अब्राहम लिंकनचं समकालीनत्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



स्वातंत्र्य, समता, बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीची मूल्ये अमेरिकेने आणि विशेषतः अब्राहम लिंकनने प्रत्यक्षात उतरवून दाखवली, हे त्यांचं श्रेष्ठत्व आहे.


जगरहाटी सतत पुढे पुढे जात असते. जे निर्माण होतं ते काही काळ भरभराटतं; मग जुनं होऊ लागतं आणि अखेर नष्ट होतं. त्याच्या जागी नवं काहीतरी अगोदरच आलेलं असतं. पण, काही गोष्टी चिरंतन असतात. वर्षांमागून वर्ष नव्हे, शतकांमागून शकतं उलटतात तरीही त्या गोष्टींचं स्मरण, सर्वश्रेष्ठत्त्व समाजमनातून नाहीसं होत नाही. अब्राहम लिंकन या माणसाच्या बाबतीत असंच काहीसं आहे. काळ विलक्षण वेगाने पुढे धावतो आहे. विज्ञानयुगाने त्यातही विशेषतः संगणकयुगाने फार झपाट्याने अनेक गोष्टी पार रद्दबातल करून टाकल्या आहेत. अमेरिका हा तर सर्वच क्षेत्रातला अतिअद्ययावत देश, पण तिथेही अब्राहम लिंकन हा माणूस विस्मृतीत जाण्याऐवजी अधिकाधिक समकालीन बनतो आहे. विशेषतः ओबामा आणि ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या गेल्या अकरा वर्षांमध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या आहेत, घडत आहेत, त्यामुळे लोकांना लिंकनची जास्त तीव्रतेने आठवण येऊ लागली आहे. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन शहरात अब्राहम लिंकनचे एक भव्य स्मारक आहे. प्राचीन ग्रीक वास्तूशैलीवर आधारलेल्या या शुभ्र संगमरवरी स्मारकाला ‘लिंकन मेमोरियल’ असंच नाव आहे. तिथे आसनावर बसलेल्या लिंकनचा पुतळा आहे. एखाद्या जगज्जेत्या सम्राटाच्या रूबाबात बसलेल्या लिंकनच्या चेहऱ्यावर ‘जाणत्या राजा’चा सगळा दिमाख शिल्पकाराने अचूक पकडला आहे. हल्ली आपल्याकडच्या इंग्रजी वृत्तपत्रांमधून कुण्या बड्या व्यापाराची एक जाहिरात येत असते. त्यात अब्राहम लिंकनच्या या आसनस्थ पुतळ्याकडे चिंतनशील नजरेने पाहणारा अमिताभ बच्चन दाखवलेला असतो. दोघांमधलं शारिरीक साम्य आपल्या पटकन लक्षात येतं. ती जाहिरात पाहून कुठल्या तरी खानाचा फॅन असलेल्या पण अमिताभचं श्रेष्ठत्त्व हळूहळू समजायला लागलेल्या नव्या पिढीच्या एका प्रतिनिधीने मला विचारलं, “अब्राहम लिंकनवर कोणीतरी पिक्चर काढणारसं दिसतंय. विधू विनोद चोप्रा किंवा संजय लीला भन्साली असणार नि बहुधा अमिताभ त्यात लिंकनचं काम करणार. पण, अब्राहम लिंकन खरंच एवढा सही होता का, की अमिताभने त्याची भूमिका करावी.” क्षणभर मी अवाक् झालो. अब्राहम लिंकन खरोखरच एवढा सही होता का? भराभर माझ्या डोळ्यांसमोरून काही कल्पनाचित्रं सरकली. उद्या खरंच एखाद्या विधू विनोद चोप्राने किंवा संजय लीला भन्सालीने लिंकनवर हिंदी चित्रपट काढायचा ठरवलं, तर त्या कुणी फायनान्सर तरी मिळेल का? लिंकनच्या चित्रपटात ऐश्वर्या, राणी, करीना वगैरे शोभेच्या बाहुल्या कशा नि कुठे नाचवल्या जातील? लिंकनच्या व्यक्तिमत्त्वातला धूर्त राजकारणी नि उमदा माणुसकीची जाण असलेला माणूस अमिताभ साकार करू शकेल? दिग्दर्शक हा चित्रपटाचा खरा नायक असतो. लिंकनचं विलक्षण चरित्र, त्याचं अभिजात श्रेष्ठत्व कॅमेऱ्यात पकडण्याची क्षमता मुळात एखाद्या चोप्रा, भन्सालीत आहे ? काय आहे हे श्रेष्ठत्व? १२ फेब्रुवारी, १८०९ हा अब्राहम लिंकनचा जन्मदिवस. म्हणजे येत्या फेब्रुवारीमध्ये त्याच्या जन्माला २१० वर्ष होत आहेत. युरोप आणि आशियातल्या अनेक प्राचीन राष्ट्रांच्या हिशोबात ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ हे नवजात अर्भकच आहे. मुळात ती ब्रिटनची वसाहत होती. आपल्याच मायभूमी ब्रिटनशी लढून अमेरिकेने स्वातंत्र्य मिळवलं. त्या स्वातंत्र्यलढ्यातला सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन हा नव्या अमेरिकन राष्ट्राचा पहिला अध्यक्ष बनला. ही घटना १७८९ सालची. तेव्हापासून सध्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत अमेरिकेचे फक्त ४४ अध्यक्ष झालेले आहेत. त्यातले काही चांगले होते. काही खरे होते, काही वाईट होते. आपल्या भारतात प्रजाहितदक्ष आणि पुण्यश्लोक अशा राजर्षींच्या मालिकांच्या मालिका होऊन गेल्या आहेत. त्या तुलनेत तर हा सगळा पोरखेळच भासतो. राजर्षी म्हणजे जो सर्वसत्ताधीश असा राजा असतानाच ऋषीही आहे असा.

