प्रयोगांमध्ये तरी आध्यात्मिक म्हणजे नैतिक धर्म म्हणजे नीती, आत्म्याच्या दृष्टीने पाळावयाची नीती तो धर्म.” याच नीती आधारित धर्माचे पालन करीत, स्वत: तसा व्यवहार करून सिद्ध तत्त्व म्हणून समाजमनावर बिंबविण्याचा प्रयत्न आणि हट्ट जीवनभर ते करत राहिले; त्यांच्या या हट्टाग्रहामध्ये जी दृढता होती, ती सनकीपणाची नसून आपल्या शाश्वत मूल्यांची जपणूक करण्यासाठीची धडपड होती. राजकारण हा आपल्या आध्यात्म साधनेचा, सत्याच्या प्रयोगाचाच एक भाग आहे, अशी त्यांची धारणा होती म्हणून आपल्या राजकीय चळवळीतही त्यांनी तत्त्वनिष्ठेचा, साधनसुचितेचा सतत आग्रह धरला. गांधीजी स्वत:ला व्यवहारकुशल (Practical Idealist) म्हणवून घेत. ‘जे व्यवहार्य नाही, ते आध्यात्मिक असूच शकत नाही,’ अशा या त्यांच्या विचारातून ते भारताचा मूळ स्वभाव आणि त्याला पूरक व्यवहार लक्षात घेऊन भारताच्या विकासाच्या कल्पना त्यांनी वेळोवेळी मांडल्या. भारताच्या मूळ स्वभावाला सोडून केलेला किंवा झालेला विकास हा फुगवटा ठरू शकतो, याची त्यांना जाणीव होत होती. म्हणूनच ब्रिटिशांच्या सांस्कृतिक आक्रमणाला (खानपान, पेहराव, जीवनमूल्ये) सतत विरोध करीत राहिले. याच विचारातून गांधीजींनी भारताची (स्वतंत्र) अर्थव्यवस्था कशी असावी, यासाठी आग्रह धरल्याचे त्यांच्या पुढील मुद्द्यावरून लक्षात येईल.



गांधीजींचा विकेंद्रित अर्थव्यवस्थेवर भर


स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी नेते या नात्याने राष्ट्राच्या आर्थिक हितसंबंधांची जपणूक करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती
. त्यातूनच त्यांच्या विचारांना राष्ट्रवादाची जोड देता आली. स्पर्धेवर आधारलेली अर्थव्यवस्था माणसाला स्वयंकेंद्रित व स्वार्थी बनविते, असे त्यांचे मत बनले होते. तिला पर्याय म्हणून लहान-लहान गटांची स्वायत्तता व त्यातील सर्व व्यक्तींचे स्वयंस्फूर्त सहकार्य (स्वयंसेवक) या तत्त्वावर चालणार्‍या छोट्या वसाहतीचे त्यांनी प्रयोगही केले. भारतातील राजकारणात पदार्पण केल्यानंतर येथील खेड्यांशी गांधीजींचा जवळून संबंध आला. ग्रामावर आधारित आणि शेतीला केंद्रस्थानी असणारी भारतीय समाज आणि अर्थव्यवस्था हीच या देशाची ताकद आहे, हे गांधींनी मनोमन जाणले आणि म्हणूनच खेड्यांतीत स्वयंपूर्ण ग्रामसंस्था नव्या विकेंद्रित अर्थव्यवस्थेला पायाभूत बनू शकेल, अशी आशा त्यांनी मनाशी बाळगली आणि त्यादृष्टीने आपल्या विधायक कार्यक्रमाची त्यांनी आखणी केली. पुढे यालाच आधारभूत ‘खेड्याकडे चलाहे गांधीजींच्या नावाने बोलले जाणारे शाश्वत मूल्यच जणू होऊन गेले. असे म्हणतात की, गांधीजींचा यंत्र संस्कृतीला विरोध होता. आजच्या रोबोटिक झालेल्या मानवाकडे व स्वत:कडे बघितले की, गांधीजींची त्यामागची भूमिका खूप व्यापक वाटायला लागते. माणसातले माणूसपण जपणारे, निसर्गाशी जवळीक साधून राहण्यासाठीचे त्यांचे मार्गदर्शक विचारांचे मूल्य खूप महान वाटायला लागते.



