ख्रिश्चन मिशनरी व गांधीजींचे आक्षेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |



महात्मा गांधींजींचे नाव घेऊन सर्वधर्मसमभावाचा जप करणारे अनेक लोक सध्या दिसतात. अशा लोकांना हिंदूंच्या धर्मांतरावर आक्षेप नसतो, उलट तेही धर्मांतरे योग्य मानतात. परंतु, महात्मा गांधीजींनी आपल्या हयातीत ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कोणत्याही प्रकारे केल्या जाणाऱ्या मग शिक्षणाच्या वा आरोग्य सेवेच्या रूपातील का असेना-धर्मांतराला विरोधच केला. महात्मा गांधींनी अखेरपर्यंत हिंदू व हिंदुत्वालाच शिरोधार्ह, आचरणयोग्य मानले आणि ख्रिस्तीमतालाही हिंदुत्वाकडून शिकण्याची सूचना दिली.


गांधीजी एका सश्रद्ध हिंदू परिवारात वाढले. त्यांच्या वडिलांचे विविध धर्मातील मित्र होते. वडिलांच्या भिन्नधर्मीय मित्रांबरोबर झालेल्या चर्चांचा त्यांच्या बालमनावरही परिणाम झाला होता. मोठे होत असताना व समज वाढत होती, त्यामुळे त्यांनी विविध धर्माचा अभ्यासही केला होता. या सगळ्याचा परिणाम म्हणून ते अन्य धर्मीयांबद्दल नेहमीच सहिष्णू असत. अभ्यासाअंती त्यांची सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर श्रद्धा निर्माण झाली होती. सर्वधर्मसमभाव म्हणजे हिंदू धर्म, इस्लाम तसेच ख्रिस्ती मताच्या समान आहे, अशा प्रकारचा सम-धर्म-समभावाचा अर्थ गांधीजींना अपेक्षित नव्हता. गांधीजींनी असे कधीही म्हटले नाही. कारण, ते तर सत्याचे आग्रही होते. गांधीजींच्या मते सर्वधर्मसमभावाचा अर्थ-सर्व पंथांविषयी तसेच सर्व धर्मामतांविषयी समान भाव, गुणांच्या तसेच दोषांच्या विवेचनामध्ये सर्वांसाठी समान कसोट्या लागू करणे, ज्या धर्मात जे गुण-दोष आहेत, त्यांना विवेकाने ओळखणे आणि त्याचा उल्लेख करणे. आजकाल काही लोकांकडून सर्व-धर्म-समभावाचा असा एक अर्थ केला जातो की, हिंदुत्वाला मानले काय, इस्लामला मानले काय किंवा ख्रिस्ती मताला मानले काय, फरक काय पडतो? गांधीजींनी कधीही असे म्हटले नाही. त्यांनी वारंवार असे म्हटले की, आपण काय मानता आणि कोणत्या मान्यतांच्या आधारे आचरण करता, याला अधिक महत्त्व आहे. कारण, त्यामुळेच ध्यानात येईल की, आपले जीवन धर्ममय आहे की अधर्ममय; पवित्र आहे की अपवित्र. सर्व धर्मांचा सर्वशक्तिमान ईश्वरावर विश्वास आहे, सर्व धर्म अनेक मूलभूत सिद्धांत समान मानतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने