समाजासाठी सर्वकाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2019   
Total Views |

 


 
 
 
स्वत:पुरता विचार करणे ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. परंतु, या वृत्तीवर मात करून केवळ पोट भरायची विद्या संपादन न करता त्या विद्येचा सुयोग्य वापर डॉ. अच्युत सामंत यांनी केलेला पाहायला मिळतो.
 

माणूस आपल्या नशिबी आलेली गरिबी दूर करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करत तो हे दारिद्य्र दूर करण्यात यशस्वीदेखील होतो. परंतु, या कठीण प्रवासादरम्यान आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गरिबीकडे मात्र तो कानाडोळा करतो. सर्वकाही दिसत असूनही, समजत असूनही आपल्यासारख्याच अनेकांकडे तो पाठ फिरवतो. कोणे एकेकाळी आपणही असेच कमनशिबी होतो, हे माणूस सहज विसरतो. पण याला अपवाद म्हणजे डॉ. अच्युत सामंत. अजूनही अनेकांना माहीत नसलेले हे नाव! अत्यंत गरिबीतून वर आलेले हे कुशाग्र आणि दयावान असे व्यक्तिमत्त्व! कलिंग इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) आणि कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (KISS) या संस्थांची स्थापना डॉ. अच्युत सामंत यांनी केली. या संस्थांमध्ये दरदिवशी सुमारे २५ हजार मुलांना मोफत जेवण दिले जाते. तसेच इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत या संस्थेत विद्यार्थ्यांची राहण्याची सोय मोफत केली जाते. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. त्यांना वैद्यकीय सुविधादेखील पुरविल्या जातात. शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकासावर या संस्थेत भर दिला जातो. डॉ. अच्युत सामंत यांनी भारतात झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी दिली होती.

 

पोटात भूक, अंगात जिद्द आणि मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर अशक्यही शक्य करून दाखवता येते. याचा प्रत्यय डॉ. अच्युत सामंत यांचे अफाट कार्य पाहून येतो. स्वत:च्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी अच्युत यांना अपार कष्ट करावे लागले. पण हे कष्ट इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत. ही सदिच्छा आपल्या उराशी बाळगून सामंत यांनी समाजकार्याला सुरुवात केली. दारिद्य्रता ही देशाच्या भावी पिढीला पाहायला मिळू नये, ही त्यांची प्रबळ इच्छा आहे. इच्छा, स्वप्न, आकांक्षा यांना कर्तृत्वाची जोड कशी द्यावी हे सामंत यांच्याकडे बघून कळते. २०१८ पासून डॉ. अच्युत सामंत हे राज्यसभेचे सदस्य आहेत. जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही ओडिशा असल्याने तेथील भुवनेश्वर येथे KIIT आणि KISS या संस्थांची त्यांनी स्थापना केली. २५ वर्षांचे असताना डॉ. अच्युत सामंत यांनी या संस्थांची स्थापना केली.

 

 
 
 
“माझ्या आयुष्याच्या सुरुवातीची २५ वर्षे मी संघर्ष केला. अन्नासाठी वणवण भटकलो. पण आता माझ्यासारख्या अनेक वंचित मुलांना अन्न मिळावे, यासाठी मी संघर्ष करत आहे,” असे डॉ. सामंत यांनी एका कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात म्हटले होते. आज समाजात आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल, तर त्यासाठी शिक्षण हे हवेच. डॉ. अच्युत सामंत हे स्वत: उच्चशिक्षित आहेत. उत्तम दर्जाचे शिक्षण आपल्या देशात प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावे यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांनी २००२ साली श्रीलंकेतील कोलंबोमधील विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. आजवर अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी डॉ. सामंत यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. २००७ साली त्यांना ‘प्रिय ओडिया सन्मान’ हा पुरस्कार ओडिशा सरकारकडून देण्यात आला. त्यानंतर २०११ साली ‘रुची ओडिशा गौरव सन्मान’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दक्षिण कोरियाच्या एका विद्यापीठाने सामंत यांना डी.लिट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. आजवर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी डॉ. अच्युत सामंत यांना गौरविण्यात आले आहे. २०१२ साली ‘जवाहरलाल नेहरु’ हा मानाचा पुरस्कार त्यांना भारत सरकारकडून देण्यात आला.
 

“आज ओडिशामधील वनवासी लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न ‘कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ ही संस्था करत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून एक सकारात्मक कार्य होत आहे,” अशा शब्दांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. अच्युत सामंत यांच्या कार्याचे कौतुक केले. जगभरातील अनेक विद्यापीठांना डॉ. अच्युत सामंत यांच्या समाजकार्याची दखल घेतली आहे. स्वत:पुरता, स्वत:च्या पोटापुरता विचार करणे ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. परंतु, या वृत्तीवर मात करून केवळ पोट भरायची विद्या संपादन न करता त्या विद्येचा सुयोग्य वापर डॉ. अच्युत सामंत यांनी केलेला पाहायला मिळतो. डॉ. सामंत हे दिवसाचे १७-१८ तास काम करतात आणि पाच ते सहा तासांपुरतीच मर्यादित झोप घेतात, असे त्यांनी मागे एका मुलाखतीत सांगितले होते. यावरून त्यांची कार्याप्रती असलेली निष्ठा, त्यांचे समर्पण दिसून येते. देशासाठी, देशाच्या भावी पिढीसाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे, आपले आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित करणारे, आपल्या कार्याद्वारे इतर अनेक आयुष्य घडविणारे डॉ. अच्युत सामंत, आज देशाला अशा समाजकार्यकर्त्यांची गरज आहे. विशेष म्हणजे आपल्या समाजकार्याकडे दुर्लक्ष होईल म्हणून, त्याला पुरेसा वेळ देता येणार नाही म्हणून अच्युत सामंत हे अविवाहितच राहिले. असे अनेक डॉ. अच्युत सामंत या देशात घडावेत. हिच सदिच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@