कांगारुंना त्यांच्याच भूमीत नमवले

    07-Jan-2019
Total Views |
 

सिडनी : भारत व ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनीमध्ये सुरू असलेला चौथा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला असून चार सामन्यांची ही मालिका भारताने २-१, अशी जिंकत इतिहास रचला आहे. ७० वर्षांत ऑस्ट्रेलियातील भारताचा हा पहिलाच मालिका विजय आहे. या विजयाने बॉर्डर-गावस्कर चषक भारताने आपल्याकडे कायम राखला. मालिकेत तीन तुफानी शतके ठोकत ५२१ धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मालिकावीराचा किताब देण्यात आला आहे.

 

पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला ३-१ असा मोठा विजय साकारता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत भारताने ७० वर्षांनी मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयाचा ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियासमोर ६२२ धावांचा डोंगर रचला होता. त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ तिनशे धावांवर आटोपला. कसोटी सामन्यांतील दिग्गज संघ ऑस्ट्रेलियावर तीन वर्षात पहिल्यांदाच फॉलोऑनची नामुष्की ओढवली होती.

 
 
 

नव्या वर्षाचे स्वागत भारताने ऐतिहासिक विजयाने केल्याने क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या कसोटी सामन्यात भारताला परदेशात विशेष कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेने भारताला २-१ ने तर इंग्लंडने ४-१ ने नमवले होते. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील कामगिरीवरून भारतीय संघावर टीका करण्यात येत होती. त्यांनाही भारतीय क्रिकेटवीरांनी आपल्या कामगिरीतून उत्तर दिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/