कोणताही धर्म अन्य धर्मापेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ नव्हता. त्यांचे ठाम प्रतिपादन होते की, जर सर्व धर्म समान असतील तर लोकांना या धर्मातून त्या धर्मात धर्मांतर करण्याची गरज काय? त्यांचे असे मत होते की, माझ्यासाठी विविध धर्म हे एका सुंदर बगीचातील विविध फुले आहेत किंवा एका विशाल वृक्षाच्या विविध शाखा आहेत. भारतीय समाजाचा एक हिस्सा ख्रिस्ती मताला मानतो, एक हिस्सा इस्लामला मानतो. राजधर्माला अनुसरून गांधीजींनी भारतीय प्रजेत पसरलेल्या दोन्ही पंथांचा सखोल अभ्यास केला. त्यामध्ये त्यांनी ख्रिस्ती मताविषयी तसेच ख्रिस्ती मिशनऱ्यांविषयी जे विचार व्यक्त केले आहेत, त्याचा गंभीर विचार करणे भाग आहे. गांधीजींचे म्हणणे होते की, हिंदूंना ख्रिस्ती मत समजत नाही आणि ते समजूही शकत नाहीत. गेली १५ शतके ख्रिस्ती मत ज्या प्रकारे पसरले आहे ते व्यवस्थित योजनाबद्ध रीतीने पुष्ट केलेल्या तर्क जाळ्याच्या स्वरूपातील ख्रिस्ती मत आहे. त्यात सांगितलेल्या प्रत्येक वाक्याचा एक विशिष्ट ख्रिस्ती संदर्भ असतो. त्याला अनुरूप त्याचा विशेष अर्थ आहे. तो संदर्भ न ओळखणारा भारतीय त्या वाक्याचा हिंदू दृष्टीने अर्थ लावतो आणि धोक्यात येतो. यासाठी गांधीजींनी म्हटले, "चांगल्या शिकलेल्या हिंदूंनादेखील ख्रिस्ती मताचे तर्कजाळे नीट समजत नाही." ख्रिस्ती पाद्री म्हणेल, येशु ईश्वराचा पुत्र आहे. हिंदू म्हणतील, बरोबर आहे-सर्वात ईश्वराचा अंश आहे. जगात मोठ्या संख्येने ख्रिस्ती आहेत. त्या पंथाचा प्रवर्तक महान विभूती असेल, त्यामुळे त्याला प्रभुपुत्र म्हणावयास हरकत नाही. पाद्री मोठी चांगली गोष्ट सांगतोय. परंतु, सत्य काय आहे? पाद्री जे सांगतोय त्याचा अर्थ आहे की, आजपर्यंत परमेश्वराने एकदाच आपल्या एकुलत्या एक पुत्रास पृथ्वीवर पाठवले आहे-तो येशू आहे. अन्य कोणीही महापुरुष-अवतार आदी ईश्वराचे अंश किवा पुत्र नाही. म्हणून राम, कृष्ण, शिव इ. खोटे आणि कपोलकल्पित देव आहेत. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांची पूजा करणे तर महापाप आहे, कारण स्त्रियांना आत्माच नसतो. गांधीजींनी बौद्धिक स्तरावर याचा तीव्र प्रतिवाद केला, कडाडून विरोध केला. त्यांनी म्हटले, "सामान्य हिंदूंना तुमच्या गोष्टीचा अर्थ नीट समजत नाही. त्यांचा बुद्धिभेद करू नका, माझ्याशी बोला."