गांधीजींचा भांडवलशाहीतील सामाजिक अन्यायापेक्षाही तिच्यामुळे वैयक्तिक जीवनात ज्या अनिष्ट प्रवृत्ती निर्माण झालेल्या होत्या
, त्याच्यावर रोख जास्त होता. गांधींनी १९०९ साली ‘हिंद-स्वराज्य’ या ग्रंथात तो प्रकट केलेला आहे. त्यांच्या मते, “कारखान्यातील यंत्रावर काम करणारा कामगार त्या यंत्राचाच एक भाग बनून राहतो. त्याचा उत्साह, सर्जनशीलता, निर्णयशक्ती यांना ओहोटी लागते. निसर्गापासून त्याची फारकत होते. भोगाच्या मागे लागल्याने स्वत:च्या अंतरात्म्याचा त्याला विसर पडतो. त्याच्या जीवनातील सहजता, शांती, समाधान नाहीशी होतात.” म्हणून यंत्रसंस्कृतीतून आलेली कृत्रिमता नष्ट करण्यासाठी परत निसर्गाकडे वळण्याचा सल्ला ते देतात. अधिकाधिक सुखोपभोगांच्या मागे लागण्याऐवजी माणसाने आपल्या गरजा मर्यादित ठेवण्याची आवश्यकता आहे, असे ते सांगतात. मानवाच्या भौतिक सुखापेक्षा त्याच्या नैतिक विकासाला त्यांनी अधिक महत्त्व दिले. छोट्या-छोट्या गटांचे स्वावलंबन आणि सहकार्य यामधून भांडवलशाहीला शह देता येईल आणि सत्तेचे केंद्रीकरण टाळून पर्यायी समाजव्यवस्था उभी करता येईल, असे त्यांचे मत होते. याच विचारसरणीला अनुसरून गांधींनी अन्य राष्ट्रभक्त समाजसुधारकांप्रमाणे आधुनिक यंत्राधिष्ठित पाश्चात्त्य संस्कृतीवर कडाडून हल्ला चढविला होता. ही संस्कृती माणसाला भौतिक सुखाची नवनवी साधने उपलब्ध करून देते आणि त्याचा शारीरिक व मानसिक अध:पात घडवून आणते, अशी टीका स्पष्टपणे केली.



आधुनिक यंत्रसंस्कृती ही युरोपीय समाजाला जडलेली मोठी व्याधीच आहे
, असे मत गांधीजींनी या ग्रंथात व्यक्त केले आहे. भारताच्या पराभवाला पाश्चात्त्यांपासून आपण आत्मसात केलेली ही भोगप्रधान संस्कृतीच कारणीभूत आहे, असे अनुमान त्यांनी व्यक्त केले आहे. शरीरश्रम, साधी राहणी, ग्रामोद्योग, विकेंद्रीकरण, स्वायत्त व स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्था यांच्यावरील त्यांचा विश्वास त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहील. कालांतराने भारताच्या आर्थिक व्यवहारातील गुंतागुंतीचा प्रत्यय आल्यावर यंत्र संस्कृतीला असणारा त्यांचा विरोध कमी झाला. बेकारी निवारण आणि आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण यांना बाधा न येईल, अशा रितीने यंत्र संस्कृतीशी तडजोड करण्याची त्यांच्या मनाची तयारी झाली. यातून कालसुसंगत परिवर्तनशीलता हाही गुण गांधीजींमध्ये दिसून आल्याचे आढळते. अर्थव्यवस्थेच्या घडणीबद्दलच्या गांधींच्या कल्पनांबाबत मतमतांतरे असू शकतील व आहेतही, परंतु आर्थिक विकासाच्या त्यांच्या संकल्पनेत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि वैद्यकीय मदत या सामान्य माणसाच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी त्यांनी अग्रक्रम दिलेला आहे, याबाबत मात्र कुणाचे दुमत असता कामा नये. सध्याचे शासनही गांधीजींच्या या अग्रक्रमावरच भर देत आहे. यातच गांधीजींच्या विचारांचे मोल लक्षात येते. रुचेल-पचेल एवढेच माणसाने संग्रही ठेवावे, पाश्चात्त्य देशाचे अनुकरण करून भारतानेही लोकांच्या राहणीमानामध्ये एकसारखी प्रगती वाढवित नेणे, हे एकमेव उद्दिष्ट असावे, हे गांधीजींना मान्य नव्हते. ते म्हणत, “जर तुमच्या दृष्टीने समृद्धी याचा अर्थ प्रत्येकाला भरपूर खायला, प्यायला मिळावे, कपडालत्ता मिळावा, मनावर सुसंस्कार घडविण्याची संधी मिळावी, हे उद्दिष्ट असे तर मला मान्य होर्ईल, मात्र, पचन होईल त्याहून अधिक अन्न पोटात ढकलणे आणि उपयोग नसलेल्या वस्तूंचा संग्रह करीत बसणे मला मुळीच पसंत नाही.”



