बीसीसीआयच्या नसत्या उठाठेवी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
 
 
एकीकडे देशभरात निवडणुकांचा ज्वर चढायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे बीसीसीआयची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बीसीसीआयने आयपीएलचे सामने निवडणुकीतच होणार, असे घोषित केले आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. याआधीही सुरक्षेच्या प्रश्नावरून भारताबाहेर सामने हलविण्यात आले होते. त्यामुळे बीसीसीआयला सुरक्षेपेक्षा जास्त पैसा महत्त्वाचा का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. हा झाला एक मुद्दा. दुसरा म्हणजे, बीसीसीआयने आयसीसीशी चर्चा न करता सामन्यांची घोषित केलेली तारीख. आयपीएलचे सामने दि. २३ मार्चपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले, पण सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा हा दौरा दि. १८ जानेवारीला संपेल, त्यानंतर न्यूझीलंडविरोधात भारत पाच एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे, त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया विरोधात भारताचे पाच एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने होतील आणि हा दौरा संपेल दि. १३ मार्च रोजी. त्यामुळे केवळ ९ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आयपीएल सामने सुरू होणार आणि त्यानंतर मे पासून विश्वचषक आहेच. असं सगळं असताना दि. २३ मार्चपासून आयपीएलचे सामने ठेवण्याची तशी काही गरज बीसीसीआयला नव्हती, मात्र तरी हा घाट घालण्यात आला. अद्याप आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले नसले, तरी आयपीएलच्या १२ व्या हंगामामुळे खेळाडूंच्या आरोग्याची हेळसांड होत आहे, एवढे मात्र नक्की. त्यातच आगामी एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह याला वगळण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या बाबतीतही आयसीसीला काहीच माहीत नव्हते. हा निर्णय बुमराहच्या दुखापतीशी संबंधित नसून बीसीसीआयला बुमराह ज्या आयपीएल संघाशी संलग्न आहे, त्यांचा असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे एखाद्या खेळाडूने आयपीएलसाठी ‘फिट’ असावे, म्हणून भारतीय संघासाठी खेळू नये, हा निर्णय घेण्याचा अधिकार खरंतर बीसीसीआयला अजिबात नाही, या अशा उठाठेवी करण्याची सवयच कदाचित बीसीसीआयला असावी, त्यामुळे याआधीही बीसीसीआयला उच्च न्यायालयाने एका याचिकेदरम्यान तुम्ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नाही, असे सुनावले होते. तरी बीसीसीआयचा हा असा होत असलेला हस्तक्षेप भारतीय संघासाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे या पालथ्या घड्यात पाणी शिरावे, एवढीच काय ती अपेक्षा...
 

युवा खेळाडूंची मक्तेदारी

 

२०१९ ची सुरुवातच भारतासाठी खास आणि विशेष ठरली, त्याची कराणेही तशीच आहेत. २०१९ च्या पहिल्या महिन्यात भारताने दोन मोठे विक्रम मोडीत काढले. पहिला म्हणजे ऑस्ट्रेलिया विरोधात ७१ वर्षांनंतर पहिल्यांदा भारताला मालिका विजय मिळवता आला आणि दुसरीकडे भारताचे ‘ब्ल्यू टायगर्स’ अर्थात भारताच्या फुटबॉल संघाने ५५ वर्षांनी आशियाई चषक स्पर्धेत विजय मिळवला. खरंतर इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आधी इतिहास घडवावा लागतो आणि भारताच्या या दोन खेळातील युवा शिलेदारांनी हा इतिहास घडवला. भारतीय क्रिकेट संघाबद्दल म्हणायचे झाले तर, विराटसेना मागे अजिबात वळून न बघता, सगळ्यांहून या आधीच पुढे गेली. त्यामुळे हा विजय अपेक्षित असला तरी, ७१ वर्षांनंतर या युवा खेळाडूंनी आपली मक्तेदारी पुन्हा सिद्ध केली. दुसरीकडे ‘अंडरडॉग’ म्हणून सदैव हिणवले जाणारे भारतीय फुटबॉल संघाचे खेळाडू. भारतात फुटबॉलचं खूळ तेवढे नसले तरी, या युवा खेळाडूंनी आपली एक विशिष्ट जागा भारतीयांच्या मनात निर्माण केली. त्यामुळे आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’ गटातील सलामीच्या सामन्यातच थायलंडचा ‘४-१’ असा धुव्वा उडवत, ‘हम भी किसी से कम नही,’ हे छातीठोकपणे सांगतिले. कारण, आशियाई चषक स्पर्धेत भारताने तब्बल ५५ वर्षांनंतर मिळवलेला हा पहिला विजय आणि अर्थातच नेहमीच फ्रंटफूटवर असणारा भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री या स्पर्धेतही चमकला आणि या युवा कर्णधाराने पहिल्याच सामन्यात दोन गोल करित अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याचा पराक्रम केला. थायलंड विरुद्धच्या सामन्यात दोन गोल करीत छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील गोलची संख्या ६७ केली, तर मेस्सीची संख्या ६५ आहे. एवढेच नाही तर, छेत्रीने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत पाच गोल केले आहेत. २०११ च्या स्पर्धेत त्याने तीन गोल केले होते आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. गुरुवारी भारत संयुक्त अरब अमिरातीविरोधात खेळणार आहे. त्यामुळे भारताच्या आशियाई चषक जिंकण्याच्या संधी जास्त नसल्या तरी, भारत ‘अंडरडॉग’ दुसऱ्या फेरीपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो तर, विराटसेनेसाठी त्यांचे पुढचे टार्गेट असेल ते एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत करत आगामी विश्वचषकालाही गवसणी घालावी. त्यामुळे फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये या युवा शिलेदारांचे वर्चस्व असेच कायम राहणार, यात वाद नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@