’आय ॲम टायपिंग इट मायसेल्फ़ !!!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2019   
Total Views |
 
 
 
 

जेमतेम तिशीतली तरुणी होती ती. लग्न होऊन एक वर्षही उलटले नाही आणि अचानक या बिकट अवस्थेला तिला सामोरं जावं लागलं होतं. चालता फ़िरता देह एकाएकी असहकार पुकारल्यागत निश्चेष्ट झाला आणि अचानक झालेल्या या आघातामुळे सर्व कुटुंबीयही कावरेबावरे होऊन गेले. काय झालं होतं असं ?
 
 
निदान होतं डेंग्यूचं. स्वाभाविकच त्याकरिता असलेले काही उपचार या तरुणीसाठी केले गेले आणि या उपचारांदरम्यान एक नवीनच विकार तिला उद्भवला. वैद्यकीय परिभाषेत या विकारास ’गिलियान बारी सिंड्रोम’ (GBS - Guillain Barre Syndrome) असे म्हटले जाते. अत्यंत दुर्मीळ असलेला आणि ’कोणाला होईल’ याचे निश्चित गणित नसलेला हा विकार थेट शरीराच्या मज्जासंस्थेवरच आघात करतो. परिणामी चालता-बोलता मनुष्यही अचानकपणे अचेत होऊन जातो. हे असे का घडते ? 
 
 
डेंग्यू किंवा तत्सम कोणत्याही विकारासाठी केल्या गेलेल्या उपचारांमुळे या रोगाच्या विषाणूंविरुद्ध अर्थात विषाणूंच्या प्रतिजनांविरुद्ध (antigens) लढण्यासाठी शरीरात प्रतिकारके (antibodies) निर्माण होतात. या प्रतिकारकांनी विषाणूंच्या अशा प्रतिजनांवर हल्ला चढवून त्यांना निकामी बनवणे अपेक्षित असते. पण काही वेळा मात्र इथे थोडी गडबड होऊन जाते. अशा अपवादात्मक प्रसंगी ही प्रतिकारके केवळ या विषाणूंवर हल्ला करुन थांबत नाहीत तर मेंदुपासून शरीराच्या विविध अवयवांपर्यंत संदेशवहनाचे काम करणाऱ्या मज्जातंतुंच्या प्रतिजनांवरदेखील ती आक्रमण करतात. आकार आणि ठेवणीवरुन हे प्रतिजनसुद्धा विषाणूंच्या प्रतिजनांप्रमाणेच भासतात इतकेच यामागचे कारण. परिणामी मज्जातंतूंचा मार्गच अडवून टाकला जातो. यामुळे होते काय, की या मज्जातंतूंशी ज्या ज्या शारीरिक हालचाली निगडित आहेत, त्या हालचालींवरील मेंदुचे नियंत्रण अचानकच संपुष्टात येते. कारण उघड आहे ; संदेशवहनाचा मार्गच रोखून धरला गेलेला आहे. याचे दृश्य परिणाम तर केवळ अकल्पनीय असतात. पहिली गोष्ट म्हणजे अशी व्यक्ती सरळ आडवी होते. तिचे बोलण्यावरचे नियंत्रण जाते आणि शब्द अनाकलनीय होतात. तोंडात तयार होणारी लाळ गिळुन टाकण्याचे सतत चाललेले काम बंद होऊन ही लाळ तोंडावाटे बाहेर येऊ लागते. साधी खाकरण्याची क्रियादेखील न झाल्याने घशात कफ़ साठत जातो. अगदी डोळ्यांच्या पापण्याही मिटता येत नाहीत, इथपर्यंत मनुष्य हतबल होतो. स्वाभाविकपणे अशा व्यक्तीस रुग्णालयात दाखल करावेच लागते. शरीरधर्म टिकवायचे असतील तर शरीरधारणा ही व्हायलाच हवी. पण इथे तर तोंडाच्या हालचाली बंद झाल्यामुळे खाणेही बंद झालेले. म्हणूनच बारीक केलेले अन्न नाकावाटे पोटात नळी सोडुन भरविण्याखेरीज गत्यंतर उरत नाही. एकाएकी झालेल्या या स्थित्यंतरामुळे कुटुंबीय सैरभैर झाले नाहीत तरच नवल. वर उल्लेख केलेल्या तरुणीला पुण्यातील शाश्वत हॉस्पिटलमध्ये जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर्स – डॉ. अतुल कुलकर्णी आणि डॉ. तन्वी यार्दी - प्रथम भेटले तेव्हा तिची अवस्थादेखील अशीच अत्यंत दयनीय झालेली होती. आता ’यात रक्तपेढीचा संबंध कुठे आला’ हा प्रश्न पडु शकेल. पण संबंध तर आहेच आणि अगदी ’रक्ताचा’ संबंध आहे. शाश्वत रुग्णालयाचे डॉ. मुकुंद पेनुरकर यांनी या मुलीवर प्रचलित सर्व उपचार करुन आपल्या प्रयत्नांची शिकस्त केली होती. पण परिणाम म्हणावा तसा मिळत नव्हता. म्हणूनच पुढील उपचारांसाठी या रुग्णालयाने अत्यंत विश्वासाने जनकल्याण रक्तपेढीची मदत मागितली होती. यात रक्तपेढीची भूमिका काय होती, ते पाहणेही मोठे उद्बोधक आहे.
 
