भुसावळ शहराच्या विकास आराखड्याचे सर्वेक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019
Total Views |

 सहा गटांकडून सर्वेक्षण, प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण, डाटा संकलन;नियोजन तज्ञ रावल यांचे मार्गदर्शन

 

 
भुसावळ, 22 जानेवारी
भुसावळ शहराच्या विकासाच्या दृष्टीने 17 ते 23 जानेवारीदरम्यान डॉ. प्रताप रावल, नियोजनतज्ज्ञ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या पथकाने शहराचे सर्वेक्षण केले. त्याअनुषंगाने या पथकाच्या काही प्रतिनिधींसोबत ‘तरुण भारत’ कार्यालयात संवाद साधला असता शहराच्या सर्वेक्षणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
टाऊन प्लानिंग अधिकारी शशिकांत निकम, नेहा उमेकर, मैत्रेही सावंत यांच्याशी संवाद साधला असता शहरात 6 गटांद्वारे रेल्वे आणि वनविभागाची जागा सोडून न.प. हद्दीतील सर्व जागांचे सर्व्हेेक्षण करण्यात आले. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन माहिती जाणून घेतली गेली. पथकातील बहुतेक विद्यार्थ्यांची सर्वेक्षण करण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच भुसावळ शहरातसुद्धा प्रथमच सर्वेक्षण होत होते, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. शहरात विकासकामांना भरपूर संधी आहेत. अनेक ठिकाणी खुल्या भूखंडाची आवश्कता दिसून येते. आरक्षित भूखंड आहे, त्याच स्थितीत आहे. भूखंड ज्या कामांसाठी आरक्षित आहेत, त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. पथकाने प्रत्यक्ष स्थळावर जाऊन जमा केलेला डेटा एकत्रित करून शहरासाठी प्रस्तावित विकास आराखडानिर्मिती केली जाणार आहे. शहराचा भविष्यातील 20 वर्षांचा विचार करता आरक्षित भूखंड वाढवावे लागणार आहेत. पाणीपुरवठा, गटार, रस्ते यांचा विकास करून शहराचा चांगला विकास होऊ शकतो. न.प.चा विस्तार पाहता मिळणार्‍या महसूलातून हे शक्य होऊ शकते. कचरा व्यवस्थापन करण्याची गरज असून विद्यालयांजवळ असलेल्या कचराकुंडीच्या बाहेर कचरा पडलेला असतो. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी नियोजन पाहिजे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीची गरज आहे. शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन आवश्यक आहे. पाणी सोडण्याची वेळ आणि किती वेळ सोडावे, याचे नियोजन गरजेचे आहे. नागरिकांमध्ये संवादाची कमी जाणवते. खुले भूखंडांचा योग्य वापर केल्यास नागरिकांचा अंतर्गत संवाद वाढू शकतो. शहरात पथदिवे भरपूर आहेत. परंतु त्यासाठी सौरऊर्जेचा वापर केल्यास लाभदायी होऊ शकणार आहे.
 
 
वाहतूक समस्या
येथील नागरिकांमध्ये अजूनही सायकल लोकप्रिय आहे. आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हे फायद्याचे आहे. पादचार्‍यांसाठी फूटपाथ नाही. तसेच शहरात ठरावीक वेळ सोडल्यास वाहतुकीची कोंडी होत नाही. काही ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची गरज आहे. रस्ते रुंदी करणाची 10 ठिकाणे न.प.ने नोंदणी केलेली आहेत तर 6 ठिकाणे बाकी आहे. रस्त्यांमध्ये काही चौकात सर्कल हे व्यवसायाच्या जागेला लागून आहेत, त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवू शकते. कालीपिलीसाठी स्वतंत्र थांब्याची व्यवस्था केल्यास वाहतुकीची समस्या कमी होऊ शकते. महामार्ग शहरातून गेला आहे. रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. बसस्थानकाचे स्थलांतरण केल्यानंतर महामार्ग ते रेल्वेस्थानक अशी शहर वाहतूक सेवा सुरू करण्यास वाव आहे.
 
 
वृक्षारोपणाची गरज
शहरात लावण्यात आलेली झाडे मृत आहेत. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड आवश्यक आहे. शहरात उपक्रमांची कमतरता आहे. रुग्णालयांची संख्या कमी आहे. तसेच मैदानांचा विकास अपेक्षित आहे. या पथकात आकांक्षा बलदी, साक्षी डहाके, रागगौरी कांचन, स्वप्निल कामठे, प्रिया बायस, जसलीन होरा, सोनिका काकडे, प्रज्ञा पाटील, हर्षदा वाघ, आकांक्षा जोशी, शुभांगी शेंडे, संपदा जांभूळकर, स्वप्निल बिलारी, शुभम कुरळे, महेंद्र अहिरवार, शशिकांत निकम, प्रताप रावल, केदारसिंग पायल, निखिल बद्रीके, दुर्गाचित्र रामाडुगू, नेहा उमेकर, मैत्रेही सावंत, मयांक पारिख, हिमांगी शर्मा, रिचा सातिजा, सौरभ जाधव, निशाद जोशी, आकाश अटाळे, रितू सांगलीकर, स्नेहल पतंगे, सायली सोनवणे यांचा समावेश होता.
 
 
तीन महिन्यात होऊ शकतो आराखडा
केलेल्या सर्वेक्षणाची सर्व माहिती गोळा करून जागावापराचा अहवाल बनवून लोकांशी चर्चा करण्यात येईल. पुढील 20 वर्षांचा विचार करून जमिनीचा वापर आणि नियोजन असेल. या सर्व प्रक्रियेला 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
डॉ. प्रताप रावल, नियोजनतज्ज्ञ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे
 


 
 
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केली पाहाणी
शहराचा विकास आराखड्यासाठी आ. संजय सावकारे यांच्या यांच्या पाठपुराव्याने पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नगरनियोजन (एम टाउन प्लॅनिंग)विभागाच्या पहिल्या वर्षाच्या 31 विद्यार्थ्यांचे पथक शहराच्या आठवडाभराच्या भेटीवर 17 पासून आले आहे. शहराची पाहणी करून डॉ.प्रताप रावल व इतर विविध विभागांच्या मान्यवर अधिष्ठाते व अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखडा तयार करण्याचे काम केले गेले.
 
@@AUTHORINFO_V1@@