शिक्षणाचा वापर देशाला आणि आपल्या शहराला व्हावा : डॉ. अनिल काकोडकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |


 


डोंबिवली “ज्या प्रमाणे देश बदलत आहे, त्याप्रमाणे आपल्याला शिक्षणाचे महत्त्व कळत आहे. पण, त्याचप्रमाणे आपण घेत असलेल्या शिक्षणाचा आपण राहत असलेल्या शहराला तसेच आपल्या देशाला फायदा व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो तरच भारताला उन्नत देश बनवू शकू,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ .अनिल काकोडकर यांनी केले. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, मराठी विज्ञान परिषद आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत विज्ञान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी काकोडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर विनिता राणे, आयुक्त गोविंद बोडके, डॉ. उल्हास कोल्हटकर, दा. कृ. सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.

 

डोंबिवलीत दोन दिवसीय विज्ञान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमता, डॉ. बाळ फोंडके व अध्यक्ष डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांचा परिसंवाद, कार्बन फुटप्रिंट, अन्न सुरक्षा, सेंद्रिय शेती या विषयावर विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. विज्ञान संमेलनाच्या निमित्ताने एक नवीन पायंडा पाडण्यात आला. “संविधानात भारतीय नागरिकांची काही मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आली आहे. त्या कर्तव्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे मूलभूत कर्तव्य म्हणून नमूद करण्यात आले आहे. आपण भारताचे नागरिक आहोत. अनेकदा देशात वाद सुरू असतात त्यावेळेस प्रत्येक भारतीयाने आपण या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी एकरूप आहोत का, याचा विचार करणे गरजेचे आहे. विद्यार्थी व तरुणांनी सर्वांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे,” असे काकोडकर म्हणाले. हे समेलन विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणारे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

यावेळी डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, “देश मोठा आहे आणि समस्याही तितक्याच मोठ्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत देशात बऱ्याच अशा गोष्टी घडल्या, ज्यामुळे प्रगती कमी अधोगती झाली. मात्र, आता आपण आपले भाग्य विधाते आहोत. बऱ्याच गोष्टी चांगल्या घडल्या आहेत. आपली अर्थव्यवस्था बळकट होत आहे. आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून ही अभिमानास्पद बाब आहे.” ते पुढे म्हणाले की, “विज्ञानाची कास धरून आवश्यक ती वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती साध्य करून त्यामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणे आवश्यक आहे. आजचे जग स्पर्धात्मक आहे. स्पर्धात्मक विचार केला तर भारतातच ग्रामीण आणि शहरी अशी तफावत आहे. ग्रामीण भागातील प्रगती करून संपूर्ण देशाला वर आणणे, भारताची प्रगती करणे, जगाच्या तुलनेत पुढे नेणे हे आव्हान आपण पेलले पाहिजे आणि ते पेलण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. शिक्षण पद्धतीत बदल गरजेचा आहे. मात्र, सुधारित शिक्षण पद्धती ही सद्यस्थितीला अनुसरून असावी,” असेही ते म्हणाले.

 

साहित्य संमेलनाचे २५ लाख द्या: रविंद्र चव्हाण

 

या प्रकारचे संमेलन शहरात होणे ही गौरवाची बाब आहे. अशा संमेलनासाठी आर्थिक बाबही महत्वाची असते. डोंबिवलीत साहित्य संमेलन पार पडले. मात्र, त्या संमेलनासाठी महापालिकेडून मिळणारे २५ लाख अद्याप मिळाले नसून ते देण्यात यावेत, अशा सुचना राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आयुक्तांना केली. आयोजकांची संमेलन करण्यासाठी होणारी तारेवरची कसरत पाहता त्यांचा विचार करून दिलेला शब्द पाळला पाहिजे, असेही ते म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@