सर्जनशिलतेचे मानबिंदू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
‘अर्पणमस्तु’ म्हणजे समाजाचे ऋणानुबंध जपत समाजाच्या कल्याणासाठी सर्वोत्तम अर्पण करणे. नितीन केळकर यांनी आपली सर्वोत्तम संकल्पना सर्जनशीलतेच्या आविष्कारातून समाजाच्या अर्थकारणासाठी निर्माण केली आहे. त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.
 

सर्जनशीलता आणि संशोधनवृत्ती ही ईश्वरी देणगी आहे, असे सांगितले जाते. या सर्जनशीलतेमुळेच आदिमानव आज पृथ्वीवर सजीव म्हणून आपली उत्क्रांती यशस्वीपणे करू शकला. इतिहासाचा मागोवा घेतला, तर विज्ञान आणि समाज या स्तरांवर सातत्याने सर्जनशीलतेच्या आविष्कारातून निर्माण झालेल्या संकल्पनेने जग बदलले आहे. नवनवीन संकल्पनांचे शिल्पकार म्हणून गेल्या शतकामध्ये पाश्चात्यांनी स्वत:ला सिद्ध केले. या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय सुपुत्रांनीही स्वत:ला सिद्ध केले आहे. विविध क्षेत्रांमध्ये सर्जनशीलतेचा साक्षात्कार करीत त्याचे वास्तवात मूर्त स्वरूप निर्माण करण्यामध्ये आज भारतीय मागे नाहीत. त्यांनी सिद्ध केले आहे की, सर्जनशीलता वंश-धर्म-वर्ण यांच्या चौकटीपलीकडे असते. याचेच एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे नितीन केळकर होय. सुनीता इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन आणि केळकर डायनॅमिक्सचे नितीन केळकर यांना सलग चार वेळा एफआयई फाऊंडेशनचा कल्पकता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे नाशिक आणि महाराष्ट्राची मान उंचावली आहे. इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे बंगळुरू येथे ‘सीएमटेक्स २०१९’ या प्रदर्शनीमध्ये दि. २९ जानेवारी रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर नितीन केळकर यांनी अतिशय कल्पकतेने आणि मेहनतीने तयार केलेल्या या कॉम्प्युटराईज्ड न्युमरिकल कंट्रोल या मशीनचे पेटंटही त्यांना मिळाल्यामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर यंत्राची किंमत परदेशात कोटी रुपयांच्यावर असून नितीन यांनी बनवलेल्या यंत्राची किंमत त्या किंमतीपेक्षा १/३ पटीने कमी आहे.

 

या सीएनसी मशीनचा वापर दंतचिकित्सा, ज्वेलरी आणि इतर अनेक अतिकुशल व्यवस्थापनांमध्ये होतो. आजपर्यंत हे मशीन परदेशातून आयात करावे लागायचे, तेसुद्धा बेसुमार किंमतीमध्ये. पण नितीन केळकर यांच्या संकल्पनेतून अवतरलेले ५ अॅक्सेस असलेले सीएनसी मशीनही किंमतीने स्वस्त शिवाय त्याचा आकार कमी असल्यामुळे वापरण्यासाठीसुद्धा योग्य आहे. ज्याच्याकडे भांडवल कमी आहे मात्र, ज्याला उद्योग करायचा आहे, असा या क्षेत्रातील कोणीही नवउद्योजक आता आपली स्वप्न पूर्ण करू शकणार आहे. ही एक प्रकारे या क्षेत्रातल्या भारतीय उद्योजकांसाठी पर्वणीच आहे. या सीएनसी मशीनबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. मात्र, ही कल्पना त्यांना सुचली कशी? यावर नितीन यांचे म्हणणे, मुंबईमध्ये त्यांच्या उत्पादनाचा एक ग्राहक आहे. गेले १५ वर्षे त्याच्याशी व्यावसायिक संबंध आहेत. मुंबईमध्ये जागा कमी. हिरेजडित घड्याळ बनवण्याचा या व्यावसायिकाचा व्यवसाय. त्याला नितीन यांची संशोधक, जिज्ञासू वृत्ती आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची आस माहिती होती. त्याने नितीन यांना सांगितले की, “टेबलवर ठेवता येईल असे सीएनसी मशीन बनले, तर कितीतरी जागा वाचेल आणि सर्वसामान्य उद्योजकही उद्योग क्षेत्रात उभा राहू शकेल.” त्याने फक्त नितीन यांना सुचवले होते. पण त्या दिवसापासून नितीन यांच्या मनात अशा प्रकारच्या सीएनसी मशीनबद्दलचे विचार सुरू झाले.

