सोंगाड्यापेक्षा सोमटे बरे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2019   
Total Views |


 


आता अजित म्हटले की दोनच गोष्टी आठवतात, एक तर मोना डार्लिंग किंवा धरण भरण्याची विशिष्ट प्रक्रिया. तर असे हे धरण भरण्याकामी अजरामर विधान करणारे अजित पवार. आताही त्यांची शाब्दिक प्रतिभा अशीच बरसली आहे. मंत्री गिरीश महाजन यांना ते म्हणाले, “ये बारामतीमध्ये, बघतोच तुला. ५०-५० वर्ष इथले लोक मला व माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय.” आता अजितदादांनी गिरीश महाजनांना आमंत्रण दिले की धमकी दिली, माहीत नाही. आता गिरीश महाजन बारामतीमध्ये आल्यावर अजितदादा काय बघणार आहेत देव जाणे. बघतीलही म्हणा, कारण त्यांच्याकडे भयंकर कल्पनाविलासाची सर्जनशीलता आहे. (सर्जनशीलतेसाठी पुन्हा धरण भरण्याची युक्तीच आठवली.) असो, तर अजितदादांनी त्यानंतर अभिमानाने सांगितले की, मला व माझ्या चुलत्यांना लोक ५०-५० वर्ष निवडून देतात. अजित पवारांना या गोष्टीचा सार्थ अभिमान असणे ठीकच आहे. कारण त्यांचा पुत्र पार्थही आता निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार, म्हणजे पवारांची तिसरी पिढी राजकारण खेळणार. असे जरी असले तरी याला घराणेशाही चुकूनही म्हणायची नाही बरं का? तर अजितदादांना लोक ५० वर्ष त्यांना निवडून देतात याची आठवण आहे. पण मग या लोकांसाठी त्यांनी काय केले? बारामतीकरांचे प्रश्न सुटले? नुसते बागायतदारांचे हित जपून आणि घरदार खानदानापुरतेच सहकारी साखर कारखाने काढून, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षण संस्था काढूनही बारामतीकर आणि परिसरातले लोक खरेच सर्वार्थाने पवारांचे समर्थक आहेत का? हा प्रश्न अजितदादा, सुप्रियाताई आणि शरदकाकांनाही आहे. पवार खानदानाने ५० वर्षे बारामतीमध्ये सत्तेची माती केल्यामुळे त्यांच्या मतीची गती मंद झाली आहे, असे वाटते. त्यामुळे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून अजितदादा म्हणाले, “हे कुठलं सोमटं आलंय.” आता सोमटं म्हणजे काय हे माहिती नाही. पण सोंगाड्या माहिती आहे. कारण शरदकाका पवार ते अजितदादा पवारांपर्यंतच्या साऱ्यांनीच महाराष्ट्रातील घडणाऱ्या प्रत्येक जातीय, धार्मिक घटनेचा वापर, नैसर्गिक आपत्तीचा वापर सत्तेसाठी केला, वर ‘मी नाही त्यातली’ चे सोंग केले. अशा सोंगाड्यापेक्षा सोमटे बरे.

 

घुंगरू देऊन काय होणार?

 

काहीतरी वेगळे करण्याच्या नादात राष्ट्रवादी पक्ष नेहमी असे काही वेगळे करतो की, लोकांना त्यांनाच वगळून टाकावे असे वाटते. आता हेच बघा ना, डान्सबारवरील बंदी उठवण्याबाबतची राष्ट्रवादीची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महिला बालकल्याणमंत्री पकंजा मुंडे यांना घुंगरू भेट देणार आहेत. का? तर कोर्टाने डान्सबारची बंदी उठवली म्हणून. या तिघांनाही घुंगरू भेट देऊन काय होणार आहे? याचा तर्कशुद्ध विचार राष्ट्रवादी पक्ष करेल तर मग काय बघायलाच नको. डान्सबारवरची बंदी उठणे हा विषय कोणत्याही समाजासाठी संवेदनशील विषय आहे. ज्या राज्यकर्त्यांना मतदार आयाबहिणींचीं मतं हवी असतील, ते हा विषय संवेदनशील पातळीवरच सोडवतील, यात शंका नाही. कारण सरकारची भूमिका लोकशाही राज्यात लोकांसाठी कल्याणात्मक भूमिकेतलीच असते. त्यामुळे ज्यावेळी न्यायालयात डान्सबार बंदीची केस होती, त्यावेळी राज्य सरकारनेही बारबंदीसाठीची भूमिका मांडली. पण न्यायालयाने यावर राज्य सरकारला अभिप्रेत असलेला आदेश दिला नाही. यात राज्य सरकारची काय चूक? आता कुणी म्हणते, राज्य सरकारने योग्य पुरावे दिले नाहीत. मग असे म्हणताना ते पुरावे कोणते, हे मात्र विरोधक सांगत नाहीत. असो, गेली काही वर्ष न्यायालयांनी वेगवेगळ्या विषयांवर निर्णय दिले. न्यायालयाने कायदेशीर प्रकिया पूर्ण करून या सर्व प्रकरणांमध्ये आदेश दिले. यातील कित्येक आदेशांबद्दल देशात, राज्यात वादळी चर्चा आंदोलने झाली. किंबहुना वादळी बिनबुडाच्या चर्चा आणि वेळ घालवणारी, काहीच निष्पन्न न होणारी आंदोलने करणे यात काहींची हयात गेली (पण त्यांना हया वाटली नाही, ही गोष्टी वेगळी) हे लोक न्यायालयाच्या आदेशाची परस्पर जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर टाकतात. सत्ताधारी नाही सापडले तर ते आपल्या विचारांपेक्षा वेगळे विचार मांडणाऱ्यांवर या आदेशाचे खापर फोडतात. आताही डान्सबार बंदीविषयी हेच चालले आहे. जर खरेच कुणी या बारबंदीविषयी गंभीर असेल तर मग कायदेशीररित्या यावर उपाय का केला जात नाही. घरदार असलेल्या, इज्जतदार कुटुंबवत्सल लोकांना घुंगरू देऊन हा प्रश्न मार्गी लागणार आहे का?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@