मंदिरप्रवेशापूर्वी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2019
Total Views |



शुक्रवार दि. २५ जानेवारी रोजी डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या 'राम मंदिरच का?' या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवली येथे होणार आहे. रामजन्मभूमी या आगामी चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार व लेखक सुधीर जोगळेकर भूषवणार आहेत. नावीन्य प्रकाशन, पुणे हे प्रकाशक असून हा कार्यक्रम फ्रेंड्स लायब्ररीतर्फे आयोजित करण्यात आला आहे. २५ जानेवारीला सायं. ६.३० शास्त्री हॉल, टंडन रोड, डोंबिवली (पूर्व) येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने या पुस्तकातील 'मनोगत' प्रसिद्ध करीत आहोत.


वादग्रस्त ढाचा पडल्यापासून अनेक वृत्ते आणि तत्सम पुस्तके वाचनात आली होती. सातत्याने त्याविषयी सत्याला झाकणारे लेखन वाचत होतो. एकांगी होत जाणाऱ्या चर्चा पाहत होतो, ऐकत होतो आणि क्वचित एखाद्या वाहिनीवरील चर्चेत भागही घेत होतो. त्यामुळे विषयाशी सतत स्पर्श होता. तथापि त्यावर काही लिहू असे वाटत नव्हते. आता तो ढाचा पडून पाव शतकावर वर्षे लोटली तरी, अद्याप तो प्रश्न तसाच लोंबकळत राहिला आहे याचे वाईट वाटते. 'मंदिर वही बनायेंगे, मगर तारीख नहीं बतायेंगे' अशा खिल्ली उडविणाऱ्या कमेंट्स वाचतो, त्यावेळी असे करणाऱ्यांना हा प्रश्न नेमका काय आहे, याची जाणीव तरी आहे का, असा सल दाटून येतो. न्यायालयात नेमके काय झाले? साक्षीपुरावे काय सांगतात? पुरातत्त्वीय पुरावे काय आहेत? इतिहासात काय घडले? मंदिर उद्ध्वस्त करणे म्हणजे मानबिंदूचे खंडन नव्हे का? असे सर्व प्रश्न हिंदू समाजाला पडून तो अस्वस्थ व्हायला हवा. तसे होताना दिसत नाही. राजकीय पक्ष केवळ आपापल्या स्वार्थासाठी लोकांना वापरून घेतात इतकेच खरे. स्वत्त्व आणि स्वाभिमान या गोष्टींची स्वातंत्र्यानंतर कमतरता निर्माण झाली आहे, असे वाटू लागते. शतकानुशतकाच्या परकीय राजवटीने आणि आक्रमकांनी केलेल्या भयानक अत्याचारामुळे इथला समाज दुखावलेला आहे. ते दुखणे वर्षानुवर्षे खोट्या इतिहासाच्या आवरणाखाली दडवून विसरायला येथील राज्यकर्ते भाग पाडत आहेत. त्यांनी हाताशी धरलेले डावे इतिहासकार आणखी धोकादायक आहेत. याबद्दल कॉन्राड एल्स्ट यांच्यासारखा बेल्जियम विचारवंत आपल्या 'अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतो, “या डाव्या विचारवंतांनी इस्लामी धर्मांधांशी एक विलक्षण हातमिळवणी केलेली आहे. खरे म्हणजे नास्तिक डावे हे धार्मिक सुधारणा विरोधाचे आणि वैश्विक तत्त्वांच्या विरोधी असलेल्या इस्लामसारख्या धर्मप्रणालीचे सर्वात कट्टर विरोधक असायला हवेत. पण, भारतात मात्र ते त्यांचा दोघांचा समान शत्रू असलेल्या हिंदू धर्माच्या नाशासाठी मोठ्या आनंदाने एकत्र काम करतात. अर्थात, आपल्या स्वार्थासाठी मुस्लिमांचा उपयोग करून घेता येईल असे जर डाव्यांना वाटत असले, तर ते चुकत आहेत. ही एका बाजूने केलेली हातमिळवणी आहे आणि ही हातमिळवणी अधिकाधिक एकांगी होत आहे. कारण, डाव्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे, तर इस्लाम अजूनही आक्रमक होत आहेत. आतापर्यंत डाव्यांनी इस्लामसाठी काहीसे अत्यंत उत्तम असे बौद्धिक कार्य केलेले आहे. मुस्लिमांची द्विराष्ट्र उत्पत्ती मान्य करून त्या आधारावर त्यांनी भारताच्या फाळणीला जोरदार पाठिंबा दिला आणि फाळणीनंतर संपूर्ण बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रावरच्या त्यांच्या वाढत्या प्रभावाचा उपयोग त्यांनी इस्लामचा इतिहास आणि त्याचे तात्त्विक स्वरूप यांच्यावरची टीका पांगळी करून टाकण्यासाठी केला.

