कल्पनांच्या भरारीस पंख देणारे डिफेन्स इनोव्हेशन हब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2019   
Total Views |


 
 
 
 
देशातील युवकांना रोजगार आणि नव्या संकल्पना यांना बळ मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची मुहूर्तमेढ रोवली. त्यातून विविध उद्योग व्यवसायांना चालना देण्याचे धोरण आखण्यात आले. विदेशी मुद्रेचा खर्च हा भारताकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण सामग्री खरेदीकामी होत आहे. हा खर्च कमी करण्यासाठी आवश्यक असणारी संरक्षण सामग्री भारतातच निर्माण होणे आवश्यक आहे. या सर्व अडचणींतून मार्ग काढण्यासाठी संरक्षण साहित्य भारतातच निर्माण व्हावे व संरक्षण सामग्री उत्पादनात भारतीय टक्क्यांत वाढ व्हावी, या हेतूने इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरला चालना देण्याचे कार्य हाती घेण्यात आले. त्यात अंतर्गत भूदल (आर्मी), नौदल (नेव्ही) व हवाई दल (एअर फोर्स) या तीनही दलांत ‘डायरेक्टोरेट ऑफ इंडिजनायजेशन’ असा विभाग संरक्षण मंत्रालयांतर्गत सुरू करण्यात आला. या विभागाला दोन प्रकारची उद्दिष्टे देण्यात आली. १) संरक्षण सामुग्रीची संख्या वाढविणे २) संरक्षण सामग्री खरेदीकामी विदेशी मुद्रेची बचत करणे.
 

त्यानुसार संरक्षण मंत्रालयामार्फत व्हेंडर डेव्हलपमेंट सेमिनार घेण्यात आले व सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स अर्थात (एसआयडीएम) या उद्योजकांच्या सोसायटीची स्थापना दिल्ली येथे बाबा कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या एसआयडीएमच्या माध्यमातून भारतातील अनेक ठिकाणी जेथे संरक्षण साहित्य निर्माण करण्याची क्षमता आहे, अशा ठिकाणी एसआयडीएम व संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेंडर डेव्हलपमेंट व इंडिजिनीअस बेसला प्रोत्साहन देणे व संरक्षण क्षेत्रात नवनिर्मितीस चालना देण्याकामी विविध उपक्रम सन २०१७ पासून हाती घेण्यात आले होतेया माध्यमातून ज्या ज्या क्षेत्रात उद्योग साहित्यात नवनिर्मितीची क्षमता आहे त्यांना टेस्टिंग सुविधा, डिझाईनसाठी पूरक व्यवस्था, डिझाईन निर्धारण करण्यासाठी संरक्षण दलाची उपस्थिती, तांत्रिक कुशल कर्मचारी वर्ग या सर्व बाबींची या नव्याने उभ्या राहणाऱ्या उद्योगांना गरज भासणार असल्याची आवश्यकता समोर आली. त्यातूनच डिफेन्स इनोव्हेशन हबची संकल्पना पुढे आली.

 

त्यातील पहिले इनोव्हेशन हब हे तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथे केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आले आणि आता राज्यातील पहिले व देशातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिक येथील ओझर येथे साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच दि. १७ जानेवारी रोजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, महाराष्ट्र सरकारने हवाई व संरक्षण साहित्य निर्मिती धोरण आखले आहे. त्यातच या हबची निर्मिती करावी, असे ठरविण्यात आले होते. उत्पादनाच्या पातळीवर यात महाराष्ट्र सरकारची भूमिकादेखील महत्त्वपूर्ण असणार आहे. या माध्यमातून निर्मितीकरणाचे मोठे दालन येथे निर्माण होणार आहे. त्यामुळे भविष्यात नाशिक परिसरात मॅन्युफॅक्चरिंग हब यावे यासाठी भाजप उद्योग आघडीमार्फत प्रयत्न केले जाणार असल्याचे भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी सांगितले.

 

डिफेन्स इनोव्हेशन हबमुळे होणार फायदे

 

लघु उद्योजकांना व स्टार्ट अपला तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी हे हब दुवा म्हणून भूमिका बजावणार आहेतया माध्यमातून मान्यताप्राप्त प्रयोगांना आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील. प्रोटोटाईप बनविणे व टेस्टिंगसाठी संरक्षण मंत्रालयाकडून १ कोटी रुपयांपर्यंत प्रयोगापरत्वे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, उत्पादनाच्या पातळीवर १० कोटीपर्यंतदेखील अनुदान प्राप्त करून देण्यात येणार आहे. यामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यातील व जवळच्या राज्यातील उद्योजकांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे नाशिकमधील उद्योजकांच्या नवसंकल्पनांना भरारी घेण्यास मोठी संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

 

डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकलाच का?

 

हे हब नाशिक येथे स्थापन करण्याचे मुख्य कारण म्हणजे, नाशिक येथे बेस रिपेअर डेपो, डीआरडीओ स्टेशन, हेलिकॉप्टर ट्रेनिंग व सव्हिर्र्सिंग सेंटर, एचएएल, तोफखाना केंद्र, बोरगड येथे दारूगोळा केंद्र, रडार स्टेशन यांसारखी संरक्षण क्षेत्राशी संबंधित आस्थापने आहेत. तसेच, नाशिकमध्ये विद्युत अभियांत्रिकी व अभियांत्रिकी उद्योग यांचा मोठा पाया आहे. त्याचप्रमाणे नाशिक हे औरंगाबाद, नगर, मुंबई, पुणे आदी शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे.

 

‘निमा’चे महत्त्वपूर्ण योगदान

 

या हबची उभारणी नाशिक येथे व्हावी यासाठी निमाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यासाठी समन्वयक म्हणून निमाचे डॉ. प्रशांत पाटील यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. शशिकांत जाधव, प्रदीप पेशकर यांनी याकामी मोलाचे योगदान दिले. नाशिकचा औद्योगिक विकास व्हावा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग हे नाशिककडे आकर्षिले जावेत. तसेच, या माध्यमातून रोजगार निर्मितीस चालना प्राप्त व्हावी व नाशिकमधील स्टार्टअपला संधी मिळावी यासाठी हे हब नाशिक येथे सुरू होण्याकामी निमामार्फत पुढाकार घेण्यात आला होता. त्याचबरोबर या हबचे मदतकेंद्र (हेल्प सेंटर) देखील निमा येथे उभारण्यात येणार आहे. तसेच या हबचे एचएएल हे केंद्र असणार आहे.

 

टेस्टिंग सुविधेचा असा होणार लाभ

 

या हबच्या माध्यमातून टेस्टिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा फायदा कसा होणार, हे आपल्याला पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. उदा. अमुक एका या उद्योजकाने बोफोर्स तोफेमार्फत अचूक लक्ष्य भेद करता येईल असे उपकरण साकारले तर, त्याला आपल्या उपकरणाची चाचणी घेण्याकरिता हबच्या माध्यमातून बोफोर्स तोफ उपलब्ध करून देण्यात येईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@