मुलाच्या ‘उदया’साठी आंध्रचा ‘अस्त’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019   
Total Views |



मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलेले चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधान होण्याची दिवास्वप्ने पाहत आहेत,” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. “नायडू यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले सासरे एन. टी. रामाराव यांच्या पाठीत दुसऱ्यांदा खंजीर खुपसला. आपल्या मुलाचा ‘उदय’ करण्याच्या एकमात्र हेतूने त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून तेलुगू अस्मितेशी तडजोड केली,” असा आरोपही त्यांनी केला.


लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून त्याचे निमित्त साधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून फेब्रुवारी अखेरीस केली जाण्याची शक्यता असून नऊ-दहा टप्प्यांमध्ये हे मतदान होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येऊ लागला आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकांच्या वेळी सहा-सात राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जातील, अशी चर्चा आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांचा कालावधी मे-जून २०१९ मध्ये संपत आहे. त्याचवेळी जम्मू- काश्मीरमध्ये निवडणुका घेता येतील का? तसेच याच्या जोडीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपत असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांतही निवडणुका घेता येतील का, याची शक्यता आजमावून पाहिली जात आहे. लोकसभा आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास वर्षभरात अन्य निवडणुका होणार नसल्याने खर्चाची बचत होईल, असा विचार त्यामागे आहे. नेमके काय घडणार, याचे चित्र आगामी कालखंडात स्पष्ट होईलच. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेवर येता कामा नये, यादृष्टीने विरोधी पक्षांची जुळवाजुळव चालू आहे. बैठका, कार्यक्रम झडत आहेत पण अद्याप विरोधकांची आघाडी वा महाआघाडी यांनी मूर्त रूप धारण केल्याचे दिसत नाही. अशी महाआघाडी तयार व्हावी यासाठी सक्रिय असलेले एक नेते म्हणजे चंद्राबाबू नायडू. एन. टी. रामाराव यांचे हे जावई. तेलुगू अस्मितेसाठी लढलेल्या आणि काँग्रेसची सत्ता आंध्र प्रदेशातून घालविणार्‍या एन. टी. रामाराव यांच्या धोरणांना हरताळ फासून चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेसशी जवळीक साधली. काही महिन्यांपूर्वी हेच चंद्राबाबू भाजपसमवेत सत्तेत होते. पण अचानक भाजपविषयी त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला. भाजपसमवेत राहिल्याने आपले भले होणार नाही, अशी जाणीव त्यांना झाल्याने त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता ते महाआघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण अजून ती आघाडी आकार घेऊ शकलेली नाही.

 

महाआघाडी किंवा अन्य आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात जे नेते आहेत, त्यातील अनेकांना आतापासूनच पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामध्ये राहुल गांधी यांच्यापासून ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडू, शरद पवार आदींच्या नावांची चर्चा सुरू आहे. पण पंतप्रधानपद मिळविण्यासाठी आधी बहुमत मिळविणे गरजेचे आहे, हे या मंडळींच्या लक्षात कधी येणार? सत्ताधारी भाजप सरकारवर सातत्याने खोटेनाटे आरोप केले म्हणजे आपल्या पापांवर पांघरूण घातले जाईल आणि जनमानसात आपली प्रतिमा उजळेल, असे या नेत्यांना वाटत असल्याने संधी मिळेल तेथे भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ही मंडळी टीका करताना दिसतात. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या की, हा अपप्रचार मोठ्या प्रमाणात होणार हे उघडच! विरोधकांची महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात असलेले चंद्राबाबू नायडू हे केंद्र सरकारवर आणि मोदी यांच्यावर घसरत आहेत. असाच एक आरोप चंद्राबाबू नायडू यांनी अलीकडेच केला. आंध्र प्रदेशच्या विकासासाठी जे प्रयत्न चालू आहेत, त्यामध्ये केंद्र सरकार अडथळे आणीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंध्र प्रदेशात अधिक गुंतवणूक झाली तर गुजरात राज्य मागे पडेल, अशी भीती केंद्र सरकारला वाटत असल्याने आमचे पाय खेचले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवू आणि देशातील सर्वात चांगले राज्य म्हणून पुढे येऊ, असे ते म्हणतात. आंध्र प्रदेशला पुढे येऊ न देण्याचा विचार पंतप्रधान करतील, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण भाजपला बदनाम करायचे आहे, मग कोणत्याही निमित्ताचा आधार घेऊन टीका करायची, असा विरोधकांचा उद्योग आहे. चंद्राबाबू हेदेखील त्यांच्याहून वेगळे कसे असतील? “विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी आपण डावोसला जाणार होतो पण त्यावर निर्बंध आणण्यात आले,” असा आरोप करून, “आपणास हा अधिकार कोणी दिला?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

