इजिप्त अरेबिक गणराज्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019   
Total Views |



इजिप्तचा इतिहास सांगतो की, या राम राजाने आशियातील अनेक भूप्रदेश जिंकले. मात्र, त्याच्यानंतर याने अनेक मंदिरेही बांधली. असा हा ‘रामराज्या’चा वारसा इजिप्तलाही आहे म्हणायचा.


इजिप्त म्हटले की रासायनिक औषधी लावून जतन करुन ठेवलेल्या ममी, पिरॅमिड यांच्या सुरस, चमत्कारिक, अजबगजब कथा डोळ्यासमोर येतात. इजिप्तची आपली अशी एक खास संस्कृती होती आणि आपल्या संस्कृतीशी या संस्कृतीचा परिचय पाश्चात्त्यांच्या भेटीआधीचा होता, हे विशेष. असे जरी असले तरी इजिप्तचा इतिहास चाळला असता भारतीयांच्या दृष्टीने एक संबंध जोडणारा दुवा आढळून येतो. तो दुवा असा की, इजिप्तचे १९ व २० व्या राजवंशातील राजे स्वत:ला ‘रामसेस’ म्हणवून घेत. त्यांच्यापैकी द्वितीय राम हा राजा इ. स. १३१५ मध्ये जन्माला आला. ६७ वर्षे त्याने राज्य केले. त्याने नुबियात सोन्याच्या खाणींचा शोध लावून राजकोष समृद्ध केला. त्याने अनेक मंदिरे बांधली. इजिप्तचा इतिहास सांगतो की, या राम राजाने आशियातील अनेक भूप्रदेश जिंकले. मात्र, त्याच्यानंतर याने अनेक मंदिरेही बांधली. असा हा ‘रामराज्या’चा वारसा इजिप्तलाही आहे म्हणायचा. अर्थात, हा झाला इतिहास, पण सध्या इजिप्तचे नाव चर्चेत आहे ते राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सिसी यांच्यामुळे. ते इजिप्तचे माजी संरक्षणमंत्री व लष्करप्रमुखही आहेत. सध्या या राष्ट्रपतींचे अनोखे निर्णय जगभरात गाजत आहेत.

 

इस्लामी पट्ट्यात असलेला हा देश. साहजिकच इस्लाम कट्टरपंथियांच्या दहशतवादी कृत्याचा त्रास या देशालाही आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक स्थिरता आणि समानता यांचे बाराच वाजलेले. या अशा बिघडलेल्या घडीला देशाची घडी बसवण्याचे काम राष्ट्रपती या नात्याने अब्देल फतेह अल-सिसी यांच्याकडे आहे. ते असेच आपले अनेक निर्णयही घेतात. जसे नुकतेच राष्ट्रपतींनी एक नवीन नियम काढला की, शहरातील सर्व वास्तू अगदी कार्यालय, प्रशासकीय वास्तूही त्यांच्या त्यांच्या मालकांनी वा संबंधित कर्मचार्‍यांनी मार्च महिन्यापर्यंत मातकट रंगाने रंगवाव्या. पण, त्याचबरोबर नाईल नदीकाठच्या सर्व प्रकारच्या वास्तू या आकाशी रंगात रंगवाव्यात. हे काम लोकांनी आणि प्रशासकीय इमारतींबाबत प्रशासकीय कर्मचार्‍यांनीही आपल्या पैशांनी करायचे आहे. तसे केले नाही तर त्यांना शिक्षा केली जाईल. यामुळे सर्व लोक हातातली कामे सोडून आपआपली घरे, कार्यालय, प्रशासकीय सेवेच्या वास्तू रंगवण्यात गर्क आहेत, तेही स्वतःच्या पैशाने. असे का करायचे? तर यावर राष्ट्रपतींचे म्हणणे आहे की, शहरामध्ये एकजिनसीपणा यायला हवा. सगळं समान, एकसारखं दिसायला हवं. तसे दिसायलाही चांगले दिसते आणि लोक नोंद घेतात.

 

फक्त राहत्या वास्तूच्या रंगसाधर्म्यामुळे लोकांमध्ये खरंच का समानता येईल? बरं, कुणाला मातकट रंग आवडत नसेल आणि इतर दुसरा रंग आवडत असेल तर? स्वतःच्या घराला आपल्या आवडीप्रमाणे रंग देण्याचा साधा हक्कही इथे नाकारला जात नाही का? इथे आपली आवडबिवड प्रकार नसावा. असो. तर हीच समानता इथे गरीब आणि श्रीमंतांच्या बाबतीतही आहे. श्रीमंतांनी शहरात आणि गरिबांनी गावात राहावे, हाही याच राष्ट्रपतींचा अजून एक अजब निर्णय. त्याचे झाले असे की, इजिप्तमध्ये महागाई वाढली. मग आर्थिक झळ बसली म्हणून इथल्या लोकांनी मूक निदर्शने केली. पण, या देशात त्यांच्यावर कारवाई केली गेली. इतके करूनही सरकार थांबले नाही, तर ज्यांना शहरातली महागाई परवडत नाही, त्यांनी शहरातच राहू नये, असाही न्यायनिवाडा सरकारने केला. त्यामुळे या देशामध्ये गरिबीच्या संकेतानुसार, जे गरीब आहेत ते शहरामध्ये राहण्यास पात्र नाहीत, असे सरकारने ठरवले. त्यानुसार शहरी गरिबांना शहाराबाहेर काढले जात आहे. याचे समर्थन करताना सरकार सांगत आहे की, शहरामध्ये बेकायदेशीररित्या वस्त्या करून राहणार्‍या लोकांना शहराबाहेर काढले जात आहे.

 

अर्थात, इजिप्तचे संकेत, आर्थिक सामाजिक परिस्थितीनुसार किंवा त्या देशाच्या सरकारने जे नियम बनवले ते देशाच्या हिताचे असतीलही, असे क्षणभर मानूया. पण, तरीही प्रश्न उरतो की, कुराण आणि शरियतला प्रमाण मानून जग चालावे, अशी बहुसंख्य मुस्लीम बांधवांची कट्टर नव्हे, तर अंतिम इच्छा असते. तसेच कुराणामध्ये तर समानता सांगितली आहे, असे सांगितले जाते. मग इजिप्त हे अरेबिक गणराज्य असून इस्लाम हा गणराज्याचा धर्म आहे. तरीही या अरेबिक गणराज्यामध्ये गरिबी-श्रीमंतीच्या निकषांवर लोकांमध्ये हा भेदभाव का? इस्लामप्रणित एकजिनसी समानता का नाही? अर्थात, इजिप्तमध्ये इस्लामनुसार राज्य चालते की नाही, याबद्दल काही देणेघेणे नाही. पण, सांगायचा मुद्दा हा की, कुणी कितीही धर्माचे नियम सांगितले तरी जो धर्म परिस्थितीनुसार स्वतःमध्ये अनुकूल बदल करतो, त्याच धर्माच्या चौकटी कायम राहतात. बाकी राष्ट्रीय धर्म म्हणून कोणत्याही देशाने स्वतःला मुस्लीम, इसाई, बौद्ध आणि निधर्मी म्हणून कितीही घोषित करू दे, काळाच्या परिक्षेपात टिकणारी तत्त्वच देश चालवतात, हेच खरं.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@