किवींचा दुहेरी पराभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



भारतीय संघ सध्या आजवरच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. विराटसेनेने तर आपल्या विजयाची घौडदौड सुरूच ठेवली असताना, वाटेत येणाऱ्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्यावर मात देत विजयाचा रथ पुढे घेऊन जात आहेत. यात ‘किवी’ म्हणजेच न्यूझीलंडच्या संघालाही भारतीय संघाने सोडलं नाही आणि १० वर्षांनी न्यूझीलंडला त्यांच्याच मायभूमीत नमविण्याचा पराक्रम केला. पण, किवींचंही नशीब वाईट, एकाच मैदानावर त्यांना एकाच देशाकडून दुहेरी पराभव सहन करावा लागला. एकदा पुरुष संघाकडून तर, दुसरा महिला संघाकडून. एकीकडे भारतीय पुरुष संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० ने ही मालिका आपल्या खिशात घातली. त्यामुळे उरलेले दोन सामने ही यजमानांना जिंकण्याकरिता दिलेली संधी असेल, तर दुसरीकडे भारतीय महिला संघाने तब्बल २४ वर्षांनी तीन एकदिवसीय सामन्यात २-० ने आघाडी घेत मालिका विजय मिळवला आणि महिला संघाने आयसीसीच्या महिला चॅम्पियनशिप यादीत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली. या दोन्ही सामन्यात बरेच साम्य होते. एक म्हणजे हे दोन्ही सामने बे-ओव्हल येथील माऊंट माऊनगुनुई या मैदानावर आणि दुसरे म्हणजे भारतीय कर्णधार व सलामीच्या फलंदाजांनी केलेली खेळी. भारतीय महिला संघाने खरंतर १९९५ मध्ये एकमेव एकदिवसीय सामना जिंकून न्यूझीलंडमध्ये मालिका विजय मिळवला होता. त्यानंतर २००५-०६ मध्ये न्यूझीलंडने ४-१ अशा फरकाने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे तब्बल २४ वर्षांनी भारतीय महिला संघाने हे विक्रम केले. या विक्रमात महत्त्वाची कामगिरी केली, ती महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाने. यावर्षीचा आयसीसीचा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार आपल्या नावावर केल्यानंतर स्मृतीने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ९० धावांची खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं. मानधनाचे हे गेल्या १० वन-डे सामन्यांतील सातवे अर्धशतक होते. मानधना आणि कर्णधार मिताली राज यांनी १५ धावांतच सलामीचा फलंदाज माघारी परतल्यानंतर, तिसऱ्या विकेटसाठी तब्बल १५१ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला विजय मिळवून दिला. पण, यात फक्त स्मृतीचं योगदान जेवढं होतं तेवढंच योगदान होतं ते महिला गोलंदाजांचं. पुरुष संघ काही महिन्यात विश्वचषक खेळेल, तर महिला संघालाही ऑस्ट्रेलियात स्वत:ला सिद्ध करायचं आहे. त्यामुळे येत्या काळात क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमांची शक्यता नाकारता येत नाही.

 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा गुंता

 

२०१९ हे वर्ष एकूणच फार रोमांचित असणार आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची सुरू असलेली तयारी, तर दुसरीकडे आयसीसी क्रिकेट विश्वचषक. अवघ्या काही महिन्यांवर विश्वचषक येऊ घातला आहे. त्यातच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही येत्या मार्च-एप्रिलमध्ये गोव्यात होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, निवडणुका, आचारसंहिता आणि सुरक्षेच्या अभावामुळे सरकारकडून ही स्पर्धा नोव्हेंबरमध्ये घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, गोव्यात या स्पर्धा नको, असे कारण भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) महासचिव राजीव मेहता यांनी पुढे करून या प्रकरणाला आता वेगळेच वळण दिले आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी दुसऱ्या राज्याचा विचार केला जात आहे. एकीकडे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा सावळा गोंधळ सुरू असताना, दुसरीकडे खेळाडूंची यात हेळसांड होत आहे. कारण जर, नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा पार पडली तर, २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी खेळाडूंना वेळ मिळणार नाही. त्यामुळे ऑलिम्पिकपूर्वीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणे महत्त्वाचे असेल. याआधीही चार ते पाचवेळा आयओए आणि गोवा यांच्यात नसलेल्या समन्वयामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष्य ही स्पर्धा कधी होणार, याकडे लागले आहे. याआधी राष्ट्रीय स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच पार पडल्या, मात्र निवडणुकीमुळे जर वेळापत्रक बदलत असेल तर आयओएची यासाठीसुद्धा तयारी असावी. केवळ कारणं देऊन हा गुंता काही सुटणार नाही. काही दिवसांपूर्वी या स्पर्धेचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष मुकेश कुमार यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही भेट घेतली. या बैठकीदरम्यान पर्रिकर यांनी स्पर्धेसाठी सरकारकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही दिले. आता असे असताना, ही स्पर्धा अन्यत्र हलवावी किंवा रद्द करावी, अशी भूमिका आयओएतील काही वरिष्ठ सदस्यांनी घ्यायची गरज काय? आयओएच्या या अंतर्गत राजकारणाचा फटका खेळाडूंना बसत आहे, त्यामुळेच आता खेळाडूंनीच आयओएकडे ही स्पर्धा लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा गोव्यातच होईल, अशी शक्यता वर्तविली जात असली तरी, आयओएकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून उचलण्यात आलेले हे पाऊल खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयार करेल, यात वाद नाही. त्यामुळे या स्पर्धेचा गुंता सोडविण्यात आयओएला यश यावे, एवढीच काय ती इच्छा!


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@