५१ महिलांनी घेतले शबरीमला मंदिरात दर्शन

    19-Jan-2019
Total Views |


 
 
 
 
नवी दिल्ली : मासिक पाळी येणाऱ्या वयोगटातील महिलांना केरळ येथील शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी शबरीमला मंदिराचा मार्ग खुला केला होता. त्यानंतर आतापर्यंत त्या वयोगटातील ५१ महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतले. शुक्रवारी केरळ सरकारकडून ही अधिकृत माहिती सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली.
 

दरम्यान, शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याबद्दल दोन महिलांना धमकीचे फोन येत होते. याप्रकरणी त्या दोन महिलांना २४ तास पोलीस संरक्षण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला दिले होते. बिंदू आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावे आहेत. बिंदू या ४२ वर्षीय असून कनकदूर्गा या ४४ वर्षांच्या आहेत. मंदिर प्रवेशानंतर धमक्यांचे फोन आल्यानंतर या दोघींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एल.एन राव आणि न्या. दिनेश महेश्वरी यांच्या खंडपीठाकडून याप्रकरणीच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. या दोघींनाही २४ तास पोलीस संरक्षण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून केरळ सरकारला देण्यात आले.

 

याप्रकरणी सुनावणीच्या वेळी केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली एलडीएफ सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील विजय हंसारिया यांनी आतापर्यंत ५१ महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतले असल्याची अधिकृत माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली. केरळ सरकारकडून पहिल्यांदाच या प्रकरणी अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. यापैकी एका महिलेचा आधार आणि फोन क्रमांक प्रत्यक्षात मात्र एका पुरुषाचा असल्याने केरळमध्ये शबरीमला प्रकरणी नवा वाद उभा राहिला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/