 

केंद्रावर आरोप करताना त्यांना आपले सासरे एन. टी. रामाराव यांची आठवण झाली. तेलुगू जनतेला दाबण्याचा प्रयत्न केल्यास तसे प्रयत्न सफल होणार नाहीत, असेही ते म्हणाले. पण त्याचवेळी रामाराव यांनी तेलुगू अस्मितेसाठी काँग्रेसशी लढा दिला होता याचा विसर मात्र त्यांना पडल्याचे दिसून आले. आपला डावोसचा दौरा सात दिवसांवरून चार दिवसांवर आणल्याबद्दल त्यांचा तिळपापड झाला आणि त्यातून ते केंद्र सरकारवर आरोप करीत सुटले आहेत, असे म्हटले तर ते चुकीचे ठरेल? ज्या रामाराव यांचे दाखले चंद्राबाबू नायडू पदोपदी देत असतात, त्या रामाराव यांची तत्त्वे त्यांनी गुंडाळून ठेवली आहेत, हे त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवे. चंद्राबाबू नायडू केंद्रावर टीका करीत असताना आंध्र प्रदेशमधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलेले चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधान होण्याची दिवास्वप्ने पाहत आहेत,” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. “नायडू यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले सासरे एन. टी. रामाराव यांच्या पाठीत दुसऱ्यांदा खंजीर खुपसला. आपल्या मुलाचा ‘उदय’ करण्याच्या एकमात्र हेतूने त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून तेलुगू अस्मितेशी तडजोड केली,” असा आरोपही त्यांनी केला. “विकासाची फळे केवळ एका कुटुंबास न मिळता ती सर्व जनतेला मिळाली तर रामाराव यांचे स्वर्ण आंध्र प्रदेशचे स्वप्न प्रत्यक्षात येईल,” असा टोलाही मोदी यांनी चंद्राबाबू नायडू यांना हाणला.

 

सत्तेची लालसा दूर ठेवून आंध्रच्या हितास सर्वोच्च प्राधान्य दिले तरच तेलुगू अस्मिता पुन्हा प्रस्थापित होईल. आपल्या मुलाच्या ‘उदया’साठी आंध्रचा ‘अस्त’ करण्यास ते निघाले आहेत. आपल्या मुलापुढे चंद्राबाबू यांना आंध्रच्या मुलाबाळांचा विसर पडला,” असे टीकास्त्रही मोदी यांनी सोडले. “काही पक्ष केवळ एका कुटुंबाचा विचार करीत असतात तर काही संपत्तीचा विचार करतात तर काही कुटुंब आणि संपत्ती अशा दोन्हींचा विचार करतात. पण भाजपला भारतमातेच्या उत्कर्षासाठी, देशातील १.३ अब्ज जनतेसाठी कार्य करण्यात आनंद वाटतो,” असे मोदी म्हणतात. देशातील आघाड्यांच्या राजकारणाबद्दल बोलताना नरेंद्र मोदी यांनी देशात दोनच राजकीय आघाड्या असल्याचे सांगून, त्यातील एक म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि दुसरी म्हणजे घराणेशाहीच्या पायावर उभी असलेली राजकीय पक्षांची आघाडी म्हणजे ‘जमघट’, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, चंद्राबाबू नायडू यांचे राजकारण, मुलाला पुढे आणण्याचे त्यांचे चाललेले प्रयत्न यावर परखड टीका करून मोदी यांनी त्यांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत, असेच या घडामोडींवरून दिसून येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@