स्वराष्ट्र नियंत्रित उद्योगांना गांधीजींचा पाठिंबा


महात्मा गांधींना स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते मानले जाते
. औद्योगिकीकरणाला गांधीजींचा विरोध होता, अशीही मांडणी काहीजण करीत असतात. स्वदेशी संदर्भातील गांधीजींच्या विचारांना आजही आपण आव्हान देऊ शकत नाही, गांधीजींची स्वदेशी कंपनीची कल्पना किती स्पष्ट होती, याची प्रचिती पुढील वक्तव्यावरून येते. ते म्हणतात, “ज्यांचे नियंत्रण, दिग्दर्शन आणि व्यवस्थापन हे मॅनेजिंग डायरेक्टर अथवा मॅनेजिंग एजंट्स यांच्याद्वारे भारतीयांच्या हातात असेल, त्या भारतीय कंपन्या होत. भांडवलाची आणि तांत्रिक ज्ञानाची जेव्हा आपणास गरज असेल आणि आपल्या देशात ती उपलब्ध नसतील तेव्हा परकीय भांडवल आणि तंत्रज्ञ यांचा वापर करण्यास माझी हरकत नाही.मात्र, हे भांडवल भारतीय नियंत्रणाखाली असावे आणि भारताच्या हितासाठी त्याचा विनियोग करण्यात यावा. परंतु, परकीय भांडवलाचा किंवा तंत्रज्ञांचा वापर करणे आणि परकीय कंपन्या भारतात वाढू देणे या दोन गोष्टी भिन्न आहेत. या कंपन्या (उद्योग) स्वदेशी म्हणता येणार नाहीत.” कोणत्याही उद्योगाचा उद्देश हा केवळ उत्पादनाचा न ठेवता बेकारी निवारण्याचा प्राधान्याने असावा, असे मत मांडताना देशी उद्योगधंद्यांमध्ये यंत्रोद्योग व ग्रामोद्योग या दोन्हींचा समावेश असावा. त्यातही ग्रामोद्योगांत प्राधान्य असावे, असा विचार ते आग्रहाने मांडतात. याच विचारातून गांधीजींनी ‘अखिल भारतीय चरखा संघ’, ‘ग्रामोद्योग संघ’ या संस्थांची स्थापना केली.



भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाने अद्ययावत यंत्रसामग्रीची कास धरल्यास सर्वांना रोजगार पुरविता येईल इतका भांडवलसंचय त्याला कधीच करता येणार नाही
. म्हणून रोजगाराच्या दृष्टीने भांडवलाधिष्ठित यंत्रोद्योगापेक्षा श्रमाधिष्ठित ग्रामोद्योगांचीच आपण कास धरली पाहिजे, असे गांधीजी वारंवार सांगत राहिले. परंतु, तत्कालीन भारतातील सत्ताधारी वर्गाला गांधीजींचा हा विचार अवास्तव व अव्यवहार्य वाटला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाश्चात्त्य पद्धतीचे औद्योगिकीकरण करण्याचे ध्येय सत्ताधार्‍यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवले. आर्थिक विकासासाठी नियोजन करून भांडवलाधिष्ठित मोठमोठे उद्योग स्थापन करण्यावर शासनाने आपले लक्ष केंद्रित केले. गेल्या ५०-६० वर्षांच्या या विकास कार्यक्रमानंतर बेकारीची समस्या उकलत जाण्याऐवजी अधिकाधिक गंभीर व गुंतागुंतीची होत चाललेली आहे. भांडवलशाही पद्धतीच्या औद्योगिकीकरणातून भारतातील बेकारीचा प्रश्न सुटण्याची शक्यता नाही, हे अधिकाधिक स्पष्ट होत चालले आहे. बेकारी निवारणाला आर्थिक विकासात अग्रक्रम देण्याचा गांधीजींचा आग्रह चुकीचा नव्हता, हे कोणालाही मान्य करावे लागेल.

