‘गांधी’ नावाचे मिथक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019   
Total Views |


गांधीवाद म्हणजे काय? गांधींची विचारप्रणाली नेमकी कोणती होती? गांधीवाद हा मार्क्सवाद वा इतर समूहवादांहून भिन्न कसा? गांधीवादाने कोणती सकारात्मक ऊर्जा जागवण्याचे निश्चित केले? असे अनेक प्रश्न. त्याचबरोबर राष्ट्रवाद, युद्ध वगैरे मुद्देही आपल्या अवतीभवती असतात. अशा सर्वच विषयांचा सदर लेखात विचार केला आहे.

 

विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा आक्रमक राष्ट्रवादाने व उत्तरार्ध हा परिवर्तनवादी विचारसरणीने प्रभावित केला होता. युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती घडली व त्यापाठोपाठ औद्योगिक क्रांती घडली. त्यामुळे प्रबळ झालेल्या युरोपीयन देशांनी जगभरात वेगवेगळे देश पादाक्रांत करून आपापली साम्राज्ये स्थापन केली. त्यात इंग्लंडबरोबरच स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, नेदरलँड आदी देशांचाही समावेश होता. या सर्व देशांच्या स्पर्धेत इंग्लंड अधिक यशस्वी ठरले व एक काळ असा होता की, इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, अशी प्रौढी इंग्रज मारीत होते. परंतु, युरोपीयन देशांच्या याच साम्राज्य लालसेतून पहिले व दुसरे महायुद्ध लढले गेले. दुसरे महायुद्ध लढत असताना हे युद्ध हे लोकशाही दोस्त राष्ट्रे विरुद्ध नाझीवाद व फॅसिस्ट प्रवृत्ती यांच्या विरोधातील आहे, असा दावा दोस्त राष्ट्रे करीत होती. हा दावा अर्धसत्य होता. कारण, दोस्त राष्ट्रांतील अमेरिकेचा अपवाद वगळता इतर देश एकतर साम्राज्यवादी होते किंवा हुकूमशाही मानणारे होते. परंतु, दुसर्‍या महायुद्धानंतर एक एक देश स्वतंत्र होऊ लागला. परंतु, ही प्रक्रिया घडत असतानाच मार्क्सवादावर आधारित क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव जगभरातील विचारवंतांवर पडला. रशिया, चीन, क्युबा या देशात या तत्त्वज्ञानातून क्रांती झाली व विसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा लोकशाही-उदारमतवादी देश व साम्यवादी देश यांच्यातील शीतयुद्धाचा होता. आक्रमक राष्ट्रवाद व शीतयुद्ध यांनी प्रभावित झालेल्या या शतकात गांधीवादाने एक नवी वाट निर्माण केली. या वाटेचा प्रभाव अनेक देशांतील आंदोलने व नेते यांच्यावर तर पडलाच, पण याच तत्त्वज्ञानातून शांततामय सहजीवनाचे स्वप्न साकारता येऊ शकते, या विचारातून त्यावर विचारमंथनही सुरू झाले.

गेल्या शतकातील विचारमंथनात गांधीवादाचे मूलभूत वेगळेपण काय आहे, हे पाहिले पाहिजे. राष्ट्रवाद काय किंवा मार्क्सवाद काय, या सामूहिक मानसिकतेवर आधारित संकल्पना आहेत. त्यात व्यक्तीला समूहाचा एक भाग या पलीकडे किंमत नाही. त्याच्याकडे समूहाला उपयोगी पडणारे एक हत्यार याच भावनेतून पाहिले जाते. सामूहिक हितासाठी व्यक्तीने आपली सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवली पाहिजे, हे गृहित धरले जाते. या दोन्हीची प्रतिक्रिया म्हणून जो व्यक्तिवाद निर्माण झाला, तो अराजकवादी होता. समूह भावनांचा प्रभाव नाकारताना सर्वच प्रकारच्या व्यवस्थांना तो नाकारत होता. पण व्यवस्थांशिवाय समाजजीवन चालणेच अशक्य. या पार्श्वभूमीवर व्यक्तीच्या सद्सद्विवेकबुद्धीच्या आधारावरच समूह जीवनाची रचना करू पाहणारा गांधीवाद यापेक्षा गुणात्मकरित्या वेगळा आहे. राष्ट्राभिमान जागृत करून त्या आधारे समूहभाव निर्माण करणार्‍या उजव्या शक्ती असोत की, परिवर्तनाची हाक देऊन उभ्या राहिलेल्या परिवर्तनवादी शक्ती असोत, या दोन्ही शक्ती किती हिंसक होऊ शकतात, याची गेल्या शतकातील असंख्य उदाहरणे देता येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर गांधीवादाचे वेगळेपण काय आहे, हे पाहिले पाहिजे.

