मुंबईतील मलजल प्रक्रिया केंद्रांची रखडलेली कामे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2019   
Total Views |

 



 
 
 
मुंबईचा खाडी किनारा, समुद्र किनारा प्रदूषित करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे मानवी मलजल. हे मलजल सध्या प्रक्रिया करुन समुद्रात सोडले जात असले तरी त्या पाण्याची गुणवत्ता परिपूर्ण नाही. या सर्व प्रक्रियेची माहिती देणारा हा लेख...
 

मुंबईत मलजल वाहिन्या टाकणे व प्रक्रिया प्रकल्प बांधणे (MSDP) यासंबंधीचे नियोजन २००२ सालापासून म्हणजे १०-१५ वर्षांहून जास्त काळापूर्वी झाले आहे. परंतु, मुंबईतील निवासी वस्तीतील एकूण मलजलापैकी २५ टक्के मलजल प्रक्रियेविना खाडीमध्ये, नदीमध्ये वा समुद्रात सोडले जाते. त्यामुळे किनारी भागामध्ये जलप्रदूषण व जवळच्या परिसरात दुर्गंधी वाढते. याचाच अर्थ सुमारे दोन हजार किमी लांबीच्या मलजलवाहिन्यांच्या महाजालातून उर्वरित ७५ टक्के मलजलावर प्रक्रिया केली जाते, असा कोणी अर्थ काढला तर तेही चुकीचे ठरेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण, सध्या सर्व ठिकाणी प्राथमिक प्रक्रियेनंतर सांडपाणी तीन किमी लांब निस्सारण वाहिनीतून सामुद्रिक जलसाठ्यात फेकले जाते. या मलजल प्रक्रियेच्या कामात बांधकाम, उदंचन यंत्रे बसविणे, रोजचे पर्यवेक्षण करणे, प्रक्रिया केल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणे व त्यात सुधारणांच्या कृती-उपचार करणे, पुन:प्रक्रिया केल्यानंतर जे जादा पाणी मिळेल, त्याचा अपेयजलाकरिता वापर करणे हा विषय फार मोलाचा पण किचकट व विलंब करणारा आहे. शिवाय मुंबई महानगरपालिकेचे काम खारफुटी, स्थानिक विरोध, रस्ते, सीआरझेड इत्यादी अडचणींमुळे संथ गतीने सुरू आहे. पण, घाण, दुर्गंधी, जलप्रदूषण नष्ट व्हावे, शिवाय मासेमारी, पर्यावरण संरक्षणाकरिता ही प्रक्रिया-प्रकल्पे व्यवस्थित पार पडावी, ही सर्वांची इच्छा आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर यामधून अपेय कामांकरिता अतिरिक्त पाणी मिळू शकेल व उत्तम स्वास्थ्य (sanitation) मिळेल.

 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) २०१७ च्या शास्त्रीय पाहणीत असे आढळले की, मुंबईत जी आठ मलजल प्रक्रिया केंद्रे बांधायची आहेत, त्यापैकी सहा केंद्रांमधून जे समुद्रात वा खाडीत मलजल सोडले जाते, त्यांपैकी सहा केंद्रांतील मलजल पूर्णपणे अशुद्ध आहे. कारण, त्यातील शुद्ध-अशुद्धतेचे निर्देशक म्हणजे जैव-रसायन प्राणवायू मागणी (BOD) व रसायन प्राणवायू मागणी (COD) हे वाजवीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात आहेत. एकूण आठ मलजल प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. ते पुढीलप्रमाणे- कुलाबा, वरळी, वर्सोवा, वांद्रे, घाटकोपर (२ ठिकाणी), मालाड व चारकोप. मुंबईत एकूण मलजलवाहिनी-महाजालातून २८०० दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया करावयाची आहे, ज्यात मानवी विष्ठा-मूत्र व स्वयंपाकघरातील मलजल घन वा पातळ स्वरूपात पसरलेले असतात. परंतु, वर्सोवा व घाटकोपर (२) ही प्रक्रिया केंद्रे सोडली, तर बाकी सर्व केंद्रांवरील आढळलेली ‘बीओडी’ व ‘सीओडी’ प्रमाणे अनुज्ञेय प्रमाणापेक्षा जास्त आढळली, ती खालील कोष्टकात दर्शविली आहेत. ‘बीओडी’ व ‘सीओडी’चे अनुज्ञेय प्रमाण दोन्ही गुणात्मक तुलना अभ्यासण्यासाठी ‘बीओडी’ व ‘सीओडी’करिता अनुक्रमे ३० मिग्रॅ / लि व २५० मि.ग्रॅ./ लिटर असे आहे.
 
