दृढ लवचीकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
व्हीएनआयटी या भारतातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्ष विश्रामजी जामदार यांच्याशी गप्पागोष्टी हा एक सुखद अनुभव असतो. एकतर, आपल्या ज्ञानात भर पडते आणि दुसरे म्हणजे, विश्रामजींची प्रसन्नता संसर्गजन्य असल्यामुळे त्यांच्या सहवासातील व्यक्तीमध्ये ती नकळत शिरते. एवढ्यातच तरुण भारत कॉन्क्लेव्हच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पागोष्टी झाल्या. ओघात विषय संघाच्या दैनिक शाखेवर आला. विश्रामजींनी नुकतीच घडलेली घटना सांगितली. प्रभात शाखेचा ध्वज व दंड ज्या घरी ठेवण्यात येतो, ते बाहेरगावी गेले होते. सकाळी स्वयंसेवक त्या घरी गेले तर घराला कुलूप दिसले. एव्हाना पाच-सहा स्वयंसेवक जमले होते. त्यातील एक म्हणाला, आज शाखा कशी लावायची? आज शाखेला सुटी. विश्रामजी म्हणाले, ध्वज नसला तरी शाखा लागेल. बाकीचे कार्यक्रम करायचे. फक्त ध्वज नसेल. लगेच शाखा लागली आणि नित्य कार्यक्रम पार पडले.
 
 
 
ज्या ध्वजाला स्वयंसेवक गुरू मानतात, तो नसतानाही शाखा लागू शकते, हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. समाजात आपण पाहतो की मुख्य व्यक्ती आली नाही तर कार्यक्रम खोळंबून राहतात. प्रसंगी रद्दही होतात. पण संघाचे तसे नाही. संघाच्या या गुणवैशिष्ट्याला विश्रामजी ‘दृढ लवचीकता’ (रिजिड फ्लेक्सिबिलिटी) असे म्हणाले. विश्रामजी म्हणाले, हा शब्द माझा नाही. मा. दत्तोपंत ठेंगडी यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनीच हा शब्द मला सांगितला होता. आता या घटनेत, काहीही झाले तरी शाखा लागली, ही झाली दृढता आणि गुरूचे प्रतीक ध्वज नसतानाही काम अडले नाही, ही झाली लवचीकता. संघकार्याचे हे आगळेवेगळे वैशिष्ट्य ज्याने जाणून घेतले, त्याला संघ समजून घ्यायला विशेष अडचण जात नाही.
 
 
 
 
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, संघाची उभारणी नेतृत्वविहीन संघटना म्हणून झाली आहे. ही जी नेतृत्वविहीन संघटनेची शक्ती असते, तिला कुणीच रोखू शकत नाही. नेतृत्वकेंद्रित संघटना लयास जाऊ शकतात, परंतु नेतृत्वविहीन संघटना नष्ट होऊच शकत नाही. हे तत्त्वज्ञान मांडणारे ‘द स्टारफिश अॅण्ड द स्पायडर’ नावाचे पुस्तक आवर्जून वाचण्यासारखे आहे. ओरी ब्राहमन व रॉड बेकस्ट्रार्म हे या पुस्तकाचे लेखक आहेत. ते म्हणतात- तुम्ही जर कोळ्याचे (स्पायडर) डोके तोडले की तो मरतो. परंतु, तुम्ही जर स्टारफिशचा पाय तोडला तर तो पाय नव्याने वाढू लागतो आणि कालांतराने तो पाय एक नवा स्टारफिश झालेला आढळून येतो. संघाची उभारणी स्टारफिशसारखी झालेली आहे. संघाचा अभ्यास करताना, तुलनेसाठी आपल्या मनात पारंपरिक संघटना असते. या संघटनांना ‘टॉप-डाऊन’ संघटना म्हणतात. वरपासून खालपर्यंत. या अशा संघटनांशी संघाची तुलना केली की, आपली फसगत होणारच.
 
 
 
 
सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. अशात राजकीय पक्षांमध्ये गरमागरमी सुरूच राहणार. परंतु, यात संघालाही ओढले जात आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासूनच संघाला राजकारणात ओढले जात आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस, यात आघाडीवर आहे. कॉंग्रेसाध्यक्षांचे सल्लागार कुमार केतकरसारखे नतद्रष्ट विचारवंत असतील, तर आणखी वेगळे काय होणार? आपली बुद्धिमत्ता, बहुश्रुतता वाम मार्गाला लावून बसलेला हा विचारवंत आहे. असो. बरेचदा आपणही संभ्रमात पडतो. संघ राजकारणात असल्यासारखा दिसतो आणि संघ राजकारणात नाही, असेही लक्षात येते. राजकारण हे समाजाचे एक अंग असल्यामुळे आणि संघ समाजव्यापी असल्यामुळे, संघ राजकारणात दिसतो. यात चूक ते काय? पण, मग तरीही तो राजकारणात नाही, असे कसे म्हणायचे? हे असे प्रश्न मनात घोळत असतानाच, विनोबा भावे यांचे लोकनीती हे छोटेखानी, परंतु अत्यंत विचारप्रवर्तक पुस्तक वाचण्यात आले. या पुस्तकात गांधीजी आणि राजनीती यावर विनोबाजी लिहितात-
 
