न्यायतत्त्वावर अमेरिका गाजवणारी कमला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


हिंदू अमेरिकन तुलसी गॅबार्ड या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक असताना आता भारतीय-अमेरिकन कमला हॅरिस यासुद्धा राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक आहेत. त्यांच्याविषयी थोडेसे...

 

एकीकडे भारतात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असताना, दुसरीकडे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याच्या हट्टामुळे शटडाऊन सुरु असून कित्येक सरकारी कर्मचारी बिनपगारी घरी बसून आहेत. अमेरिकन जनता ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे त्रस्त असून पुढील निवडणुकीत ट्रम्प यांचा पक्षांतर्गत तसेच मतदारांमध्येही निभाव लागणे तसे कठीणच. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुढील वर्ष उजाडणार असले तरी आतापासूनच काही चेहरे या शर्यतीत समोर येताना दिसतात. हिंदू अमेरिकन तुलसी गॅबार्ड या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक असताना आता भारतीय-अमेरिकन कमला हॅरिस यासुद्धा राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे २०२०ची अमेरिकेची निवडणूक ही भारतीयांसाठीही तितकाच उत्सुकतेचा विषय असेल. २००३ पासून खरंतर कमला या अमेरिकेच्या राजकारणातील एक चर्चेचा विषय ठरल्या होत्या. स्त्रियांच्या समान हक्कांसाठी त्यांनी २००३ पासूनच लढाई सुरू केली होती. कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या संसदेतील जागा जिंकत याआधी इतिहास रचला होता. इतकं मोठं यश मिळवणार्‍या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन ठरल्या होत्या. पण, त्यांचा प्रवास हा तितकासा सोपा आणि सरळ अजिबात नव्हता.

 

१९६४ साली कॅलिफोर्नियातील ऑकलँड येथे भारतीय-जमैकन घरात कमला यांचा जन्म झाला. त्यांच्या आई शामला गोपालन या मूळच्या चेन्नईच्या. १९६० साली स्तनाच्या कर्करोगावर संशोधन करण्यासाठी त्या अमेरिकेत आल्या आणि त्यांची भेट डोनाल्ड हॅरिस यांच्याशी झाली आणि त्यांनी कॅलिफोर्नियातच आपल्या संसाराची सुरुवात केली. मात्र, कमला या केवळ सात वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला. कमला आणि त्यांची बहीण माया यांचा ताबा त्यांच्या आईला मिळाल्यामुळे त्यांच्यावर भारतीय विचारांचा जास्त प्रभाव पडला. कमला यांच्या आई त्यांना संस्कृतमधील आणि विविध भारतीय पौराणिक कथा सांगे. मात्र, लहान वयात आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे कमला यांच्या मनावर परिणाम झाला. त्यातच शाळेत असताना त्यांना त्यांच्या नावावरून आणि वर्णावरून हिणवले गेले. अशावेळी कमला यांच्या आईने त्यांना आपलं आयुष्य हे आपण कसे दिसतो, यापेक्षा आपण काय करू शकतो, यावर जास्त अवलंबून असल्याचा कानमंत्र दिला. हा मंत्र घेऊनच कमला या सुरुवातीला कॅलिफोर्नियातील आपल्याच शाळेच्या विद्यार्थी अध्यक्षा बनल्या. येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात झाली. कमला यांच्या मते, ”मला राजकारणापेक्षा लोकांना मदत करायला आवडते. माझी आईही तशीच होती. त्यामुळे तेच संस्कार माझ्यावर झाले. शाळेपासूनच मी माझ्या खालच्या वर्गातल्या मुलांना शिकवायचे. त्यामुळे मी शाळेतच विद्यार्थी अध्यक्षा झाले.” पुढे महाविद्यालयात असताना त्यांनी न्यायतत्त्वशास्त्र या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली आणि नोकरी करण्यापेक्षा त्यांनी आपल्या ज्ञानाचा समाजकल्याणासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला. कायदा केवळ शिकण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी करता आली पाहिजे, याकरिता सर्वप्रथम त्या १९९० ते १९९८ या कालावधीत कॅलिफोर्नियाच्या उपअ‍ॅटर्नी जनरल म्हणून कार्यरत राहिल्या. त्यांच्या मते, ”चार भिंतीत ज्या गोष्टी घडतात, त्या तिथेच राहतात. लोकांना त्या चार भिंतीत घेतलेले निर्णय कळावे म्हणून मी कॅलिफोर्नियाच्या उपअ‍ॅटर्नी जनरलपदासाठी स्वत:ला तयार केले.” २००३ साली त्या कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल झाल्या. खरेतर २००८च्या निवडणुकीतच कमला या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. मात्र, त्यांनी तेव्हा निवडणुकीसाठी तयार नसल्याचे सांगितले. अमेरिकेच्या अभ्यासाकरिता आणखी वेळ घेतला. मात्र, बराक ओबामांच्या निवडणुकीदरम्यान त्या ओबामा यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होत्या.

 

भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांबाबत भावनात्मकरित्या विचार करते,” असे आपल्या भाषणात म्हणणार्या कमला यांनी ओबामांच्या काळात भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. २०१६ मध्ये त्या पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत आल्या, जेव्हा बेकायदेशीर गर्भपाताचा मुद्दा पेटला. कमला यांनी गर्भपात कायदेशीर करावा, ही मागणी उचलून धरली होती. त्यानंतर डेमोक्रेट लॉरेटा सानचेज यांचा पराभव करत ५१ वर्षीय कमला या अमेरिकेच्या सिनेटवर निवडून आल्या. दोन वेळा अ‍ॅटर्नी जनरलपद भूषवलेल्या हॅरिस यांनी आपल्याच पक्षाच्या लॉरेटा यांचा पराभव केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयांपैकी जगातील सहा मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदीच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करीत, ”ही बंदी आपल्याला सुरक्षित ठेवू शकते, असे समजण्याची चूक केली जाऊ नये. अमेरिकेत वाढणार्‍या कट्टरवादाशी लढा देण्याची गरज असताना अमेरिकेला मुस्लीम समुदायापासून दूर ठेवून एकटे पाडू नये. ही कृती पूर्णपणे अनैतिक आणि अमेरिकेच्या ध्येयाच्या विरोधातील आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले होते. देशातील १२ डेमोक्रेटिक नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आव्हान देण्यासाठी तयारी केली असली तरी, अमेरिकेत तुलसी गबार्ड आणि कमला हॅरिस या दोघीही जास्त लोकप्रिय आहेत. त्यामुळे २०२० मध्ये अमेरिकेत भारतीय वंशाच्या या महिलांपैकी कुणीही महासत्तेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाली तरी भारतासाठी, भारतीयांसाठी तो अभिमानाचाच सर्वोच्च क्षण असेल, हे निश्तित.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@