शितावरून भाताची परीक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


प्यू रिसर्च सेंटरला आपल्या सर्वेक्षणात असं आढळलं की, आफ्रिकन-अमेरिकन मुसलमान अमेरिकेवर अजिबात खूश नाहीत. याचा अर्थ ते अतिरेकी इस्लामचे समर्थक आहेत असाही नव्हे. पण, ते असमाधानी आहेत.

 

अमेरिकेतील विविध अध्ययन संस्था, अभ्यासकांचे गट हे सदोदित नाना प्रकारची सर्वेक्षणं करीत असतात. सर्वेक्षणांमधून दिसून येणार्‍या निष्कर्षांना खूपच मर्यादा असतात. पण, तरीहीशितावरून भाताची परीक्षाया न्यायाने त्या निष्कर्षांमध्ये थोडाफार खर्च केला जातो आणि त्यामधून निघणारा निष्कर्ष इतका बारीकसा असतो की, डोंगर पोखरून उंदीर निघाला अशीच स्थिती वाटते. परंतु, या उंदरावरून त्या अध्ययन संस्था लोकांच्या नाडीचा अंदाज घेतात. तो अंदाज राजकीय पक्षांपर्यंत आणि सामाजिक हितासाठी कामं करणार्‍या संस्थांपर्यंत पोहोचवला जातो. त्यातून नवी सामाजिक धोरणं ठरतात. त्यातून नवे कायदे केले जातात. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष काम करणार्‍या लोकांमधून राजाने आपले खबरी निर्माण करावेत. रोज रात्री राजाने अशा विविध खबर्‍यांकडून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांतील ताजं वर्तमान समजावून घ्यावं. त्यानुसार आपलं धोरण ठरवावं. हे करताना या खबर्‍यांना एकमेकांची माहिती किंवा एकमेकांशी संपर्क राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असा उपदेश भारताचा महान विचावंत आर्य चाणक्य याने अडीच हजार वर्षांपूर्वी करून ठेवलेला आहे. सर्वेक्षण ही एक प्रकारे या खबरेगिरीचीच चकाचक पॉलिश केलेली अमेरिकन आवृत्ती आहे.

 

तर अमेरिकेतल्या लोकसंख्येवर लक्ष ठेवणार्‍या एका नामवंत अध्ययन संस्थेने नुकतेच अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्या मुसलमानांचं सर्वेक्षण केलं. यात संस्थेने ६० हजार मुसलमानांच्या मुलाखती घेतल्या. अलीकडेच युरोपातल्या विविध देशांमध्येही अशी सर्वेक्षणंकरण्यात आली होती. त्यातं असं आढळून आलं की, युरोपीय मुसलमान ते राहत असलेल्या देशांच्या धोरणांबाबत नाराज आहेत. ‘इसिसबद्दल त्यांच्यापैकी बहुसंख्यांना सहानुभूती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वत:ला अगोदर मुसलमान आणि नंतर ते राहत असलेल्या देशाचे नागरिक म्हणवतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर या रिसर्च सेंटरने वरील सर्वेक्षण केलं. अमेरिकन मुसलमानांमध्ये बहुसंख्या ही आफ्रिकन, अमेरिकन मुसलमानांची आहे. त्यांच्या खालोखाल पाकिस्तान, इराण, भारत आणि लेबेनॉन या देशांमधील स्थलांतरित मुसलमान आहेत. आफ्रिकन अमेरिकन मुसलमान म्हणजे ३००-४०० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून अमेरिकेत गेलेले काळे गुलाम. अब्राहम लिंकनने गुलामगिरी रद्द केली, त्यालाही आता दीडशे वर्षे पूर्ण होऊन गेली. कायदेशीरदृष्ट्या काळे लोक आता गुलाम नाहीत. त्यांनानिग्रोकिंवानिगरम्हणणं हा गुन्हा आहे. पण, गोर्‍यांच्या मनातला वर्णश्रेष्ठत्त्वाचा अहंपणा कायदा घालवू शकलेला नाही. यातून काळ्या लोकांची चळचळ उभी राहिली. पण, तिचा नेता मार्टिन ल्युथर किंग धाकटा याचा खून झाला. ख्रिश्चन धर्मात सगळे समान आहेत, अशी डिंग पाद्री लोकं मारत असतात. पण, काळ्या ख्रिश्चनांना गोर्‍यांच्या चर्चमध्ये प्रवेश दिला जात नाही.