 

इस्लामी जातीयवादी योजनांसाठी या पाश्चात्याळलेल्या उच्चभ्रूंचा निव्वळ उपयोग करून घेतला जातो आहे, हे मत केवळ वरवरचे ठरण्याचीही शक्यता आहे. इस्लामी स्वमताग्रहामुळे त्यांना काही धोका नाही, अशी या उच्चभ्रूंची खात्री आहे आणि ती बरोबर आहे. इस्लाम जोमदार बनून त्याने राज्यव्यवस्थेला एकदा आकार दिल्यानंतर जे शहाच्या इराणपेक्षा भारतात अधिक प्रमाणात घडलेले आहे. तो आधुनिकतेला फारसे आव्हान देऊ शकणार नाही. इस्लामी पुनरुत्थानाचा हिंदू समाजाला धोका असला तरी त्याला अधिक मोठे आव्हान आहे ते डावीकडे झुकलेल्या, पाश्चात्याळलेल्या म्हणजेच थोडक्यात-नेहरूवादी व्यवस्थेचे.” (अनुवाद - वि. ग. कानिटकर आणि शुभदा गोगटे, शुभदा-सारस्वत प्रकाशन, पृ. ६, ७) आता मात्र डाव्यांचा सर्व कावा उघडा पडत आहे. त्यांच्या शेवटाचा आरंभ झाला आहे. या पुस्तकात न्यायालयातील त्यांची काही वक्तव्ये दिली आहेत. ती वाचून, अशांना बुद्धिवादी आणि इतिहासकार असे का म्हटले जाते, असा प्रश्न वाचकांना पडेल. १९५०-६०च्या दशकात रामस्वरूप, सीताराम गोयल, करपात्रीजी महाराज, बाळशास्त्री हरदास यासारखे आणि अलीकडच्या काळात स्वामी वरदानंद भारती, पांडुरंगशास्त्री आठवले, भारताचार्य सु. ग. शेवडे, पु. भा. भावे असे अनेकजण डाव्या विचारप्रणालीशी बौद्धिक झगडा करीत होते. त्यावेळचा डाव्यांचा सर्व उद्धटपणा आता फारच पातळ झाला आहे.

 