 

अमेरिकेच्या या आजवरच्या ४४ अध्यक्षांमध्ये चार जण हे सदासर्वकाळ अत्यंत लोकप्रिय मानले जातात. जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, फर्डिनंड रुझवेल्ट आणि जॉन केनेडी. आधुनिक काळात राजेशाही व्यवस्था उलथून टाकून स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा उद्घोष करीत, जनतेचं राज्य आणण्याचा पहिला प्रयत्न केला फ्रेंच राज्यक्रांतीने. पण, क्रांतीनंतरच्या फ्रेंच सत्ताधाऱ्यांना वरील मूल्ये अमलात आणता आली नाहीत. अमेरिकेने आणि विशेषतः अब्राहम लिंकनने ती मूल्ये प्रत्यक्षात उतरवून दाखवली, हे त्यांचं श्रेष्ठत्व आहे. आजची अमेरिका ही कमालीची साम्राज्यवादी आहे. जगावर प्रत्यक्षात राजकीय साम्राज्य न गाजवता, जगाचं आर्थिक शोषण करायचं नि स्वतःची समृद्धी सतत वाढवत राहायची, असा हा नवसाम्राज्यवाद सुरुवातीच्या काळात नव्हता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांमधलं स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी अमेरिकन लोकांनी खुद्द मायभूमी ब्रिटनशीच पंगा घेतला. पण म्हणजे कोण स्वतंत्र झालं? तर अमेरिकन भूमीवर राहणारे गोऱ्या रंगाचे पुरुष लोक स्वतंत्र झाले. त्याच भूमीवर राहणाऱ्या गोऱ्या स्त्रिया नि काळे स्त्री-पुरुष यांचा सामाजिक दर्जा काय होता? गोऱ्या स्त्रिया गोऱ्या पुरुषांच्या बायका, आया, बहिणी होत्या. पण त्याव्यतिरिक्त त्यांना कोणतीही स्वतंत्र, सामाजिक ओळख नव्हती आणि काळे स्त्री-पुरुष तर निव्वळ गुलाम होते. गोऱ्या लोकांच्या घरांतून, शेतमळ्यावरून गुरांसारखे, गुरांबरोबरच राबणारे गुलाम! त्यांना माणूस म्हणूनसुद्धा ओळखलं जात नव्हतं. बाजारात इतर चार वस्तूंप्रमाणेच या जित्या-जागत्या माणसांना विकलं खरेदी केलं जात होतं. अब्राहम लिंकनचा पूर्वज सॅम्युअल लिंकन हा ब्रिटनमधून सन १६३७च्या सुमारास अमेरिकेत स्थलांतरित झाला. तो अगदी साधा कोष्टी होता. अब्राहमचा बाप टॉमस हा सुतार होता. अत्यंत गरीब स्थितीतल्या या टॉमस लिंकनच्या पोटी अब्राहमचा जन्म एक कुडाच्या झोपडीत झाला. अक्षरश: वाटेल ती हलकीसलकी कामं करीत जगाचा भलाबुरा अनुभव घेत अब्राहम लहानाचा मोठा झाला. काही काळ तो लष्करात होता. काही काळ तो एका छोट्या गावात पोस्टमास्तर होता. १८३२ साली वयाच्या २३व्या वर्षी तो एक नातेवाईकाबरोबर व्यापार करण्यासाठी दक्षिणेत न्यू ऑर्लिन्सला गेला. या प्रवासात त्याला गुलामगिरीच्या अमानुष प्रथेचं पहिलं दर्शन घडलं. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात मळे, बागायती होत्या. या मळ्यांवर फुकट राबायला स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून जहाज भरभरून काळे लोक आणले. तेच हे गुलाम. युरोपीय मानववंश शास्त्रज्ञांनी आफ्रिका खंडातल्या लोकांचा विशिष्ट वंश ठरवून त्या वंशाला ‘नेग्रिटो’ असं नाव दिलं. त्यावरूनच ‘नि, ग्रो’ किंवा ‘नीगर’ हा शब्द रुढ झाला. वास्तविक आफ्रिकन लोक युरोपीय लोकांपेक्षा बुद्धीने अजिबात कमी नव्हते. शारीरिक बळात तर ते युरोपियनांना कित्येक पट भारी होते. पण, आपापसातली भयानक दुही, वारंवार पडणारे दुष्काळ, अफाट लोकसंख्या, नेतृत्वाचा अभाव, आधुनिकतेचा अभाव अशा सर्व घटकांमुळे युरोपियनांनी आफ्रिकन देश जिंकले आणि त्यांतील नागरिकांना गुलाम म्हणून अमेरिकेत नेऊन फुकट राबवले.