 

या सामाजिक विषमतेमुळे काळे लोक मनातून संतापलेले असतात. याचा फायदा मुसलमानांनी उचलला आणि परिणामी १९७०च्या सुमारास आफ्रिकन-अमेरिकन म्हणजे काळ्या अमेरिकनसाठी खूप मोठ्या संख्येने इस्लाम धर्माचा स्वीकार केला. याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे त्या काळातला प्रख्यात मुष्टियोद्धा कॅशियस क्ले. कॅशियस क्ले हा आफ्रिकन-अमेरिकन. पण, त्याने धर्मांतर केलं. महंमद अली या नव्या नावाने तो वावरू लागला. मृत्यूनंतरही तो जगप्रसिद्धच आहे. आफ्रिकन-अमेरिकनांच्या या नव्या पावित्र्यामुळे गोरे अमेरिकन थोडे हादरले. वर्णद्वेष थोडा सौम्य झाला. आम्ही काळ्या लोकांना सर्वत्र समान संधी उपलब्ध करून देत आहोत, असं दाखवलं जाऊ लागलं. हॉलिवूडच्या चित्रपटांमधून गोर्‍या हिरोचा मित्र म्हणून किंवा एखाद्या चरित्र भूमिकेत काळे नट दिसू लागले. ही काळी व्यक्तिरेखा फार उमदी, दिलदार, शूर, धमाल विनोदी अशी उठावदार प्रेक्षकांवर छाप टाकणारी असेल, याची काळजी घेतली जाऊ लागली.

 

पण, प्यू रिसर्च सेंटरला आपल्या सर्वेक्षणात असं आढळलं की, आफ्रिकन-अमेरिकन मुसलमान अमेरिकेवर अजिबात खूश नाहीत. याचा अर्थ ते अतिरेकी इस्लामचे समर्थक आहेत असाही नव्हे. पण, ते असमाधानी आहेतया उलट पाकिस्तान, इराण, भारत, लेबेनॉन आणि आता बांगलादेश इथून आलेले मुसलमान आपल्या जीवनाबद्दल खूपच आनंदी आहेत. त्यांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रांमध्ये संधी मिळत आहेत. सर्वसाधारण गोर्‍या अमेरिकन नागरिकांची सरासरी मिळकत आणि या मुसलमानांची मिळकत यामध्ये फार तफावत नाही. मिळणारी प्रत्येक संधी उचलण्यास, परिश्रम करून स्वतःची प्रगती करून घेण्यास हे मुसलमान उत्सुक आहेत. अमेरिकन समाजजीवनात मिळून-मिसळून जाण्याची त्यांची तयारी आहे. अल कायदा किंवा एकंदरीतच अतिरेकी इस्लामी मानसिकता त्यांना पसंत नाही. त्यांना आपला भौतिक उत्कर्ष साधायचा आहे आणि त्यासाठी ते अमेरिकेत आलेले आहेत.

 

यातील महत्त्वाचा भाग असा की, अमेरिकन समाजजीवनाशी एकरूप होण्याची तयारी दाखवणारे हे मुसलमान स्वत: त्यांच्या-त्यांच्या देशांमधून स्थलांतरीत होऊन आलेले आहेत. आता दुसरा महत्त्वाचा भाग पाहा. १९६०-७०-८०च्या दशकांमध्ये ज्या मुसलमानांनी अमेरिकेत स्थलांतर केलं, ती पिढी आता स्थिर झाली आहे. हळूहळू निवृत्तीकडे झुकत आहे. आता त्या पिढीची नवी जवान पोरं रिंगणात उतरत आहेत. ही नवी पिढी फार लहानपणीच अमेरिकेत आलेली आहे किंवा अमेरिकेतच जन्मलेली आहे. म्हणजेच शिक्षण, संस्कार या दृष्टीने ही पिढी पक्की अमेरिकन आहे आणि नेमकी हीच पिढी अमेरिकेच्या एकंदर ध्येय-धोरणांबाबत असंतुष्ट आहे. आम्ही पहिल्यांदा मुसलमान आणि नंतर अमेरिकन आहोत, असं उत्तर देणारे लोक या संस्थेला याच गटात जास्त आढळले. मात्र, अतिरेकी इस्लामी चळवळीबद्दल सहानुभूती क्वचितच कोणी व्यक्त केली. एकंदरीत या सर्वेक्षणातून या अध्ययन संस्थेने काढलेले निष्कर्ष असा की, युरोपपेक्षा अमेरिकेची स्थिती बरी आहे. स्थानिक समाजाशी मिळून-मिसळून राहायला आम्ही उत्सुक आहोत, असं अमेरिकतले मुसलमान तोंडाने म्हणतात तरी. युरोपात त्यांची तेवढीही तयारी नाही.