 

 
गांधीजींनी आापल्या व्रतविचारात शरीरश्रमांना महत्त्व दिले आहे. शेकडो वर्षांच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरेतून शरीरश्रमाकडे तिरस्काराने पाहण्याची वृत्ती आपल्या लोकांत निर्माण झालेली आहे, हे गांधीजींचे निरीक्षण होते. ही वृत्ती हीच आपल्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातील मोठा अडथळा होता. वर्णव्यवस्थेत ब्राह्मणांना उत्पादक श्रमाचे वावडे होते. घाम गाळणे ही शूद्रांची मिरासदारी होती. बुद्धी व श्रम यांच्यातील फारकतीमुळे (सुशिक्षितांचे) खेड्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे, हे गांधीजींचे मत खरेच आहे. म्हणून विधायक कार्याच्या द्वारे खेड्यांची उन्नती करण्यासाठी त्यांनी शेकडो कार्यकर्ते खेडोपाडी पाठविले. मनुष्य कितीही मोठा विचारवंत असला तरी त्याच्या काही शारीरिक गरजा भागविण्यासाठी त्याने शारीरिक श्रम करणे आवश्यकच आहे. निसर्गाचा तो नियम आहे. जे लोक शरीरश्रम करीत नाहीत, त्यांना अन्न पचनासाठी व्यायाम करावा लागतो. व्यायामापेक्षा उत्पादक श्रम करणे, सामाजिक हितास अधिक उपकारक आहे, सुशिक्षित लोक उत्पादक श्रम करू लागले की, श्रमाची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी ते आपले बुद्धीकौशल्य पणाला लावल्याखेरीज राहणार नाहीत, असा गांधीजींचा कयास होता.


आर्थिक निकषांवर समानतेचा आग्रह


आपल्या देशातील आत्यंतिक आर्थिक विषमतेवर आघात करून समतेचा पाठपुरावा करणारे गांधीजी एक लोकाभिमुख वृत्तीचे राजकीय पुढारी होते
. श्रीमंत आणि गरीब, बुद्धिजीवी आणि श्रमजीवी यांच्यातील आर्थिक विषमता त्यांना अनर्थकारक वाटत होती. या देशातील सामान्य जनता नेहमी अर्धपोटी असल्यामुळे या विषमतेला अधिकच निर्घृण स्वरूप आले होते. विषमतेवर आधारलेला समाज हा कधीही अहिंसक राहू शकत नाही, अशी गांधीजींची धारणा होती आणि म्हणूनच आर्थिक विषमता कमी करण्यावर त्यांनी भर दिला. “आर्थिक समतेसाठी झटणे, याचा अर्थ भांडवल आणि श्रम यांच्यातील अनादी विरोध नाहीसा करणे, हा होय. ज्या थोड्या धनिकांच्या हातात आज देशाची संपत्ती गोळा झालेली आहे, त्याची पातळी खाली आणणे आणि अत्यंत हलाखीत दिवस कंठणार्‍या जनतेची पातळी उंचावणे हाच त्याचा मार्ग होय.” श्रीमंत आणि गरीब यांच्याप्रमाणे श्रमजीवी व बुद्धी वर्गातील आर्थिक तफावतही त्यांच्या दृष्टीने धोक्याची होती.