 

गांधीजींनी सर्व ख्रिस्ती दाव्यांचा स्वीकार न करता असे म्हटले की, "आपल्या धर्मात आम्हाला पसंत असलेली गोष्ट आहे-ती म्हणजे ‘सर्मन ऑन द माउंट‘, त्याच्याशी मिळतेजुळते अन्य अंश आणि त्यांना अनुरूप कार्य. त्याहून भिन्न जी कार्ये चालतात ती सर्व भारतविरोधी तसेच मानवताविरोधी आहेत." वरीलप्रमाणे त्यांची भूमिका असल्यामुळे ख्रिश्चन मिशनरी कारवायांबद्दल स्पष्ट व आक्षेपार्ह मत त्यांनी नोंदवलेले आढळते. त्यांचे मत होते, "भारतातील ख्रिश्चनीकरण अराष्ट्रीयता व युरोपीकरणचा पर्याय झालेला आहे." (ख्रिश्चन मिशन, देअर प्लॅन्स इन इंडिया, नवजीवन पृ. ३२) प्रलोभन व आमिष दाखवून धर्मांतर करण्यास गांधीजींचा प्रखर विरोध होता. पाद्री मोट यांनी म्हटले की, "आमच्याद्वारे पैसा द्यायचा असेल तर तो कशारीतीने द्यावा, ज्यायोगे कोणतेही नुकसान होणार नाही व पैशाचा काही उपयोग होऊ शकेल?" यावर गांधीजीनी म्हटले, "नाही, जेव्हा पैसा दिला जातो, तेव्हा त्याने केवळ हानीच होते. आवश्यक असेल तर पैसा कमावला पाहिजे. माझे निश्चित मत असे आहे की, अमेरिका आणि इंग्लंडने मिशनरी संस्थांच्या निमित्ताने जेवढा पैसा दिला आहे, त्याने लाभाऐवजी हानीच अधिक झाली आहे." ते म्हणत, "तुम्ही हे सरळ सरळ समजून घ्या की, माझे हे अनुभवाच्या आधारे निश्चित मत आहे की, आध्यात्मिक विषयासाठी धनाचे यत्किंचितही महत्त्व नाही. म्हणून आध्यात्मिक विषयाच्या नावावर पैसे व सुविधा देणे बंद केले पाहिजे." ते पुढे म्हणतात, "दुसऱ्याच्या हृदयाला केवळ आध्यात्मिक शक्तीसंपन्न व्यक्तीच प्रभावित करू शकतो. मिशनरी केवळ गोड बोलू शकतात. ते आध्यात्मिक शक्तिने संपन्न नाहीत. मिशनऱ्यांद्वारे वाटला जाणारा पैसा म्हणजे धनपिशाच्च आहे." "धर्मांतरामुळे भारतात व जगातही प्रगतीचा मार्ग अवरुद्ध होत आहे," असे त्यांचे मत होते. आज भारतात आणि अन्य कुठेही धर्मांतराबद्दल जुळवून घेणे माझ्यासाठी असंभव आहे. हा एक असा गंभीर गुन्हा आहे, ज्यामुळे जगात शांतीच्या, प्रगतीच्या वाटेवर बाधा येईल. एखाद्या विशिष्ट पद्धतीचा आग्रह धरल्यामुळे किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायास मान्यता देण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यामुळे तीव्र संघर्ष उत्पन्न होऊ शकतो, त्याची परिणती भीषण रक्तपातात होऊ शकते. कोणताही ख्रिश्चन व्यक्ती हिंदू व्यक्तीचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर का करू इच्छितो? जर हिंदू सभ्य व धर्मपरायण व्यक्ती असेल तर ख्रिश्चन व्यक्ती त्यामुळे संतुष्ट का होत नाही? (हरिजन ३० जाने. १९३७) ख्रिश्चनांच्या शैक्षणिक व आरोग्य सेवेबद्दल गांधीजींना आदर होता. परंतु, सेवेच्या आड चाललेल्या धर्मांतराबद्दल त्यांचा तीव्र आक्षेप होता. १९३१ साली मिशनरी एफ. बी. मेयर यांनी गांधीजींना इंग्लंड व आयर्लंड सोसायटी परिषदेत विचारणा केली, "काय येशूच्या संदेशाविना आपणास जीवनामध्ये शांतता प्राप्त झाली आहे?" त्यावेळी त्यांनी होकारात्मक उत्तर दिले. "धर्म ही अगदीच खाजगी बाब आहे. मी कोणत्याही अन्य व्यक्तीस हिंदू वा पारशी करायचा प्रयत्न करणार नाही. तसे केले तर ते माझ्या श्रद्धेच्या विरुद्ध असेल. मी माझा व्यक्तिगत अनुभव व सहकारी म्हणून सांगू इच्छितो, जर तुम्ही माझ्या नजरेत नजर ठेवून माझ्याशी संवाद केलात तर कदाचित आपले काम जास्त वाढेल. तुमचा स्वार्थत्याग फार मोठा आहे, संघटनात्मक क्षमता वाखाणण्याजोगी आहे. आपण व्यक्ती म्हणून ही सज्जन आहात. तुमची सेवेची वृत्ती वाढो, अशी माझी इच्छा आहे. मी तुमच्या सोबतही काम करू इच्छितो. पण आपण भारतात या बदल्यात धर्मांतर करावे, याला माझा विरोध आहे." (गांधी समग्र खंड ४८.पृ.१२६) २२ मार्च, १९३५ ला एका मिशनऱ्याला दिलेल्या मुलाखतीत गांधीजींनी त्यांच्या धर्मप्रसाराबद्दल नापसंती व्यक्त करताना म्हटले की, "धर्मप्रसाराचा अनैतिक मार्ग म्हणजे अन्नात कालवलेले विष आहे. जे सर्व अन्नाला बाधित करते. त्यामुळे सर्व प्रकारच्या ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या मी विरोधात आहे." (गांधी समग्र खंड ६०, पृ. ३२३) विदेशी मिशनरी लोकांच्या भारतातील कामाबद्दल गांधीजींनी आपला विचार स्पष्ट केला आहे.