 
महात्मा गांधीजींनी ताडले होते की (स्वराज्यप्राप्तीनंतर) कॉंग्रेसच्या मार्फत राज्यकारभार चालला, तर राजनीती चालेल; आणि तोपर्यंत जी चालली ती लोकनीती होती. म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने कॉंग्रेसला ‘लोकसेवक संघ’ बनण्याचा सल्ला दिला होता. गांधीजींची ही श्रेष्ठ कल्पना होती. यात त्यांच्या प्रतिभेची चमक दिसते. त्यांचा विचार होता की देशावरचे गुलामगिरीचे जोखड झुगारून देण्याचे कार्य संपल्यानंतर देशातील सर्वांत मोठी संस्था असलेल्या कॉंग्रेसने ‘लोकसेवक संघ’ बनावे. तसे झाले असते तर देशातील सर्वांत मोठी संस्था सेवक संस्था झाली असती. सेवा करणार्या गौण संस्था हिंसक समाजातही असतात. कारण जेथे समाज असेल तेथे सेवेची आवश्यकता तर असतेच. परंतु, अिंहसक समाजात तर सेवामय संस्था सर्वांत मोठी असली पाहिजे. ‘सेवा-प्रधान’ म्हणण्यातही मला समाधान नाही. ‘सेवामय’ संस्था म्हणणे मला जास्त योग्य वाटते.
दुसरे म्हणजे, लोकसेवक संघाच्या कल्पनेत सत्तेवर सत्ता चालविणे अभिप्रेत आहे. आजच्या आवश्यकतेनुसार राज्यशासन चालवणारी जी सत्ता, तिच्यावर सत्तेपासून अलिप्त असणार्या समाजाची सत्ता असण्याची गोष्ट यात आहे. असे झाले असते, तर सेवा सार्वभौम झाली असती आणि सत्ता सेविका बनली असती. सत्तेला नियंत्रणात ठेवण्याची शक्ती त्या समाजात राहिली असती. लोक अशा समाजाचा आशीर्वाद घेऊनच निवडणुकीत उभे राहिले असते. परंतु, अनेक कारणांनी असे होऊ शकले नाही आणि कॉंग्रेस मुख्यत: निवडणूक लढणारी संस्था बनली.
 
 
 
विनोबाजींच्या या प्रतिपादनात लोक शब्दाऐवजी राष्ट्र शब्द ठेवून बघा. संघाची भूमिका स्पष्ट होऊन जाईल. तसेही लोक म्हणजे राष्ट्रच असते. विनोबाजींना, महात्मा गांधींना जे आकळले, ते डॉक्टर हेडगेवार, श्रीगुरुजींपासून बाळासाहेब देवरस व सर्व सरसंघचालकांना आधीच समजले होते, असे म्हणता येईल. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी समाजाला सिद्ध करणे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते टिकविण्यासाठी समाजाला लायक बनविणे, या दोन बाबी वेगवेगळ्या आहेत. महात्मा गांधी आदी प्रभृतींनी हा फरक नेमका ओळखला होता. संघाच्या नेतृत्वाने तदनुसार संघटनेची दिशा वळवली. कॉंग्रेसला मात्र हे जमले नाही. कदाचित, महात्मा गांधींचा खून झाला नसता आणि ते हयात असते, तर कॉंग्रेसला असे विधायक लोकसेवक संघाचे वळण त्यांनी दिले असते.
 
 
सत्तेला नियंत्रणात ठेवण्याची शक्ती असलेला समाज निर्माण करण्याचा संघाचा प्रयत्न आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. इतक्याच मर्यादित अर्थाने संघ राजकारणात आहे. आपल्याकडील साम्यवादी विचारांच्या प्रभावामुळे सत्ताच समाजाला नियंत्रित करताना दिसून येते. भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यात तसा मूलभूत फरक काहीच नाही. भांडवलशाहीत भांडवलदारांना समाजाचे नियंत्रण हवे असते आणि साम्यवादात सरकारला समाजावर नियंत्रण हवे असते. संघाला आणि महात्मा गांधींना समाजाचे सत्तेवर नियंत्रण अभिप्रेत आहे. सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जी पात्रता असायला हवी, ती समाजात निर्माण करण्याचे काम संघ करीत आहे. विनोबाजींनी म्हटल्याप्रमाणे, अशी शक्ती समाजात निर्माण झाली की, लोक अशा समाजाचा आशीर्वाद घेऊनच निवडणुकीला उभे राहतील. आज थोड्याफार प्रमाणात संघाच्या बाबतीत असेच तर घडत आहे.
 
 
 
 
 
दिल्लीतील प्रसिद्ध तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात, हाच आशय प्रकट केला आहे. डॉ. मोहनजींचे शब्द आहेत- गेल्या 93 वर्षांत आम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थन केले नाही. आम्ही धोरणांचे समर्थन अवश्य केले आहे आणि आमच्या धोरणांचे समर्थन करण्याचा लाभ, जसजशी आमची शक्ती वाढते, तसा तो राजकीय पक्षांना मिळू शकतो. जे हा लाभ घेऊ शकतात, ते घेऊन जातात. जे नेऊ शकत नाहीत, ते तसेच राहतात.
 
 
 
 
थोडक्यात, महात्मा गांधीजींचा ‘सेवा सार्वभौम व सत्ता सेविका’ हा जो विचार आहे, तो समाजात प्रतिष्ठित करण्याचे काम संघ करत आहे. इतका संघ महात्मा गांधी यांच्या निकट आहे. हेही एक संघाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. आजच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळ्यात, या दृष्टीने संघाकडे बघितल्यास, मनातील संभ्रम दूर होण्यास निश्चितच मदत होईल, असे वाटते.
@@AUTHORINFO_V1@@