गेल्या ७० वर्षांत या डाव्या लोकांमुळे आपली डोकी 'सब्व्हर्ट' झाली होती. आपण विचार, काय आणि कसा करायचा, हेसुद्धा तेच ठरवत होते. त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाला शिरोधार्य मानत आपल्यातील अनेकजण बळी पडत होते. सर्व काही नाकारणे आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे हा त्यांचा कार्यक्रम आता लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे. या देशात जे बहुसंख्य आहेत तेच जणू देशशत्रू असल्यागत मांडणी करीत राहणे आणि हिंदू समाजाला सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे यांचे कृत्य आता उघड होते आहे. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरे देण्याची आता गरज आहे. त्या कार्यात खारीचा वाटा आम्ही पिता-पुत्र उचलण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे वाहिन्यांवरील चर्चांमध्ये आकडेवारी आणि अन्य ग्रंथांचे संदर्भ देत मांडणी केली की या लोकांची कशी बोलती बंद होते हे आम्ही दोघेही अनुभवत असतो. भरपूर संदर्भ आपल्याकडे असूनही हिंदू समाज अंगभूत सहनशीलतेमुळे देवा-धर्मावर टीका करण्याचे यांचे चाळे आजवर खपवून घेत आला. यापुढे असे व्हायला नको. यासाठीच या पुस्तकाचे लेखन हाती घेतले. कित्येक दिवस (आणि रात्रीत) न्यायालयाचे निकालपत्र, साक्षी, भारतीय पुरातत्त्वीय विभागाचे अहवाल यांच्यासहच अन्य कित्येक लहान-मोठी कागदपत्रे आणि पुस्तके मिळून किती हजार पाने वाचून, अभ्यासून, पडताळून झाली आणि विविध डॉक्युमेंटरीज् एकूण किती तास बघून झाले याला गणतीच नाही. हे सारे का? तर अयोध्या प्रकरण दोन्ही बाजूंनी नीट अभ्यासण्यासाठी! अयोध्येतच भव्य राम मंदिर व्हावे अशी इच्छा असली तरी, त्या प्रकरणाची इत्थंभूत माहिती आम्हाला नव्हती.आपले लेखन हे सत्य संदर्भ, पुरावे यावरच आधारित हवे असा नेहमीचा आग्रह होता; प्रचारकी थाटाचे पुस्तक लिहिण्याचा विचार अजिबात नव्हता. आता मात्र अयोध्या प्रकरण संपूर्णपणे अभ्यासल्यावर अयोध्येतील विवादित स्थानीच भव्य राम मंदिर उभारले जायला हवे हे आधीपासूनच असलेले मत इतिहास, संदर्भ-पुरावे आणि न्यायिक प्रक्रिया यावर आधारित आणि दृढमूल झाले आहे. देशातल्या डाव्या विचारसरणीच्या जमात-ए-पुरोगामींनी हे प्रकरण कसे लांबवले-चिघळवले हेदेखील पुराव्यांसह मांडले आहे. हे सारे सत्य जाणूनही जर कोणी 'राम मंदिराच्या जागी हॉस्पिटल उभारा' असे सांगत असेल, तर त्यांनी आधी स्वत:चे राहते घर उदार अंत:करणाने हॉस्पिटलसाठी दान करून टाकावे!

 

या प्रकल्पासाठी अनेकांचे हातभार लागले. प्रमोद पंडित जोशी, संदीप तोंडापूरकर आणि प्रणव भोंदे यांना नुसते फोनवर सांगताच त्यांनी काही पुस्तके पाठवली. एल्स्टच्या पुस्तकाच्या अनुवादक असलेल्या शुभदा गोगटे यांनी त्यांच्याकडे असलेल्या एकमेव प्रतीची छायाप्रत करून घ्यायला दिली आणि ती प्रत 'गंधर्ववेद प्रकाशना'चे आमचे मित्र प्रकाश खाडिलकर यांनी त्वरेने करून दिली. 'नागपूर तरुण भारत'च्या चारुदत्त कहू यांनी मोहम्मद के. के. यांचा लेख तातडीने पाठविल्याने परिशिष्टात तो समाविष्ट करता आला. 'नागपूर तरुण भारत'चे आभार. पत्रकार मित्र राजेश प्रभूसाळगांवकर यांनी त्यांचा कारसेवेच्या अनुभवाचा लेख पुस्तकात घेण्याची अनुमती दिली. संदर्भग्रंथ सूची वेगळी दिली नाही कारण अनेक ठिकाणी मूळ संदर्भांचे उल्लेख केले आहेत. आमचे तरुण प्रकाशक नितीन खैरे यांनी आणि त्यांच्या सर्व चमूने युद्धपातळीवर काम केल्यामुळे पुस्तक त्वरेने प्रकाशित होऊ शकले. अत्यंत अर्थपूर्ण असे मुखपृष्ठ आमचे जामात भूषण वैद्य यांनी केले. आणखी कुणाचा नामोल्लेख राहिला असल्यास क्षमस्व. पण, या गोवर्धनाला अनेकांचे हात लागले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. सरतेशेवट मक्का, व्हॅटीकन, जेरुसलेम यांच्याइतकेच महत्त्व हिंदूंसाठी अयोध्या, काशी, मथुरेचे आहे. अयोध्येत रामलला विराजमान आहेत. त्यांना हटवण्याचा प्रश्नच येत नाही. तिथे मंदिर होते आणि आहेच... ते केवळ 'भव्य' करायचे आहे! वाचकांनी आपले मत आवर्जून कळवावे.

 

वंदे मातरम्।

जय श्रीराम।

 

डॉ. सच्चिदानंद शेवडे

डॉ. परीक्षित शेवडे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@