 

"जर मिशनरी लोकांनी आपली शैक्षणिक व आरोग्य सुविधेची कामे धर्मांतरासाठी वापरली तर माझा त्याला विरोध असेल. प्रत्येक राष्ट्र आपला धर्म दुसऱ्या राष्ट्रांच्या धर्माइतकाच पवित्र मानतो. अर्थात, भारताचा धर्म त्याच्या लोकांसाठी पुरेसा आहे. भारतात कसल्याही प्रकारच्या धर्मांतराची आवश्यकता नाही. मला माझे हे वाक्य आणखीन स्पष्ट करावेसे वाटते. कोणत्याही सेवाकार्याच्या आड धर्मप्रचाराचे काम हे समस्या निर्माण करणारे आहे. त्याचा येथील लोकांकडून निषेधच होईल. धर्म ही अगदीच खाजगी बाब आहे. त्याचा संबंध हृदयातील श्रद्धेशी आहे. एखादा डॉक्टर ख्रिश्चन आहे व त्याने माझा आजार औषधी देऊन बरा केला तर मी ख्रिश्चन होण्याची आवश्यकता काय आहे? मी त्या डॉक्टरचा रुग्ण असेन तर त्याने अशी अपेक्षा का करावी? त्याच्या आरोग्य सेवेमुळे मी विकारमुक्त झालो यापेक्षा आणखीन मोठे बक्षीस कोणते आहे? ख्रिश्चन शाळेत शिकलो म्हणून मी ख्रिश्चन धर्म का अंगीकार करावा? या गोष्टीमुळे आध्यात्मिक उन्नती होत नाही तर संघर्षाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक उन्नती संशयातीत असली पाहिजे. मी समजुतीने केलेल्या धर्मांतराविरोधी नाही. परंतु, या आधुनिक फसव्या पद्धतीच्या मी विरोधात आहे. आजकाल धर्मांतर हा सुद्धा एक धंदा झाला आहे. धर्मांतराचा दरडोई खर्चाचा अहवाल मी वाचला आहे व त्याच्या आधारावर ‘नवीन पीक’ घेण्यासाठी बजेट केले जाते, याला धंदा नाही तर अन्य काय म्हणणार? यामुळे आध्यात्मिक उन्नती कशी साधली जाणार? यावरून हे निश्चित होते की, भारतात धर्मांतराची प्रलोभनाद्वारे आवश्यकता नाही. जर आवश्यकता असेल तर ती आत्मशुद्धीची आहे. आत्मसाक्षात्काराची आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारामुळे ते होत नाही. जे भारताला धर्मांतरित करू इच्छितात त्यांच्यासाठी वैद्यराज तुम्ही स्वतःला बरे करा, असे म्हणणे जास्त संयुक्तिक होणार नाही का?"