 

 

विविध प्रक्रिया केंद्रांवरील २०१७ मध्ये आढळलेले बीओडी व सीओडीचे प्रमाण (मिली ग्रॅम प्रतिलिटर)

 

‘बीओडी’ची व ‘सीओडी’ची थोडक्यात माहिती

 

बीओडी - मलजलाची शुद्धता मिळण्याकरिता सेंद्रिय संयुगे खाद्यामध्ये परावर्तित होण्याकरिता जरुरी पडणारी प्राणवायूची व्याप्ती.

 

सीओडी - मलजलाच्या सेंद्रिय प्रदूषणाची कसोटी तपासण्याकरिता लावलेला एक निकष. सेंद्रिय संयुगे व असेंद्रिय संयुगे प्राणवायूत मिसळण्यासाठी (oxidise) जरुरी पडणारी प्राणवायूची व्याप्ती.

 

विविध प्रक्रिया केंद्रांवर काय घडत आहे?

 

प्रक्रिया केंद्रांपर्यंत मलजल पोहोचल्यानंतर त्यावर फक्त घनपदार्थ काढण्यासाठी प्राथमिक प्रक्रियाच केली जाते व त्यानंतर ते मलजल समुद्रात वा खाडीत उदंचन यंत्राच्या साहाय्याने तीन किमी लांब अशा निस्सारण वाहिनीमधून सोडले जाते. मुंबई महापालिकेच्या मालाड केंद्रापर्यंत सुमारे ४० लाख लोकांचे मलजल पोहोचते व सर्व केंद्रे बघितली, तर मालाड केंद्रामधील मोठ्या व्याप्तीचे मलजल फक्त प्राथमिक प्रक्रिया झाल्यावर ते मालाड खाडीमध्ये सोडले जाते व खाडी रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात प्रदूषित व दुर्गंधीमय बनते. परंतु, मालाड खाडीच्या पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूची व इतर रसायनांची व्याप्ती अगदी खालच्या पातळीवर पोहोचलेली असते. त्यामुळे माशासारखे जलचर प्राणी मरणावस्थेला पोहोचले आहेत. या प्रदूषण, दुर्गंधी व जलचरांच्या समस्येविषयी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, तर उत्तर मिळते की, “आम्ही मलजलावर प्रक्रिया एमपीसीबीच्या नियमाप्रमाणे करीत आहोत. आम्ही या आठ प्रकल्पांसाठी विविध प्रक्रिया कार्यान्वित करण्याकरिता १२ हजार कोटींचा निधी राखून ठेवला आहे. आमच्या योजनेप्रमाणे आम्ही प्राथमिक, माध्यमिक व तृतीयावस्थेतील प्रक्रिया (Primary Secondary and Tertiary) पूर्ण करणार आहोत. या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या मलजलातील पाणी अपेयजल कामामध्ये म्हणजे औद्योगिक कामाकरिता व बाग-बागायतींकरिता वापरता येईल.”

 

विविध प्रक्रिया केंद्रांच्या बांधकामाचा विकास कुठपर्यंत?

 
 वरळी लव्हग्रोव्ह उदंचन केंद्र - या जागेच्या ठिकाणी ‘आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट’ केंद्रासाठी २००६ सालापासून २१०० चौमीची जागा राखून ठेवली होती. राजधानीतील ‘दिल्ली हाट’सारखा प्रकल्प तेथे बांधला जाणार होता. ४.९ रुपये कोटींचा निधी खर्चून पालिकेने तेथील २,६८६ चौमी जागेवर दोन इमारती बांधल्या आहेत. २०१२ मध्ये बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स व मुंबई पालिका तेथे ट्रस्ट स्थापून त्या आर्ट केंद्राच्या कामाला सुरुवात करणार होते. पण, ते काही झाले नाही. त्यामुळे हा भूखंड आता पालिका परत घेत आहे व तो कदाचित आता मलजल प्रक्रियेच्या कामाकरिता (WWTP) वापरला जाईल. २०१२ पासून आतापर्यंत तेथे आर्ट व क्राफ्ट केंद्राची काहीच हालचाल झालेली नाही. या ठिकाणी कारागिरांच्या कौशल्याचे प्रदर्शन व निरीक्षण दालने, अ‍ॅम्फीथिएटर, कलात्मक उत्पादन, विज्ञान केंद्रे व प्रदर्शने होणार होती. परंतु, हे सगळे जाऊन तेथे आता हरित स्वरूपाचे मलजल प्रक्रिया केंद्र बनणार आहे. या केंद्रापर्यंत ३६० दशलक्ष लिटर व्याप्तीचे मलजल पोहोचते. ही जागा ९.७४ हेक्टर आहे व मलजलावरच्या प्रक्रियेमध्ये प्राथमिक, माध्यमिक व तृतीयावस्थेतील प्रक्रिया करण्यात येणार आहेत. इमारतीच्या गच्चीवर मोठी बाग करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाला सुमारे पाच वर्षांचा अवधी लागेल.
 