 

पोटापाण्यासाठी खडतर जीवन जगताना, संघर्ष करताना अब्राहम लिंकन हेही पाहात होता की, आपल्या या स्वतंत्र अमेरिकन राष्ट्रात आपल्याच स्त्रिया आणि हे काळे स्त्री-पुरुष यांचं जीवन आपल्याहीपेक्षा खडतर आहे. संघर्ष करीत, शिक्षण घेत अब्राहम लिंकन वकील झाला. अल्पावधीतच त्याने वकिलीत जम बसवून एक उत्तम हजरजबाबी, विनोदी वक्ता म्हणूनही नाव मिळवलं. आता त्याची राजकीय महत्त्वाकांक्षाही जागी झाली. तत्कालीन राजकीय समस्यांबरोबरच लिंकन स्त्रियांचे प्रश्न आणि गुलामगिरीची प्रथा यांचाही अभ्यास करू लागला. हे दोन्ही प्रश्न नाजूक असल्यामुळे अमेरिकेतले जे दोन मुख्य राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन, या दोघांनाही त्यात लक्ष घालायला किंबहुना त्याबाबत काही ठाम भूमिका घ्यायलाही आवडत नसे. पण, लिंकनने हिरीरीने हे दोन्ही प्रश्न मांडायला सुरुवात केली. हळूहळू लिंकन आपल्या कर्तबगारीने मोठमोठी राजकीय पदं प्राप्त करत गेला. कुडाच्या झोपडीत जन्मलेला, एका सामान्य सुताराचा पोरगा आपल्या दारिद्य्राचं वगैरे भांडवल न करता, अंगच्या खऱ्याखुऱ्या गुणांनी उत्कर्ष पावत गेला आणि अखेर रिपब्लिकन या सामान्य जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पक्षातर्फे उभा राहून राष्ट्राध्यक्ष बनला. आता गुलामगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला. अमेरिकेतली दक्षिणेकडची संस्थानं गुलामगिरीच्या बाजूने होती. कारण, त्यांच्या प्रदेशात प्रचंड मळे होते. त्यांना फुकट राबायला गुलाम हवे होते. उत्तरेकडच्या संस्थानाची गुलामगिरीची प्रथा रद्द व्हायला हरकत नव्हती. कारण, ती प्रथा अमानुष तर होतीच आणि व्यवहारात त्यांच्या प्रदेशात फारसे मळे नसल्यामुळे फुकटात मिळणारे शेतमजूर हा त्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा नव्हता. हा प्रश्न ऐवढ्या टोकाला पोहोचला की, दक्षिणेकडील संस्थानं देशातून फुटून निघण्याच्या गोष्टी करू लागली. त्या स्थितीत राष्ट्राध्यक्ष लिंकनने ‘उत्तरी संस्थानं विरुद्ध दक्षिणी संस्थानं’ असं युद्ध पत्करलं, पण देशाची फाळणी होऊ दिली नाही. युद्धाची पहिली दोन वर्ष उत्तरी संस्थानं सतत मार खात होती. त्यामुळे लिंकनचे राजकीय विरोधक अगदी ‘राशनपानी लेकर’ त्याच्यावर तुटून पडले, पण लिंकन डगमगला नाही. अखेर त्याने युद्ध जिंकलं. गुलामगिरीची प्रथा अमेरिकन संसदेने कायद्याने रद्द केली. लक्षावधी काळ्या गुलामांना अमेरिकन राष्ट्राच्या नागरिकत्वाचा गोऱ्या लोकांइतकाच समान दर्जा मिळाला. हे स्वत: गोऱ्या असलेल्या लिंकनने घडवलं. या विजयानंतर १८६४ साली दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर लिंकनने केलेलं पहिलं भाषण हा वक्तृत्वाचा एक अप्रतिम नमुना आहे. त्यात माणुसकी, मानवी मूल्यं यांच्यावरचं प्रेम, निष्ठा इतकी ठासून भरलेली आहे की, त्या एका भाषणानेसुद्धा लिंकनला महान राष्ट्रपुरुष ठरवायला हरकत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@