संत एकनाथांच्या भारुडातील चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2019   
Total Views |



मागच्या लेखात आपण पाहिले की, कुटुंबव्यवस्थेतील रुपके वापरून संत एकनाथांनी अनेक रचना केल्या. त्यातील ‘दादला’ ही अशीच एक शतकानुशतके लोकप्रिय रचना. या भारुड रचनेतला एकानाथांचा ‘दादला’म्हणजे एका कुटुंबवत्सल स्त्रीची अपेक्षा-इच्छा-वासना अशा अवगुणांनी युक्त अविवेकी वृत्ती.

 

दैनंदिन व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक वास्तव व्यवहारांवर म्हणजेच लौकिक व्यवहारांवर रुपकांच्या माध्यमातून प्रबोधक टिपणी करण्याचे काम सर्वच संतांनी केले आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, नवनाथ महाराज, रामदास स्वामी अशा सगळ्यांनीच, श्रद्धा आणि भक्तीच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करताना आणि व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक जीवनातील दैनंदिन व्यवहारातील नैतिकतेच्या मूल्यसंवर्धनासाठी अशी रुपकात्मक भारुडे लिहिली. मात्र, भारुड हे संत एकनाथांच्या साहित्यातील वैशिष्ट्य ठरले. भारुड म्हणजे संत एकनाथ असे समीकरण स्वीकारले गेले. विषयांचे वैविध्य, रुपकांची नाट्यमय मांडणी, समाजाला जाणवेल आणि समजेल अशा नर्मविनोदाचा समर्पक वापर आणि भारुडांच्या रचनांची गेयता ही समाजमान्यता प्राप्त करणाऱ्या संत एकनाथांच्या भारुडाची चार ठळक वैशिष्ट्ये होती आणि ५०० वर्षांनंतर आजही ती तितकीच प्रभावी आहेत. संत एकनाथांच्या लिखित साहित्यातील या भारुडांच्या रचनांतील रुपकांचा म्हणजेच चिह्नांचा-प्रतीकांचा विलक्षण वापर, हा आपल्या लेखमालेचा प्राथमिक अभ्यास विषय आहे. भागवत-रामायणातील कथा असोत, दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्याचा सल्ला देताना, वैयक्तिक-कौटुंबिक नात्यांतील जोडणी आणि स्वभाव वैशिष्ट्यांवर केलेली टिपणी असो आणि समाजातील अंधश्रद्धांचा फोलपणा दाखवणारी प्रखर टीका असो... यातील रुपकांचा नर्मविनोदासह केलेला वापर अचंबित करणारा आहे. यातील नर्मविनोदाच्या वापरामुळे, श्रोता या भारुडांकडे आकर्षित झाला आणि मग त्यातील रुपके आणि रुपकमूल्य त्याला समजली आणि त्यामुळे त्यातील मूल्यवृद्धीची जाणीव श्रोत्यांना झाली. संत एकनाथांच्या भारुडातील नाट्यमय रचना आणि गेयता, समाजप्रबोधन या मूळ उद्देशाला समर्पक आणि पूरक होत्या आणि आजही आहेत.

 

मागच्या लेखात आपण पाहिले की, कुटुंबव्यवस्थेतील रुपके वापरून संत एकनाथांनी अनेक रचना केल्या. त्यातील ‘दादला’ ही अशीच एक शतकानुशतके लोकप्रिय रचना. या भारुड रचनेतला एकानाथांचा ‘दादला’म्हणजे एका कुटुंबवत्सल स्त्रीची अपेक्षा-इच्छा-वासना अशा अवगुणांनी युक्त अविवेकी वृत्ती. आपल्या संसारात सुखाचा शोध घेणारी अशाच अविवेकी वृत्तीची ही कुटुंबवत्सल तरीही असमाधानी महिला या भारुडाची नायिका आहे. या भारुडातील हेच पात्र फार महत्त्वाचे रुपक आहे. तिच्या मनाची स्थिती तिच्या एकटीची नाही. अविवेक हे सर्व समाजमनातील दुखणे आहे, या जाणिवेने संत एकनाथांची ही रचना वैयक्तिक आणि समाजमनाच्या दुखऱ्या व्याधीवरील शस्त्रक्रियेचेच काम करते. यातील मूलभूत वास्तव आणि त्यासाठी वापरलेली द्वयार्थी रुपके-प्रतीके त्यांच्या गूढार्थांचा आणि सूक्ष्मार्थांचा अर्थ आणि परिणाम, लौकिकाच्या सीमा पार करून वैश्विक ज्ञानाचा अनुभव देते. यातील काही रुपके, अखिल मानवसृष्टीच्या लौकिक संकल्पांना आहेत, तर त्याबरोबरच येणाऱ्या काही संकल्पना अमूर्ताकडे जाणाऱ्या वैश्विक संकल्पना आहेत. याचा विस्तार या लेखात केला आहे.