 
वर म्हटल्याप्रमाणे रोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार झालेली जी प्रतिकारके विषाणूंबरोबरच मज्जातंतुंनाही आपले लक्ष्य करतात, ती शरीरभर फ़िरतात रक्तावाटे. हे रक्त शरीरात प्रवाहित होण्यासाठी मुख्य भूमिका असते ती रक्तातील रक्तरसाची म्हणजेच प्लाज्माची. थोडक्यात प्लाज्माच्या गाडीत बसून ही प्रतिकारके शरीरभर प्रवास करतात आणि GBS सारख्या विकारात मज्जातंतुंच्या प्रतिजनांवरही जाऊन अडकतात. ’प्रतिकारकांनी रोखलेला मज्जातंतुंचा मार्ग मोकळा करणे’ हाच यावरील इलाज होय. यासाठी इथे एकच मार्ग शिल्लक राहतो, त्याचे नाव - थेराप्युटिक प्लाज्मा एक्सचेंज (TPE) ! अर्थात शरीरातील संपूर्ण प्लाज्माच बदलणे. कारण शरीरातील प्लाज्मा जर काढुन टाकला तर या प्लाज्माला ज्यांनी आपले माध्यम बनविले आहे, ती प्रतिकारकेही आपोआपच बाहेर येतील, हे तर्कशास्त्र. TPE सारखी प्रक्रिया पार पडण्यासाठी ’अफ़ेरेसिस’ हे उपकरण वापरले जाते. रक्तातून फ़क्त आवश्यक तेवढाच रक्तघटक काढुन घेऊन बाकी रक्त पुन्हा शरीरात सोडणे या उपकरणामुळे शक्य होते. रक्तपेढीत प्लेटलेटदानासाठी हेच उपकरण वापरले जाते आणि प्लेटलेटप्रमाणेच केवळ प्लाज्मा काढुन घेणे या उपकरणामुळे सहज शक्य आहे. TPE सारख्या उपचारांदरम्यान शरीरातील संपूर्ण प्लाज्मा बदलताना ’आधी तो वेगळा करुन काढणे व (त्या जागी) दुसरा चांगल्या गुणवत्तेचा प्लाज्मा – जो रक्तपेढीत उपलब्ध असतो - भरणे’ या दोन्ही क्रिया एकामागोमाग एक व्हायला हव्या असतात. अफ़ेरेसिस’चे हेच काम आहे. शरीरातील संपूर्ण प्लाज्मा बदलण्यासाठी अशा तीन ते पाच प्रक्रिया किंवा आवश्यकतेनुसार अधिकही प्रक्रिया कराव्या लागतात. प्रत्येक दोन प्रक्रियांदरम्यान सामान्यत: एका दिवसाचे अंतर असावे लागते.
 
 
अफ़ेरेसिससारखी यंत्रणा रुग्णालयात नेऊन वापरण्यासाठी रक्तपेढीचे तंत्रज्ज्ञ आणि डॉक्टर यांना अर्थातच तिथे उपस्थित असावे लागते. रक्तपेढीची टीम आणि रुग्णालयाची टीम एकत्रितपणे ही प्रक्रिया पार पाडतात. ही यंत्रणा रुग्णहितासाठी रक्तपेढीच्या बाहेरही वापरण्याची सिद्धता जनकल्याण रक्तपेढीने सुरुवातीपासूनच ठेवलेली आहे. त्यामुळे वर उल्लेखिलेल्या तरुणीसाठी रुग्णालयातून विचारणा झाल्यानंतर ’जनकल्याण’ने तातडीने या मोहिमेची तयारी केली आणि डॉ. तन्वी या मोहिमेच्या कर्णधार बनल्या. अशा मोहिमा पार पाडणे सोपे काम नाही. रुग्णाला या उपकरणाशी जोडले जाते ते ’सेंट्रल लाईन’मार्फ़त, जी गळ्याजवळील (किंवा मांडीजवळील) एका नलिकेव्दारे उघडते ती थेट हृदयात. त्यामुळे या प्रक्रियेदरम्यान रुग्णाचे निरीक्षण करण्यासाठी आणि आणीबाणीच्या प्रसंगी त्वरेने हालचाली करण्यासाठी अफ़ाट निरीक्षणक्षमता आणि निर्णयक्षमता असणे गरजेचे असते. याबरोबरच प्रत्येक प्रक्रियेनंतर रुग्णात झालेल्या सुधारणा नोंदविणे, त्याप्रमाणे पुढील नियोजन करणे, रुग्णांच्या नातलगांना सांभाळुन घेणे ; विशेषत: याव्दारे होऊ शकणाऱ्या प्रतिकूल परिणामांची कल्पना योग्य शब्दांत देणे ही कामेही डॉक्टरांसाठी महत्वपूर्ण असतात. रक्तपेढी आणि रुग्णालय यांचे संयुक्त काम असे या उपचाराचे स्वरूप असल्याने दोन्ही संचांतील समन्वय हा खूप महत्वाचा असतो. डॉ. पेनुरकर आणि त्यांच्या संचानेही या मोहिमेत रक्तपेढीसोबत आपली भूमिका उत्तमरित्या बजावली. त्याचे परिणामही चांगले मिळु लागले.
 
