
मुंबई : आधार प्रणालीचे प्रणेते आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी आता डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात क्रांती आणणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती डिजिटल पेमेंट क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि ऑनलाईन बॅंकींग क्षेत्र अधिक सुरक्षित बनवण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे म्हटले आहे.
रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल व्यवहार अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यावरही समितीचा भर असणार आहे. संबंधित समिती ९० दिवसांत अहवाल सादर करणार आहे. समितीत डिजिटल व्यवहार, सुरक्षा, जोखीम, ऑनलाईन व्यवहार आदींवर उपाययोजना केली जाणार आहे.
नीलेकणी यांच्या व्यतिरिक्त पॅनलमध्ये माजी रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर एच.आर.खान, विजया बॅंकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक किशोर सनसी, माहिती व प्रसारण व स्टील मंत्रालयाचे माजी सचिव अरुण शर्मा आणि आयआयएम अलाहबादचे अधिकारी संजय जैन आदींचा सामावेश आहे.