 

‘दादला’

मोडकेंसे घर तुटकेसें छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥

मला दादला नलगे बाई ॥धृ॥

फाटकेंच लुगडे तुटकीच चोळी।

शिवाया दोरा नाही । मला दादला नलगे बाई ॥२॥

जोंधळ्याची भाकर आंबाडीची भाजी ।

वर तेलाची धार नाही ॥३॥

मोडका पलंग तुटकीसी नवार ।नरम बिछाना नाही ॥४॥

सुरतींचे मोतीं गुळधाव सोनें ।राज्यांत लेणें नाहीं ॥५॥

एका जनार्दनीं समरस झालें ।

तो रस येथे नाहीं ॥६॥

 

भारुडाची ही रचना प्रत्येक मराठी मनांत कायम घर करून असते. या रचनेतले ‘मोडकेंसे घर तुटकेसें छप्पर’ या पहिल्या चार शब्दांत ‘मोडकेसे घर’ हे पहिले दोन शब्द म्हणजे आपल्या नश्वर पार्थिव देहासाठी एकनाथांनी वापरलेले रुपक आहे. या देहाचे आरोग्य आपल्याला सांभाळता येत नाही हे याचे वास्तवातील लौकिक रुपकमूल्य आहे. शरीराची निगा ठेवता न येण्याचे प्रमुख कारण शिक्षणाचा, साक्षरतेचा अभाव अर्थात अविद्या. फक्त लिहिता-वाचता आले की, त्याला साक्षरता म्हणता येणार नाही, जीवनमूल्यांची साक्षरता हवी, असा स्पष्ट सल्ला ‘तुटकेसें छप्पर’ या पुढच्या दोन शब्दांत आहे. विद्या-अविद्या ही अमूर्त संकल्पना आहे. कारण, ती एखाद्या वस्तूसारखी दाखवता येत नसते. पहिल्या चार शब्दांतील ही लौकिक आणि अलौकिक रुपके आणि त्याचे रुपकमूल्य ही फार विलक्षण मांडणी आहे.

 

पहिल्या चरणातील पुढच्या दोन ओळीदेवाला देवघर नाही’ अशा आहेत. इथे ‘देव’ म्हणजे श्रद्धा आणि भक्ती या मानवी जीवनातल्या अगदी प्राथमिक गुणवत्ता. या गुणवत्तांना ‘देवघर नाही’ म्हणजे या दोन गुणवत्तांना आपल्या मनात-अंत:करणात जागा नाही. कारण, विद्येचा -प्राथमिक मानवी मूल्यांच्या परिचयाचा अभाव आहे. या चार-सहा शब्दांतील चिह्न-प्रतीकांचा -रूपकांचा इतका प्रभावी प्रयोग, ही फार मोठी प्रतिभा आहे. ‘मला दादला नलगे बाई’ हे ध्रुवपदातले चार शब्द मात्र आशेचा किरण दाखवतात. हिचा ‘दादला’ म्हणजे तिच्यातील विवेकवृत्तीचा पूर्ण अभाव याचे रुपक आहे. ध्रुवपदातील या चार शब्दांत ही कुटुंबवत्सल स्त्री चक्क मला ‘दादला’ नको अशा निर्णयाप्रत येते. कारण, तिलाही स्वत:च्या कमतरतेची जाणीव झालेली आहे. दादल्याचा म्हणजे अविवेकाचा त्याग करून तिला विवेकवृत्ती आत्मसात करायची आहे. मग बदललेल्या दादल्याबरोबर आपला संसार बहरेल याची तिला खात्री असावी. नर्मविनोदाचा असा वापर श्रोत्यांना निश्चितपणे आकर्षित करतो. ‘फाटकेंच लुगडे तुटकीच चोळी’ हे दुसऱ्या चरणातील पहिले चार शब्द अशीच दोन अनपेक्षित तरीही समर्पक रुपके आहेत. फाटके लुगडे आणि तुटकी चोळी हे स्त्रीच्या नैसर्गिक लज्जा भावनेला झाकू शकत नाहीत. मात्र, एकनाथांच्या या चरणातील लज्जा तिच्या शरीराची नसून तिच्या बुद्धीची-कुवतीची, तिला जाणवणारी लज्जा आहे. साक्षरता आणि विवेक नाही म्हणून आपल्याला बुद्धी वापरता येत नाही, याचीच तिला भ्रांती आहे. हेच तिचे ‘फाटके लुगडे’ आहे. दुर्बुद्धी झाल्याने मनात येणारे भ्रष्ट विचार म्हणजेच तिची ‘तुटकी चोळी’ आहे. हे फाटके लुगडे आणि तुटकी चोळी तशीच राहते. कारण, पुढे तिची तक्रार आहे ‘शिवाया दोरा नाही.’ अशा सगळ्या अवगुणांमुळे या स्त्रीच्या आयुष्यात शिस्त नाही. या दोऱ्याचे रुपक या स्त्रीच्या अशाच शिस्त आणि नियमांच्या अभावाला उद्देशून एकनाथांनी वापरले आहे. एकनाथांच्या मते, हळूहळू या स्त्रीला आपल्यातील अभावांची जाणीव होऊ लागली असावी. कारण, पुढच्या तिसऱ्या चरणात तिचा नूर म्हणजे स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसतो. ‘जोंधळ्याची भाकर आंबाडीची भाजी, वर तेलाची धार नाही’ असं म्हणणारी ही स्त्री पहिल्या चार शब्दांतच समजून चुकली आहे की, माझ्या अपेक्षा वास्तव नाहीत. त्या मायावी आहेत. मला सतत चुकीचे वागायला भाग पडत आहेत. वासना-विषयाच्या अपेक्षांची भाकर आणि भाजी मला नको. त्याऐवजी मला यातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य हवे आहे. मला ‘तेलाची धार’ म्हणजे कुणाचा तरी उबदार स्नेह हवा आहे.