उदारमतवादावर आधारित लोकशाही व्यवस्था असो की कम्युनिस्ट, समाजवादी राजवट असो, या दोन्ही संकल्पना या व्यवस्थाकेंद्रित आहेत. एका संकल्पनेत अधिकाराचे विकेंद्रीकरण करून हुकूमशाही टाळणे यासाठी त्याआधारे सत्ता संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, तर दुसर्‍या ठिकाणी व्यक्तीच्या आर्थिक लोभवृत्तीवर नियंत्रण आणून समाजातील शोषण कमी करण्याचा प्रयत्न आहे. परंतु, या दोन्ही व्यवस्थेत व्यक्तीला नियम व कायद्याच्या चौकटीत बसवून नियंत्रित करण्याचा जो हेतू आहे, तो साध्य करण्यासाठी व्यक्तीमध्ये परिवर्तन करण्याची योजना नाही. व्यवस्था कोणतीही असली तरी माणसातील विकारबुद्धी जोवर कायम आहे, तोवर शोषणाची प्रवृत्ती थांबणार नाही. शोषणाचे स्वरूप बदलेल, शोषण करणार्‍या व्यक्ती बदलतील, पण शोषण कायम राहील. व्यक्ती परिवर्तनासाठी जैन तत्त्वज्ञानातील जे मूल्य पंचक आहे, त्याचा म. गांधी आग्रह धरत. किंबहुना अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह या मूल्य पंचकात गांधींच्या तत्त्वज्ञानाचा सारांश सांगता येईल. यापैकी प्रत्येक मूल्य हे महत्त्वपूर्ण आहे. आपण आपल्या मतांसाठी आपल्याशी आग्रही असले पाहिजे, पण ते दुसर्‍यावर लादता कामा नये, सत्याचा शोध हीच आपली जीवनप्रेरणा असली पाहिजे, दुसर्‍याच्या कोणत्याही गोष्टीवर हक्क सांगता कामा नये, उपभोगासाठी कितीही साधने उपलब्ध असली तरी त्यांचा मर्यादेत उपयोग केला पाहिजे व आवश्यकतेपेक्षा अधिक संग्रह करता कामा नये. प्रत्येक व्यक्ती या मूल्यपंचकानुसार वागू लागली तर जगातील शोषणाचे, संघर्षाचे व त्यातून होणार्‍या हिंसेचे कारणच दूर होईल, असे गांधीवाद सांगतो. या आत्मशुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जी नैतिक ऊर्जा निर्माण होत असते तीच मानवी जीवन उन्नत करणारी समूहभावना सहजीवन सुसंवाद व अर्थपूर्ण करू शकते.

जगाच्या केवळ शांततामय नव्हे तर पर्यावरणापासून समन्वयपूर्ण सामाजिक जीवनाची गुरुकिल्ली गांधीवादात आहे. गांधीवाद जग सुधारण्याची घोषणा करीत नाही तर व्यक्ती परिवर्तनाची कल्पना मांडतो व त्यातून जग बदलण्याची हमी देतो. गांधीवादातून निर्माण होणारा समूह भाव हा अत्याचारी, हिंसक, शोषक बनूच शकत नाही. अशा आधीच अस्तित्वात असलेल्या अत्याचारी, हिंसक, शोषक समूहवादाला आत्मकेंद्रित व्यक्तिवाद हे उत्तर असू शकत नाही. यांचे कारण म्हणजे मानवी संस्कृतीच समूहभावाने उत्क्रांत झाली आहे. समाजाशिवाय व्यक्तींचे आयुष्य हे अर्थशून्य आहे. गांधीवाद विकाराधिष्ठित समूहवाद नाकारतो. ज्यावेळी व्यक्तीच्या मनातील विकारांची वादळे दूर होतात, तेव्हा त्याचबरोबर त्याला आत्मसामर्थ्याचा प्रत्यय येऊ लागतो. मनातील अंधार दूर होऊन आत्मप्रकाशाची ज्योत प्रज्वलित होते, तो दुसर्‍याचा उपदेश राहत नाही, तर आत्मप्रचितीचा स्वर होतो. अशी व्यक्ती एकटी असली तरी तिच्यात जगाचे आव्हान स्वीकारण्याचे सामर्थ्य येते. ते जगाच्या प्रेमातून येते, व्यक्तिवादासारखे जगाच्या तुच्छतेतून नाही. जगाच्या अपूर्णतेकडे तो अधिक सहानुभूतीने पाहू लागतो. या स्तरावर येण्याकरिता आपल्याला किती कष्ट घ्यावे लागले आहेत, याची त्याला कल्पना असल्याने तो जगाकडे अधिक सहानुभूतीने पाहतो. आज परिस्थिती कितीही विपरित असली तरी ती उद्या बदलू शकते याबद्दलचा त्याचा आशावाद कमी होत नाही. उलट त्यामुळे त्याच्यातील परिवर्तनाची ऊर्जा अधिक तेजस्वी होते.