 
पहिल्याच प्रक्रियेनंतर या मुलीचे बोलणे काहीसे सुधारले आणि तोंडावाटे बाहेर येणारी लाळ नियंत्रित झाली. दुसऱ्या प्रक्रियेनंतर बोलणे आणखी सुधारले आणि पापण्यांची उघडझापही काही प्रमाणात करता येऊ लागली. पुढील टप्प्यात पापण्यांची पूर्ण उघडझाप आणि हाता-पायांच्या किंचित हालचाली होऊ लागल्या. नंतरच्या टप्प्यात आधार घेऊन बसता येऊ लागलं, शिवाय हाताची पकड चांगली झाली. हातात फ़ोन धरता येऊ लागला. पुढील म्हणजे सहाव्या प्रक्रियेनंतर आधार घेऊन उभं राहणंदेखील या तरुणीस शक्य झालं. नाकातून घातलेल्या नलिकेव्दारा चालु असलेलं अन्नग्रहण थांबलं. सामान्य भोजन सुरु झालं. मुख्य म्हणजे या टप्प्यात अत्यंत हर्षभरित होऊन ’आय ॲम टायपिंग इट मायसेल्फ़’ असा मेसेज या मुलीने स्वत: टाईप करुन डॉ. तन्वी यांना पाठविला. यावेळी तिला झालेला आनंद आणि डॉ. तन्वी व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेलं समाधान केवळ अवर्णनीय होतं. सातव्या आणि शेवटच्या प्रक्रियेनंतर ही तरुणी आधार घेऊन चालुही शकली आणि यानंतर चारच दिवसांनी ती स्वत:च्या पायांनी चालत घरी गेली. सैरभैर झालेलं एक कुटुंब पुन्हा हसु-खेळु लागलं.
 
 
सामान्यत: अशा प्रक्रियांसाठी ’डायलिसिस’चे मशीन वापरण्याचा प्रघात आहे. पण डायलिसिस’ यंत्रणेची पूर्णत: भिन्न कार्यपद्धती पहाता ’प्लाज्मा एक्सचेंज’साठी केलेला फ़ार तर तो एक जुगाड असु शकतो. त्या तुलनेत अफ़ेरेसिस पद्धत निश्चितच अधिक परिणामदायी असते आणि जगभर ती वापरलीही जाते. असे असूनही ’डायलिसिस’ पद्धतीच्या जवळपास निम्म्या खर्चात ही मोहीम यशस्वी झाली. अर्थात केवळ व्यावसायिकता हा यामागील प्रधान विचार कधीच नव्हता आणि नसेलही. याआधीही अशा काही प्रक्रिया अन्य रुग्णालयांतदेखील जनकल्याण रक्तपेढीने यशस्वीपणे पार पाडुन काही घरे सावरली आहेत. विश्वस्त मंडळाचा भरभक्कम पाठिंबा, कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांची दूरदृष्टी, त्याची यशस्वी अंमलबजावणी करणारी डॉक्टर व तंत्रज्ज्ञांची टीम, अद्ययावत यंत्रणा, ’शाश्वत’सारख्या रुग्णालयसमुहांनी ’जनकल्याण’वर दाखविलेला विश्वास, या सर्व बाबी TPE उपचाराच्या सिद्धतेमागील गुंतवणुकीसमान आहेत आणि ’आय ॲम टायपिंग इट मायसेल्फ़’ सारखा एखादाच मेसेज म्हणजे आहे या खटाटोपाचे खरे फ़लित !
 
- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@