‘हराम’ची व्याख्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2019   
Total Views |



पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (पीआईए) ने मदिना आणि जेद्दाच्या विमान प्रवासातील मनोरंजनावर प्रतिबंध लादले आहेत. या मार्गात केवळ कुराणच्या आयत आणि नातचे प्रसारण केले जाणार आहे. पीआयएचे प्रवक्ता मशहूद तजावर यांचे यावर विधान आहे की, लोकांच्या भावनांचा विचार करून हा निर्णय घेतला गेला आहे. कारण इथे केवळ पवित्र यात्रेकरू जातात. त्यामुळे त्यांच्या विमान प्रवासादरम्यान संगीत किंवा गीत प्रसारण करणे योग्य नाही.

 

हे पाहिले की वाटते की, पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र असल्यामुळे आणि कुराणामध्ये संगीत, नृत्य वगैरेला हरामचा दर्जा दिला असल्यामुळे (निदान तसे सांगितले तरी जाते) या देशात नृत्य, संगीत वगैरेंना काळ्या पाण्याची बंदी असावी. पण जरा मागोवा घेतला तर जाणवते की, पाकिस्तानने वरकरणी कितीही कुराणाचे पाईक आणि इस्लामिक धर्माचे कट्टर अनुयायी दाखवले. पाकिस्तानने धार्मिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आपण भारतापासून किती दूर वेगळे आहोत, हे दाखवले. तरी सत्य हेच आहे की, पाकिस्तानच्या अंतःप्रवाहातल्या भारतीय कला संस्कृतीचा वारसा पाकिस्तान मारूच शकला नाही आणि शकतही नाही. मुळात पाकिस्तानच्या जन्माचा सिद्धांत मांडणाराच शायर, कवी होता मुहमद इक्बाल. पाकिस्तानने राष्ट्र म्हणून काहीही भूमिका घ्यावी, पण पाकिस्तानच्या जनतेमध्ये शायर इक़बाल, फैज अहमद फैज, अहमद फराज के अलावे गालिब, मीर, दाग़, जिगर इत्यादी उर्दू शायरांच्या गजल आजही प्रसिद्ध आहेत, तर गायकांची सुरेल मैफलही पाकिस्तानमध्ये आहे. गुलाम अली, मेहदी हसन, नुसरत फतह अली खान, राहत फतेह अली खान, अबिदा परवीन या गायकांची जादू पाकिस्तानभर आहे. आपले भारतीय गायक, सिने कलाकार यांच्यावर जीव टाकणारीही पाकिस्तानी जनता आहे.

 

असो. कोणाच्याही धार्मिक भावना निष्ठा यांना ठेच लावायची नाही, पण पुरोगाम्यांइतके पुरोगामी नसले तरी मानवतावादी असल्यामुळे मला इतकेच म्हणावेसे वाटते की, कोणत्याही धर्माच्या धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी जाताना (मग ते मक्का असो की मानसरोवर की अयोध्या की व्हॅटिकन चर्च की, सुवर्ण मंदिर की गयाचे विहार असू दे) तर या स्थळांना धार्मिकतेची पवित्र भावना घेऊन चाललेत म्हणून तिथे केवळ त्यांना धार्मिक बाबीच ऐकवल्या जाव्या, असे हे योग्य आहे का? पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) ने मदिना आणि जेद्दाला जाणार्‍या विमानसेवेमधून संगीताचे प्रसारण वगळून काय साधले? संगीतामधून असे काय ऐकवले जाते? हे गीत ऐकून प्रवाशांचे अल्लाहविषयीची अनुभूती बदलणार आहे का? हे संगीत ऐकल्यामुळे प्रवाशांची धार्मिक श्रद्धा बदलणार आहे का? मन विचलित होईलही, पण ती मानवी नैसर्गिक प्रवृत्ती आहे. समजा मन क्षणभर विचलित झाले, तर ते पाप आहे का? काय पाप आणि काय पुण्य हा प्रश्न सगळ्यात मोठा.

 

हिंसाचार, नशापान, भ्रष्टाचार, विश्वासघात, लैंगिक असमानतेतून केला जाणारा अत्याचार या गोष्टी पाप की पुण्य? अर्थात या गोष्टी प्रत्येक धर्मात पाप आणि हरामच मानल्या आहेत. पण हा हराम इमानेइतबारे होतोच ना? उलट खेदाने म्हणावे लागेल की, इसिस, अल कायदा, तालिबान, तेहरिक-ए-पाकिस्तान तालिबान, बोको हराम, हिजबुल्लाह, हमास सारख्या क्रूर दहशतवादी संघटना हिंसा करताना जाहीर करत असतात की, इस्लामच्या रक्षणासाठी आणि प्रसारासाठी ते हे कृत्य करतात. असो. या व इतर सर्व दहशतवादी संघटना मानवतेचा विश्वासघात करीतच आहेत. यात जगजाहीर आहे की, पाकिस्तान अशा संघटनांना फूस लावतो, मदतही करतो. मग हे हराम नाही का? नशेचा बाजार, भ्रष्टाचाराचा बाजार यातही पाकिस्तान मागे नाही. किंबहुना, पाकिस्तानच्या प्रत्येक नेत्याला भ्रष्टाचाराचा गुन्हेगार ठरवून शिक्षा झालेली दिसते.

 

मग हे सगळे हराम जर पाकिस्तान करतो तर केवळ मक्का आणि जेद्दाला जाणार्‍या विमानप्रवासात संगीताचा हराम बंद करून काय होणार? पाकिस्तानने कितीही धार्मिकतेचा आव आणला असेल तरी इस्लामिक कट्टरपंथियांना खुश करण्यासाठीच पाकिस्तानची ही खेळी आहे. मात्र, पाकिस्तानच्या या खेळीत इस्लाम आणि कुराणच्या मानवी सर्जनशिलतेच्याबाबत प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांची उत्तरं पाकिस्तान तसेच भारतातलेही तमाम निधर्मी, पुरोगामी, मानवी हक्कांचा लढा देणारे तथाकथित विचारवंत देतील का?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@