राहुल गांधींना ‘अहमद’ मिळाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2019   
Total Views |



काँग्रेस पक्षसंघटनेत सरचिटणीस (संघटन) हे महत्त्वाचे पद केरळमधील खा. के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या गेल्या आहेत. गेली वीसेक वर्षे दिल्लीचे दरबारी राजकारण जवळून पाहिलेल्यांना काँग्रेसअंतर्गत रुजलेल्या दरबारी राजकारणाचीही पुरेपूर कल्पना असेलच. काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या (थोडक्यात नेहरू-गांधी घराण्याच्या) जवळ राहून, त्यांचा विश्वास संपादन करून, दरबारी राजकारणातील खेळ्या खेळून, कोणताही जनाधार नसताना देशाच्या राजकारणावर मजबूत पकड ठेवण्याचे कसब प्राप्त केलेल्या नेत्यांची एक स्वतंत्र यादीच करता येईल. अहमद पटेल, हे यातील अगदी अलीकडचे नाव. संपुआ सरकारच्या काळात तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या अत्यंत विश्वासातील मानले जाणाऱ्या अहमद पटेल यांनी कशी काँग्रेसअंतर्गत व पर्यायाने केंद्र सरकारमधील सूत्रे हलवली व पडद्याआडून ‘राज्य’ केले हे सर्वश्रुत आहेच. ‘अॅक्सिडेण्टल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटातही याची थोडी झलक पाहायला मिळतेच. राहुल गांधी अध्यक्ष होताच त्यांनी पटेलांना दूर करत कोषाध्यक्षपदी नियुक्त केले. पटेलांनंतर ज्येष्ठ नेते अशोक गहलोत सरचिटणीसपदी आले, परंतु पटेलांएवढा प्रभाव गांधीदरबारात निर्माण करू शकले नाहीत. अर्थात, गहलोत यांचा प्रभाव त्यांना मुख्यमंत्रिपद मिळवून देण्यात यशस्वी ठरला आणि बिचाऱ्या सचिन पायलटांच्या विमानाचे मात्र ‘क्रॅश लॅण्डिंग’ झाले. त्यानंतर आता के. सी. वेणुगोपाल या पदावर आले आहेत. हे नाव फारसे सुपरिचित नाही. केरळमधील अॅलेप्पीचे खासदार आणि युपीए-२ च्या काळात केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले ५५ वर्षीय के. सी. वेणुगोपाल गेल्या काही वर्षांत काँग्रेसअंतर्गत राजकारणात भारी ठरताना दिसत आहेत. नुकतेच कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ विरोधात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, तर अहमद पटेलांना राज्यसभेवर निवडून आणण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. आता तर थेट सरचिटणीस-संघटन म्हणून राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी वेणुगोपाल यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे, तीही अशी अटीतटीची निवडणूक तोंडावर असताना. वेणुगोपाल यांनी गणितात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आता अहमद पटेल तितके प्रभावी नसताना राहुल यांनी आपला स्वतःचा ‘अहमद’ वेणुगोपाल यांच्या रूपाने शोधल्याचे दिसत आहे. हा अहमद येत्या काळात राहुल गांधींची आणि पर्यायाने काँग्रेसची नौका तारतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

फडणवीसांशी लढायला माजी मुख्यमंत्र्यांची फौज

 

प्रियांका गांधी-वडेरांच्या राजकारणप्रवेशाची चर्चा धूमधडाक्यात सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर जे अन्य महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, त्यावर मात्र माध्यमांचे आणि चर्चाकारांचे म्हणावे तेवढे लक्ष गेलेले दिसत नाही. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसमधील एकेक करून जुने दुढ्ढाचार्य खड्यासारखे बाजूला करून आपल्या विश्वासातील लोक तिथे बसविण्यास सुरुवात केल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. परंतु, या चर्चेच्या मर्यादा मध्य प्रदेश, राजस्थान इ. राज्यांचे मुख्यमंत्री निवडताना दिसून आल्या. आता प्रियांका यांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली खरी, परंतु त्यानंतर प्रदेशस्तरावर मात्र जुन्या सरंजामदारांनाच पुन्हा एकदा धुरा सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रातही विविध समित्यांच्या जम्बो नियुक्त्या करत असताना राहुल यांनी खांदेपालट न करता त्याच त्या नेतेमंडळींकडे महत्त्वाची पदे देत निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठीच्या मोठी फौजच उभी राहिल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एमपीसीसीच्या नव्या नियुक्त्या पाहिल्या तर ही बाब आपल्या लक्षात येते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि शिवाजीराव पाटील-निलंगेकर या चार माजी मुख्यमंत्र्यांनाच पुन्हा एकदा या फौजेच्या अग्रस्थानी ठेवण्यात आले असून अन्य समित्यांमध्येही नवे चेहरे अभावानेच दिसत आहेत. अपवाद म्हणून फारतर माध्यम विभागात खा. कुमार केतकर यांची नियुक्ती म्हणता येईल. पृथ्वीराजबाबा, अशोक चव्हाण, सुशीलकुमार यांपैकी एकाही नेत्याला आज राज्यव्यापी जनाधार नाही. प्रत्येकजण जेमतेम स्वतःच्या जिल्ह्यापुरता उरला आहे. महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस साफ अपयशी ठरली. शिवाय, अंतर्गत गटबाजीनेही काँग्रेसला ग्रासल्याचे वेळोवेळी दिसून आले. महाराष्ट्र काँग्रेसचे आजचे चित्र पाहिले तर प्रत्येकजण स्वतःचे एकेक बेट बांधून बसला आहे. परंतु, या सगळ्यांचा एकत्र पक्ष असा जाणवतच नाही. अशात नवे चेहरे अग्रस्थानी आणत नव्या दमानिशी भारतीय जनता पक्षाचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुकाबला करण्याचे सोडून पुन्हा त्याच त्या संस्थानिकांकडेच परत जाण्याचे धोरण महाराष्ट्र भाजपमधील फडणवीस, चंद्रकांतदादा, मुनगंटीवार, तावडे, खा. पूनम महाजन, पंकजा मुंडे, दानवे, गिरीश महाजन आदी नेत्यांच्या तगड्या ताकदीपुढे टिकाव धरेल का?, असाच प्रश्न पडतो आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@