ग्रामराज्य
: गांधीजी ‘ग्रामराज्य’ संकल्पनेचे प्रमुख प्रणेते मानले जातात. ग्रामीण उद्योगधंद्यांचे पुनरूज्जीवन हा ग्रामोद्धाराचा प्रारंभ बिंदू म्हणता येईल. खेड्यातील लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, दैववाद, संकुचितपणा नाहीसा करून त्यांच्या जीवनात सर्वांगीण सुधारणा घडवून आणण्याची गांधीजींची मनिषा होती. ग्रामोद्योगाच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्यासाठी लोकांमध्ये सहकाराची वृत्ती निर्माण झाल्यास श्रमविभागाला भरपूर वाव मिळेल आणि वेळेची बचत होऊन उत्पादनक्षमता वाढेल, असे गांधीजींचे म्हणणे होते. १९४२ पासून ते सामुदायिक शेतीचा विचार मांडू लागले. “माझा दृढविश्वास आहे की, आपण सहकार शेतीचा स्वीकार केल्याशिवाय आपल्याला शेतीचे संपूर्ण फायदे मिळवता येणार नाहीत. खेड्यातील शंभर कुटुंबांनी जमिनीचे शंभर तुकडे करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रितपणे जमिनीची लागवड करून तिच्यावरील उत्पन्न वाटून घेणे, हे अधिक श्रेयस्कर आहे. हे बुद्धीला पटण्यासारखे नाही का? जो नियम जमिनीला तोच भांडवलालाही लागू पडतो.” गांधीजींचा आदर्शवाद म्हणावा की, भोळेपणा की, निष्पाप मत म्हणावे, हे सांगता येणार नाही. परंतु, गेल्या १५-२० वर्षांतील शेतीची-शेतकर्‍यांची परवड, शेतकरी आत्महत्या, शेतात घुसलेली कारखानदारी आणि त्यातून आलेले राजकीय कारखानदार हे सगळं पाहता; गांधीजींच्या या सहकारी शेतीच्या सल्ल्यावर विचार व्हायला पाहिजे होता, असे वाटायला लागते. सामुदायिक शेतीचा पुरस्कार डॉ. आंबेडकरांनीदेखील केलेला आहे.



गोरक्षण
: गोरक्षण हा गांधीजींच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यासाठीही त्यांनी सहकाराची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. शेती आणि गोरक्षण यामध्ये ते स्वयंस्फूर्त सहकार्याची अपेक्षा करतात. हिंसेवर आधारलेल्या जबरदस्तीच्या सहकार्यापेक्षा असे स्वयंस्फूर्त सहकार्यच लोकांना खरे स्वातंत्र्य मिळवून देईल, हीच त्यांची पंचायत ग्रामराज्याची संकल्पना होती. गाय हा हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहे. गांधीजींनी गायीमधली उत्पादकक्षमता जाणली होती. त्यातले अर्थकारण त्यांच्या लक्षात आले होते. भारतातला माणूस गोरक्षणाचे काम श्रद्धेने करेल आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हे धर्मपालनातून मिळालेल्या उत्पन्नासारखे असेल, सच्चे सात्विक असेल असा भावही त्यामागे असावा.



