संमेलनाच्या बाजूने वाढते जनमत; साहित्य, कला, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर एकवटले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई/पुणे (विशेष प्रतिनिधी) : यवतमाळ येथे होत असलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणवादाचे गालबोट लागले आहे. तसेच, त्यानंतर नेहमीप्रमाणे सार्‍या वादाची दिशा ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी, असहिष्णुता व ठराविक विचारधारांचा दबाव वगैरेंकडे वळवण्यात आली असून त्यामुळे संमेलनावर बहिष्कार घातला पाहिजे, असेही दबावतंत्र राबवले जात आहे. मात्र, या दबावतंत्राविरोधात एकत्र येत मंगळवारी साहित्य, कला, संगीत, पत्रकारिता, संशोधन, शिक्षण आदी क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रक प्रसिद्ध केले व संमेलनावर बहिष्कार नको, अशी भूमिका ठामपणे मांडली. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा आणखी असंख्य मान्यवरांनी एकत्र येत या भूमिकेला पाठींबा दिला तसेच, बहिष्कारवाद्यांच्या झुंडशाहीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

 

डॉ. संजय उपाध्ये, भाऊ तोरसेकर, डॉ. श्रीकांत बहुलकर, संतोष शेलार, मंदार लव्हाटे, प्रवीण तरडे, मोहन शेटे, मोरेश्वर जोशी, संजय सोनवणी, मिलिंद गाडगीळ, अभिराम भडकमकर, डॉ. उदय कुलकर्णी, उदयन इंदुरकर, अशोक राणे, डॉ. अनुराधा कुलकर्णी, तुषार दामगुडे, राजीव साने, समीर दरेकर, कॅ. स्मिता गायकवाड, अक्षय बिक्कड, डॉ. अभिराम दीक्षित यांच्यासह सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी ‘बहिष्कार नको’ या भूमिकेला आपला सक्रीय पाठींबा जाहीर केला. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील काही विशिष्ट मंडळींनी हे सारे प्रकरण भलतीकडेच नेत संमेलनावर ‘सर्वांनी बहिष्कार घातला पाहिजे’, अशी भूमिका घेत दबावतंत्र सुरू केले होते. काही प्रतिष्ठित माध्यमांचे संपादकही या सार्‍यात आघाडीवर होते.

 

हे प्रकरण चिघळले असता, राज्यातील अनेक मान्यवरांनी एकत्र येऊन मंगळवारी एक पत्रक जारी करत, या झुंडशाहीचा तीव्र निषेध केला. दै. मुंबई तरूण भारत या सर्व व्यक्तींशी सातत्याने संवाद साधत असून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जात आहेत. बुधवारी यामध्ये आणखी काही मान्यवर मंडळी सामील झाली व त्यांनीही संमेलन यशस्वी झालेच पाहिजे, या भूमिकेस पाठींबा दिला. त्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक-सामाजिक वर्तुळातून फार मोठे जनमत या सर्व वादात सक्रियपणे उतरून झुंडशाहीचा निषेध करताना व संमेलनाच्या बाजूने आपापली मते मांडताना दिसून येत आहे.

 

ज्याला संमेलनाला जायचे नाही, त्याने त्याची वैयक्तिक भूमिका जरूर घ्यावी. परंतु, इतरांनीही बहिष्कार घालावा, असे आवाहन करून आपण झुंडशाही तर करत नाही ना, याची काळजी या मंडळींनी घ्यायला हवी. डॉ. अरूणा ढेरेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असे सांगणे, ही ढेरे यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी नाही का? सहगल यांच्याबाबतीत जे झाले त्याचा निषेध व्हायलाच हवा, परंतु निषेध आणि बहिष्कार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. साहित्यक्षेत्रातील सुजाण व्यक्तींनी तरी अशी झुंडशाही करणे योग्य नाही.”

- संजय सोनवणी, लेखक

 

सरकारी अनुदानावर भरवल्या जाणार्या संमेलनांनी सरकारचा निषेध करण्यात काय अर्थ आहे? हे एक थोतांड आहे. यांचा हा सारा संमेलनवाद आणि अविष्कारस्वातंत्र्य हे दुटप्पी आहे. संमेलनाध्यक्षांवरही दबाव टाकून त्यांचीही गळचेपी करायची, हे यांचे आविष्कारस्वातंत्र्य आहे. स्वतः अध्यक्षांना मात्र यांच्या लेखी आविष्कारस्वातंत्र्य नाही. हे नवीन नाही, हे गेली अनेक वर्षे भारतात सुरू आहे.”

- भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक

 

सर्वप्रथम या सगळ्या घटनेला जबाबदार असलेल्या मनसेचा निषेध व्हायला हवा. मग दबावापुढे नमलेल्या आयोजन समितीचाही व्हायला हवा. नयनताराबाईंकडे मराठी रसिकांच्यातर्फे दिलगिरी व्यक्त करावी. तसेच, यामागील नेमकी सत्यता जाणून न घेता ‘फडणवीस सरकारला माझे मुद्दे अडचणीचे वाटले असतील’ असे अंदाजपंचे बोलून सर्व रोख राजकीय दिशेने वळण्यास कारणीभूत ठरलेल्या नयनतारा सहगल यांच्या विधानाचा निषेध केला गेलेला नाही, त्यामुळे या विधानाबद्दल नाराजी मात्र व्यक्त व्हायलाच हवी. कारण संमेलनाध्यक्षांची मते न पटल्याने अटक होण्याची एकमेव घटना दुर्गाबाई संमेलनाध्यक्ष असताना घडली होती. त्यानंतर असे आजवर घडलेले नाही. आणि त्यानंतर, अरुणाताईंनी त्यांचे नियोजित भाषण करावे. या घटनेमुळे त्यात बदल करायची गरज नाही. त्यांनी आवश्यक व महत्वाच्या वाटणार्‍या मुद्द्यांवरच त्यांनी बोलावे. कुणाच्याही अपेक्षांचे ओझे बाळगू नये. कणा सत्व वगैरे दबावतंत्राचा भाग असतो. भूमिकावादी साहित्य हे साहित्यविश्वाचा एक भाग असते पण ते म्हणजेच सर्वस्व नसते.” आणीबाणीच्या काळात तीन महिने तुरुंगवास पत्करलेल्या सत्याग्रही अरुणा ढेरे यांना राजकीय परिस्थितीचे आकलन नाही अथवा वेळ पडल्यास त्या विरोधात आवाज उठविण्याची धमक त्यांच्यात नाही, असे मनातही आणणे हास्यास्पद ठरेल.

-अभिराम भडकमकर, लेखक व पटकथाकार

 

सहगल यांच्याबाबत जे घडले त्याचा निषेध झाला पाहिजे. पण साहित्य संमेलनावर बहिष्कार नको. कारण कला-साहित्य ही संस्कृतीची विविध अंग आहेत. समाजाला एकत्र जोडण्याच्या दृष्टीने कला-साहित्य ही संधी आहे. साहित्यामधून समाज घडतो. समाजाला दिशा देण्याच्या दृष्टीने जे विचारमंथन आवश्यक असते ते साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होते. त्यामुळे साहित्य संमेलन होणे हे आवश्यक आहे.”

- कॅ. स्मिता गायकवाड, अभ्यासक-लेखक

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@