गांधी आजच्या संदर्भात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |



भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापुरतेच महात्मा गांधी प्रासंगिक होते का? गांधीजींच्या विचारांनुसार वागणे त्यानंतर शक्यच नव्हते का? महात्मा गांधी स्वातंत्र्यपूर्व काळात तर प्रमुख होतेच. पण, आजच्या संदर्भात त्यांचे विचार उपयुक्त आहेत का, असे अनेक प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले जातात. तेव्हा, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या लेखात प्रयत्न केला आहे.


स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या माझ्या पिढीचे आणि इतरही बहुसंख्य लोकांचे गांधींविषयीचे आकलन अपुरे आहे. गांधी आम्हाला तुकड्यातुकड्याने माहिती आहेत. राजकीय नेत्यांच्या भाषणांप्रमाणे गांधीही आम्ही तोंडी लावण्यापुरते आणि सोयीने वापरतो. आम्ही फारसे गांधींविषयी वाचलेले नाही आणि ज्यांनी वाचलेले आहे
, त्यातल्या फारच थोड्यांचा गांधीया विषयाचा अभ्यास आहे. हे अभ्यासकही बहुधा गांधींची मांडणी त्यांचे पूर्वग्रह व विचारसरणीच्या चष्म्यातून त्यांना सोयीची अशीच करतात.


सरकारी कचेर्‍यांच्या भिंतींवर असलेले फोटो, पाचशेच्या नोटांवरची प्रतिमा, स्वच्छता सप्ताह किंवा गांधी जयंतीच्या निमित्ताने हातात काठी घेतलेली पाठमोरी रेखाकृती यातून महात्म्याचे दर्शन तर नित्य घडत असते. परंतु, त्याच्या जगण्याचे आणि विचारांचे समग्रतेने आकलन करण्याची संधी फारशी मिळत नाही. तेवढा वेळही आम्हाला नसतो आणि ते महत्त्वाचे आहे, असे आम्हाला कधी वाटतही नाही. तरीही तुमच्या-माझ्या आळसाच्या पलीकडे जाऊन गांधी आजच्या संदर्भात का महत्त्वाचे आहेत, याची मांडणी करणे तसे धाडसाचे आहे. माझे आकलनही तुमच्यासारखेच अपुरे असल्यामुळे त्याची स्वाभाविक मर्यादा या लेखालाही आहे, हे नमूद करणे गरजेचे आहे.

आपल्यापैकी बहुतेकांना गांधी ठाऊक आहेत, ते इतिहासातल्या धड्यांमधून आणि अधूनमधून कानांवर पडणार्‍या काही वचनांमधून.

दे दी हमें आजादी, बिना खड्ग, बिना ढाल।

साबरमती के संत तुने कर दिया कमाल॥

उचललेस तू मीठ मूठभर,

साम्राज्याचा खचला पाया

चरखा चला चला के, लेंगे स्वराज लेंगे।

बी द चेंज, यू वॉण्ट टू सी...

या सर्वांतून गांधीनावाचे एक मिथक तयार झाले. त्यामुळे गांधीसमजून घेणे अधिकाधिक अवघड होत गेले.

मोहनदास करमचंद गांधी हा एक जगावेगळा माणूस आहे. त्याच्या जगण्याचे आणि विचारांचे अनेक पैलू आहेत. सत्याचे प्रयोगमधून येणारी त्यांची आत्मकथा विलक्षण भासली, तरी इतके प्रांजळ आणि पारदर्शी कथन करण्याची परंपरा आपल्याकडे रुजलेली नाही. गुजरातेतल्या पारंपरिक वैष्णव कुटुंबातला जन्म, इंग्लंडमध्ये वकिलीच्या शिक्षणानंतर दक्षिण आफ्रिकेत जाणे, वंशभेदाच्या आलेल्या तीव्र अनुभवानंतर तिथल्या भारतीयांचे त्यांनी केलेले संघटन, भारतात परतल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पश्चात त्यांच्याकडे आलेली काँग्रेसची सूत्रे, चंपारण्यच्या सत्याग्रहापासून ते सविनय कायदेभंगापर्यंत स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होण्याची सामान्यांना त्यांनी उपलब्ध करून दिलेली संधी, डॉ. आंबेडकर व सुभाषचंद्रांसारख्या नेत्यांशी त्यांचे झालेले वाद व मतभेद, ’चले जावचे आंदोलन, फाळणीसंबंधीच्या त्यांच्या भूमिका या सर्वांतून त्यांचे एक व्यक्तिचित्र उभे राहते.

