तख्तपालटाच्या वाटेवर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 

२०१४ साली व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे हुकूमशहा असल्याचा आरोप करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी शेजारी देश अर्थात अमेरिका आणि विरोधक तयारच होते.

 

दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; अर्थात व्हेनेझुएला हा देश. व्हेनेझुएलाची भौगोलिक रचना पाहिल्यास त्यांच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश, तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत. त्यामुळे व्हेनेझुएला तसा पर्यटकांच्या कायम आकर्षणस्थानी राहिलेला देश. मात्र, सध्या हा लॅटिन अमेरिकन देश आपल्या अंतर्गत राजकारणामुळे जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. व्हेनेझुएलाची राजकीय परिस्थिती एवढी अस्ताव्यस्त झाली आहे, की विरोधकांनी आपल्यातल्याच एकाला ‘कार्यकारी राष्ट्रपती’ म्हणून जाहीर करुन टाकले आणि व्हेनेझुएला तख्तपालटाच्या वाटेवर येऊन उभा राहिला. हा वाद खरंतर बऱ्याच काळापासून सुरू आहे. २०१४ साली व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे हुकूमशहा असल्याचा आरोप करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी शेजारी देश अर्थात अमेरिका आणि विरोधक तयारच होते. मुळात अमेरिकेला मिरच्या झोंबण्याचे कारण म्हणजे आपल्या एका भाषणात मादुरो यांनी अमेरिकेवर घणाघाती टीका केली आणि अमेरिका हा पाठीत खंजीर खुपसणारा मित्र आहे, अशी जळमळीत टीका केली. त्यानंतर अमेरिकेसोबत असणारे सर्व व्यवहार मादुरो यांनी मोडून काढले. याचाच राग म्हणून की काय, विरोधी पक्षप्रमुख खुआन गोईदो यांनी स्वत:ला ‘कार्यकारी राष्ट्रपती’ म्हणूनच घोषित केले आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अगदी क्षणाचाही विलंब न लावता गोईदो यांच्या निर्णयाचे चक्क स्वागत केले.

 

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच निकोलस मादुरो यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाची शपथ घेतली. मात्र, निवडणुकीदरम्यान मादुरो यांच्यावर मते मिळवण्यासाठी निवडणुक व्यवस्थेत अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला. मादुरो यांनी २०१३ ला राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली आणि तेव्हापासून जश्या मुंग्या साखरेला चिकटतात, तशी संकटं व्हेनेझुएलाला चिकटली. एका इंग्रजी वृत्तपत्राने जाहीर केलेल्या माहितीनुसार, गेल्या २०१३ पासून ६० टक्के व्हेनेझुएलावासींनी अमेरिकेत किंवा इतर शेजारी राष्ट्रांमध्ये पलायन केले. याचे प्रमुख कारण म्हणजे मादुरो यांना नको असलेली अमेरिकेसोबतची मैत्री. यामुळे व्हेनेझुएलामध्ये लोकांना दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्किल झाले आहे. व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पेट्रोलविक्रीमुळे मिळणाऱ्या महसुलावर चालते आणि व्हेनेझुएलामधून अमेरिका सर्वात जास्त पेट्रोल विकत घेत असे. मात्र, मादुरोंच्या धोरणांमुळे अमेरिका आणि संलग्न देशांच्या कंपन्यांनी व्हेनेझुएलातील गुंतवणूक थांबवली आणि परिणामी लाखो व्हेनेझुएलावासींना देशाबाहेर स्थलांतर करावे लागले. आर्थिक स्थिती बेताची असताना दुसरीकडे मादुरोंनी अमेरिकेसोबत असलेले सर्व संबंध तर तोडले, उलट अमेरिकेच्या राजदूतांना ७२ तासांत व्हेनेझुएला सोडण्यासही भाग पाडले.

 

या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत डोनाल्ड ट्रम्प आणि व्हेनेझुएला संसदेचे अध्यक्ष खुआन गोईदो यांनी ‘गो अवे मादुरो’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केली. या मोहिमेत मादुरोंनी अभियानात सामील लोक देशद्रोही असल्याचे जाहीर करत त्यांच्यावर गोळीबार केला आणि यात १४ लोकांचा मृत्यू झाला. अखेर या सगळ्या जुलमी हुकूमशाहीला कंटाळून बुधवारी गोईदो यांनी स्वत:लाच ‘कार्यकारी राष्ट्रपती’ घोषित केले. यानंतर नेहमीप्रमाणे दोघांच्या भांडणात अमेरिकेने हस्तक्षेप करत ‘पूर्व राष्ट्रपती मादुरो’ यांच्याकडे कोणतेही अधिकार नाही, असे घोषित करत लष्करालाही विनंती केली की, तुम्ही गोईदोला समर्थन करा. यात गोईदो यांनी घेतलेले धोरण चुकीचे नसले तरी, यात फरफट होत असलेल्या सामान्य नागरिकांचा विचार करायला हवा होता. कारण, गोईदो यांनी जरी स्वत:ला ‘राष्ट्रपती’ घोषित केले असले तरी, मादुरो यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिलेला नाही आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता अधिक आहे. सध्या व्हेनेझुएलाचे नागरिक एकच मागणी करीत आहेत, ती म्हणजे स्वातंत्र्याची. १८११ साली कागदावर स्वातंत्र्य मिळालेल्या या देशात आजही ७० टक्के शिक्षित जनता नोकरीशिवाय आणि अन्नाशिवाय फक्त स्वातंत्र्याची वाट पाहत आहे. ही खरंतर लाजिरवाणी बाब आहे, की जो प्रश्न विचारविनिमयाने सुटू शकतो, त्याचं जागतिक राजकारण करून इतर देश आपली पोळी भाजत आहेत आणि जरी या हुकूमशाहीतूनही या लोकांची सुटका झाली तरी, गोईदो काही अमेरिकेची साथ सोडणार नाही, म्हणजे व्हेनेझुएलामध्ये पुन्हा ये रे माझ्या मागल्या...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@