गांधीजी भारतातील प्रत्येक गरीब
, कष्टकरी, वंचित व्यक्तीचे जीवनमान उंचवावे, त्यांच्या राहणीमानाचा विकास व्हावा म्हणून विविध प्रयोग आणि विचार मांडत राहिले. गांधीजींच्या राजकारण, समाजकारण, धर्मकारण अर्थकारण, स्वातंत्र्य चळवळ, त्यांचे वैयक्तिक जीवन व्यवहार, मूल्य इत्यादी बाबींवर विचार मांडत राहिले. कधी आग्रह तर कधी हट्टाग्रह करीत राहिले. आपल्याच विचार विश्वाचे चिंतन करीत राहिले आणि पुन्हा-पुन्हा पुनर्जीवित विचार मांडत राहिले. त्यामुळे गांधीजी या व्यक्तिमत्त्वाभोवती जसा श्रद्धेचा भाग आहे, तसा वादविवादाचाही भाग आहे. गांधीभक्तीतून मांडलेले विचार-लिखाण खूप आहे आणि सनकी गांधी या अंगाने विचार लिखाण मांडणारेही खूप आहेत. काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कुणाला कालबाह्य वाटूही शकतात. परंतु, मी गांधींना कुठल्याही चष्म्यातून न अभ्यासता एक कुतूहल म्हणून आणि हे असे का? (कधी तोळा तर कधी मासा) या शंका निरसनासाठी अभ्यास करायला लागले तेव्हा जाणवले की, गांधींचा विचार हा भारताच्या धर्म आधारित नीतीमूल्यांचा विचार आहे. धर्म हा भारताचा आत्मा आहे आणि याच धर्माचे व्यावहारिक स्वरूप सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. धर्माची संकल्पना ही मानवाच्या जगण्याशी निगडित आहे. प्रत्येक मानवाच्या जगण्याचे मूळ सत्त्व हे त्याला जगताना त्याच्या क्रयशिलतेतून आत्मिक शांती, आत्मिक समाधान मिळेल, या उद्दिष्टपूर्तीचा प्रवास आहे. हा धर्म सांगत असताना गांधीजी वैयक्तिक आणि छोट्या छोट्या स्तरावर प्रयोग करतात आणि हे या देशाला पुरक ठरेल, असा हट्ट धरतात. परंतु यातून एक धागा सतत सुटत गेल्याचे जाणविते. (Missing Link) ते म्हणजे मनुष्य हा सतत नाविन्याचा मागोवा घेणारा प्राणी आहे. जशी नैसर्गिक उत्क्रांती असते, तशी विकासाच्या परिभाषेचीही उत्क्रांती असते. सामाजिक आणि व्यावहारिक कालानुरूप उत्क्रांतीही असते. त्या त्या काळी माणसाची व्यवहार आणि नीतीमूल्ये यांचे व्यावहारिक स्वरूप बदलत राहते आणि म्हणून मूलभूत विचार करणारे गांधी विचार कालबाह्य वाटायला लागतात.



माणसाच्या जगण्याचा अंतिम टप्पा विकास विकास आणि विकास हाच असेल
, तर गांधींचे विचार भूतकालीक वाटायला लागतात आणि माणसाच्या युगानुयुगे प्रवासाचा अंतिम टप्पा मोक्ष, अंतरात्मा शरणता हा असणार असेल, तर गांधीजींच्या विचारांना तोड नाही. आजही आणि उद्याही ते कालसुसंगत असणार आहेत. गांधीजींच्या प्रतिपादनात ‘त्याग’ आणि ‘त्याज्य’ या मूल्यांचा जास्त प्रभाव दिसतो. सहिष्णुता, अहिंसा या तत्त्वाचाही ते आग्रह धरतात. परंतु, त्याच्या विरोधाभासाचे काय करायचे, हे मात्र शिताफीने टाळतात. गांधीजींनी भारताच्या तात्कालिक समस्यांवरती उपाय या अर्थाने खूप भाष्य केलेले आहे. भारताच्या या स्थितीच्या वरकरणी कारणांचाही शोध घेतल्याचे जाणवते. भविष्याचा वेध घेताना मात्र भारत पुन्हा विश्वगुरू होईल, याचे भाकीत मात्र ते करीत नाहीत. याचा अर्थ मी असा लावते की, गांधीजी ‘आध्यात्मिक भारत’ या परिप्रेक्ष्यातच राहून विकासाचे मार्गक्रमण करावे, असा आग्रहाचा सल्ला देतात. नीतीमूल्ययुक्त व्यवहार ही भारताची ताकद आहे. जगाने यासाठी भारताचे अनुकरण करावे, असा जगाला नकळत सल्ला देतात. ‘साधी राहणी उच्च विचारसरणी‘, ‘सहिष्णु मन सुदृढ मन,’ अहिंसक व्यवहार, पुण्याचा मार्ग, ‘नीतीयुक्त व्यवहार, अंतरात्मा साक्षीदार’! या शाश्वत मूल्यांचा ऊहापोह गांधीजींच्या विचारांचे सार आहे, असे माझे मत आहे.

- डॉ. सुवर्णा रावळ

 

संदर्भ :

) गांधी-हिंद स्वराज्य, २) गांधी विचार दर्शन ३Economic & Industrial Life And Relation; V. B. Kher ४) गांधी- नलिनी पंडित.

@@AUTHORINFO_V1@@