मांगरूळच्या रोपवनाला ६६ लाखांचे कुंपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |



अंबरनाथ : तालुक्यातील मांगरूळ येथील वृक्षारोपण करण्यात आलेल्या रोपवनांना लागलेल्या आगीमुळे अडचणीत आलेल्या वनविभागाकडून आता, रोपवनाच्या रक्षणासाठी कुंपण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अखेर जागा झालेल्या वनविभागातर्फे सुमारे ६६ लाख रुपयांचा खर्च या कुंपणासाठी येणार असून त्याला मान्यता मिळाली आहे. या कुंपणामुळे हा परिसर सुरक्षित राहील, असा विश्वास वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय या परिसरात बोअरवेल खोदण्यात आली असून विद्युत पुरवठाही सुरू करण्यात आल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

राज्य सरकारच्या ५० कोटी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे वनविभागाच्या ८० एकर जागेवर लाखो वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी, शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी लावलेल्या या वृक्षांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात वणव्यांची झळ सोसावी लागली. वनक्षेत्रात घुसलेल्या समाजकंटकांनी लावलेल्या आगींमुळे हजारो वृक्ष होरपळून गेली.

 

मांगरूळ येथील आगीत ७ हेक्टर क्षेत्रातील १२ हजार, ६३३ रोपांना आगीची झळ बसली आहे. याच ठिकाणी डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या आगीत ८ हेक्टर क्षेत्रातील गावात व पालापाचोळा जाळून २० हजार रोपांना झळ बसली होती. त्यानंतर वनविभागाने या ठिकाणच्या रोपांना अतितातडीने पाणी देण्यासाठी बोअरवेल घेणे, मोटार बसविणे, वीजपुरवठा करणे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६ लाख, ७२ हजार, ५०० रुपये खर्च केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वनविभागाकडून पुढील काळात अशा घटना होणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू होते. मांगरूळच्या रोपवनांना संपूर्णपणे संरक्षण जाळी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे वृक्षांच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

आटगाव वनक्षेत्रात रोपांना बाटल्यांतून ठिबक सिंचन

 

जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले, मात्र जिल्ह्यात सध्या असलेल्या पाणीटंचाईमुळे या रोपांना पाण्याची सुविधा पुरवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आटगाव परिमंडळ वनक्षेत्रातील वनकर्मचार्यांनी पाण्याच्या टाकाऊ बाटल्यांमधून रोपांना पाणी देऊन वनसंवर्धन करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@