परंतु, जेव्हा एखाद्या समूहाच्या विकाराधिष्ठीततेमुळे माणसाच्या समूह जीवनाचे अस्तित्वच धोक्यात येते, तेव्हा काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर जटिल आहे. हा प्रश्न जसा हिटलरच्या रूपाने दुसर्‍या महायुद्धात उभा राहिला होता, तसाच महाभारत युद्धाच्या काळीही उभा राहिला होता. युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी अर्जुनाने व युद्धानंतर युधिष्ठिराने युद्धाच्या नैतिकतेसंदर्भात, उपयुक्ततेसंदर्भात, त्यांच्या परिणामासंदर्भात अनेक मूलगामी प्रश्न उत्पन्न केले व त्यांना गीतेच्या रूपाने कृष्णाने व शांतीपर्वाच्या रूपाने भीष्माने उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. फाळणीसाठी मुस्लीम लीगने हिंसक आंदोलन केले, तेव्हाही गांधीवादाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. परंतु, त्या मर्यादा गांधीवादाच्या नसून मानवी आकलनशक्तीच्या मर्यादेच्या आहेत, जिला निखळपणे मानवी संस्कृती म्हणून ओळखता येईल, अशा संस्कृतीचा विकास सुरू होऊन दहा हजार वर्षे झाली. ती संस्कृती अटळपणे विशवसंस्कृतीकडे वाटचाल करीत आहे.

इतिहासाच्या कालपटावर मानवी विकार आणि विचारांचा संघर्ष सातत्याने झाला आहे व त्यात मानवी विचारबुद्धीने विकारबुद्धीवर मात केली आहे. तशी ती केली नसती तर आज जे मानवी समाजाचे अस्तित्व आपण अनुभवतो
, ते अनुभवायला शिल्लकच राहिलो नसतो. गांधीवाद हे सनातन सत्यच सांगत आहे. आजच्या संघर्षमय जीवनात ते कदाचित स्वप्न वाटेल. मानवाने जाणीवपूर्वक केलेल्या पहिल्या युद्धापासून कुणा ना कुणा अर्जुनाला अशा युद्धाच्या अपरिहार्यतेविषयी, नैतिकतेविषयी, उपयुक्ततेविषयी प्रश्न पडले असतीलच. पण आज ना उद्या या संघर्षातून जग मुक्त होऊ शकेल, असे स्वप्न गांधीमार्ग देतो आणि नवा आशावाद जागवतो. आत्मशक्तीच्या बळावर लोक जागरण, लोक संघटन, लोक चळवळ शक्य आहे, असे उदाहरण म. गांधींनी आपल्या जीवनातून जगापुढे ठेवले आहे. आजच्या संघर्षातून आज ना उद्या शांततामय व अर्थपूर्ण सहजीवन शक्य होणार आहे, हे स्वप्न, हा विश्वासच कुरुक्षेत्रापासून पुलवामापर्यंतच्या संघर्षाला अर्थ निर्माण करीत असतो व असा प्रत्येक संघर्ष गांधीवादी मिथकाची अपरिहार्यता सिद्ध करत असतो.



@@AUTHORINFO_V1@@