एवं सच्चिदानंद प्रवादू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |

 


 
 
 
भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला आपल्या प्राप्तीचे मार्ग दाखवले. केवळ मार्ग न दाखवता ते त्याला बोटाला धरून घेऊन गेले. भगवंत अवतार समाप्तीसाठी जाऊ लागले तेव्हा जसे बालक आपल्या मातेने कडेवर उचलून घेण्यासाठी रडू लागतं, तसा उद्धव मोठमोठ्यानं रडू लागला. गरुडाच्या पाठीवर भगवंतानं आपल्याला बसवून भगवंतासमवेत घेऊन जावं, यासाठी हट्ट करू लागला. भगवंताने दया येऊन उद्धवाला विविध साधनांद्वारे प्राप्ती कशी करून घ्यावी हे सांगितले. महत्त्वाचं म्हणजे, भगवंत परमात्मा परमेश्वर कुठेही जात नाही आणि येत नाही. तो कायम सर्वत्र असतो.
 

भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला उपदेश करून संपूर्ण जगावर उपकार केले. उद्धवाला आपल्या सगुण भक्तीचे बारकावे कथन केले. सगुणाची साधना सामान्य लोकांसाठी निर्गुण साधनेपेक्षा सुलभ आहे, हे भगवंताने जाणले होते. श्रीकृष्णाने भागवतामध्ये योगमार्ग, निर्गुण ध्यानमार्ग, योगी लोकांसाठी कथन केला. तो मार्ग अवघड व कठीण आहे. यम, नियम, ध्यान, धारणा इ. विविध अंगे या मार्गामध्ये येतात. निर्गुण, निराकार तत्त्व आकलनाच्या पलीकडील आहे. त्यामुळे या मार्गावर चालताना तोल सांभाळून भगवंतप्राप्ती सहज साध्य नाहीभगवान श्रीकृष्ण आपल्या कोणत्या रुपाचं ध्यान करावं ते सांगतात,

 

सर्वांग सुंदर श्यामवर्ग।


ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन।


सुमुख आणि सुप्रसन्न।
 

मूर्तीचे ध्यान करावे॥

 


सर्वांग सुंदर, शामल वर्णाच्या, गंभीर आणि अत्यंत श्रेष्ठतम मूर्तीचं ध्यान करावं भगवंत भक्ताला उदारपणाने देण्यासाठी उभा असतो. अत्यंत प्रसन्न आणि स्मितवदन असणाऱ्या मूर्तीचं ध्यान केल्याने भगवंताची प्राप्ती होते. पुढे उद्धवाच्या माध्यमातून समस्त साधकांना सांगतात,

 

ते आनंदी आनंदयुक्त।

 

जाहलिया आपुलें चित्त॥

 

आनंदाची उपलब्धी तेथ।

 

होय सुनिश्वित साधकां॥
 

साधकाचं चित्त संपूर्ण आनंदाने भरतं. इतर कोणत्याही गोष्टी त्याच्या चित्तामध्ये प्रवेश करू शकत नाही. तो आनंदयुक्त होऊन आनंदरूप होतो. असा आनंदरूप साधक मला प्राप्त करण्याच्या पर्वताच्या एक एक पायऱ्या चढत असतो. चढताना तो अजिबात दमत, थकत नाही. आनंदघन, आनंदरूप परमात्मा व साधकाचे चित्त एकरूप झाले की, दु:ख चिंता याला तसूभरही जागा उरत नाही. तो सदैव आनंदाच्या झुल्यावर मनसोक्त झोके घेतो. त्या झोक्यावर झुलताना त्याला कशाचेही भान राहत नाही, तो देहभान विसरून जातो. या आनंदाचा प्रकाराच वेगळा असतो. चित्तामध्ये आनंद कोंदतो. साधकाला असं सगुण ध्यान आवडू लागतं. त्याची अवीट गोडी चाखल्यामुळे तो अन्य साधनमार्गांचा अवलंब करत नाहीअशा साधकाला काय प्राप्त होतं ते श्रीकृष्ण सहजपणाने सांगतात,

 

यापरी तीव्र ध्यानस्थिती।

 

समाधिपर्यंत माझी प्राप्ती॥

 

साधकासी होय शीघ्रगती।

 

