अपरिवर्तनीय कर्जरोख्यातील गुंतवणुकीचा पर्याय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019   
Total Views |



अन्य गुंतवणूक पर्यायांसारखा अपरिवर्तनीय कर्जरोख्यांत गुंतवणूक हा एक पर्याय आहे. अपरिवर्तनीय कर्जरोखे वेगवेगळ्या मुदतींचे व मुदतींप्रमाणे वेगवेगळ्या व्याजदराचे विक्रीस काढले जातात. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहात, हे निश्चित केल्यावर मग या पर्यायाचा विचार करता येईल. तेव्हा, यासंबंधीची अधिक माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.


कंपन्या, वित्तीय संस्था ज्याप्रमाणे निधी उभारण्यासाठी भागभांडवल वाढवण्यासाठी शेअर विक्रीस काढतात, त्याचप्रमाणे कर्जरोखेही विक्रीस काढतात. कर्जरोखे दोन प्रकारांनी विक्रीस काढले जातात, अपरिवर्तनीय तसेच परिवर्तनीय. अपरिवर्तनीय कर्जरोख्यांत गुंतवणूकदाराला गुंतविलेल्या रकमेवर व्याज मिळते व मुदतीअंती गुंतवलेली रक्कम परत मिळते. परिवर्तनीय रोखे मुदत संपल्यावर त्यांचे शेअरमध्ये परिवर्तन केले जाते. म्हणजे कर्ज रोखेधारक कालांतराने भागधारक होतात. गेल्या दोन महिन्यांत अपरिवर्तनीय कर्जरोख्यांचे सहा ‘पब्लिक इश्यू’ गुंतवणुकीसाठी उपलब्ध होते. यांचे वार्षिक व्याजदर ९ टक्के ते १०.२५ टक्के या दरम्यान होते. हे कर्जरोखे शेअर बाजारात ‘लिस्ट’ केले जातात. त्यामुळे ते विक्रीस काढलेल्या कालावधीत जर कोणी विकत घेतले नाही, तर ते नंतर शेअर बाजारातून विकत घेऊ शकतात.

 

क्रेडिट रेटिंग

 

कर्जरोख्यांत गुंतवणूक करताना त्यांचे ‘क्रेडिट रेटिंग’ पाहावे. क्रेडिट रेटिंग चांगले असेल तर गुंतवणुकीवर नियमित व्याज मिळेल व मुदतीअंती मूळ रक्कम परत मिळेल, याची ग्वाही असते. जर ‘एएए’ (ट्रिपल ‘ए’) असे जर रेटिंग असेल तर अशा कर्जरोख्यांत गुंतवणूक करणे योग्य. हे रेटिंग असलेल्या कर्जरोख्यांत गुंतवणूक करणे कमी जोखमीचे. त्यानंतर ‘एए’ रेटिंग. हे रेटिंग असलेल्या कर्जरोख्यांत गुंतवणूक करण्यास हरकत नाही. ‘बीबीबी’ रेटिंग असेल तर डोळे झाकून गुंतवणूक करावी. कॅश फ्लो समृद्ध असलेल्या कंपन्यांच्या किंवा वित्तीय संस्थांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक करण्यास हरकत नाही. ज्या कंपनीवर कर्ज कमी असते आणि कॅश बॅलन्स जास्त असतो, अशा कंपन्यांना चांगले क्रेडिट रेटिंग मिळते. गुंतवणूकदाराला वैयक्तिकरित्या प्रत्येक कर्जरोखे विक्री करणाऱ्या संस्थेचा आर्थिकदृष्ट्या अभ्यास करणे जमेलच, असे नाही. त्यामुळे क्रेडिट रेटिंग करणाऱ्या भारतातील यंत्रणांवर विश्वास ठेवावाच लागतो. आतापर्यंत तरी क्रेडिट रेटिंग करणाऱ्या कंपनीविरुद्ध वाद निर्माण झालेले नाहीत किंवा या यंत्रणांबद्दल शंकाही उपस्थित केल्या गेलेल्या नाहीत. सध्या कोणीही परिवर्तनीय रोखे विक्रीस काढत नाही. अपरिवर्तनीय कर्जरोखेच बाजारात येतात. त्यामुळे यात गुंतवणूक करताना क्रेडिट रेटिंगला महत्त्व द्यावे. त्यानंतर यातून मिळणाऱ्या नियमित उत्पन्नाचा मुद्दा विचारात घ्यावा. गरज पडल्यास यात गुंतवलेली रक्कम पटकन मिळेल की नाही, मुदतपूर्व मिळेल की नाही, हा मुद्दा विचारात घ्यावा. शेवटचा मुद्दा म्हणजे हे कर्जरोखे करमुक्त नाहीत. त्यामुळे कर कापून प्रत्यक्षात किती परतावा मिळणार, हा मुद्दा विचारात घ्यावा.