 

समझनेवाले को इशारा काफी है! इतिहासाची जाण भारतीय लोकांना इतिहासाची जाणही नाही आणि पर्वा तर त्याहून नाही, असा पाश्चिमात्य अभ्यासकांचा स्पष्ट अभिप्राय आहे. या आरोपात नक्कीच तथ्य आहे. फक्त सत्य एवढंच आहे की, ज्यांना इतिहासाची जाण आहे. असे जाणते लोक संख्येने फारच कमी आहेत. बहुसंख्य लोक आपल्या उपजीविकेच्या, पोटापाण्याच्या धांदलीत इतके गुंतून पडलेले आहेत की, त्यांना इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायला खरोखरच फुरसत नाही. अर्थात, इतिहास जपायचा असतो. पुढल्या पिढीकडे एक ठेव म्हणून सोपवायचा असतो नि इतिहासापासून प्रेरणा घेऊन भविष्यात नवा इतिहास घडवायचा असतो, ही एक मानसिकता आहे, ही एक प्रवृत्ती असते. ही प्रवृत्ती भारतीय नागरिकांमध्ये निर्माणच होणार नाही, असलीच कुठे मनाच्या कोपर्‍यात, तर ती मारली जावी, याची पुरेपूर काळजी इंग्रजी शिक्षण पद्धतीने घेतलेली आहे. ही पद्धतीच अशी आहे की, त्यातून बाहेर पडणारी माणसं कारकूनच व्हावीत.

 

वास्तविककारकूनहा इंग्रजांपूर्वी सामान्य हुद्दा नव्हता. शिवरायांचे थोर मुत्सद्दी आणि रणधुरंधर सेनानी मोरोपंत पिंगळे यांनासरकारकूनहा मानाचा किताब होता. हे मोरोपंत पुढे राज्याभिषेकानंतर छत्रपतींचे पंतप्रधान झाले. यावरूनकारकूनया पदाची मातब्बरी ध्यानी यावी. पण, इंग्रजांच्या कारकिर्दीत कारकून म्हणजे लिखापढी करणारा एक सामान्य कामगार अशी त्या पदाची नि शब्दाची अवनती झाली. इंग्रजांनी जाणीवपूर्वक कारकून ही मनोवृत्ती निर्माण केली. कुणाच्या अध्यात-मध्यात येणारा, लाचार, जी हुजूर वृत्तीचा, संतापाने कधीही खवळून उठणारा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मभान विसरलेला, अस्मिता हरवलेला माणूस म्हणजे कारकून. इंग्रजी शिक्षण पद्धतीतून अशा कारकूनी मनोवृत्तीच्या लोकांच्या फौजाच्या फौजा आजही बाहेर पडतातच आहेत. व्यवहारात, लौकिक आयुष्यात हे लोक मोठमोठी पदं भूषवतात. खूप भौतिक प्रगतीसुद्धा करतात. पण, मनोवृत्ती कारकूनाचीच असते. अशा लोकांना इतिहासाची जाण कशाला असणार? असेच लोक गडांवर आणि गडांच्या पायथ्याशी रेव्ह पार्ट्या करतात. युरोपातही ऐतिहासिक किल्ले आहेत. झेकोस्लोव्हाकिया हा एक ऐतिहासिक देश आहे. साम्यवादी राजवट कोसळल्यावर त्या देशातल्या दोन वांशिक गटांनी दोन स्वतंत्र देश उभे केले. झेक वांशिक गटाने आपला झेक प्रजासत्ताक हा देश निर्माण केला, तर स्लोव्हॅक गटाने आपला स्लोव्हाकिया हा स्वतंत्र देश बनवला. झेक प्रजासत्ताकाची राजधानी प्राग हे युरोपातलं एक प्राचीन शहर आहे. फार मोठा इतिहास, सांस्कृतिक समृद्धी या शहराने पाहिलेली आहे. लॉबकोविझ हे प्राग शहरातलं एक ऐतिहासिक सरदार घराणं आहे. हे घराणं इतकं श्रीमंत होतं की, झेक प्रदेशातले दहा किल्ले त्यांच्या खाजगी जहांगिरीत होते.

 

साम्यवादी राजवटीने सरदारशाही-सरंजामशाहीचा बीमोड करून श्रमिकांचं राज्य वगैरे आणण्याच्या नावाखाली ब्रॉबकोविझ घराण्याला मनसोक्त लुटलं. त्यांचे किल्ले-राजवाडे तर जप्त केलेच, पण त्यांच्या घराण्याने जपून ठेवलेल्या मौल्यवान कलाकृतीही लुटून नेल्या. आता नव्या राजवटीने लॉबकोविझ घराण्याला प्रागमधला किल्ला परत दिला आहे. घराण्यातला वर्तमान वंशज विल्यम लॉबकोविझ सध्या किल्ल्याची संपूर्ण डागडुजी करून तिथे घराण्याचं वस्तुसंग्रहालय उभं करण्यात गुंतलेला आहे. “आमच्या घराण्याने जमवलेल्या असंख्य कलाकृती म्हणजे आमच्या देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. लोकांनी तो पाहावा, अशी माझी इच्छा आहे,” विल्यम म्हणतो. आपल्या देशातही खूप राजवाडे आहेत. काही ठिकाणी वस्तुसंग्रहालयं आहेत. पण, कित्येक ठिकाणी त्याचं रूपांतर पंचतारांकित हॉटेलांमध्ये करण्यात आलं आहे. त्यांच्या मालकांना इतिहासाच्या प्रेरणेपेक्षा अनिर्बंध उपभोगभूमीतून मिळणारा बक्कळ पैसा जास्त आवडतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@