बाटलीबंद हवेचा नवा धंदा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2019   
Total Views |

 

 
पिण्याचं पाणी विकलं जाईल, पाण्याचा धंदा केला जाईल, असं काही वर्षांपूर्वी सांगितलं गेलं होतं, तेव्हा लोक हसले होते. पण, आज आपण बघतोच आहोत की, पिण्याच्या पाण्याची एक बाटली 15 ते 20 रुपयांना विकली जातेय आणि सामान्यातला सामान्य माणूसही ती विकत घेतोय. पंचतारांकित हॉटेलांमधून तर चक्क 80 ते 100 रुपयांना एक बाटली मिळतेय. तिकडे आखाती देशांमध्ये एक लिटर पेट्रोल जेवढ्या रुपयांत मिळते, तेवढ्या रुपयांत आपण पाण्याची बाटली विकत घेतो आणि आपल्याकडे एक लिटर पेट्रोल जेवढ्या रुपयांत विकले जाते, तेवढ्या रुपयांत तिकडे पाण्याची बाटली मिळते. यावर तर आता आपला सगळ्यांचाच विश्वास बसला आहे. कारण, ते वास्तव आपल्या सगळ्यांपुढे आहे. पण, आपल्याला आता जर कुणी असं सांगितलं की, यापुढे शुद्ध हवासुद्धा बाटलीत बंद करून विकली जाणार आहे आणि मोकळा श्वास घेता यावा म्हणून आपल्यालाही ती विकत घ्यावी लागणार आहे, तर कुणीच विश्वास ठेवणार नाही. पण, हे खरे आहे आणि बाटलीबंद शुद्ध हवा विकत घेण्याची नामुष्कीही आपल्याच कर्तृत्वाने आपण ओढवून घेणार आहोत.

पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल, तर एकूण भूभागाच्या 33 टक्के जमिनीवर जंगल असणे गरजेचे आहे. पृथ्वीचा 72 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि उरलेल्या 28 टक्के जमिनीपैकी 33 टक्के जमिनीवर भरपूर ऑक्सिजन देणारी झाडं असली पाहिजेत, असा नियम आहे. पण, वास्तवात असं आहे का? याचं उत्तर नकारार्थी आहे. आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी वास्तव किती भीषण आहे, हे आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्रात जंगलांचं प्रमाण हे 19 ते 21 टक्के एवढंच आहे. विदर्भात हेच प्रमाण 45 टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजे विदर्भ जर वेगळा झाला, तर उर्वरित महाराष्ट्रात जंगलांचं प्रमाण तर आणखी कमी होईल. विकासाच्या नावाखाली उर्वरित महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. पण, विदर्भातली जंगलं आहे तशीच घनदाट आहेत. पण, जंगलांच्या बदल्यात विदर्भाला मिळाले काहीच नाही. औद्योगिक विकासात पुणे, ठाणे, नाशिक आणि मुंबई या भागांचाच मोठ्या प्रमाणात विकास झाला. नागपूरवगळता विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये विकास हा नावापुरताच झाला आहे. पण, जंगलांमुळे विदर्भातील हवा आजही शुद्ध आहे आणि इथल्या लोकांना ऑक्सिजनही भरपूर प्रमाणात मिळतो, हे वास्तव आहे.

मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करायचे असेल, तर विकास आवश्यकच आहे. पण, असलेली झाडे तोडून विकास परवडणार आहे काय, याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. जागतिक तापमानात झालेल्या बदलांमुळे ऋतुचक्र आधीच बदलले आहे. त्याचा फटका मानवी जीवनाला आणि जंगलांमध्ये राहणार्या पशू-पक्ष्यांनाही बसला आहे. भारतीय शेतीलाही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. पावसावरही विपरीत परिणाम झ्राला आहे. अनियमित पावसामुळे जलसाठे कमी कमी होत चालले आहेत. जगातल्या अनेक शहरांमध्ये अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तिसरे जागतिक महायुद्ध पाण्यावरूनच होऊ शकते, असे भाकीत नॉस्ट्रॅडॅमस नावाच्या भविष्यवेत्त्याने फार पूर्वीच करून ठेवले आहे. जगातल्या सुंदर शहरांपैकी एक असलेले दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहर भीषण पाणीसमस्येला तोंड देत आहे. जगात अशी असंख्य शहरं आहेत. दिवसेंदिवस ही समस्या भीषण होत चालली आहे आणि तरीही आपण गांभीर्याने उपाय करायला तयार नाही. हे सगळे होते आहे जंगलांच्या बेसुमार कटाईमुळे.

आजच्या चर्चेचा मुद्दा मुळात पाणी हा नसला, तरी श्वास घ्यायला जशी शुद्ध हवेची गरज आहे, तशी जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी पाण्याचा उल्लेख. पाण्याप्रमाणेच भविष्यात शुद्ध हवेचाही धंदा केला जाईल आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, अशांनाच ती हवा विकत घेता येईल. मग, बाकीच्यांनी मरण पत्करायचे काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होईल. त्याहीपलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल की, बाटलीबंद शुद्ध हवाही किती दिवस विकत मिळेल आणि कोण किती वेळा ती विकत घेण्याची क्षमता ठेवेल? उद्या मोलमजुरीची, कष्टाची कामं करणारी आणसं शुद्ध हवेअभावी आजारी पडलीत आणि त्यांना प्राण गमवावा लागला, तर ज्यांच्याकडे हवा विकत घेण्याची क्षमता आहे, ते श्वास तर मोकळा घेतील पण, इतर संसाधनांअभावी जगतील कसे? हा कुणालाही घाबरवण्याचा प्रयत्न नाही. बाटलीबंद शुद्ध हवा आजच विकत घेण्याचा दुर्दैवी प्रसंग आपल्यावर ओढवलेला नाही. पण, भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू शकते आणि आजही काही भागात आपल्यापैकी अनेकांना प्रदूषणामुळे शुद्ध हवेची, त्यातून मिळणार्या ऑक्सिजनची आवश्यकता पडत आहे, अनेक जण नाकातोंडावर मास्क लावून फिरताना आपल्याला दिसत आहेत, अनेकांना प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आजार झाले आहेत, हे वास्तव नाकारून चालेल का? आणि हे सगळे कशामुळे होत आहे, याचा विसर पडूनही चालेल का?

