डॉ. आचार्य ‘अविनाशी’ सेवा पुरस्कारांची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |

औरंगाबादची ‘साकार’ संस्था आणि गेवराईचे संतोष गर्जे पुरस्काराचे मानकरी

 
 
जळगाव, २१ जानेवारी
 
केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या ‘अविनाशीसेवा’ पुरस्कारासाठी यावर्षी संस्थात्मक गटातून औरंगाबाद येथील ‘साकार’ या संस्थेची तर व्यक्तिगत गटातून गेवराई, जि.बीड येथील सहारा अनाथालयाचे संतोष गर्जे यांची निवड करण्यात करण्यात आली.
 
 
संस्था आणि व्यक्ती यांनी समाजाप्रती समर्पित भावनेने केलेल्या केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सह. बँकेतर्फे देण्यात येणार्‍या या पुरस्काराचे स्वरूप संस्थेसाठी रु.१०१०/- तर व्यक्तिगत रु.५१०००/-सोबत मानपत्र, स्मृतीचिन्ह असे आहे. पुरस्कारार्थींचा शोध घेण्यासाठी प्रतिष्ठानच्यावतीने निर्माण केलेल्या निवड समितीत बँकेचे संचालक हरिष यादव, विवेकानंद प्रतिष्ठानच्या संचालिका हेमा अमळकर आणि कविता दीक्षित, बळवंत पतसंस्थेचे संचालक संदीप लाड, संगीता अट्रावलकर आणि आरोग्य विभागप्रमुख भानुदास येवलेकर आदी मान्यवरांचा समावेश होता.

साकार संस्था, औरंगाबाद
 

 
 
शिशु संगोपन केंद्र तथा दत्तकविधान क्षेत्रात सेवा करणारी औरंगाबाद येथील ‘साकार’ ही संस्था जन्मतः टाकून दिलेल्या अनाथ बालकांचे संगोपन करून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी धडपड करते. ‘चिमुकल्यांना घर मिळवून देणारी संस्था’अशी सर्वदूर या संस्थेची ख्याती आहे. औरंगाबाद शहरात गेल्या २२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या या संस्थेने ‘साकार’ हे टाकून दिलेल्या मुलांना सांभाळणारे वसतिगृह नव्हे तर या मुलांना त्यांचे हक्काचे घर वाटावे असा प्रयत्न केला आहे. मुलांच्या भवितव्यासाठी गरजू पालकांनी मूल दत्तक घ्यावे,यासाठी ही संस्था प्रयत्नशिल असते. या संस्थेद्वारे अनाथ व परित्यागीत अनेक बालकांना दत्तक विधानाद्वारे त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे.

संतोष गर्जे, सहारा अनाथालय, गेवराई, जि. बीड
 

 
 
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ‘बालग्राम’ या संस्थेच्या माध्यमातून काम करणारे संतोष गर्जे यांचा जन्मही बीड जिल्ह्यातील पाटसरा या दुर्गम खेड्यात गरीब ऊसतोड मजूर शेतकरी कुटुंबात झाला आहे. आपल्यासारख्याच अनेक निराधार मुलांचा ते आपल्या कार्यातून ‘सहारा’ ठरले आहे. बहिणीच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या भाचीची होणारी परवड पाहून त्यांनी अशा मुलांसाठी काम करण्याचे ठरविले. वयाच्या १९व्या वर्षी २००४ मध्ये त्यांनी ‘सहारा अनाथालया’ची स्थापना केली. सुरुवातीला उधारीवर पत्रे घेऊन तीन खोल्यांच्या शेडमध्ये संस्था सुरु झाली. ऊसतोडणी कामामुळे सततचे स्थलांतर, त्यात मुलांची होणारी आबाळ पाहून अशा मुलांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी संतोष गर्जे यांनी अथक परिश्रम केले. सध्या त्यांच्या अनाथालयात निराधार, निराश्रित, उपेक्षित, देह व्यापारातून शोषणाच्या बळी ठरलेल्या महिलांची मुले,तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचे पाल्य, आत्महत्त्या केलेल्या शेतकर्‍यांची मुले आपले भवितव्य घडवीत आहेत.
 
 
३१ रोजी पुरस्कार वितरण
 
अविनाशीसेवा पुरस्काराचे वितरण गुरुवार, 31 जानेवारी रोजी सायं. 6 वाजता, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी जळगावचे प्रसिद्ध उद्योजक पुखराज पगारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरत अमळकर, जळगाव जनता सह.बँकेचे अध्यक्ष अनिल राव आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@