 

‘मोडका पलंग तुटकीसी नवार, नरम बिछाना नाही’ असा स्वत:चाच उपहास करताना तिला म्हणायचे आहे, मला नरम बिछाना हवाय. संसारातील आनंदाचा-सुखाचा दिनक्रम मला अपेक्षित आहे. या तिच्या अपेक्षेचे ‘नरम बिछाना’ हे रुपक आहे. पण, तिच्या शाश्वत सुखाचा हा अपेक्षित बिछाना मात्र मोडका आहे. त्याच्या नवारीची वीण तुटलेली आहे. अविवेकामुळे तिच्या अपेक्षेतील असा ‘नरम बिछाना’ मोडलेला आहे. संसारातील तिचे शाश्वत सुख म्हणजे ‘सुरतींचे मोतीं गुळधाव सोनें’ असे आहे. ‘सुरतीचे मोतीं’ म्हणजे दिसायला सुंदर मोती आणि ‘गुळधाव सोने’ म्हणजे लखलखीत सोन्याचे आकर्षक दागिने. ‘सुरती’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. सुरत म्हणजे सौंदर्य आणि सुरती म्हणजे रुपयाचे नाणे. गेली काही शतके ‘ज्याचे खिशात सुरती तो मंगलमूर्ती’ अशी म्हण प्रचलित आहे. यातला सुरती म्हणजे पैसे. वरचे हे दोन्ही अलंकार तिच्या ज्ञानाचे रुपक आहेत. मात्र, हेच ज्ञान तिच्याकडे नाही म्हणून ती खंतावली आहे. माझ्या संसाराच्या छोट्याशा राज्यात मला असे काही ल्यायला (अलंकार वापरणे) मिळत नाहीत, अशी खंत ती ‘राज्यांत लेणें नाहीं’ असे म्हणताना व्यक्त करते आहे. ‘एका जनार्दनीं समरस झालें, तो रस येथे नाहीं’ असं शेवटच्या चरणात म्हणताना संत एकनाथ तिच्या माध्यमातून आपल्या गुरूला वंदन करतात आणि अशा अविवेकामुळेच तिच्या अपेक्षेतील आत्मिक सुख तिला मिळत नसल्याचे तिचे गाऱ्हाणे पुन्हा एकदा श्रोत्यांसमोर ठेवतात. ही भारुडाची रचना संत एकनाथ स्वत: नाट्यमय आवेशात सादर करत असावे, ज्यामुळे ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याची प्रतिक्रिया त्यांना समजत असावी. मराठी संत- महंतांनी कित्येक शतकांपासून समाज प्रबोधन आणि मूल्यवृद्धी संवादाचे महत्त्वाचे काम यशस्वीपणे केले आहे. त्यातील रुपके आणि मूल्यसंकेत याचा अभ्यास आपण पुढेही करणार आहोत...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@