सध्या फक्त वरळी, घाटकोपर, भांडुप, कुलाबा, वर्सोवा, वांद्रे व मालाड येथील केंद्रांवर मलजल पोहोचल्यावर त्यावर फक्त प्राथमिक प्रक्रिया केली जाते. त्यावर नियोजनाप्रमाणे पुढील म्हणजे माध्यमिक व तृतीयावस्थेतील प्रक्रिया करण्याचे पुढील काही काळात ठरले आहे. त्याच्या अपेयजलाच्या पुनर्वापराकरिता १७०० दशलक्ष लिटर पाणी त्यावेळी उपलब्ध होईल. म्हणजे, सध्याच्या पाणीपुरवठ्याच्या ५० टक्के जादा पाणी मिळेल. पण, ते सर्व तिन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळेल. कामात विलंब व २००६ मध्ये स्थूल खर्चाचा अंदाज २३०० कोटी रुपये होता, तो आता २०१७-१८ काळाकरिता १४,३६८ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. ही कामे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा पालिकेचा विचार आहे. विलंबामुळे खर्चही वाढतो व स्वास्थ्याची स्थिती येण्यासही वेळ लागतो.

 

प्रक्रिया-केंद्रांची क्षमता दशलक्ष लिटरमध्ये दर्शविली आहे - वरळी (८४०), वांद्रे (७७०), घाटकोपर (३००), भांडुप (२८०), मालाड (८५०), वर्सोव्हा (१८०), कुलाबा (४५), चारकोप (६).

 

कुलाबा केंद्र - मुंबईतील मलजलावरील तिन्ही प्रक्रिया पूर्णपणे पूर्ण करणारे हे पहिले प्रक्रिया केंद्र ठरणार आहे. नियोजनाप्रमाणे हे काम फेब्रुवारी २०१९ मध्ये पूर्ण करण्याचे ठरले होते. ते आता दोन महिने आधीच पूर्ण होणार आहे. या प्रक्रिया केंद्रावरून ३७ दशलक्ष लिटर व्याप्तीच्या मलजलावर प्रक्रिया होणार आहेवांद्रे, वरळी, घाटकोपर, भांडुप, धारावी आणि वर्सोवा येथील प्रक्रिया केंद्रे बांधण्याकरिता लवकरच निविदा मागविल्या जातील. वांद्रे केंद्राकरिता जुन्या प्रक्रिया कामांचे नूतनीकरण करण्याचे, मलजलवाहिन्यांचे रूंदीकरण करण्याचे व नवीन मशीनरी बसविण्याचे काम राहील. वांद्रे केंद्र ९.६ हेक्टर जागेवर बांधायचा आहे व तेथे ३६० दशलक्ष लिटर मलजलाच्या व्याप्तीवर तिन्ही प्रक्रिया करावयाच्या आहेत.

 

मालाड केंद्र - या प्रकल्पाकरिता काही दुसऱ्याच अडचणी उद्भवल्या आहेत. ११ हेक्टर जागेकरिता खारफुटी व रस्ता प्रकल्प आड येत आहेत. मार्च २०१८ मध्ये मुंबई पालिकेला समजले की, २४ हेक्टर ठाण्यातील जंगलव्याप्त जागा जंगल खात्याकडे दिलेली आहे. तिच्या मंजुरीकरिता सीआरझेडची सुटका झाली तरी, ११ हेक्टर जागा रस्ता असल्यामुळे स्थानिक लोकांचा विरोध आहे. २६ हजार झाडे तोडावी लागतील. केंद्र सरकारने मंजुरी देताना १८० हेक्टर म्हणजे पाचपट जागेवर नवीन खारफुटी पैदा करण्याची अट घातली आहेत. हे प्रक्रिया केंद्र सर्वात मोठे आहे व येथे ८५० दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया करण्याची व्याप्ती आहे व स्थूल खर्चाचा अंदाज २०२० कोटी रुपये केला आहे.

 

मलप्रक्रियेकरिता २०० रुपये कोटींचा सल्ला

 

मलवाहिन्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आठ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मलजलप्रक्रिया केंद्रांपैकी धारावी, वांद्रे, वरळी या ठिकाणच्या प्रकल्पांसाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची निवड केली आहे व त्याकरिता २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. सल्लागारांच्या सल्ल्यानंतर कंत्राटदारांची निवड होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त होणारी सुधारित मानके, वाढणारी लोकसंख्या आदी गोष्टींचा विचार करता पालिकेच्यावतीने मुंबई २००२ मध्ये मलनिस्सारण प्रकल्प टप्पा-२ हाती घेण्यात आला. तीन केंद्रे सोडून इतर केंद्रांसाठी सल्लागारांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्याकरिता फेरनिविदा मागविण्यात आल्या आहेततेव्हा लवकरात लवकर ही मलजल प्रक्रिया केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास मुंबईमधील जलप्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होईल, यात शंका नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@