यथानिगुती ध्यान करिता॥

 

साधकाला परमप्राप्ती सगुण ध्यानामुळे होते. दृढ भावाने आणि अचल असे ध्यान अनेक उत्तमाची प्राप्ती करून देणारं आहे. ध्यान करता करता समाधीची उच्चस्थिती प्राप्त होते. समाधी अवस्थेमध्ये तो परमात्म्याला जाऊन मिळतो. म्हणजे साधक भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो. श्रीकृष्ण आपल्या प्राप्तीचं गुह्य उकलून सांगतात. भगवंतच हा गहन विषय सुलभ करून सांगतात, ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. यामागे आपल्या शिष्यांची आणि त्याद्वारे अगणित साधकांची प्रगती साधण्याचा उदात्त उद्देश आहे. जगतामधील अनेक योनींमधील श्रेष्ठ योनी असलेल्या मनुष्ययोनीत जन्म दिला हे त्या परमात्म्याचे ऋण आहेत. ते फेडण्यासाठी भगवंताला सृष्टीमधील नश्वर गोष्टी अर्पण करून उपयोग नाही. त्याला सोनं, चांदी, माणिक, मोती, रत्न याची आवड नाही. त्याला संपत्ती देणं हा ऋणमुक्तीचा मार्ग नाही.

 

भगवंताला आवडणाऱ्या गोष्टी केल्या की, तो खूश होतो. त्याला भोळी, भाबडी भक्ती भावते. त्याचप्रमाणे सगुण ध्यानाच्या साधनेत रममाण होणारे साधक आवडतात. मन, बुद्धी, चित्त त्याला अर्पण केलं की, तो प्रसन्न होतो. जन्माचे प्रयोजन शोधणारे, त्याकरिता प्रयत्नशील असणारे त्याला मनापासून आवडतात. शिवाय मानवयोनीचं सार्थक कशात आहे, याचा कृतिशील विचार जीवनात उतरवणारे साधक त्याला प्रिय असतात. अशा साधकांना, भक्तांना तो ध्येयाप्रत नेण्यासाठी मनापासून मदत करतो. आत्मस्वरूप जाणण्याच्या निश्चयाला बळकटी देतो. या मार्गावरील संकंटरुपी, विघ्नरुपी काटे स्वत: भगवंत उचलून टाकतो. एकदा भक्ती मनात ठसली, साधना साधली की केवळ आनंद आणि आनंदच उरतो. भगवंत सांगतात,“मी केवळ आनंदरूप आहे. ज्याला हा आनंद, परमानंद, सच्चिदानंद सापडला की मीच त्याला गवसतो. मग दु:खाचा लवलेश नसणारा आनंदघन परमात्मा प्राप्त झाला की प्राप्त करण्याजोगे काहीच उरत नाही. त्याचा मानवजन्म सफल झाला असे समजायला हरकत नाही.”

 

भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला आपल्या प्राप्तीचे मार्ग दाखवले. केवळ मार्ग न दाखवता ते त्याला बोटाला धरून घेऊन गेले. भगवंत अवतार समाप्तीसाठी जाऊ लागले तेव्हा जसे बालक आपल्या मातेने कडेवर उचलून घेण्यासाठी रडू लागतं, तसा उद्धव मोठमोठ्यानं रडू लागला. गरुडाच्या पाठीवर भगवंतानं आपल्याला बसवून भगवंतासमवेत घेऊन जावं, यासाठी हट्ट करू लागला. भगवंताने दया येऊन उद्धवाला विविध साधनांद्वारे प्राप्ती कशी करून घ्यावी हे सांगितले. महत्त्वाचं म्हणजे, भगवंत परमात्मा परमेश्वर कुठेही जात नाही आणि येत नाही. तो कायम सर्वत्र असतो. त्याचा सगळीकडे नित्य वास असतो. एकदा हे जाणलं की शिष्य, भक्त, साधक कायम मुक्तीचा अक्षय आनंद उपभोगू शकतो, हे कथन केलं. मग अशी अनुभूती देणाऱ्या भगवंताच्या चरणी जीवनपुष्प अर्पण करावंसं वाटणं स्वाभाविक आहे.

 

- कौमुदी गोडबोले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@