 

नियमित उत्पन्न

 

अपरिवर्तनीय कर्जरोखे वेगवेगळ्या मुदतींचे व मुदतींप्रमाणे वेगवेगळ्या व्याजदराचे विक्रीस काढले जातात. गुंतवणूकदारांना जर तिमाही, सहामाही असे निश्चित कालावधीने व्याज हवे असेल, तर तसे मिळू शकते किंवा मुदतीअंती पूर्ण एकत्रित व्याज व मूळ रक्कम मिळू शकते. मुदतीअंती संपूर्ण व्याज घेतल्यास, मध्ये मध्ये घेतलेल्या व्याजातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम हातात मिळू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहात, हे निश्चित करा. तुम्हाला पैशाची कधी गरज आहे व अल्प व दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीबाबत तुमचे काय निर्णय आहेत, यानुसार गुंतवणुकीचा कालावधी ठरवावा. तुम्ही दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी कर्जरोखे हा पर्याय निवडला असेल तर सर्वाधिक कालावधीत गुंतवणूक करावी. नियमित उत्पन्न हवे म्हणून जर गुंतवणूक करणार असाल तर व्याजाचा कालावधी निश्चित करावा लागेल. बँकांच्या मुदत ठेवींवर जसे मासिक व्याज मिळते, तसे यात मिळत नाही. पण, त्रैमासिक, सहामाही वगैरे कालावधींनी व्याज मिळू शकते. करमुक्त बॉण्ड्स हा पर्यायही आहे. सरकारी कर्जरोखे हा पर्यायही उपलब्ध आहे. करमुक्त बॉण्ड्स किंवा सरकारी कर्जरोखे शेअरबाजारातूनही विकत घेता येतात. मध्ये मध्ये व्याज घ्यायचे की मुदतपूर्तीच्या वेळी एकदम घ्यायचे, याचा निर्णय तुमचा तुम्हीच, तुमची पैशाची गरज पाहून घ्यावयास हवा. तुम्हाला मध्ये-मध्ये पैशाची गरज नसेल, तर मुदतीअंती सर्व व्याज घ्या, जी रक्कम जास्त मिळेल.

 

पैशात रूपांतर

 

माणसाला कधीही पैशाची गरज पडू शकते. त्यावेळी गुंतवणुकीतला पैसा तत्काळ मिळणे गरजेचे असते. त्यामुळे अपरिवर्तनीय कर्जरोख्यांतून मुदतपूर्व पैसे मिळू शकतात का, ते गुंतवणुकीच्या कालावधीत विकता येतात का, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.शेअरबाजारात जर अपरिवर्तनीय कर्जरोखे ‘लिस्ट’ असतील तर ते विकणे शक्य होते.काही काही कर्जरोखे मुदतीच्या कालावधीत ‘सरेंडर’ करता येतात. पण, बँकांच्या मुदत ठेवींत गुंतविलेली रक्कम जशी गुंतवणुकीच्या मुदतीत सहज मिळू शकते, तेवढ्या सहजतेने यात मिळणार नाही. ‘फिजिकल’ सोन्यात गुंतवणूक असेल तर त्यांचे रूपांतर पैशांत तत्काळ होऊ शकते. सरकारी योजनांतील गुंतवणुकीचे पैशात रूपांतर होण्यास बऱ्याच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. सध्या ‘हाऊसिंग’मध्ये केलेली गुंतवणूक पूर्णतः ब्लॉक झालेली आहे. ‘हाऊसिंग’ क्षेत्र गेली कित्येक वर्षे मंदीत असल्यामुळे खरेदीदारांची वानवा जाणवत आहे.

 

आयकर किती?

 

अपरिवर्तनीय कर्जरोख्यांवर मिळणारे व्याज करपात्र आहे. त्यामुळे हे व्याज गुंतवणूकदाराच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट करावे लागते. जर तुम्हाला १०.४० टक्के दराने आयकर आकारला जात असेल, तर ज्या कर्जरोख्यांवर तुम्हाला ९ टक्के व्याज मिळत असेल ते प्रत्यक्षात आयकर कापून ८.१० टक्के परतावा मिळणार. ९.५ टक्के व्याजाच्या कर्जरोख्यांवर प्रत्यक्षात आयकर कापून ८.५ टक्के व्याज हातात पडते. १० टक्के व्याजाच्या कर्जरोख्यांवर आयकर प्रत्यक्षात कापून ९ टक्के व्याज हातात मिळते. जर तुम्ही २०.८० टक्के दराने आयकर भरत असाल, तर ९ टक्के व्याजाचे तुम्हाला ७.१ टक्के व्याज, ९.५ टक्के व्याजाचे ७.५ टक्के व्याज व १० टक्के व्याजाचे ७.९ टक्के व्याज मिळणार. तुम्ही जर ३१.२० टक्के दराने व्याज भरत असाल तर, तुम्हाला ९ टक्के व्याजाचे ६.२ टक्के, ९.५ टक्के व्याजाचे ६.५ टक्के व १० टक्के व्याजाचे ६.९ टक्के व्याजच प्रत्यक्षात हातात पडणार. जर तुम्ही ३५.३३ टक्के दराने आयकर भरत असाल, तर ९ टक्के व्याजाचे ७.८ टक्के, ९.५ टक्के व्याजाचे ६.१ टक्के व १० टक्के व्याजाचे ६.४ टक्के व्याज हातात मिळणार. आयकर कपातीमुळे कर्जरोख्यांवर मिळणारे चांगले व्याजदर हे गुंतवणूकदारांसाठी मृगजळ ठरू शकते. अन्य गुंतवणूक पर्यायांसारखा अपरिवर्तनीय कर्जरोख्यांत गुंतवणूक हा एक पर्याय आहे. यातील गुंतवणुकीची इथ्यंभूत माहिती वर दिलेली आहे. ही माहिती वाचून तुमच्याकडे गुंतवणुकीस उपलब्ध असलेल्या पैशानुसार तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार विचार करून हे ‘प्रॉडक्ट’ गुंतवणुकीस योग्य आहे का, याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@