 

गांधीजींच्या या भूमिकेमुळे एका ख्रिश्चन नर्सने गांधीजींना विचारले होते की, "धर्मांतराच्या कारवाया केल्यामुळे ख्रिश्चन मिशनरी लोकांना आपण भारतात येण्यावर बंदी घालू इच्छिता?" यावर गांधीजींचे उत्तर स्वयंस्पष्ट होते. "बंदी घालणारा मी कोण? जर माझ्या हातात सत्ता आली, जर माझ्याकडे कायदा करण्याची ताकद असेल तर सर्वप्रकारचा ख्रिश्चन धर्मप्रसार मी थांबवू इच्छितो. हिंदू परिवारात ख्रिस्ती मिशनरी लोकांच्या प्रवेशाचा अर्थ वेशभूषा, भाषा, खानपान, रितीरिवाज यांच्यामधील बदलाचा परिणाम म्हणून परिवाराचे विघटन होय." त्यांनी पुढे म्हटले आहे, "लोकांना चांगले जीवन जगण्याचे निमंत्रण आपण देत आहात, याचा अर्थ असा होत नाही की, आपण त्यांना ख्रिश्चन करावे. आपण बायबलमधील वचनांचा अर्थ असा काढत असाल तर मानव समाजाच्या एका विशाल अंशाला आपण पतित मानत आहात, जो ख्रिश्चन धर्म अवलंबायला तयार नाही. जर येशू ख्रिस्त आज परत पृथ्वीवर आला तर त्याच्या नावाने चालणाऱ्या अनेक गोष्टींना तो नाकारेल." ते पुढे म्हणतात, "केवळ लॉर्ड, लॉर्ड किंचाळून कोणी ख्रिस्ती होत नाही. खरा ख्रिस्ती तो आहे, जो परमेश्वराच्या इच्छेनुसार आचरण करतो. ज्या व्यक्तीने कधी प्रेषित येशूचे नावही ऐकले नसेल तोदेखील परमेश्वराच्या इच्छेनुसार आचरण करू शकतो." गांधीजींनी वारंवार म्हटले की, "माझ्या दृष्टीने हिंदुत्व, सत्य आणि धर्म ही परस्पर एक दुसऱ्याच्या जागी ठेवण्यास योग्य अशी पदे आहेत... जे वेद उपनिषदावर, परमेश्वरावर तसेच पुनर्जन्मावर श्रद्धा ठेवतात ते हिंदू होत. वेद धर्म प्रज्ञेचे सार आहे. वेद अनादी आहेत. कारण धर्म अनादी आहे. धर्म सृष्टीच्या आरंभापासून आहे. हिंदुत्व मानते की, ईश्वर कणाकणात व्याप्त आहे, सर्वव्यापी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसत्तेत त्या परमसत्तेचे तेज आहे. म्हणून सम्यक साधनेद्वारे त्या आंतरिक तेजाला जागृत करून परमज्ञानाची प्राप्ती संभव आहे. हिंदुत्व सर्व व्यापक आहे-सर्वसमावेशक आहे. जगात जेथे कोठे जे काही धर्माचे रूप असेल, ते समस्त धर्मरूप हिंदू धर्मात विद्यमान आहे. जे धर्मरूप हिंदुत्वात नाही, ते जगात अन्य कोठेही नाही. हिंदुत्वच धर्माचा विश्वस्तरीय निकष आहे, कसोटी आहे. म्हणूनच ख्रिस्ती मताला हिंदुत्वाकडून शिक्षण घेऊन धर्ममय व्हावे लागेल; अधर्मापासून, पापापासून मुक्त व्हावे लागेल. ख्रिस्ती मताचे हे कर्तव्य आहे."

- शरद ढोले

@@AUTHORINFO_V1@@