शौर्यसूर्य मावळला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019   
Total Views |


 

भारतमातेच्या आणि भारतीय जनतेच्या सुरक्षेसाठी लढणारे नझीर वानी कोण होते? आता त्यांची आठवण येण्याचे नेमके कारण काय? हे प्रश्न उपस्थित होतात. जाणून घेऊया याबद्दलच...


जो अब तक ना खौला,

वो खून नहीं पानी है-

जो देश के काम ना आये,

वो बेकार जवानी है!

 

मातृभूमीच्या एकता, अखंडता व सार्वभौमत्वासाठी जीवावर उदार होऊन जवानांनी प्राणार्पण केल्याचे आपल्याला माहितीच आहे. अगदी १९४७च्या पहिल्या पाकिस्तानी आक्रमणापासून ते कालपरवापर्यंत दहशतवाद्यांशी लढता लढता स्वातंत्र्यवेदीवर आहुती देणाऱ्या तरुणांची हौतात्म्यमाला भारतभूच्या चरणांवर वाहिली गेली. याच मालेतील एक पराक्रमी रत्न म्हणजे नझीर वानी. गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना नझीर वानी यांना वीरमरण आले. जे भाग्य आपल्या नशिबी यावे म्हणून शेकडो लोक कामना करतात, ते नझीर यांच्या वाट्याला आले. तरीही भारतमातेच्या आणि भारतीय जनतेच्या सुरक्षेसाठी लढणारे नझीर वानी कोण होते? आता त्यांची आठवण येण्याचे नेमके कारण काय? हे प्रश्न उपस्थित होतात. जाणून घेऊया याबद्दलच...

 

सुरुवातीला उल्लेख केलेल्या पंक्तीतील शब्दांप्रमाणेच खरेतर नझीर वानी यांचे आयुष्य. आपल्यावर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराकडे पाहून नझीर वानी यांचे रक्त एकदा नव्हे तर दोनदा सळसळले, खवळले. एकदा वाईटासाठी आणि एकदा चांगल्यासाठी! चांगल्यासाठी कार्य करत असताना नझीर वानींच्या जगण्याला तर अर्थ प्राप्त झालाच. पण, त्यांचे बलिदानही असंख्यांच्या हृदयात त्यांना अमर करून गेले. दहशतवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अश्मुजी हे नझीर वानी यांचे मूळ गाव. आयुष्याच्या प्रारंभी वाईट विचारांच्या अन् माणसांच्या संगतीत आल्याने त्यांची पावले फुटीरतेकडे, दहशतवादाकडे वळली. जणू काही दहशतवाद हेच काश्मीर समस्येवरचे एकमेव उत्तर असल्याचे नझीर यांच्या मनावर ठसले. दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या वानी यांना ’इख्वान’ म्हणून ओळखले जाऊ लागले. हातात बंदूक घेऊन मग कोणाशी ना कोणाशी त्यांचा तंटा-बखेडा सुरू झाला. पण, लवकरच त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांना आपली चूक उमगली. दहशतवाद हे कोणत्याही प्रश्नावरचे उत्तर असू शकत नाही, हे त्यांना पटले आणि त्यांनी दहशतवादाचा मार्ग सोडून शरणागती पत्करली. इथूनच नझीर यांचे रक्त देशसेवेसाठी उसळले आणि त्यांनी भारतीय लष्करात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

 

२००४ साली लष्करात प्रवेश केल्यापासून नझीर वानी काऊंटर इनसर्जेंन्सी ऑपरेशन्स म्हणजेच दहशतवाद्यांना निपटून काढण्याच्या कार्यक्रमाचा भाग झाले. सुरुवातीला प्रादेशिक सेनेच्या १६२व्या बटालियनचा भाग असलेल्या नझीर यांनी आपल्या सेवाकाळात कितीतरी दहशतवादविरोधी मोहिमेत सहभागी होत दहशतवाद्यांचा खात्मा केला. धाडसी स्वभाव असलेले वानी अशा मोहिमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असत. याच उत्साहामुळे त्यांनी २००७ साली सैन्यपदकदेखील पटकावले. वीरता आणि देशभक्तीच्या गुणांची कदर करत देशाने २०१८ सालीदेखील ऑगस्ट महिन्यात त्यांना सैन्यपदकाने सन्मानित केले. मात्र, नोव्हेंबरच्या २५ तारखेला काळाने घात केला आणि अवघ्या ३८व्या वर्षी नझीर वानी हुतात्मा झाले. गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला वानी ‘३४ राष्ट्रीय रायफल्स’ बटालियनच्या सहकाऱ्यांसोबत कर्तव्यावर होते, त्याचवेळी गुप्तचरांकडून शोपियाँच्या बटागुंड गावात हिजबुल मुजाहिद्दीनचे सहा दहशतवादी लपल्याची सूचना मिळाली. वानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे या दहशतवाद्यांना रोखण्याची जबाबदारी देण्यात आली. दहशतवाद्यांना भिडण्याच्या कामगिरीवर निघालेल्या वानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. नझीर वानी यांनी स्वतः दोन, तर सहकाऱ्यांसह सहाही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, या चकमकीत नझीर वानी दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले व त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. इथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढे वानी यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. दहशतवाद्यांसाठी आक्रोश करणारे गाव यावेळी मात्र नझीर वानी यांच्यासाठी अश्रू गाळत होते. संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली, दुकाने बंद आणि चेहरे म्लान दिसत होते. गावकरी आपल्या मातीत जन्मलेल्या सुपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी पार्थिवाजवळ जात होते. नझीर वानी ज्या ध्येयासाठी हुतात्मा झाले, त्याची जाणीव गावकऱ्यांच्या डोळ्यात होती. जणू ते सांगत होते की, नझीरने काश्मीर आणि काश्मिरींच्या आयुष्याला जिहाद्यांपासून व त्यांच्या दलालांच्या गुलामीतून स्वतंत्र करण्यासाठी बलिदान केले. यावेळी नझीर यांची पत्नी, मुलगा व मुलगीही हजर होते.

 

२६ नोव्हेंबर, २०१८ रोजी नझीर वानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी नझीर वानी यांच्या सन्मानार्थ त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. दहशतवाद्यांशी लढताना दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल आजच नझीर वानी यांना देशाचा शांतीकाळातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार ‘अशोकचक्र’ देण्याची घोषणा राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आली. येत्या प्रजासत्ताकदिनी नझीर यांचे कुटुंबीय हा पुरस्कार स्वीकारतील. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी दहशतवादाचा पोकळ मार्ग सोडून हौतात्म्य प्राप्त झालेल्या नझीर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे अभिवादन!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@