 

 
 
 
दीड वर्ष व २४ तास ध्यानी-मनी याच मशीनचे चिंतन सुरू झाले. शेवटी तो क्षण आला, सातत्याने प्रदीर्घ चिंतन, मनन आणि अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मनात या मशीनविषयीची संकल्पना विजेच्या तेजाने चमकून गेली. तो युरेकाचा क्षण नितीन यांनी पकडला. त्या संकल्पनेतूनच मग ५ अ‍ॅक्सेस सीएनसी मशीन तयार झाले. नितीन हे उच्चशिक्षित. त्यांचे वडील हेसुद्धा अभियंता. ज्यावेळी संगणक नव्हते, त्यावेळी त्यांनीसुद्धा ऑफसेट मशीन बनवले होते. ते संपूर्णत: त्यांच्या कल्पनेने साकारलेले होते. नवउन्मेषाचे बीज वडिलांकडूनच नितीन यांच्यामध्ये आले. त्यामुळे नितीन यांना प्रत्येक आव्हान ही संधीच वाटत होती. ‘गरज ही शोधाची जननी असते’ असे म्हणतात. ती गरज निर्माण झाली की, त्या गरजेची पूर्तता करण्याचे लक्ष्य नितीन लीलया पेलतात. त्याबद्दल ते म्हणतात, “जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सातत्यपूर्ण निष्ठेने केलेले प्रयत्न यश मिळवून देतेच.” याआधीही त्यांनी पेन प्लॉटरची निर्मिती केली होती. सोप्या भाषेत सांगायचे, तर दरवाजाच्या नावाची पाटी किंवा देव-देवतांचे धातूचे नाणे निर्माण करताना जे कौशल्य लागते त्यासाठीचे अतिकुशल यंत्र. ‘एफआईई पुरस्कार’ आयुष्यात एकदा मिळाले तरी धन्य. पण नितीन यांना तो चार वेळा मिळाला.
 

आज उद्योजक म्हणून नाव मिळवलेल्या नितीन यांची पायवाट सरळ नव्हती. कारण, आपल्याकडे का कोण जाणे, असा समज आहे की मराठी भाषिक व्यवसाय करूच शकत नाहीत. नितीन यांनाही सुरुवातीला काहींनी गंमतीने म्हटले, “अरे, मराठी माणूस धंदा करू शकतो का?” यावर नितीन यांनीही गंमतीने उत्तर दिले होते, “आता उच्चशिक्षित मराठी युवक व्यवसायामध्ये उतरला आहे, ज्याच्याकडे शिक्षणही आहे आणि गुणवत्ता. त्यामुळे व्यवसाय, धंदा हा कोणा एका समाजाची मक्तेदारी न राहता त्यामध्ये आम्ही नक्कीच यशस्वी होऊ.” आज मागे वळून पाहताना नितीन यांना काय वाटत असेल? त्यांच्या संकल्पनांच्या मूर्त स्वरूपाला इतके पुरस्कार मिळाल्यावर त्यांना काय वाटत असेल? यावर नितीन म्हणतात, “पुरस्कार, सन्मान याहीपेक्षा एखादी संकल्पना मनात उमलतानाचा क्षण माझ्यासाठी अतिआनंदाचा आणि अविस्मरणीय असतो.” नितीन यांच्या कर्तृत्वामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर संशोधन क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव नवतेजाने उमलले आहे, हे नक्की. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सीएनसी मशीन खरेदीसाठी कोट्यवधींच्या उलाढाली व्हायच्या. मात्र, नितीन यांच्या संशोधनामुळे देशाचे पैसे वाचले आहेत. देशाचा समाजाचा आणि भारतीय उद्योजकांचा पैसा वाचवणारे नितीन केळकर यांचे उद्योगसमाजातील योगदान महत्त्वाचे आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@