त्याचबरोबर चरखा व सूतकताईतून गांधींनी दाखवलेला स्वदेशीचा मार्ग, ’हिंद स्वराजबरोबरच स्वयंपूर्ण ग्रामविकासाची केलेली मांडणी, ’नई तालीममधून शिक्षणासंबंधी त्यांनी मांडलेले मॉडेल, त्यांची रामराज्याची संकल्पना, त्यांचा अहिंसा व सत्याचा आग्रह, पर्यावरणासंबंधीचे विचार यातून त्यांचे एक विचारचित्रही उभे राहते.

माझे जीवन हाच माझा संदेश आहे’, असे म्हणणार्‍या गांधींच्या या संदेशाचे आकलन करणे वाटते तितके सोपे नाही. रिचर्ड अ‍ॅन्टेनबरोंचा गांधींवरचा चित्रपट असो की लगे रहो मुन्नाभाईत्यातून गांधीनावाच्या व्यक्तीचे व त्याच्या विचाराचे ओझरते आणि आभासी दर्शन होते. मुन्नाभाईनंतर रस्तोरस्ती झालेले गांधीगिरीचे प्रयोग मुख्यतः प्रसिद्धीसाठीच होते आणि त्यांचा मागमूसही आता दिसत नाही.

या चित्रपटांमधून गांधी विचारांचे सुलभीकरण झालेच, पण दुर्दैवाने गांधीविचारांची समग्र मांडणी आणि बदलत्या काळानुसार त्याचे नवे संदर्भ सकसपणे मांडण्याचे प्रयत्न विविध विद्यापीठांमध्ये उभ्या राहिलेल्या गांधी अभ्यास केंद्रांमधूनही फारसे झाले नाहीत. काही ठिकाणी तसे झाले असले, तरी ते सर्वसामान्यांपर्यंत-विशेषतः तरुणांपर्यंत पोचवण्याचे विशेष प्रयत्न झाले नाहीत.

गांधींची आणि त्यांच्या विचारांची चर्चा मुख्यतः होते, ती गांधी जयंतीच्या आसपास काही कार्यक्रमांमधून वा वर्तमानपत्रे-मासिकांमधल्या लेखांतून. त्यांना स्वाभाविकच वेळेची आणि शब्दांची मर्यादा असते. त्यामुळे वरवरच्या मांडणीशिवाय त्यातून फार काही हाती लागत नाही. गांधींच्या दीडशेव्या जन्मशताब्दीच्या निमित्तानेही काहीसे असेच होण्याचा आणि गांधी पुन्हा विस्मरणात जाण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन गांधींचे संदर्भ पुन्हा नव्या पिढीच्या जगण्याशी जोडण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.

गांधी उद्यासाठीहे दिलीप कुलकर्णींचे पुस्तक नुकतेच वाचनात आले. आजच्या समस्यांवरचा उतारा गांधीविचारच आहे, यावर त्यांची ठाम श्रद्धा आहे. त्यातून ते म्हणतात, “गांधी केवळ आजच कालोचित आहेत असे नाही, तर ते नित्य-कालोचित (एव्हर-रिलेव्हंट) आहेत अन् केवळ भारतापुरते स्थलोचित आहेत असे नाही, तर सर्व-स्थलोचित आहेत.त्यातून साकारलेल्या या पुस्तकात विकासाचे गांधी प्रतिमानलोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न ते करतात. कोणत्याही पुस्तकाला असतात, तशाच या पुस्तकालाही गांधींवरच्या भक्तिभावाची मर्यादा आहे. तरीही गांधींचे वेगवेगळे पैलू आणि विचारसृष्टी समजून घेण्यासाठी ते उपयोगी आहे.

गांधींच्या राजकारण आणि समाजकारणाला स्वातंत्र्यपूर्व काळाच्या व तत्कालीन परिस्थितीच्या मर्यादा होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्याही काही मर्यादा होत्या. त्या लक्षात घेऊनही विविध विषयांना स्पर्श करणारे गांधींचे मूलगामी चिंतन आणि त्यांचा सार्वत्रिक, सार्वकालिक प्रभाव विचारात घ्यावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे हा प्रभाव एखाद्या संप्रेरकासारखा व्यक्ती आणि समूहांना कृतीच्या दिशेने नेणारा आहे. मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर), नेल्सन मंडेला, दलाई लामा, आंग सान स्यू की यांच्यापासून ते बराक ओबामांपर्यंत आपल्याला तो ठळकपणे दिसतो. इतकेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामानविषयक कृती परिषदेत संपूर्ण जगाला ठणकावणार्‍या ग्रेटा थनबर्ग या किशोरवयीन मुलीच्या निर्धारातही गांधीविचारांचा ठसा आपल्याला दिसतो. तुम्ही माझे बालपण आणि स्वप्न चोरली आहेत आणि पोकळ शब्दांनी हे नुकसान भरून येणारे नाही. ही कृतीची वेळ आहे,’ असे ती जगाला सांगते, तेव्हा मला त्यात गांधीविचारांची झाक दिसते. ही पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवू शकेल, मात्र प्रत्येकाची हाव पुरवायला ती सक्षम नाही,’ हे गांधींनीच आपल्याला सांगितले होते.