आपल्या भागात शुद्ध हवा नसेल आणि आपल्याला ती हवी असेल तर ती ऑनलाईन मागविण्याची सोय झाली आहे. शुद्ध हवा बाटलीत बंद होते आणि ती विकत मिळते, तीही घरपोच, हे ऐकायला थोडे विचित्र जरूर वाटेल, पण हे सत्य आहे. बाटलीबंद हवेची विक्री आता सुरू झाली आहे. देशातीलच नव्हे, तर विदेशातील कंपन्यांनीही घरपोच बादलीबंद हवा पुरविणे सुरू केले आहे. हा शाप की वरदान, हे आपल्यापैकी प्रत्येकाला ठरवावे लागणार आहे. शेवटी आज जी अवस्था आपण आपल्या भागात ओढवून घेतली आहे, ती उद्या हिमालयातही निर्माण होईल आणि हिमालयातली हवाही प्रदूषित होऊन त्याचा फटका संपूर्ण देशाला बसेल. इंटरनेटवरून शुद्ध हवेची विक्री सुरू आहे. प्युअर हिमालयन कंपनीचा तर असा दावा आहे की, दहा लिटर शुद्ध हवा भरलेली एक बाटली आम्ही ग्राहकांना विकत आहोत आणि या एका बाटलीतल्या हवेने ग्राहकाला 160 वेळा श्वास घेता येईल. हिमालयातल्या शुद्ध हवेचा पुरवठा आम्ही करीत आहोत, असा दावा या कंपनीने केला आहे. श्वास घेण्यासाठी बाटलीसोबत आम्ही मास्कही देत आहोत, अशी माहिती या कंपनीने दिली आहे. उत्तराखंडातल्या चमोली येथे हवा कॉम्प्रेस करून बाटलीत भरली जात आहे आणि मास्कद्वारे एका सेकंदात एकदा शुद्ध हवेद्वारे श्वास घेतला जाऊ शकेल. विदेशी कंपन्यांनीही भारतात शुद्ध हवा विकण्याचा धंदा सुरू केला आहे. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील या कंपन्यांनी आधी चीनमध्ये शुद्ध हवा विकली, आताही विकत आहेत आणि पुढेही विकत राहणार. शुद्ध हवा बाटलीबंद करण्याचा पहिला प्रकल्प कॅनडातच सुरू झाल्याचे ऐकिवात आहे. काय आश्चर्य? हवाही विकत घेऊन जगावे लागेल, याची कल्पनाही कधी कुणी केली होती? कडूिंलब, वड, पिंपळ, औदुंबर, रक्तचंदन अशी झाडं जरी आपण आपल्या भागात मोठ्या प्रमाणात लावलीत ना, तरी हिमालयापेक्षाही शुद्ध हवा आपल्याला मिळू शकते. पण, अशी झाडं लावली तर अंगणात कचरा होतो, घराभोवती जी कुंपणिंभत आहे, त्याला झाडांच्या मुळांमुळे धोका उत्पन्न होतो, या भीतिपायी आम्ही असलेली झाडं तोडतो. पण, ही कचरा करणारी झाडं तोडल्याने आमच्या आयुष्याचाच कचरा होणार आहे, याचा विचार तर आम्ही कधी करतच नाही. आम्ही तर आता बाटलीबंद हवा विकत घेतो आहोत. काय हे भूषण!

 

व्हायंटलिटी एअर ही कॅनडाची कंपनी आहे. जगात सगळ्यात आधी याच कंपनीनं हवा विकण्याचा धंदा सुरू केला. चीनच्या रूपानं या कंपनीला मोठी बाजारपेठ मिळाली. आता या कंपनीच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. जाणकारांनी मात्र या शुद्ध हवेच्या धंद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कंपनीने बाटलीत बंद केलेली हवा तीन मिनिटे घ्यायची आणि उर्वरित वेळी प्रदूषणयुक्त हवेत राहायचे, याने काय फायदा होणार? बरोबरच आहे, हा प्रश्न. पण, काहींचा दिवस शुद्ध हवा घेतल्याशिवाय चांगला जातच नाही. रसायनयुक्त अन्नपदार्थ खाल्ले जात असल्यामुळे दिवसेंदिवस प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे आणि ज्यांची प्रतिकारशक्ती आधीच कमी झाली आहे, अशांना बाटलीबंद हवा वा ऑक्सिजन घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आज देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रदूषणाची पातळी प्रमाणबाहेर वाढली आहे आणि त्यामुळे दिल्लीकरांचे जीवन दुष्कर झाले आहे. अशीच स्थिती राहिली, तर दिल्लीकरांना हिमालयातली बाटलीबंद हवा विकत घेण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. त्यामुळे प्युअर हिमालयन एअर नावाची कंपनी असो वा कॅनडातील व्हायंटलिटी एअर ही कंपनी असो, या कंपन्यांचा धंदा तेजीत चालणार हे नक्की! आजकाल एअर प्युरिफायर्सचा धंदाही तेजीत आहे. एकुणात, सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर भरपूर ऑक्सिजन देणारी झाडं लावण्याबाबत आणि ती जगवण्याबाबत आपल्या सगळ्यांनाच गांभीर्याने पावलं उचलावी लागणार आहेत...


@@AUTHORINFO_V1@@