आजच्या युगातील तरुण कीर्तनकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
सचिन यांचे अफाट समाजकार्य पाहून लोकांनी त्यांना दिलेली ‘माऊली’ ही पदवी योग्य वाटते. त्यांच्या कार्यामुळे ‘माऊली’ हे विशेषण त्यांच्यासाठी कसे आणि किती योग्य आहे, याचा प्रत्यय येतो.
 

चांगले विचार चांगल्या पद्धतीने मांडायचे असतील, मत कितीही परखड असले तरी ते दुसऱ्यांना न दुखावता मांडता येण्यासाठी अंगी वक्तृत्वगुण असावे लागतात. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी वक्तृत्व शैली सर्वांनाच लाभत नाही, परंतु ज्यांना ही शैली लाभते, ते एक उत्तम वक्ता जरूर बनतात. आपल्या अमोघ वाणीच्या जोरावर अनेक वक्तृत्व स्पर्धाही जिंकतात, परंतु आपल्या या वक्तृत्व शैलीचा वापर केवळ वक्तृत्व स्पर्धांपुरताच मर्यादित न ठेवता त्यातून समाजप्रबोधन करणारे उत्कृष्ट वक्ते म्हणजे सचिन पवार!

 

सचिन पवार यांनी ‘विवेकवारी’चे आयोजन केले होते. वारकरी घरात जन्म झाल्याने संतवाङ्मयाचे संस्कार बालपणीपासून सचिन यांच्यावर झाले होते. वारकरी संप्रदायाने पूर्वापारपासून कर्मकांडाला विरोध केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा जेव्हा आला, तेव्हादेखील वारकऱ्यांनी त्याचे स्वागतच केले. परंतु, आज महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमध्ये तळागाळातील लोकांमध्ये अनेक अंधश्रद्धा पाहायला मिळतात. त्याचे निर्मूलन करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कायद्याचे योग्य ज्ञान पोहोचावे, वारकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी गैरसमज असू नयेत, हा या ‘विवेकवारी’चा हेतू होता. पण वारकऱ्यांपर्यंत पोहोचायचे, त्यांच्यापर्यंत आपले विचार पोहोचवायचे असतील तर, वर्तमानपत्रे, मासिके, व्हिडिओ यांचा आधार घेऊन चालणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष वारीत सहभागी व्हायला हवे, हे सचिन पवार यांनी वेळीच ओळखले होते. वारीतील लोकांना एकच भाषा उत्तमरित्या कळते आणि ती म्हणजे कीर्तनाची भाषा! त्यासाठी सचिन पवार यांनी कीर्तन करायला सुरुवात केली. आज एक तरुण वयाचा कीर्तनकार म्हणून सचिन पवार यांच्याकडे पाहिले जाते. अनेक लोक सचिन यांना ‘माऊली’ म्हणून संबोधतात. सचिन यांचे अफाट समाजकार्य पाहून लोकांनी त्यांना दिलेली ‘माऊली’ ही पदवी योग्य वाटते. त्यांच्या कार्यामुळे ‘माऊली’ हे विशेषण त्यांच्यासाठी कसे आणि किती योग्य आहे, याचा प्रत्यय येतो.

 
समाजसेवेला वाहून घेतल्याबद्दल ‘अहिल्यारत्न’ हा मानाचा पुरस्कार देऊन सचिन पवार यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राला अमूल्य अशी संतांची परंपरा लाभली आहे. तुकोबा, ज्ञानेश्वर, एकनाथांसारखे अनेक थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले. संतांचे हे थोर विचार तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आम्ही वारकरी’ या संस्थेमार्फत सचिन पवार संतविचार अभ्यासवर्ग आयोजित करतात. तसेच आजच्या तरुणाईला वारी खर्‍या अर्थाने कळावी, यासाठी सचिन यांनी ‘वारी विथ विजडम’ अर्थात ‘ज्ञानासहित वारी’ हा उपक्रम राबवला. संत ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? इथपासून ते संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन, तरुणाईला पडणार्‍या यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या उपक्रमाद्वारे दिली गेली. तसेच आजची लहान मुले ही उद्याच्या तरुण पिढीमध्ये दाखल होणार असतात. या हेतूपुरस्सर लहान मुलांसाठी ‘गप्पा संतांच्या’ हा उपक्रम सचिन पवार यांनी राबवला. सचिन पवार हे स्वत: या उपक्रमांमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागामध्ये असलेल्या ‘परिवर्तन’ संस्थेचाही सचिन पवार एक भाग आहेत. ‘परिवर्तन’ या संस्थेमार्फत महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील १८ ते २० गावांमध्ये सचिन पवार शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने समाजकार्य करतात. शिवाजी महाराजांच्या नावावर आज राजकारण केले जाते. परंतु, खरा इतिहास सांगितला जात नाही, तो सर्वांना कळावा, यासाठी ‘परिवर्तन’ या संस्थेमार्फत या भागातील गावांमध्ये शिवचरित्र अभ्यासवर्ग आयोजित केले जातात. महिलांसाठी सावित्री प्रबोधनवर्गाचे आयोजन केले जाते. तसेच तेथील लहान मुलांसाठी ‘शिदोरी’ नावाचा व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम आयोजित केला जातो. संत साहित्यातील विचार हे सचिन यांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहेत, असे ते आवर्जून सांगतात.
 
 
गेल्या वर्षी या परिसरातील गावांमधील तब्बल १६०० महिलांसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन केले होते. या मेडिकल कॅम्पद्वारे महिलांची हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमची चाचणी करण्यात आली. १६०० पैकी तीनशे ते साडेतीनशे महिला या अ‍ॅनिमियाग्रस्त असल्याचे या चाचणीत आढळले. त्यांना पुढील तीन महिने पुरतील एवढी औषधे अ‍ॅनिमियावर उपचारासाठी देण्यात आली. ‘परिवर्तन’ या संस्थेमार्फत हे कार्य करण्यात येते आणि ‘परिवर्तन’ या संस्थेचा आपण एक भाग आहोत, हे सांगायला आज अभिमान वाटतो, असे सचिन पवार आनंदाने सांगतात. वक्तृत्वाच्या जोरावर कीर्तन करून, व्याख्याने देऊन जे काही मानधन सचिन यांना मिळते त्याचा वापर ते रचनात्मक सामाजिक कार्य उभारण्यासाठी करतात. आपल्या प्रभावी वाणीप्रमाणेच समाजात आणि समाजमनावर प्रभावशाली कार्य करणारे तरुण वक्ते सचिन पवार यांना ‘दै. मुंबई तरुण भारत’चा सलाम!
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@