अहिंसा आणि सत्याग्रह ही दोन तत्त्वं गांधी विचारांचा गाभा आहेत. देशाला स्वातंत्र्य केवळ गांधीप्रणित सत्याग्रह आणि अहिंसक लढ्यामुळे मिळाले, हा दावा अतिशयोक्त आणि दिशाभूल करणारा आहे. मात्र, सामान्य माणसाला स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याची संधी आणि त्याला झेपेल असा कार्यक्रम गांधींच्या पुढाकारानेच मिळाला, हे कोणाला नाकारता येत नाही. दांडी यात्रा हे त्याचे ठळक उदाहरण आहे.

गांधींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान हा जसा अनेकांच्या टीकेचा विषय झाला आहे, तसाच तो बहुसंख्यांच्या आकर्षणाचाही विषय आहे. त्याविषयी मोठी मतमतांतरेही आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात अहिंसागांधींच्याही आधी अनेकांनी सांगितली आहे. मात्र, सार्वजनिक जीवनात-विशेषतः राजकारणात अहिंसेच्या तत्त्वाचा वापर आधुनिक काळात कोणी केला असेल तर तो गांधींनी. परकीय ब्रिटिश राजवटीविरुद्ध या शस्त्राचा त्यांनी कौशल्याने वापर केला. त्यामुळेच वर म्हटल्याप्रमाणे दे दी हमे आजादी बिना खड्ग, बिना ढालहा समज मोठ्या प्रमाणावर प्रस्तुत झाला. पण देशाला स्वातंत्र्य मिळतेवेळी झालेल्या फाळणीत लाखोंची हत्या झाली, या वास्तवाकडेही आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. शिवाय, व्यक्तिगत जीवनातील अहिंसेचे पालन आणि राष्ट्रजीवनात अहिंसेचे तत्त्व अंगिकारताना येणार्‍या मर्यादा या द्वंद्वाचा विचारही आपल्याला करावा लागतो.

अहिंसेचा मुद्दा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणापुरता मर्यादित नाही. जगण्याच्या अनेक पातळ्यांवर तो आपल्याला सामोरा येतो. जिथे सत्ता आणि संघर्ष आहे, तिथे हिंसा येते. रोजच्या जगण्यात आणि कौटुंबिक नात्यांमध्ये, सामान्य व्यवहारांमध्येही हिंसा शिरकाव करू शकते. ती टाळायची तर संयमाची आणि सामंजस्याची वाट चोखाळावी लागते. हे लक्षात घेऊन गांधींनी व्यष्टीपासून समष्टीपर्यंत सर्वत्र अहिंसेचा मार्ग सुचवला आहे. हिंसा ही लोकांमध्ये नाही, तर ती शोषण करणार्‍या यंत्रणांमध्ये-व्यवस्थांमध्ये (सिस्टिममध्ये) आहे, असे गांधींचे म्हणणे आहे. त्यामुळे गांधींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत नीट न्यायचे असेल, तर त्याची पक्की वैचारिक मांडणी करण्याबरोबरच ते सोप्या भाषेत समजावून सांगणेही गरजेचे आहे.

लोकशाही मार्गाने अहिंसक सत्याग्रहाचे अभिनव साधन गांधींनी भारतीयांच्या हातात दिले. स्वातंत्र्यानंतर सत्ताधारी बदलले, तरी अनेक ठिकाणी विकासाचे प्रश्न तसेच राहिले. विकासाच्या नव्या प्रकल्पांमधूनही पर्यावरणाच्या, पुनर्वसनाच्या समस्या उभ्या राहिल्या. त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणार्‍या संस्था-संघटनांना प्रसंगी स्वदेशी राज्यकर्त्यांविरोधात सत्याग्रहाधारित आंदोलनांचाच मार्ग स्वीकारावा लागला. सुंदरलाल बहुगुणांचे चिपकोआंदोलन, मेधा पाटकरांच्या नर्मदाआंदोलनापासून ते अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शनपर्यंत असंख्य उदाहरणे यासंदर्भात देता येतील. पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो शहरांपासून ते तहसीलदार कचेर्‍यांसमोरील धरणे आंदोलनापर्यंत याच्या असंख्य लहान-मोठ्या आवृत्त्या आपण नेहमी पाहत असतो. हा गांधींचाच वारसा आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.

गांधींचा वारसा राजकारणापुरता किंवा अशा आंदोलनांपुरता मर्यादित नाही. गांधींचे तसे सामान्य वाटणारे व्यक्तिमत्त्व त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांना सामाजिक कामाची प्रेरणा देणारे होते. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस राजकीय पक्ष म्हणून विसर्जित करावी आणि तिचे सेवाभावी संस्थेमध्ये रुपांतर करावे, ही गांधींची सूचना दुर्लक्षली गेली. परंतु, त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन हजारो कार्यकर्ते दुर्गम खेड्यांमध्ये, जंगलवस्त्यांमध्ये गेले आणि असंख्य प्रकारची विधायक कामे त्यांनी उभी केली. वनवासी क्षेत्रातले ठक्कर बाप्पांचे काम, विनोबांची भूदान चळवळ, बाबा आमटेंचे महारोग्यांच्या सेवेचे काम अशी असंख्य उदाहरणे यासंदर्भात सांगता येतील. सर्वोदयाचा आणि गरिबातल्या गरीब माणसाचा विकासहा अंत्योदयाचा विचार या सर्वांच्या केंद्रस्थानी होता. गडचिरोलीत डॉ. अभय बंग यांनी उभ्या केलेल्या कामामागे गांधी-विनोबांची प्रेरणा आहेच, पण विधायक कार्यांमध्ये स्वतःला झोकून देणार्‍या असंख्य युवा कार्यकर्त्यांमध्येही प्रेरणेचा हा धागा कायम राहिलेला आपल्याला दिसतो.

गांधींची नई तालीमसध्या मागे पडली असली, तरी श्रमसंस्कारांना महत्त्व देणारी, नव्या कौशल्यांची रुजवात करणारी आणि खुला विचार करायला शिकवणारी ही पद्धती अनौपचारिक शिक्षणाच्या प्रयोगांमधून पुढे येताना दिसते. अनुताई वाघांच्या कोसबाडच्या शाळेच्या वाटेवरून पुढे जाणारे रमेश पानसेंचे प्रयोग, पुण्यातली अक्षरनंदन शाळा आणि जिल्हा परिषदेच्या काही जीवनशिक्षण शाळांमधूनही त्याचे नवे अंकुर फुटताना आपल्याला दिसतात.

गांधींची ग्रामस्वराज्याची कल्पनाही आजच्या संदर्भात नव्याने मांडण्याची गरज आहे. भारत खेड्यांचा देश आहे, हे चित्र वाढत्या शहरीकरणात आता मागे पडत आहे. विकासाच्या मार्गावर धावताना हा बदल अपरिहार्य वाटत असला, तरी गावखेड्यांमध्ये राहणार्‍या लक्षावधी भारतीयांचे जीवन सुसह्य, सुखकर आणि समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. ते करायचे तर पंचायत राज व्यवस्थेच्या जोडीला स्वयंपूर्ण ग्रामसमूहांची रचना आपल्याला उभी करावी लागेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रतीक चरखाहे केवळ त्यासाठी पुरेसे नाही, तर शेती सक्षम करण्याबरोबरच शेतीला पूरक उद्योग-व्यवसायांची मोठी साखळी उभी करण्याशिवाय गत्यंतर नाही. गांधींनी दाखवलेला मार्गच त्यासाठी उपयोगी पडू शकतो.

गांधीनावाचे व्यक्तित्त्व आणि विचार सहजपणे असा कोणाच्या चिमटीत सापडणार नाही. त्यामुळे गांधींचे मला झालेले हे आकलन अपुरे असू शकते. मुन्नाभाईच्या डोक्यात झालेल्या केमिकल लोच्याप्रमाणे तो कदाचित भ्रमही असू शकतो. पण गांधी मला आजही रिलेव्हन्टवाटतात. याचे कारण गांधी विचार काळानुसार विकसित होत जाणारा आहे.

गांधींचे अनुयायी आणि संपूर्ण क्रांतीचे प्रणेते जयप्रकाश नारायण यासंदर्भात म्हणतात, ’गांधी के प्रयोगों में आखिरी बात जैसी कोई स्थिति नहीं होती है। ऐसा इसलिए है कि गांधी के विचार-तत्व परिस्थिति के साथ-साथ विकसित होते चलते हैं, न कि जड़ सिद्धांतों से बंधे, अटके व ठिठके होते हैं। गांधी खुद भी अपने निरंतर विकसित होते अनुभवों के आलोक में अपनी अवधारणाएं सुधारते, विकसित करते और समृद्ध करते मिलते हैं।


विविधांगी व्यक्तिचित्र

 

मोहनदास करमचंद गांधी हा एक जगावेगळा माणूस आहे. त्याच्या जगण्याचे आणि विचारांचे अनेक पैलू आहेत. ’सत्याचे प्रयोग’मधून येणारी त्यांची आत्मकथा विलक्षण भासली, तरी इतके प्रांजळ आणि पारदर्शी कथन करण्याची परंपरा आपल्याकडे रुजलेली नाही. गुजरातेतल्या पारंपरिक वैष्णव कुटुंबातला जन्म, इंग्लंडमध्ये वकिलीच्या शिक्षणानंतर दक्षिण आफ्रिकेत जाणे, वंशभेदाच्या आलेल्या तीव्र अनुभवानंतर तेथील भारतीयांचे त्यांनी केलेले संघटन, भारतात परतल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पश्चात त्यांच्याकडे आलेली काँग्रेसची सूत्रे, चंपारण्यच्या सत्याग्रहापासून ते सविनय कायदेभंगापर्यंत स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होण्याची सामान्यांना त्यांनी उपलब्ध करून दिलेली संधी, डॉ. आंबेडकर व सुभाषचंद्रांसारख्या नेत्यांशी त्यांचे झालेले वाद व मतभेद, ’चले जाव’चे आंदोलन, फाळणीसंबंधीच्या त्यांच्या भूमिका या सर्वांतून त्यांचे एक व्यक्तिचित्र उभे राहते.

 

‘अहिंसे’ला सोप्या शब्दांची गरज

अहिंसेचा मुद्दा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणापुरता मर्यादित नाही. जगण्याच्या अनेक पातळ्यांवर तो आपल्याला सामोरा येतो. जिथे सत्ता आणि संघर्ष आहे, तिथे हिंसा येते. रोजच्या जगण्यात आणि कौटुंबिक नात्यांमध्ये, सामान्य व्यवहारांमध्येही हिंसा शिरकाव करू शकते. ती टाळायची तर संयमाची आणि सामंजस्याची वाट चोखाळावी लागते. हे लक्षात घेऊन गांधींनी व्यष्टीपासून समष्टीपर्यंत सर्वत्र अहिंसेचा मार्ग सुचवला आहे. हिंसा ही लोकांमध्ये नाही, तर ती शोषण करणार्‍या यंत्रणांमध्ये-व्यवस्थांमध्ये (सिस्टिममध्ये) आहे, असे गांधींचे म्हणणे आहे. त्यामुळे गांधींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत नीट न्यायचे असेल, तर त्याची पक्की वैचारिक मांडणी करण्याबरोबरच ते सोप्या भाषेत समजावून सांगणेही गरजेचे आहे.

 

गांधीविचारांची प्रेरणा

गांधीजींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन हजारो कार्यकर्ते दुर्गम खेड्यांमध्ये, जंगलवस्त्यांमध्ये गेले आणि असंख्य प्रकारची विधायक कामे त्यांनी उभी केली. वनवासी क्षेत्रातले ठक्कर बाप्पांचे काम, विनोबांची भूदान चळवळ, बाबा आमटेंचे महारोग्यांच्या सेवेचे काम अशी असंख्य उदाहरणे यासंदर्भात सांगता येतील. सर्वोदयाचा आणि ’गरिबातल्या गरीब माणसाचा विकासहा अंत्योदयाचा विचार या सर्वांच्या केंद्रस्थानी होता. गडचिरोलीत डॉ. अभय बंग यांनी उभ्या केलेल्या कामामागे गांधी-विनोबांची प्रेरणा आहेच, पण विधायक कार्यांमध्ये स्वतःला झोकून देणार्‍या असंख्य युवा कार्यकर्त्यांमध्येही प्रेरणेचा हा धागा कायम राहिलेला आपल्याला दिसतो.


डॉ. संजय तांबट

९८८१०९८१०७


(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत.)

 

@@AUTHORINFO_V1@@